तुम्हाला काय वाटते की मला चाहते लिहायचे होते आणि मी चुकून चहाते लिहीले आहे? छे ते चहातेच आहे. चहाचे चाहते ते चहाते. आमच्या एक मावशी होत्या. 34 वर्षे झाली असतील त्यांनी मला एक चहावर गाणे ऐकवले होते. आज त्यातल्या फक्त दोन ओळी आठवणीत आहेत. बाकी अगदीच आठवत नाहीत. पण त्या दोन ओळी अगदी ह्रदयाच्या तळाशी बसलेल्या अधुनमधून वर येतात. आज त्याची पूर्ण कविता झालीच.
चहाच्या चाहत्यांना कधीही विचारा चहा घ्याल ना? ते नाही म्हणतच नाहीत. अगदी सुवासिनी जशी कुंकवाला कधी नाही म्हणत नाही ना? तसेच. थंडी असो पाऊस असो थकून भागून घरी आलेले असा किंवा खाणे झालेले असो. नंतर घोटभर चहा हवाच. त्याशिवाय मजा नाही.
चहा द्यावा चहा घ्यावा चहा जिवाचा विसावा…
थोडे पाणी आणि साखर त्यात मिसळून चहा पावडर
उकळी काढून त्यामध्ये मग कपात गाळून प्यावा… 1
थंडीमध्ये आले घालून कधी गवती चहा टाकून
मस्त ताजे दूध ओतून आळस तो घालवावा… 2
पहाटेच्या या प्रहरी चहा होई घरोघरी
तलफ येता खरोखरी चहा लगेच मागवावा… 3
कळत नाही इतरांना पण चहाच्या चाहत्यांना
पटेल हे म्हणणे त्यांना अमृतासम तो मानावा… 4
चहा द्यावा चहा घ्यावा चहा जिवाचा विसावा….
कवी – सौ सुनेत्रा विजय जोशी,
रत्नागिरी.
उरावर नाच