भाषा सक्ती, राष्ट्रीय एकात्मता, व्यक्तीवाद आणि मानसिक असुरक्षितता….
India,that is bharat shall be a union of states…असं भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलंय….त्यांनी Federation हा शब्द जाणीवपूर्वक नाही वापरला. का नसेल वापरला?…कधी विचार केला आहे ? याचं कारण ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी आधीच धर्माच्या नावावर देशाचं विभाजन झालं होतं…या देशात अनेक राष्ट्रकं आहेत हे संविधानकर्त्यांना माहिती होतं…म्हणून वापरला नाही. थांबा सांगते राष्ट्रकं म्हणजे काय ते…
वसुंधरा काशीकर
२८ राज्यं, त्या राज्यांच्या वेगवेगळ्या भाषा, लिपी, पेहराव, खानपानाच्या स्वतंत्र संस्कृती….अनेक धर्म, जाती. प्रत्येक राज्य हे राष्ट्रक आहे. म्हणजे भारताच्या प्रत्येक राज्यात राष्ट्र होण्याचं पोटॅन्शिअल आहे. हा धोका संविधानकर्त्यांना माहिती होता. त्यामुळे या देशाची अनेक शकलं होण्याची, तुकडे पडण्याची भीती संविधानकर्त्यांना जाणवत होती म्हणून त्यांनी केंद्र सरकार हे मजबूत ठेवलं. राज्यांना कमी अधिकार दिले. राज्याचं आर्थिक अवलंबित्व केंद्रावर ठेवलं. जेणेकरुन राज्य फुटून बाहेर पडणार नाही. म्हणून आपलं संघराज्य हे केंद्रोत्सारी आहे…म्हणजे राज्यांना केंद्राने अधिकार दिले आहेत…केंद्राला राज्याने अधिकार दिले नाहीत..जसे की अमेरिकेत घडले आहे, तिथे राज्य एकत्र आलेत आणि त्यांनी केंद्राची निर्मिती केली…केंद्राकर्षी पद्धत…म्हणून तिथे राज्य ताकदवान आहेत केंद्राइतकेच…भारतात मात्र तसे करुन चालणार नव्हते… म्हणून केंद्र बळकट केले…संविधानकर्ते दूरदर्शी होते.
आजच्या केंद्र शासनाचे धोरण हिंदी ही एक राष्ट्रीय भाषा म्हणून स्वीकारावी जेणेकरुन राष्ट्रीय एकात्मता आणि सुसुत्रता निर्माण होण्यास मदत होईल असे आहे आणि जे योग्यच आहे…कारण आपल्या राज्यांच्या भाषा जरी वेगवेगळ्या असल्या तरी संस्कृती मात्र आसेतु हिमाचल एकच आहे. भारतातली कुठलिही आई ही एकाच पद्धतीने मुलाशी वागेल. कुटुंबाचं महत्व, आजी-आजोबांचं नातवावर असणारं प्रेम, भावाचं बहिणीवर असणारं प्रेम, राखी, भाऊबीज हे सण …हे काश्मीर ते कन्याकुमारी सारखं आहे…
हिंदी ही राष्ट्रभाषा आहेच…पण दक्षिणेकडील राज्य ती मानत नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे असुरक्षितता. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा, झारखंड असा प्रचंड मोठा हिंदी बेल्ट आपल्याला दाबून टाकेल ही भीती त्यांना वाटते…देशाचा पंतप्रधान हिंदी बेल्ट ठरवतो. एकट्या उत्तरप्रदेशमधून ८५ खासदार निवडून येतात. तेव्हा त्यांची असुरक्षितता जायज आहे.
महाराष्ट्रात हिंदी पाचवीपर्यंत सक्तीची या प्रकरणात खासदार कनिमोळी करुणानिधीचं एक मोठं अंतर्दृष्टी असलेले वक्तव्य आलं होतं…की हिंदी बेल्टमधल्या लोकांनी पण तामीळ, तेलगू, मल्याळम्, कन्नड म्हणजे दक्षिण बेल्टमधली एखादी भाषा शिकावी. राष्ट्रीय एकात्मतेसाठी ते आवश्यक आहे. मला ही सूचना खूप महत्वाची वाटली.
तसं बघितलं तर पाचव्या वर्गापासून हिंदी आहेच. प्रश्न १ ते ५ वीपर्यंत तीन भाषा ठेवावा की नाही हा होता. ती पर्यायी भाषा म्हणून ठेवली असती तर कोणाचा काही विरोध नव्हता. पण सरकारने सक्ती केली आणि व्यवस्थेकडून प्रतिकूल प्रतिक्रिया आल्या…जनतेचा विरोध झाला. मी स्वत: व्यक्तीवादी आहे. शरद जोशींचा आयुष्याची गुणवत्ता कशी ठरवावी हा निकष मला भावतो. आयुष्याची गुणवत्ता कशी ठरवायची तर तुम्हाला आयुष्यात निवडीचं स्वातंत्र्य किती मिळतं…ती निवड करताना किती पर्याय उपलब्ध आहेत..यावर तुमच्या आयुष्याची गुणवत्ता ठरते.
उदाहरणार्थ – जिल्हापरिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलाला फक्त एसएससी बोर्डचा पर्याय उपलब्ध असतो आणि मराठी माध्यमाचा. शहरात शिकणाऱ्याला एसएससी बोर्ड, आयसीएसई बोर्ड, सीबीएसई, आयबी असे पर्याय उपलब्ध असतात. फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश इत्यादी कितीतरी भाषा शिकता येतात.. थोडक्यात शहरात राहणाऱ्या मुलाला जास्त पर्याय उपलब्ध असतात. निवडीचं स्वातंत्र्यही जास्त. पर्यायानं आयुष्याची गुणवत्ताही जास्त. पण सोबतच हे ही लक्षात घेणं आवश्यक आहे. पर्यायांची विविधता समाजानं, सरकारनं, खाजगी क्षेत्रानं उपलब्ध करुन देताना त्याची सक्ती करता कामा नये. ते मूलभूत स्वातंत्र्य या संकल्पनेच्या विरोधात आहे.
पर्याय उपलब्ध असणं महत्वाचं ते स्वीकारायचे वा नाही हे व्यक्तीनं आणि समाजानं ठरवायचं आहे. लादण्यातून मानसिक असुरक्षितता निर्माण होते. काही गोष्टी लादणं हे मानव हिताचं असतं…उदाहरणार्थ शहाबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय. लसीकरण. किंवा सतीबंदी कायदा. कारण त्यात अधिकतमाचं अधिकतम सुख आहे. ( Greatest happiness of the greatest number) स्त्रियांचा एक मोठा वर्ग ज्याची लोकसंख्या ५० टक्के आहे त्याचं सुख यात असल्याने हे कायदे महत्वाचे होते. त्याची सक्ती वैध होती.
पण भाषेच्या बाबत तसं म्हणता येणार नाही. राष्ट्रीय एकात्मता अत्यंत महत्वाची आहे. यात दुमत असू शकत नाही. राष्ट्र असेल तर अस्तित्व असेल. पण प्रचंड मोठ्या जनसमुदायात मानसिक असुरक्षितता निर्माण करुन राष्ट्रीय एकात्मता कधीच साध्य करता येणार नाही. त्यासाठी वेगळे दुवे शोधावे लागतील. वेगळे दुवे निर्माण करावे लागतील. समान इतिहास, ब्रिटिशांविरोधातलं आंदोलन, एकतेमध्ये विविधता, राष्ट्र म्हणून समान हितसंबंध, सुरक्षितता, अर्थकारण आणि संस्कृती हे ते दुवे आहेत.
हिंदीची सक्ती करण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांची जोपासना आणि त्या भाषांना प्रोत्साहन हाच राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याचा मार्ग असू शकतो. फूल हैं अनेक किंतू माला फिर एक हैं…एक-अनेक….असा. त्यातही मला वाटतं भारतीय संस्कृती हा राष्ट्रीय एकात्मता साधण्याचा सर्वात मोठा दुआ आहे. काश्मीर ते कन्याकुमारी आणि पूर्वांचल ते अरबीसमुद्र असे पसरलेले भारतीय जनमानस, त्याचं मन सारखंच आहे…त्याची विचारपद्धती सारखी आहे…भावूकता सारखी आहे…
अमृता प्रीतमचं फार सुंदर वाक्य आहे..हे वाक्य म्हणजे भारतीय संस्कृतीचं हृदय आहे..
ती म्हणते
माँ के चेहरे की जगमगाहट
बहनों के चुडियों की खनखनाहट
प्रेयसी के दुपट्टे की सरसराहट
और समय की आहट
सभी जगह एक जैसी होती है…
म्हणूनच धर्म एक असूनही पाकिस्तान फुटला आणि बांगलादेश निर्माण झाला. म्हणजेच धर्मापेक्षा संस्कृती मोठी आहे….सुंदर आहे… आपण राष्ट्रीय एकात्मतेसाठी संस्कृती जोपासूया…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
