April 20, 2024
mrugajal-mage-pani-poetry-book-by-shriram-pachindre
Home » अतृप्त मृगजळी आयुष्याला पाणी दाखवणाऱ्या कविता
काय चाललयं अवतीभवती

अतृप्त मृगजळी आयुष्याला पाणी दाखवणाऱ्या कविता

कविवर्य श्रीराम पचिंद्रे यांचा ‘मृगजळ मागे पाणी’ हा पाचवा काव्यसंग्रह अतृप्त मृगजळी आयुष्याला पाणी दाखवणारा आणि जगण्यामरणाच्या विपरीत अनुभूती व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्तींचा तृष्णेचा प्रवास आहे. ज्यात प्रेम, विरह, कारुण्य, नातं, समाजभान, विसंगत अनुभव, वास्तव, तळमळ, तगमग आणि तडफडही आहे. पानापानांत मुक्त श्वास देणारे विषय आहेत. तृष्णा शमवणारे शब्द आहेत.

दयासागर बन्ने

देशिंग सांगली

खरेतर श्रीराम पचिंद्रे हे सुप्रतिष्ठित वृत्तपत्रात संपादक. प्रतिथयश कवी आणि गझलकार. यापूर्वी त्यांचे फुलोरा, सूर्यपंख ,आभाळाचे पंख निळे, लक्ष्यवेध हे काव्य संग्रह प्रकाशित. निसर्ग सामाजिक, प्रेम कविता आणि गझल लिहिण्यात त्यांचा हातखंडा .तितकंच गद्य लेखनही त्यांनी केले. त्यांच्या शाहू कादंबरीतील एक प्रकरण बालभारतीच्या अभ्यासक्रमात आहे. आता नवा काव्यसंग्रह दिलाच पाहिजे असे मनापासून वाटले, तेव्हा त्यांचा संग्रह आला, त्याचे नाव’ मृगजळ मागे पाणी’या संग्रहात यमकबद्ध रचना, मुक्त काव्य ,अभंग, मुक्तके, लावणी, गझल, हझल असे विविध काव्यप्रकार अविष्कृत झालेत.

सुजाता पेंडसे यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांची कविता धीरगंभीर आणि खोल समज घेऊन येते. प्रस्थापितांविरुद्ध अंगार होते. तितकाच हळवा आणि परखड असा त्यांच्या शब्दांचा बाज आहे .तत्त्व चिंतनाच्या आणि वास्तवाच्या मुशीतून हा कवी अनुभवांना सामोरे जातो.

प्रत्येक व्यक्तीची स्वतःची एक भूमिका असते. समूह भावना आणि वास्तव जरी त्या भूमिकेपेक्षा वेगळे असले तरी खरा कवी आपल्या भूमिकेपासून विचलित होत नाही. म्हणून एका कवितेत श्रीराम पचिंद्रे म्हणतात ,’ मी ऐकलीय तुझ्या आत्म्याची साद…, काळ्या मातीची त्वचा सोलून, हिरवी रक्तिमा पानापानातून, तशी तुझी भाषा, काळजातून उगवलेली.’ अशी स्वतःची शब्दकळा सापडलेला हा कवी भुसभुसीत वाळूचा निद्रिस्त किनारा व्हायला नाकारतो आणि म्हणतो,’ नाजूक फुलांचे हृदयी मी रसरसणारा अग्नी, वरतून राख जमलेला पण थंड निखारा नाही. ‘या कवीला शब्दांच्या पोटातील मौनाचा गाभारा खुला करायचा आहे,म्हणून ते अभिमानाने दाखवून देतात, ‘फुटतात अक्षरे आशय घेत उराशी, क्षितिजावर पडल्या या तुकड्यांचा राशी…’

या राशी म्हणजे चमकत्या तारका आहेत ज्यांनी आपले जगणे अधिक प्रकाशमान होते. या संग्रहातील सुरुवातीच्या काही कविता प्रेमविषयक, भावभावनांच्या ,आठवणींच्या, विरहाच्या आणि नात्यांच्या नाजुक धाग्यात विणणाऱ्या आहेत. ‘तुझे माझे नाते, उत्कट इतुके, भुकेचे पोटाशी, असते तितुके.’ असे एकजीव झालेले हे नाते आहे. जे कवीचेच नाही तर तुमचे आमचेही असते.’ किती मोहविती तुझ्या भावमुद्रा, कसे आवरावे मनीच्या समुद्रा ?’ असे भाव ते व्यक्त करतात.

आपकी याद आये तो… असे भाव अनेक कवितात फुलले आहेत. डोळ्यांच्या काळ्याशार डोहांत दोघे बुडालेले, पण कोणी जातो साथ सोडून. मग ‘माझ्या आतबाहेर सतत वावरणारी तू .. अविरत कोसळणारी आनंदाची वृष्टी तू … आयुष्यातील उणीव तू.. व्यवहाराचे नेणीव तू..’अशी जाणीव कवीला होते. विरहाच्या जंगलातही आठवणींचे पक्षी फिरू लागतात. त्यामुळे कवी म्हणतो, ‘वाऱ्यावरून आता आली तुझी खुशाली’ मग तो राधेच्या डोळ्यांमधला घननीळ तिच्या डोळ्यातील आभाळात बघू इच्छितो, त्यासाठी शब्दांचे ताटवे लावताना कवी म्हणतो की, ‘वाटेवर ठेवतो मी पावलांचे काही ठसे, तुझ्या मनात लावतो, माझ्या डोळ्यांचे आरसे..’ अशी कधी विफल, कधी सफल प्रेमाची कविता या संग्रहात पानापानावर भेटते.

जगण्याच्या लढाईत पराभूत झालेल्या माणसांच्या व्यथा कथाही कवीने शब्दबद्ध केलेल्या आहेत. ‘जन्माच्या तृष्णेसाठी हे मृगजळ मागे पाणी, मौनाच्या सांजकिनारी उच्श्वास ऐकतो गाणी..’या मुक्तकातून हे भाव ते व्यक्त करतात. तर बाजार कवितेतून सारा जन्म भंगार झाला असताना आणि डोळसांनी अंध मैत्रीचा खुला व्यापार मांडला असताना वेदनेची कारणे काय सांगावीत असे वाटून ते लिहितात,’शस्त्र त्यांनी पेलले हाती जरी, झेलला मी आसवांचा वार हा..’ दिलासे फितुर झाल्यावर कुठून खुलासे आणावेत ? सगळे फासे उलटे पडल्यावर पराभवा तूच आता ये असे त्यांना वाटते. प्रवास कवितेत आयुष्याची भटकंती सुरू झाल्यावर ही वनवन आपण का करतो ,जगण्याचा हा प्रवास मारण्यासाठी आहे का? जगणे मरणाच्या तोंडाशीच नेते आणि आत्मा चिरंतनाचा पाठी … असे जीवन सत्य कवीने प्रगट केले आहे. तर ‘आयुष्य रद्दीच्या कागदासारखं असतं, टेरिकाॅटच्या शर्टाआत गन्जिफ्राॅकला भोक असतं..’ अशा प्रतिमेतून जगण्याचे बकाल वास्तव प्रगट केलं आहे.

तरी अशा बकालपणात आणि आयुष्याच्या उजाड वनात कवीला जगण्याच्या काही वाटा आणि सुगंधाच्या पेठा सापडतातच. मग काय ते लिहितात, ‘तुझ्यासारखे फूल सृष्टीत नाही, तुझ्याविना कोणीच दृष्टीत नाही, तुझे नेत्र खुलताच फुलतात बागा, तुझ्या स्वागतालाच झुलतात राने, … विधाता जरी पैज घेईल आता, असे रुप केव्हाच घडणार नाही..’अशी काही जगण्याची हिरवळ भेटत राहते आणि मग आयुष्य सुखाच्या प्रवासास फिरू लागते.

सुखदुःखांच्या फेऱ्यात आयुष्य सरते. प्रकाश अंधाराच्या पाठशिवणीच्या खेळात रमते. दुःखांशी खेळते. जिंकते. हरते. सफल होते. विफल होते. त्यांच्या कडू-गोड आठवणी कोणत्याही साहित्यात शब्दात रूपांनी प्रकट होत असतात. अनुभवांचे आणि समकालीन पर्यावरणाचे साहित्यिक भान किती खोल आहे यावर कोणत्याही कवीची कविता आपली भावमुद्रा काळावर उमटवत असते. त्या अर्थाने कविवर्य श्रीराम पचिंद्रे यांच्या कवितांकडे पाहिल्यास या कविता विसंगत अनुभूतीला पकडणाऱ्या सामाजिक भान जपणाऱ्या, नात्यांना कवेत घेणाऱ्या आणि जगण्याच्या लढाईत नेकीची सोबत करणाऱ्या आहेत. म्हणूनच महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन त्या आतून आलेल्या आहेत.

माणसाच्या विपरीत परिस्थितीतच माणुसकीची खरी ओळख होत असते. सौख्याच्या, आनंदाच्या क्षणात सोबत असणारे दारिद्र्याच्या आणि दुःख वेदनेच्या काळात कुठे दूर पळून जातात, असे काही अनुभव सामाजिक कवितांमधून आणि गझलांमधून कवी श्रीराम पचिंद्रे यांनी रेखाटले आहेत.

धमन्यांमध्ये रक्त जळू लागल्यावर उसासणाऱ्या शब्दांमधून अर्थ छळू लागतात असे त्यांना वाटते. ते लिहितात , ‘कधी अनावर वळणावरती भेटत होते थवे,
कसे अचानक रस्त्यांमधुनी तेच वळू लागले..’

नेकीने राहणाऱ्या व राबणाऱ्या माणसाला जगात थारा नाही हे स्पष्ट करताना कवी लिहितो, ‘पाय ओढतो त्याला मिळतो मानमरातब मोठा , पाय धराया वाके त्याच्या पाठीमध्ये रट्टा’
असे व्यक्तिगत अनुभव जेव्हा सर्वजणांना समकालात अनुभवास येतात, तेव्हा व्यवस्थेचे फास बळकट होतात. हे फास वेळीच काढण्यासाठी कवी मग शब्दातून अस्वस्थता व्यक्त करत विद्रोहाची पेरणी करतो. भूक कवितेत कवी कुठलाच पक्ष माझ्या पोटाला घालत नाही, कुठलाच वाद भुकेशी संवाद साधत नाही हे सांगत व्यवस्थेला खडसावत म्हणतो,
‘सगळे धर्मजातपंथाला जीवनवादी वाद पेटवा
त्याच आगीवर समस्तांचे विचार
शिजवा किंवा भाजा
आणि वाढा गरिबाला
काहीतरी द्या पोटाला…’

पोटापाण्याचे असे प्रश्न छळत असताना बळी जाणारे बळी जातात, बळी घेणारे बळी घेतात.. हे कुठवर चालायचं असे सनातन प्रश्न कवीला पडले आहेत. ‘मरण तुमचे टळत नाही’अशी जाणीव कवी समकालाला करून देत आहे. हे या कवितेचं फार मोठे यश आहे.

भुकेच्या प्रश्नाबरोबरच अभिव्यक्तीवर गदा आणणारे आणि भय आणि धाक दाखवणारे अदृश्य हात वाढू लागल्याचे खंत कवी या संग्रहात व्यक्त करतात. बुद्धी विकत घेणारे किंवा बुद्धीची भीक मागणारे अदृश्य धाक दाखवत असतात ,अशावेळी जगावे की मरावे हा प्रश्न आम्हाला कधीच सतावत नाही कारण आमचे जगणे हीच असते आमची आत्महत्या …अशी परखड कविता देऊन रसिकांच्या मनातला असंतोष कवी उजागर करत आहे. अशा अस्वस्थतेतून कवी म्हणतो,’ पाखरांनो उठा, बांडगुळांचं बीजच चोचीनं टिपून काढा, का की यांचा जन्मच होता कामा नये… झाडं जगायची, तर हेच आवश्यक आहे !’

काव्यसंग्रह: मृगजळ मागे पाणी
कवी: श्रीराम ग. पचिंद्रे
प्रकाशक: यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे
पृष्ठे: ११२ मूल्य: १२५ रुपये


Related posts

सावळी

आतून सोलून निघणार्‍या सामान्य माणसाचा हंबर : ब्लाटेंटिया

प्रगल्भ प्रतिभेचा आविष्कार: आवडलं ते निवडलं

Leave a Comment