फावल्या वेळेचा फायदा घेत डॉ. पाटील यांनी वाचनालयातील सभासद महिला व मुलींनी जर्मन भाषा शिकण्यासाठी प्रवृत्त केले. तनिषा कपाले हिने जर्मन भाषेची ही कार्यशाळा ऑनलाईन घेतली. 21 दिवसांचा हा कोर्स होता. आता या सभासद महिलांना जर्मनही येते.
लेखन – राजेंद्र घोरपडे
मातृभाषेव्यतिरिक्त अन्य भाषांवरही तेवढेच प्रभुत्व असणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील महिलांनीही यात मागे असता कामा नये, या उद्देशाने डॉ. अपर्णा पाटील यांनी वडणगे (ता. करवीर) गावात महिलांमध्ये जागृती केली. वडणगे येथील श्रीमती चंद्रप्रभा शंकरराव पाटील महिला वाचनालयाच्या माध्यमातून याबाबत त्यांनी विविध उपक्रम राबविले. महिला व मुलींसाठी कार्यशाळा आयोजित केल्या. पण, खरंच मराठीव्यतिरिक्त इंग्रजी वा अन्य परदेशी भाषा येण्याची गरज आहे का? का म्हणून आम्ही ही भाषा शिकायची? आम्हाला याचा फायदा काय? ही भाषा शिकून काय करायचे? प्रत्येक ग्रामीण महिलेला पडणारा हा प्रश्न येथील महिलांनाही पडला. पण, या वाचनालयातील सभासद महिला आज इंग्रजी बोलतात. महिला इंग्रजी वाचनही आवडीने करीत आहेत. त्यांच्यात शिकण्याची जिज्ञासा निर्माण झाली. लॉकडाउनमध्ये या महिलांनी आता जर्मन भाषाही शिकली आहे.
अन्य भाषांचे महत्त्व सांगताना डॉ. पाटील यांनी एक घडलेली घटना सांगितली. त्या म्हणाल्या, “”गावातील दोन मुलींची राष्ट्रीय पातळीवरील बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली होती. स्पर्धेसाठी त्यांना राज्याबाहेर जावे लागत होते. त्यांच्याबरोबर नेहमी त्यांचे वडील जात असत, पण वडिलांना नोकरीच्या कामामुळे एकदा जाणे जमले नाही. त्या वेळी या मुलींसोबत त्यांच्या आईला जाण्याची वेळ आली. स्पर्धा हैदराबाद येथे होती. मुलींसोबत जायचे तर इतरांशी अन्य भाषांत संवाद साधावा लागणार होता. राज्याबाहेर मराठी तर कोणीच बोलत नाही आणि हैदराबादमध्ये फारसे हिंदी कोणी बोलतही नाही. अशावेळी त्यांच्याशी इंग्रजीतच संवाद साधण्याची गरज होती. वाचनालयातील कार्यशाळेत इंग्रजी संभाषण शिकल्याचा फायदा त्यांना इथे झाला. स्पर्धेदरम्यान मुलींची बॅडमिंटन रॅकेट हॉटेलवर विसरली होती. स्पर्धा थोड्याच वेळात सुरू होणार होती. अशा वेळी ती रॅकेट तातडीने आणणे गरजेचे होते. त्या वेळी मुलींच्या आईने धाडस केले. टॅक्सीवाल्याला इंग्रजीत समस्या समजावून सांगितली. त्यामुळे त्यांना पटकन हॉटेल गाठता आले व रॅकेट आणता आली. या घटनेनंतर अन्य महिलांनाही भाषेचे महत्त्व वाटू लागले. मला काय गरज आहे इंग्रजी संभाषण शिकण्याची? ही वृत्ती या महिलांतून निघून गेली. महिलांमध्ये आता इंग्रजीबरोबरच अन्य भाषा शिकण्याची इच्छा निर्माण झाली आहे.
फावल्या वेळेचा फायदा घेत डॉ. पाटील यांनी वाचनालयातील सभासद महिला व मुलींनी जर्मन भाषा शिकण्यासाठी प्रवृत्त केले. तनिषा कपाले हिने जर्मन भाषेची ही कार्यशाळा ऑनलाईन घेतली. 21 दिवसांचा हा कोर्स होता. आता या सभासद महिलांना जर्मनही येते. नवीन भाषा आल्याने अनेक गोष्टी आत्मसात करता येऊ शकतात. त्या भाषेतील संस्कृती, परंपरा याची माहिती होते. यातून खूप काही घेण्यासारख्या गोष्टी आहेत. या महिला अनुवादाचे कामही घरबसल्या करू शकतात. वाटले तर यात त्या करिअरही करू शकतात. विशेष म्हणजे परदेशी भाषाही आपण शिकू शकतो, हा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला.
लेखन – राजेंद्र घोरपडे
माैनी महाराज शिवाजी महाराज यांचे गुरु…वेबसाईट पाहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा