September 27, 2023
Dr Prajakta Mangesh Kolapkar Success Story
Home » मुलांच्या आयुष्यात आनंद पेरणारी प्राजक्ता
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

मुलांच्या आयुष्यात आनंद पेरणारी प्राजक्ता

ही कहाणी आहे आपल्या ध्येयपूर्तीसाठी चंद्रपूरहून कोसो मैल पलायन करुन पुण्यास आलेल्या एका मुलीची. एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या, एकाच वेळी विविध क्षेत्रात आपली नाममुद्रा उमटविणाऱ्या आणि सतत नावीन्याचा शोध घेणाऱ्या विदर्भ कन्या डॉ प्राजक्ता कोळपकर यांची. प्राजक्ताचा आजवरचा हा प्रवास आपणास थक्क करून टाकणारा आहे. कला, क्रीडा, नृत्य, आकाशवाणी व दूरदर्शन निवेदिका, कवयित्री, अभिनेत्री, वृत्तपत्रीय लेखिका, समुपदेशक, वक्ता, पाळणाघर आणि दिव्यांग मुलांसाठी अकॅडमी अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्राजक्ताच्या प्रवाही प्रवासात आपणही रममाण होऊन जाल. तिची जीवन – कहाणी जितकी मनाला हुरहूर लावणारी आहे तितकीच प्रेरणा देणारी आहे.

शब्दांकन – प्रा चंद्रकांत खांडगौरे

प्रवरानगर
मोबा. नं. ९८६०११६६००

अतिशय सर्वसामान्य आणि हलाखीच्या परिस्थितीत, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे प्राजक्ताचा जन्म झाला. वडील बाबू म्हणून काम बघायचे. फार कठीण काळ होता तो. वडिलांचे नाव नानासाहेब बोराडे आणि आई आशालता बोराडे. वडिलांकडे खूप गरिबी तर आईकडे खूप श्रीमंती होती. पण आईची साथ बाबांना खूपच मोलाची ठरली. बाबा नेहमीच दौऱ्यावर असायचे. त्यामुळे प्राजक्ता जी घडली ती आईमुळेच. पाच वर्षाची असताना आठ फूट उंच बांधलेल्या झोक्यातून ती खाली पडली. खाली शहाबादी फरशा होत्या. खाली पडल्यावर किमान पाच मिनीटे ती रडलीच नाही; त्यामुळे आई आणि सगळ्यांचीच रडारड सुरू झाली. पाच मिनिटांनंतर ती रडली; तर शेजारची आजी म्हणाली, “पुनर्जन्म आहे पोरीचा. खूप नाव काढेन…..!”

शिक्षणाची सुरुवात आरमोरी (जि. गडचिरोली) या छोट्याशा गावातून झाली. अतिशय हुशार आणि अभ्यासू असणारी ही बालवाडीच्या वयातच पहिलीला गेली. दुसरीपासून चंद्रपुरात शिक्षण सुरू झाले. अभ्यासात चांगली गती होती. दुसरीत असताना पहिले भाषण केले. १५ ऑगस्टला १९८३ साली, तिथूनच खऱ्या अर्थाने वक्तृत्वाची पायाभरणी झाली. हा वारसा बाबांकडून मिळाला. पुढे वाकचातुर्य वाढत गेले. शहर – तालुका – जिल्हा – राज्य – राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वक्तृत्वाचा ठसा उमटवला आणि शिक्षण संपेपर्यंत किमान ३०० बक्षिसे मिळवली. दर वर्षी महाविद्यालयाला किमान ३५ सांघिक बक्षिसांची खैरात असायची.

पाचवीत असताना पहिल्यांदाच दोन अंकी नाटक लिहिले. त्यात नाट्यलेखन व अभिनयाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्यावेळेस माजी खासदार शोभाताई फडणवीस म्हणाल्या होत्या, “एक नवी लेखिका महाराष्ट्राला मिळाली.” आज प्राजक्ताचे विविध वृत्तपत्रात सातत्याने लिखाण सुरू आहे. एखादा चित्रकार कुंचल्याच्या सहाय्याने रंगांची उधळण करुन चित्र साकार करतो, त्याप्रमाणे आपल्या सिध्दहस्त लेखणीतून प्राजक्ताने अनेक व्यक्तिंची व्यक्तिचित्रे, शब्दचित्रे साकारलेली आहेत. त्या शब्दांच्या किमयागार आहेत. तीन हजार कविता, १५० ललित लेख, १५ एकांकिका, आणि १०० वैचारिक लेख ही त्यांची आजवरची मालमत्ता आहे.

शिक्षणात गती चांगली होती. १२ वी पर्यंत विज्ञान शाखेची विद्यार्थिनी असूनही कला शाखेकडे जाण्याची ओढ होती. चंद्रपूर येथील फिमेल एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात कला शाखेत (एफ. वाय. बी. ए.) प्रवेश घेऊन मेरिटची मानकरी ठरली. ‘मराठी वाड्:मयाची’ उत्तरपत्रिका ‘उत्कृष्ठ उत्तरपत्रिका’ म्हणून सगळ्या महाविद्यालयात दाखविली जायची. आणि विशेष म्हणजे ही उत्तरपत्रिका ७५ पाने लिहिली होती; आणि ही एक उच्चांकी नोंद होती. एफ. इ. एस. कॉलेज मधील १९९३ ला Best Student of The Year हा अवॉर्ड प्राजक्ताला तत्कालीन महाभारत या दूरदर्शन मालिकेतील भीष्म – मुकेश खन्ना यांच्याकडून मिळाला होता. त्यानंतर किमान सात वर्ष हा पुरस्कार कोणालाही दिला गेला नाही. “प्राजक्तासारखी अष्टपैलू विद्यार्थिनी मिळणे नाही”. असे माननीय प्राचार्य पिसे सरांचे म्हणणे.

प्राजक्ता सांगत होती की, “अभ्यासाबरोबरच हँडबॉल या खेळातसुध्दा मी आघाडीवर होती. नॅशनल, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी या सर्व स्तरावर खेळण्याची संधी मला मिळाली. अभिनयासाठीची पारितोषिके पदरात पडत गेली. एन. सी. सी. आणि एन. एस. एस. साठी राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. २६ जानेवारी १९९८ ला प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथील ध्वज संचालनाच्या मानवंदना परेडसाठी माझी निवड झाली होती. हे करत असतानाच इजिप्तची राजधानी कैरोसाठी भारतातून एकल नृत्यासाठी ही माझी निवड झाली. हा सगळा यशस्वी प्रवास करत असताना १९९९ ला एक मानाचा तुरा माझ्या टोपीत खोवला गेला, तो म्हणजे अभिनय, नृत्य, वक्तृत्व, वादविवाद, खेळ या पाच विभागातली मी एकटी युनिव्हर्सिटी कलर व्होल्डर होते. मला नागपूर युनिव्हर्सिटीकडून एकाच वर्षी पाच ब्लेझर मिळाले होते.

प्राजक्ता बोराडेला स्पर्धक म्हणून येऊ देवू नका, परीक्षक म्हणून आणा; ती आल्यावर कोणालाही बक्षीस मिळत नाही.” असा एक अर्ज नागपूर विद्यापिठाला कोण्या एका महाविद्यालयाने केला होता. रोज कुठल्या तरी पेपरला बातमी – फोटो असायचा आणि नागपूरला शिकत असतांना बातमी चंद्रपूरपर्यंत जायची. आई – बाबांनी कधीच माझ्या कुठल्याच स्पर्धांना हजेरी लावली नाही; कधीच कौतुक केलं नाही, पण त्यांनी कशाला नाही म्हटलं नाही. म्हणजे अनपेक्षितपणे त्यांनी मला प्रोत्साहीतच केले आहे; त्यासाठी मी त्यांची आयुष्यभर ऋणी आहे.

डॉ प्राजक्ता कोळपकर, मोबा. नं. ९८८१९०७२४१ / ९२८४२२२६३५६

पुढे ती म्हणते, “नागपूरला मास कम्युनिकेशन म्हणजेच पत्रकारितेचा अभ्यास करायला आल्यावर घरून पैसे घ्यायचे नाही, हे मनाशी पक्के ठरवले होते. म्हणून हजाराची स्पर्धा मारण्याची कुवत असतानाही मी शंभर रुपयाच्या स्पर्धेतही सहभागी व्हायचे. बी. ए., एम. एस. डब्ल्यू., एम. ए. ( समाजशास्त्र) चंद्रपूर येथे तर मास कम्युनिकेशन (पत्रकारिता), एम. एफ. ए. (मास्टर ऑफ फाईन आर्ट इन ड्रामा) आणि पुढे पीएच. डी. (बालविकास) असा माझा शैक्षणिक प्रवास मेरिटसह झाला. उत्कृष्ठ अभिनेत्री, नागपूर आकाशवाणी व दूरदर्शनवर निवेदिका, गोष्टीची गोष्ट, संवाद माझा माझ्याशी, गोष्ट कशी तयार करावी ? आदी यशस्वी उपक्रम मी राबविले. परिवर्तन ही स्वलिखित डॉक्युमेंटरी फिल्म महाराष्ट्रातील कारागृहात दाखविण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून मान्यता मिळाली होती. ज्याचे अनावरण श्री श्री रविशंकर याच्या हस्ते झाले होते.”

“अभ्यासात हुशार आणि विविध गुणांवर अधिराज्य गाजवणारी; तरीही आयुष्यात वेगळे काहीतरी करायचे, याने झपाटून गेलेली; मात्र काय करायचे? हे ठरत नव्हते. नागपुरात एम. एफ. ए. (नाटक) शिकत असताना पुण्याचे वेड मला स्वस्थ बसू देत नव्हते. एक संधी मिळाली आणि चक्क घरातून पलायन करुन मी पुण्याला आले. पुण्यात मित्र, मैत्रिणी, नातेवाईक कुणीही नसताना येथे राहण्याचे धाडस केले. नंदादीप या ग्रीटिंग कार्ड कंपनीला मी कॉपी रायटर म्हणून रुजू झाले. खूप चांगली, मानाची आणि माझ्या आवडीची नोकरी होती; मात्र तेचतेच साचेबद्ध काम करणे मला मान्य नव्हते. कारण काहीतरी वेगळे करायचे यानेच झपाटले होते. मी अवघ्या सहा महिन्यात नोकरी सोडली आणि पुणे व मुंबईच्या सगळ्या ग्रीटिंग कार्ड कंपनीला फ्री लांसिंग केले त्यातही छान जम बसला. तरीही काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास मला त्रास देत होताच. अशात आयुष्याला एक कलाटणी मिळाली ती म्हणजे पुण्याच्या मंगेश मधुकर कोळपकर यांच्याशी लग्न झाले. त्यामुळे हक्काचे घर मिळाले. मंगेश हे सकाळ वृत्तपत्रात वरिष्ठ पत्रकार असून त्यांच्या सहकार्याशिवाय सक्षम पावले उचलणे शक्यच नव्हते. काही दिवस फ्री लांसिंग करत असताना मी गरोदर राहिले आणि दुर्दैवाने माझे पहिले बाळ दगावले. तो धक्का मला सहन करणे आणि पचवणे जड गेले. ‘मी संपले’ ही भावना मनात बोकाळत होती. कशीबशी त्यातून सावरून मधल्या काळात मी रांगोळ्या शिकव, राख्या शिकव, मेहंदीच काढायला जा, दागिने कर अशी वाट्टेल ती कामे केली. माझ्यातला आत्मविश्वास जणू संपला होता. मला सर्वसाधारण लोकही उपदेश करायला लागले की, वडापावची गाडी लाव, S T D त काम कर, साड्यांच्या दुकानात काम करशील का? या वाक्यांची माझीच मला लाज वाटली.

“माझ्या वाकचातुर्यावर महाराष्ट्र गाजविणारी मी, नृत्यासाठी दिल्ली, कैरोला (इजिप्त) जाणारी मी, रिपब्लिक डे ला दिल्लीला जाणारी मी, हँडबॉल मध्ये ऑल इंडिया खेळणारी मी, विसाव्या वर्षापर्यंत तीन हजार कविता लिहिणारी मी, अशी कशी काय हारु शकते? हा माझाच मला सवाल! शेवटी धाडसाने एक दिवस मीच माझ्या मनाशी ठरवले, मी इतके मोठे गमावले त्याच्या दुपटीने कमावून दाखवीन. पण मधले सहा वर्षे मी कशी काढलीत माझे मलाच माहित. माझ्या कलागुणांचा जिथे उपयोग होईल आणि मी माझ्या सगळ्या कला दुसऱ्यांना देऊ शकेन, असे काहीतरी करायचे ठरवले. त्यात मला प्रकर्षाने जाणवले की, पुण्या – मुंबईच्या मुलांचे बालपण हरवत चालले; तेव्हा मी मनाशी ठरवले की, इथल्या मुलांचे बालपण जसेच्या तसे देण्याची आपण जबाबदारी स्वीकारावी. तोपर्यंत मला एक मुलगी झाली. गार्गी च्या जन्मानंतर पुन्हा उडण्याचे बळ मला मिळाले आणि तिच्या पायगुणाने पुन्हा स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी सज्ज झाले आणि गार्गीस फन वर्ल्ड या आधुनिक पाळणाघराची निर्मिती केली.

सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत शिवाय साडेचार महिन्यापासून ते दहा वर्षापर्यंत किमान १००० मुले इथे येऊन हे पाळणाघर पुण्यात अव्वल क्रमांकावर विराजमान झाले. तेव्हा गरज होती म्हणून नॉर्मल मुलांसोबत दिव्यांग मुले घेतली आणि प्रवास सुरु झाला. आता याच दिव्यांग मुलांसाठी तीन वर्षांपूर्वी पिन्याकल रिक्रिएशन अकॅडमी घडली. यात पंधरा ते साठ वयाची सर्व प्रकारची दिव्यांग मुले आहेत. या मुलांना दुरुस्त करणे आणि समाजाच्या प्रवाहात आणणे हा माझा उद्देश नाही तर या मुलांच्या जन्मापासून आईचं आयुष्य खऱ्या अर्थाने संपलेलं असत, म्हणून तिला सांगणे आहे, तू हे मुल माझ्याकडे सोपव आणि तुझं उर्वरित आयुष्य तरी तुझ्या मनासारखं जग. या आयांच्या डोळ्यातून वाहणारे समाधानाचे आसू मला खूप शक्ती देतात. मागच्या जन्मी या मुलांनी माझ्यासाठी खूप काही केलं म्हणून या मुलांसाठी मी खूप काहीतरी करुन परतफेड करावी आणि त्यांच्या आयुष्यात आनंद पेरावा हीच मनापासून इच्छा.” आता प्रा फाँडेशन च्या माध्यमातून हे सगळं काम सूरु आहे.

दुनिया म्हणे कळे न त्यास काही पण आम्ही म्हणतो… जग कळे तयासी. गुज मनीचे कळे न केव्हा पण एकमेकां सवे पूर्ण आम्ही..!!! आयुष्य म्हणजे शरीर, मन, भावना, इच्छा, प्रेम, स्वप्न, स्वत्व, मान, अपमान, अभिमान अशा अनेक व्यक्त अव्यक्त गोष्टींचा गोषवारा. यातील एक जरी गोष्ट कमी असेल तर आयुष्य अधुरे असल्याचा भाव. पण यातल्या बऱ्याच गोष्टी नसतानाही आयुष्य जगता येतं, हे Pinnacle Recreation Academy ने सिद्ध करुन दाखविले आहे.

डॉ प्राजक्ता कोळपकर

PRA Foundation च्या अंतर्गत पिन्याकल रिक्रिएशन अकॅडमी ही संस्था गेली १२ वर्षे दिव्यांग मुलांसाठी काम करत आहे. डॉ प्राजक्ता मंगेश कोळपकर या ह्या संस्थेच्या संस्थापिका आहेत. लेखन, नाट्य, रंगभूमी या आपल्या आवडत्या क्षेत्राला कायमचा रामराम ठोकुन त्या या वेगळ्या क्षेत्रात रममाण होऊन कार्यरत झाल्या. सुरवातीला गार्गीस फन वर्ल्ड ने याचा पाया रचला. धावपळीच्या जीवनात मुलांना त्यांचं हक्काचं बालपण देण्यासाठी गार्गीस फन वर्ल्ड सज्ज झालं. सुरवातीला अगदी गरज म्हणून नॉर्मल मुलांबरोबरच स्पेशल मुलंसुध्दा डे केअरचा एक अविभाज्य घटक बनले. मग हळूहळू हे लक्षात आलं की, ही मुलं एकमेकांबरोबर खूप छान वाढतात. कोणतीही गोष्ट यांच्या मैत्रीच्या, वाढीच्या आड येत नाहीये. कोणतीही थेरपी न देता सुद्धा निव्वळ शुध्द प्रेमाच्या जोरावर ही वाटचाल खूप जोरदार सुरू झाली.

स्पेशल मुलांसाठी शाळा फक्त वयाच्या १७ व्या वर्षापर्यंतच आहेत. पण पुढे यांचं काय ? या विचाराने अस्वस्थ झालेल्या डॉ प्राजक्ता यांनी फक्त दिव्यांग मुलांसाठी नवीन सेन्टर उभारण्याचे ठरवले आणि या मुलांना समाजाने माणूस म्हणून स्वीकारावे यासाठीची एक अवघड लढाई सुरू झाली. या अकँडमीमध्ये सर्व प्रकारची दिव्यांग मुले आहेत. स्पास्टीक, अॉटिस्टिक, सीपी, स्लो लर्नर सगळ्याच प्रकारची, आणि तेही वय वर्ष १५ ते ५५ या वयोगटातील. त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करू देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जातो. त्यांच्या जीवनात आनंद मिळवून देण्यासाठी हरतऱ्हेच्या गोष्टी इथे केल्या जातात. जसे ज्यांना गाण्याची आवड आहे त्यांच्यासाठी गाणं शिकणे, ज्यांच्या हातात कला आहे त्या करण्यासाठी त्यांना मदत करणे. या मुलांसाठी कोणतीही डॉक्टरी थेरपी न वापरता रोजच्या व्यवहारातील छोट्या छोट्या कामामधूनच यांची एक वेगळी थेरपी होऊ शकते यावर डॉ प्राजक्ताचा विश्वास आहे. PRA हे डे केअर नसून त्यांचे हक्काचे घर आहे, जिथे मुलांनी हक्काने रहावे, मजा करावी, नाचावं, गाणी म्हणावीत, आपल्याला आवडेल ते करावे आणि आनंदाने रहावे हाच हेतू घेऊन डॉ प्राजक्ता उभ्या आहेत. इथे No Maid – No Head या तत्वावरच काम चालते. म्हणून या मुलांसाठी वॉटर थेरपी, म्युझिक थेरपी यावर भर देऊन त्यांना शारीरिक दृष्ट्या स्वावलंबी बनविणे यावर भर दिला जातो, जेणे करुन ही मुले कोणावरही भार बनून राहणार नाहीत. या मुलांसाठी आपल्या स्वत:च्या घराइतकेच दुसरे हक्काचे घर म्हणजेच Pinnacle Recreation Academy असावे आणि अशीच याची ओळख असावी, हीच डॉ. प्राजक्ता यांची मनीषा आहे.

पण….. हजारो दिव्यांग मुलांची माता होण्यात त्यांनी सुखसमाधान मानले. ”आयुष्यात खूप पैसे मिळू शकतात, पण त्याहीपेक्षा महत्वाचे आहे समाधान! आणि मी हे काम करतांना अतिशय समाधानी आहे, यात मला आनंद आहे”. असे याप्रसंगी त्या म्हणाल्या. दिव्यांग मुलांच्या आनंदासाठी जगातलं एक सुंदर मॉडेल तयार करावे, ही त्यांची इच्छा आहे.

बोराडे परिवाराने पाया रचला आणि कोळपकर परिवार कळस रचण्यास मदत करत आहे. माझी जीवन – कहाणी ही एखाद्या चल चित्रपटासारखी आहे. खूप चढ उतार पाहिले मी कमी वयात. आता कशाचीच भीती वाटत नाही. पण एकच वाटतं, किती वेळा लढायचं? पण माझी लढाई थेट दिवसाशी आहे. माझं काम बघून त्या देवालाही पाझर फुटावा.

डॉ. प्राजक्ता कोळपकर

या प्रवासात मला अनेक ‘मानसन्मान’ आणि विविध ‘पुरस्कार’ प्राप्त झाले आहेत. स्वयंमसिध्दा पुरस्कार, कर्तबगार महिला पुरस्कार, लाफ इंटरनँशनल अवॉर्ड, राष्ट्र गौरव पुरस्कार, आदिशक्ती सन्मान, राष्ट्रीय लोक कल्याण मानवसेवा पुरस्कार, भारत शिखर सन्मान पुरस्कार, इंटरनॅशनल पीस सोशल अवॉर्ड आदी पुरस्कार आणि सन्मान यांची नावे व यादी खूप मोठी आहे, आणि ती मी प्राप्त केली आहेत. सुपर मॉम नावाची शॉर्ट फिल्म National Film Festival ला पाठविली असून झेंडा आजी आणि फर्माईश या माझ्या दोन कथांवर शॉर्ट फिल्म तयार होत आहे. १०० ललित या पुस्तकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. रंगमंचावरची अभिनेत्री होण्यास आलेली मी या समाजाच्या रंगमंचावर अशा पद्धतीने दात्री होऊ शकतेय, याचा आनंद आहे.

या निमित्ताने मला आजच्या तरुण तरुणींना असे सांगावेसे वाटते की, “तरुणांनी आणि शिक्षित लोकांनी अशा क्षेत्राकडे नक्की वळावे. आपणही समाजाचे देणे लागतो, ही भावना कधीच विसरू नये. देशाचं भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर अनेकांनी आपल्या समाजाला आणि देशाला या माध्यमातून हातभार लावावा. ज्या दिवशी अशा संस्था उदयास येणार नाही त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने यशस्वी झाले असू.”

कळी पानाआड लपलेली असली तरी तिच्यातला सुगंध पानाआड लपून राहिलचं असं नाही, काही कालावधीनंतर तो जवळच्या परिसरात अन् आसमंतात दरवळणारच. एक तपापासून गार्गीस फन वर्ल्ड आणि पिन्याकल रिक्रिएशन अकॅडमीचे कार्य हे असचं पानाआड लपलेल्या कलिकेसारखं अनभिज्ञ – अज्ञात – प्रसिद्धीविन्मुख आहे.

( डॉ प्राजक्ता कोळपकर ह्या बाल संगोपन विषयातील तज्ज्ञ आहेत. )

Related posts

स्वतःला दोष देणारी माणसे…

सकारात्मक राहण्याची कला…

प्रवेश परीक्षा : आव्हाने आणि संधी!

Leave a Comment