September 24, 2023
Poems that create an optimistic outlook in children
Home » मुलांमध्ये आशावादी दृष्टिकोन निर्माण करणाऱ्या कविता
काय चाललयं अवतीभवती

मुलांमध्ये आशावादी दृष्टिकोन निर्माण करणाऱ्या कविता

पेन्सील घेऊन पाठीवरती रेघोट्या ओढणारी मुलं आता काचेच्या स्क्रिनवर बोटे फिरवू लागली आहेत. मुलांना मोबाईलच्या गमतीजमतीचे कुतूहल मुलांना वाटत आहे. मोबाईलची संगत आता सगळ्यांनाच कशी लागली आहे हे कवयित्री मुलांच्या भावनेतून सांगते. मुलांना मोबाईलवर शिक्षण घेण्यात मोठा आनंद होतो हे सांगते .

प्रा. रामदास केदार

मोबाईल – ९८५०३६७१८५

मुलांचे भावविश्व घडवत मुलांच्या मनात आशावादी दृष्टिकोन निर्माण करणारी कविता कवयित्री मालती सेमले यांनी बाग आम्हा मुलांची या बालकविता संग्रहात लिहिलेली आहे. मालती सेमले ह्या गडचिरोली जिल्ह्यातील कवयित्री असून त्या व्यावसायाने शिक्षिका आहेत. ‘सागरमोती हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला असून त्यांना मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.

मुलांच्या मनात आनंदाची बाग फुलावी, चेहऱ्यावरती निरागसतेचा भाव न फुलता प्रसन्नतेचा भाव फुलून यावा. या करिता कवयित्रीची ही धडपड आहे. आपल्या शालेय मुलांवर उत्तम संस्कार व्हावेत, चांगले विचार बालकवितेतून खोलवर त्यांच्या मनात रुजवावे म्हणून मुलांच्या आवडीचे प्रयोग करून मुलांच्या मनात आशावादी दृष्टिकोन पेरण्याचा कवयित्रीचा हा प्रयत्न दखलपात्रच आहे. कवयित्री ही आदिवासी भागात वाढलेली आहे. अशा आदिवासी भागातील शिक्षिका म्हणून संस्कार करतांना तारेवरची कसरत कशी करावी लागते ? हे सांगणे अवघडच ! या मुलांच्या बागेत संस्कारांची, विचारांची, प्रेरणेची झाडे, फुले आहेत. यातूनच मुलांना ज्ञार्नाजनाबरोबर निखळ आनंदही मालती सेमले देऊ पाहते आहे. काट्याकुट्यात, रानावनात, दगडधोंड्यात राहणारी गालात हसणारी मुलं कवयित्रीला वेलींवरच्या हसऱ्या फुलांसारखी वाटू लागतात. तो हसरा आनंद बागेतील फुलांच्या माध्यमातून कवयित्री उभे करते आहे.

रंगरंगुल्या फुलांची
बाग आम्हा मुलांची
तरुवेलीच्या संगतीने
नाचू गाऊया आनंदाने

शाळेतल्या काळ्या फळांचा लळा मुलांना कसा लागतो ? ते शिकवताना वेगवेगळ्या उदाहरण देऊन सांगते. अंक गणित शिकवतांना तो अंक कसा दिसतो ते समजून सांगते. आकाशातील चंद्राची उपमा ती देते.
आकाशातील चंद्र जणू
गोल गोल केक
उभी रेघ जोडताच
तयार होईल केक

शेतकरी जसा वेगवेगळ्या भाज्या लाऊन मळा फुलवतो तसाच अंकाचा मळा फळ्यावरती फुलतो आहे.

काळा काळा फळा
मला लावतो लळा
एका एका अंकाचा
त्यावर फुलवू मळा

सहलीतून मुलांना आनंदाबरोबरच ज्ञानाचा खजिनाही मिळतो. भौगोलीक आणि सांस्कृतिक पर्यावरणाचा अभ्यास होतो आणि नकार देणारी ही मुलं सकारात्मक दिशेने आपले पाऊल उचलत असतात. वेगवेगळ्या पक्षांची ओळख निर्माण होते. त्याची वेगळी ओळख कवयित्री करुन देते. आपली जशी शाळा तशीच पक्षांचीही शाळा असते. पक्षांच्या जगण्यांचे वेगळेपण आणि संदर्भ कवयित्री मुलांना सांगते.

घार उतरली आकाशातून
गरुड होता कोपऱ्यात बसून
बुलबुल, सुतार नि मैना हसली
बदकाची चोच निराळीच दिसली
पक्षांची भरली एकदा शाळा
शिक्षक बनला तुरेदार कोंबडा

हीच नवलाई मुलांना खूप आवडत असते. आपल्या जगण्याव्यातिरिक्त इतरही एक आनंदाचे जग असते. ते आनंदाच्या जगात विहार करण्यासाठी कवयित्री मुलांना या बागेत घेऊन जाते. तर आपले खरे सोबती कोण आहेत हे ही सांगते. घरातील आपल्या माणसांसोबत इतरही जीव लावणारी पाळीव प्राणी असतात त्यांची ओळख मुलांना करून देते.
मनीमाऊ, घोडा, बैल, गाय, बकरी, कोंबडी हे असतात.

सर्वांना आवडते कबरी गाय
तिच्या दुधावर रुचकर साय
दुडूदुडू धावते इवले वासरु
अवघ्या घराचे लाडके लेकरू
खुराड्यातून निघाली कोंबडी
अंगणामध्ये घालते लंगडी
अंगणात आमच्या फुलांची झाडे
मन प्रसन्न वाटतेय गडे

मुले प्रसन्नतेने नाचतांना आकाशातील तारे जमिनीवर खेळ मांडल्यासारखी कवयित्रीला वाटतात. मुले नाचण्यात दंग होतात, आपली भूक विसरतात, संगीतावर तल्लीन होऊन जातात. चेहऱ्यावरती मुखवटे आणि रंग लावून मोर नाचतो तशी नाचतात.

पायात घुंगरू छम छम छम
ढोल वाजती ढम ढम ढम

डोळे फिरवित नाचती सारे
धरतीवरती उतरले तारे

हीच खरी घरातली हसरी तारे आहेत. पाऊस म्हणलं की तो मुलांच्या जिव्हाळ्याचा आणि आनंदाचाच विषय आहे. पावसात भिजून चिंब चिंब होणे मुलांना आवडत असतं. काळ्या काळ्या ढगांतून पडणारे टपोरे थेंब आणि वाहत्या पाण्यावरची बुडबुडे पकडण्यातला तो आनंद, कागदांच्या होड्या सोडून मागे धावत जाऊन पकडणे. हे मुलांना मोहीनी घालणारे दृश्य असते.
वाजतात ढोल
ढगोबाच्या घरी
अंगावर झेलूया
पावसाच्या सरी

थेंब थेंब टपोरा
आकाशातून पडे
जागोजागी भरले
डबक्यांचे घडे

मोबाईल आला आणि मुलांसमोर एक नवीन क्रांतीला सुरुवात झाली. पेन्सील घेऊन पाठीवरती रेघोट्या ओढणारी मुलं आता काचेच्या स्क्रिनवर बोटे फिरवू लागली आहेत. मुलांना मोबाईलच्या गमतीजमतीचे कुतूहल मुलांना वाटत आहे. मोबाईलची संगत आता सगळ्यांनाच कशी लागली आहे हे कवयित्री मुलांच्या भावनेतून सांगते. मुलांना मोबाईलवर शिक्षण घेण्यात मोठा आनंद होतो हे सांगते .

बाबा बाबा सांगा ना
ही कशी आहे गंमत
ज्याने त्याने धरली
मोबाईलची संगत

नको नको मला
चॉकलेट, बिस्किट
मोबाईलमध्ये शोधीन
अभ्यासाचे किट

काळानुसार परिवर्तन होऊ लागले असून बैलगाडी ही मुलांच्या आवडीचा विषय असतो. आता बैलगाडी राहिलेली नाही. आदिवासी भागातील डोंगराळ भागात रस्ता अभावी बैलगाडीचाच उपयोग होतो आहे. बैलांसह सजवलेली गाडी पाणंद रस्त्याने घुंगरु वाजवत पळतांना मुलांच्या चेहऱ्यावरचे हसू कवयित्री टिपते आहे. गावात उड्या मारत हुप हुप करत माकडे कौलारूवरुन जातांना मुलांना आनंद वाटतो. सिंहांचा दरारा कसा असतो, हत्तीचे बळ कसे असते? हे सांगते. एखाद्या लग्न सोहळा मुलांना कसा आवडतो ? गावची जत्रा मुलांना वेड कशी लावते? मिठाई, फुगे, पेढे, घसरगुंडी हा आनंदी सोहळा मुलांना आवडतो.

वस्तूंची रेलचेल दुकानात भारी
मुलांच्या गर्दी उसळली सारी
मौत का कुँवा वाटे थरकाप
झुकझुक गाडीला लागली धाप

शिमगा, दिवाळी हा सण आवडीचा. मुलांची लगभग सुरु होते. रंग खेळताना आणि पणती लावताना होणारा आनंद आणि त्यातून बऱ्याच गोष्टींचे होणारे ज्ञान यामुळे मुलांच्या मनाची मशागत होते. पणती, उंच माझा झोका, नदीबाई, काळी काळी पाटी या कविता वाचनिय आहेत. मुलांच्या मनाची मशागत केली तर उत्तम संस्काराची रुजवण होऊ शकते. ही संस्काराची रुजवण कवयित्री मुलांच्या मनात खोलवर करते. अनुपमा उजगरे यांची प्रस्तावना तर दिलीप लोखंडे यांच्या शुभेच्छा आहेत. आतील चित्रे व मुखपृष्ठ प्रदीप खेतमर यांनी उत्तम प्रकारे रेखाटले आहे.

पुस्तकाचे नाव – बाग आम्हा मुलांची
कवयित्री – सौ. मालती सेमले
प्रकाशक – यशोदीप, पुणे
पृष्ठे – 43 किंमत –125 रुपये

Related posts

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात भूजलात वाढ

कोमसापतर्फे वाङ्मय पुरस्कारासांठी आवाहन

पंढरपूर येथील श्री रुक्मिणीमातेची सरस्वतीच्या रुपात पुजा

Leave a Comment