कणकवली : समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग तर्फे २०२५ सालचे नाट्य व काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदाचा जयंत पवार नाट्य पुरस्कार तरुण नाटककार उदय जाधव यांना जाहीर झाला आहे, तर प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कार कवी अक्षय शिंपी यांना प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे स्वरूप १० हजार रुपये रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि ग्रंथ संच असे आहे. या पुरस्कार निवड समितीमध्ये ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस, नीतीन रिंढे आणि रणधीर शिंदे यांचा समावेश होता. या समितीने साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान व गुणवत्ता लक्षात घेऊन विजेत्यांची निवड केली.
समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी साहित्य व नाट्यक्षेत्रातील तरुण लेखक, कवी आणि नाटककारांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. पुरस्कारांचे वितरण सोहळे लवकरच पार पडणार असल्याचे प्रतिष्ठानने जाहीर केले आहे.
उदय जाधव यांचा परिचय
‘कला ही फक्त करमणुकीचं साधन नाही, तर ती समाजाशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे,’ या जाणिवेतून काम करणारा रंगकर्मी म्हणजे उदय जाधव. कोकणातील दुर्गम खेड्यातून मुंबईत येऊन शिक्षण घेतं, कामगार वस्तीतल्या मुलांना मोफत प्रशिक्षण देणारा एक नाट्य शिक्षक, पथनाट्यांतून सामाजिक प्रश्न मांडणारा एक समाजभान असणारा कार्यकर्ता, प्रयोगशील नाट्यलेखक, आणि रुपेरी पडद्यावर कलात्मक दर्जा मिळवणारा दिग्दर्शक ! पंडित सत्यदेव दुबे, चेतन दातार आणि अजित भगत यांसारख्या दिग्गजांकडून नाट्य प्रशिक्षण घेतलेल्या या रंगकर्मींने पथनाट्यांचे लेखन-दिग्दर्शन आणि अभिनय करतानाचं, १०० हून अधिक पथनाट्यांचे सादरीकरण करत त्यांनी कामगार, महिला आणि बालकामगारांच्या समस्या थेट जनतेसमोर मांडल्या.
‘वस्ती’, हे त्यांचं स्किट तब्बल ७५ हून अधिक वस्ती ते रंगभूमीवर झळकले आहें आणि आजही तरुण रंगकर्मी ते मुक्तपणे सादर करतात. गार्गी, सारस, मुरळी, सफर, सारख्या एकांकिकांनी त्यांना प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून वेगळी ओळख मिळवून दिली.त्यांच्या गार्गी ह्या एकांकिकेचे महाराष्ट्रभर ५० हून अधिक प्रयोग झाले. अनेक स्पर्धामध्ये गार्गीला अनेक पारितोषिकंही मिळालेली आहेत. तसेच पृथ्वी, NCPA थिएटर्ससारख्या प्रतिष्ठित रंगभूमींवर या कलाकृतीला दादही मिळालेली आहे. गार्गीचे हिंदी भाषेतही प्रयोग झाले आहेत. त्यांनी आजवर प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून, अठरावा उंट, तुम्ही आम्ही आपण सारे, जय मल्हार, उभे आडवे धागे, मुक्ता या सारखी वेगळ्या धाटणीची नाटकंही सादर केली आहेत. तर अभ्यासपूर्ण मांडणी केलेलं, लेखन आणि दिग्दर्शन म्हणून त्यांचं इतिहासिक नाटकं, ‘देवानंपिय असोक’.हे सध्या व्यावसायिक रंगभूमीवर बहुचर्चित ठरले आहे. चित्रपट दिग्दर्शक म्हणूनही त्यांची कारकिर्द यशस्वी आहे.
अक्षय शिंपी यांचा परिचय
बिनचेहऱ्याचे कभिन्न तुकडे’ आणि ‘अव्याकृत’ हे कवितासंग्रह प्रकाशित असलेले अक्षय शिंपी हे व्यावसायिक स्तरावर पूर्णवेळ अभिनेता आणि लेखक म्हणून कार्यरत आहेत. ‘काय डेंजर वारा सुटलाय’, ‘ पुनश्च हनीमून’, ‘आधी बसू मग बोलू’, ‘अगदीच शून्य’, ‘ बॅकस्टेजवाला कोणी’ ‘Mr. & Mrs.’ ‘ मराठी वाङ्मयाचा घोळीव इतिहास’, ‘इन्विजिबल सिटी’ या मराठी नाटकांतून, तर ‘हॅलो फ़रमाईश’, ‘बस्ती में मस्ती’ ‘विरासत’, ‘हयवदन’, ‘राम सजीवन की प्रेमकथा’ या हिंदी नाटकातून अभिनेता म्हणून काम. ‘१९०९’, ‘चक्की’, ‘सेल्समन’ ‘हिजडा’ आदी चित्रपटांमधून अभिनय. विविध मराठी मालिकांमध्ये ही अभिनय.दास्तानगोई’ हा उर्दू कलाप्रकार मराठीत आणला.मुंबई शहरावरील ‘दास्तान-ए-बड़ी बांका’ आणि ‘दास्तान-ए-रामजी’ या मराठीतील दास्तानगोचे प्रयोग सुरू आहेत. त्यांचा ‘पीयूष बबेले’ लिखित ‘नेहरू: मिथक और सत्य’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद नुकताच प्रकाशित झाला आहे. ‘शंकर शेष फाउंडेशन, मुंबई’ ची शिष्यवृत्ती सलग तीन वर्ष जाहीर. शरद पवार इन्पायर फेलोशिप साहित्य विभागात जाहीर. साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती प्राप्त.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
