धर्म कोणता आहे? तर दया हा धर्म आहे. माणुसकी हा धर्म आहे. हा धर्म स्वीकारायला हवा. या धर्माचे पालन करायला हवे. हीच आपली भारतीय संस्कृती आहे. हाच आपल्या संस्कृतीचा धर्म आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
जेथ जेथ संपत्ति आणि दया । दोन्ही वसती आलिया ठाया ।
ते ते जाण धनंजया । विभूती माझी ।। 307 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 10 वा
ओवीचा अर्थ – अर्जुना, ज्या ज्या पुरुषाच्या ठिकाणी ऐश्वर्य आणि दया ही दोन्ही राहावयास आलेली असतील, तो तो पुरुष माझी विभूती आहे असे समज.
अनेक व्यक्ती पैशाच्या मागे धावत असतात. पैसा त्यांना अति प्रिय असतो. तसा ते अमाप पैसाही कमावतात, पण त्यांच्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात सर्वत्र पैसाच दिसतो. या पैशाच्या गर्वाने ते सर्वसामान्य जनतेचा द्वेष करतात. दानाची वृत्ती त्यांच्यात नसते. असली तरी विकत घेतल्याची ते भाषा करतात, इतकी मग्रुरी त्यांच्यात असते. अहो, इतकेच काय, पण स्वतःच्या घरच्यांच्यासाठीही पैसा खर्च करण्यासाठी ते नाही होय, नाही होय करतात.
पैसा काय फुकट येतो काय? पैसा काय झाडाला लागतो काय? अशी त्यांची बोलणी ऐकून घ्यावी लागतात. पैशाने माणसे विकत घेता येतात, पण प्रेम, आशीर्वाद, कृपा विकत घेता येत नाही. यासाठी अंगात दानशूरपणा असावा लागतो. अंगात दयाभाव असावा लागतो. पैशाने अंगात आलेल्या गुर्मीने तो इतका अंध झालेला असतो की, घरात भेटायला आलेल्या व्यक्तीचा आदर करणेही तो विसरतो; पण पैशाची ही गुर्मी योग्य नाही.
कारण पैसा हे द्रव्य आहे. ते नाशवंत आहे. आज आहे उद्या नाही, पण घरात लक्ष्मीशिवाय शांती नाही, हेही तितकेच खरे आहे. लक्ष्मी घरात सुखशांती, समाधान घेऊन येते; पण ते टिकवून ठेवणे, आपल्या हातात आहे. आपल्याजवळच्या पैशाने गरजूंना मदत केली तर ते आपल्या कठीण प्रसंगात निश्चितच मदतीला धावतील, यात शंकाच नाही. यासाठी दयावान व्हायला शिकले पाहिजे.
धर्म कोणता आहे? तर दया हा धर्म आहे. माणुसकी हा धर्म आहे. हा धर्म स्वीकारायला हवा. या धर्माचे पालन करायला हवे. हीच आपली भारतीय संस्कृती आहे. हाच आपल्या संस्कृतीचा धर्म आहे. जगा व जगू द्या असा आपला धर्म सांगतो. हे सांगण्यामागचा उद्देश समाजात शांती नांदावी हा आहे, पण आजकाल धर्माची व्याख्याच बदलली आहे. धर्म म्हणजे अनेक बंधणे, असा अर्थ काढला जात आहे; पण ही बंधणे काय आहेत, हे तरी जाणून घ्यायला नको का? नियम कोणते आहेत, हे अभ्यासायला हवे.
जगातील कोणताही धर्म हेच नियम सांगतो. कारण सर्व धर्मांचा मार्ग हा एकच आहे. भगवंतांची प्राप्ती. त्यामुळेच सब का मालिक एक असे म्हटले गेले असावे. दया हा धर्म आहे. तेथे भगवंताची वस्ती निश्चितच आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.