पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करण्यासाठी जणू काही वंदे मातरमला दीडशे वर्षे झाल्याचे निमित्त साधून लोकसभेमध्ये दहा तासाची चर्चा आयोजित केली होती. या चर्चेत भाग घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरू यांना हिंदू विरोधी ठरवून जोरदार टीका केली. पण ती त्यांच्या अंगलट आली.
वसंत भोसले
स्वातंत्र्यानंतरचा भारत कोणत्याही अर्थाने सुसज्ज, मजबूत किंवा आधुनिक देश नव्हता. देशात औद्योगिक पायाभूत सुविधा नव्हत्या. संपूर्ण राष्ट्र कुपोषण, दुष्काळ, बेकारी, अशिक्षितता आणि आरोग्य सुविधांच्या अभावाने कंगाल झालेले होते. याशिवाय समाजात खोलवर रुजलेले जातीय, धार्मिक, अंधश्रद्धा प्रधान आणि परंपरावादी विचार देशाच्या प्रगतीसमोर अडथळा ठरू शकणारे होते. अशा राष्ट्राला आधुनिक पातळीवर उभे करण्याची जबाबदारी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या खांद्यावर आली आणि त्यांनी या आव्हानाला वैज्ञानिक दृष्टीकोन, धर्मनिरपेक्ष मूल्ये, पायाभूत विकास, औद्योगिकीकरण, निर्भय परराष्ट्र धोरण आणि तर्कशुद्ध विचारसरणी या पायांवर स्थिर केले. नेहरू यांनी भारताला आधुनिकतेकडे नेतांना इंग्रजांना दूषणे देण्यापेक्षा आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित केले. पण २०१४ नंतर सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने भारतामध्ये विज्ञानाधारित धोरणांपेक्षा धार्मिक प्रतिमा, ऐतिहासिक विकृती, धार्मिक ध्रुवीकरण, जाहीरबाजी, खाजगीकरण आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचे वर्चस्व वाढवत नेले; आणि सातत्याने नेहरू यांना दुषणे देत राहिले. हा बदल केवळ राजकीयच नाही तर विचारसरणी आणि राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टिकोनातील मूलभूत फरक दर्शवतो.
सांगलीचे आमचे एक प्रबोधनकार मित्र जगदीश काबरे यांनी “नेहरू आणि मोदी : दृष्टिकोनातील फरक” या शीर्षकाखाली एक सविस्तर लेख लिहून विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दृष्टिकोनातील फरका विषयी तुलनात्मक मांडणी केली आहे. एक अत्यंत उत्तम दर्जाचा हा लेख आहे आणि तुलनात्मक मांडणी कशी करावी याचा देखील एक आदर्श आहे. तो लेख मला खूप भावला म्हणून त्याचा पहिला परिच्छेद वर दिलेला आहे. इथूनच या लेखाची सुरुवात होते. याच विषयावर संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात चर्चा झाली. तेव्हा या चर्चेच्या केंद्रस्थानी पंडित जवाहरलाल नेहरू होते. नेहरू यांची वैचारिक भूमिका, निर्णय क्षमता आणि दृष्टिकोन याची उंची मोजण्याचा प्रयत्न सातत्याने भाजपचे सरकार करते आहे. वास्तविक नेहरु यांचे मोठेपण यापूर्वीच्या अनेक पंतप्रधानांनी मान्य केले होते. एवढेच नव्हे तर भाजपचे पहिले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील पंतप्रधान नेहरू यांचे मूल्यमापन करून त्यांना सूर्याची उपमा दिली होती.
पंडित नेहरू यांच्या निधनानंतर सर्वत्र अंधार पसरलेला आहे एका सूर्याचा अस्त झालेला आहे असे वर्णन त्यांनी केले होते अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे की, नेहरूंशी आमचे मतभेद जरूर होते. मतभेद हे लोकशाहीचे मूलभूत अंग आहे त्याशिवाय लोकशाही जिवंत असल्याचे मानले जाऊ शकत नाही. वाजपेयी यांनी आपल्या संसदेतील भाषणात अनेक वेळा पंडित नेहरूंचा उल्लेख आदराने केलेला होता आणि करीतही होते.
१९७७ मध्ये जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले तेव्हा वाजपेयी मंत्री झाले. त्यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालय होते. परराष्ट्र मंत्रालयाच्या जात असताना तिथे भिंतीवरती पंडित जवाहरलाल नेहरू यांचे तैलचित्र लावलेले होते. ते संसद सदस्य म्हणून अनेक वेळा परराष्ट्र मंत्रालयात जात असताना ते चित्र पाहत होते. परराष्ट्र मंत्र म्हणून जेव्हा त्यांनी प्रवेश केला. त्यावेळी ते चित्र गायब झाले होते त्यांनी विचारले की, इथे पंडित नेहरू यांचे चित्र होते ते कुठे गेले? परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांना वाटले की नेहरू हे वाजपेयींच्या पक्षाच्या विरोधी पक्षाचे नेते होते. त्यामुळे तेथील चित्र काढून ठेवावे पण तेथील चित्र तातडीने तिथे लावण्यात आले. हा किस्सा स्वतः वाजपेयी यांनीच संसदेमध्ये सांगितला होता.
विद्यमान भाजप आघाडीचे सरकार सातत्याने नेहरूंचा अवमान करणे किंबहुना नेहरू पंतप्रधान झाल्यामुळेच भारतातले सर्व प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेक प्रश्नांना पंडित नेहरू जबाबदार आहेत अशा स्वरूपाचे वर्तन आणि बोलणे नेहमी चालू असते. बंकिमचंद्र चटोपाध्याय ( बॅनर्जी) यांनी दि. ७ नोव्हेंबर १८७५ रोजी लिहिलेल्या कोलकत्या जवळच्या नैहाटी कांटालपाडा या गावात वंदे मातरम गीत लिहिले त्याला यावर्षी दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त संसदेमध्ये चर्चा ठेवण्यात आली होती. या चर्चेची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरू यांच्यावर तोंडसुख घेतले.
वास्तविक या राष्ट्रगीताचा प्रवास ही खूप रोमांचक आणि विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर झालेला आहे. बंकिमचंद्र चटर्जी यांनी हे गीत राष्ट्रगीत म्हणूनच लिहिण्याच्या उद्देशाने गुंफले होते. बंगाली आणि संस्कृत भाषेचा त्याच्यामध्ये मिलाप आहे. १८५७ च्या बंडापर्यंत ब्रिटिश राज्यकर्ते “गॉड सेव्ह द क्वीन” ही कविता सैन्यातील जवानांना म्हणायला सांगायचे. आपल्या देशाच्या राणीचे संरक्षण व्हावे, अशी ती भावना असली तरी त्या भावनेतूनच बंकिमचंद चटर्जी यांना राष्ट्रगीत लिहिण्याची स्फूर्ती मिळाली आणि आपले देखील एक राष्ट्रगीत असावे ही भावना प्रबळ झाली. त्यांनी १८८२ मध्ये आनंदमठ नावाची कादंबरी लिहिली. त्या कादंबरीमध्ये वंदे मातरम या गीताचा समावेश केला होता. तो समावेश कादंबरीचा भागच होता. चटर्जी यांनी ही कविता लिहिताना पुढे ते राष्ट्रगीत होईल अशी कल्पना केलेली नव्हती. पण राष्ट्राच्या सौंदर्याचा, संस्कृतीचा आणि परंपरेचा मिलाफ त्याच्यामध्ये असावा असा प्रयत्न त्यांनी केला होता.
आनंदमठ कादंबरी खूपच गाजली त्याच्यावर हिंदी चित्रपट देखील आला. या कादंबरीतील वंदे मातरम या गीताचा जय जयकार होऊ लागला. त्याच्यामध्ये जी भावना व्यक्त करण्यात येत होती तशीच भावना काँग्रेसच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या राष्ट्रीय आंदोलनामध्ये विकसित होत होती. कोलकत्यात १८९६ मध्ये रहीमतुला सयानी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे अधिवेशन झाले. त्या अधिवेशनामध्ये जगमान्य साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांनी वंदे मातरम हे गीत गायले. काँग्रेसने या गीताचा स्वीकार तेव्हाच केला होता. तेव्हापासून वंदे मातरम या गीताच्या गायनाने काँग्रेसचे अधिवेशनाची सुरुवात होत होती.
बंगालची फाळणी १९०५ मध्ये करण्याचा निर्णय ब्रिटिशांनी घेतला. तेव्हा प्रचंड उद्रेक झाला. बंगाली अस्मिता जागी झाली. त्याच वर्षी बनारस येथे गोपाळ कृष्ण गोखले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनात देखील वंदे मातरम गीत रवींद्रनाथ टागोर यांच्या पुतणी सरलादेवी यांनी हे गीत गायले होते आणि त्याच अधिवेशनामध्ये बंगालच्या फाळणीला विरोध करण्याचा ठराव काँग्रेसने केला होता. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाचा उदय होण्यापूर्वी वंदे मातरम हे राष्ट्रगीत म्हणून जरी त्याला मान्यता दिलेली नसली तरी तसा मान देऊन ते गायले जात होते.
पुढे १९३७ मध्ये या गीताचा राष्ट्रगीत म्हणून समावेश करावा असा विचार सुरू झाला. तेव्हा त्याच्यावर बरीच चर्चा झाली आणि या गीतातील पहिली दोन कडवी स्वीकारण्यात आली. पुढच्या कडव्यांच्या मध्ये हिंदू देव देवता देवतांचा उल्लेख होता. शिवाय तो पौराणिक काळातील संदर्भ होता. आधुनिक काळासाठी असे संदर्भ घ्यावेत की न घ्यावेत आणि एकाच धर्मातील देव देवतांचा उल्लेख असावा का यावरून बरीच चर्चा झाली. त्यामुळे पुढची कडवी घ्यायची नाहीत असा निर्णय त्या काळच्या स्वातंत्र्य सेनानी आणि स्वातंत्र्यातील कार्यकर्त्यांनी चर्चेद्वारे घेतला.
राष्ट्रगीत म्हणून मान्यता
हा निर्णय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुस्लिमांचे तुष्टीकरण करण्यासाठी घेतला आणि हिंदू देवदेवतांचा अपमान केला अशी ओरड करण्यात येते. नेहरू कसे हिंदू विरोधी होते, हे भासवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून केला जातो. वंदे मातरमला राष्ट्रगीत म्हणून मान्यता देण्याचे प्रक्रिया ही केवळ पंडित नेहरू यांच्यावर अवलंबून नव्हती. त्यावेळच्या सर्वच काँग्रेस पुढाऱ्यांनी चर्चा केली होती. सरदार वल्लभभाई पटेल, सुभाष चंद्र बोस, सी. राजगोपाल, महात्मा गांधी अशा अनेक थोर नेत्यांचा त्याच्यामध्ये सहभाग होता. त्याचा विचार करूनच आणि सर्वच धर्मांना न्याय देणारी भाषा त्या राष्ट्रगीतामध्ये असावी. केवळ पौराणिक कथांच्या आधारे देव देवतांचा उदो उदो करणारे राष्ट्रगीत असू नये, अशी त्यामागची भावना होती. कारण उद्या नव्याने स्वातंत्र्य होणाऱ्या भारताला वैज्ञानिक दृष्टिकोन देऊन अशा पौराणिक कथा कल्पनातून बाहेर काढण्याचा तो उद्देश होता म्हणून त्यातली काही कडवी वगळण्यात आली. दरम्यानच्या काळात वंदे मातरम हे स्वातंत्र्यातील एक स्फूर्तीदायक गीत म्हणून मान्यता पावले होते.
वंदे मातरम लिहिण्याचा कालखंड आणि त्याला मान्यता मिळण्याचा कालखंड हा सर्व स्वातंत्र्यलढ्यांनी भारावून गेलेला होता. त्या काळामध्ये जनसंघ किंवा भारतीय जनता पक्षाची ही मातृसंस्था समजली जाते. ती हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी कधीही वंदे मातरमचा गौरव केला नाही. ते गीत कधीही त्यांनी गायले नाही. शिवाय स्वातंत्र्यामध्ये या संस्थांनी तथा संघटनांनी कधी भागही घेतला नाही. याउलट १९३७ मध्ये ज्या प्रांतिक निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये हिंदू महासभेने भाग घेऊन काही प्रांतामध्ये मुस्लिम लीग बरोबर युती करून सरकार स्थापन केले.
बंगाल प्रांताच्या सरकार स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये हिंदू महासभा होती आणि मुस्लिम लीगला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसला विरोध करण्यासाठी हिंदू महासभेने मुस्लिम लीग बरोबर युती करून सरकार स्थापन केले होते. त्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून मुकबुलं हक्क होते. त्यांच्या सरकारमध्ये जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी अर्थमंत्री म्हणून सहभागी झाले होते. मुस्लिमांचा एवढाच द्वेष करायचा होता तर मुस्लिम लीग बरोबर हिंदू महासभेने सरकार कसे स्थापन केले..?
स्वातंत्र्य मिळत असताना जेव्हा फाळणी झाली त्यावेळेला मुकबूल हक्क पाकिस्तानात गेले आणि मोहम्मद अली जिनांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये पाकिस्तानचे पहिले गृहमंत्री झाले. पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या नेत्याच्या मंत्रिमंडळामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भागीदारी केली होती. याच श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पंडित नेहरू यांनी आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले होते. जर त्यांना मुस्लिमांचे तृष्टीकरण करायचे आणि हिंदूंना विरोधच करायचा होता तर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना मंत्रिमंडळात घेतले असते का..? याउलट सर्वसमावेशक विचारधारांना एकत्र करण्याचा प्रयत्न पंडित नेहरू यांनी केला होता. भारत पाकिस्तान फाळणीमुळे रक्तबंबाळ झालेल्या समाजाला एकत्र करणे हा त्यांचा दृष्टिकोन होता.
प्रियंका गांधींचा पलटवार
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करण्यासाठी जणू काही वंदे मातरमला दीडशे वर्षे झाल्याचे निमित्त साधून लोकसभेमध्ये दहा तासाची चर्चा आयोजित केली होती. या चर्चेत भाग घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरू यांना हिंदू विरोधी ठरवून जोरदार टीका केली. पण ती त्यांच्या अंगलट आली. कारण काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांचे केलेले भाषण खूपच गाजले. या भाषणात त्यांनी आव्हान दिले की, पंडित नेहरू यांना यांच्या चुका तुम्हाला दाखवायच्या असतील तर त्याची यादी करा. त्यांना काही शिव्या द्यायच्या असतील तर त्याची यादी करा आणि संसदेचे खास अधिवेशन घेऊन जितका वेळ लागेल तितकी चर्चा आपण करू या, असे आव्हान दिले. जेणेकरून पंडित नेहरू यांच्या कार्याचा देश उभारणीच्या कामाचे मूल्यमापन होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे वंदेमातरम निमित्त ज्या राजकीय उद्देशाने ही चर्चा आयोजित केली होती. तीच प्रियंका गांधी यांनी उधळून लावली. अशाच प्रकारची अनेकांची भाषणे झाली.
देशाला स्वातंत्र्य मिळत असताना जगभरात ज्या काही घडामोडी घडत होत्या. त्या पार्श्वभूमीवर अनेक तडजोडी करणे किंवा काही देवघेव करणे हे अपेक्षित असते. देशातील राजकारणामध्ये तसेच आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये आपल्या देशासाठी जे योग्य त्याचा स्वीकार करायचा असतो. पंडित नेहरू यांनी सलग सतरा वर्षे देशाचे नेतृत्व करताना जी दिशा दिली ती आजपर्यंत कोणीही नाकारू शकलेले नाहीत. पण पंडित नेहरू यांना कोणत्या मुद्द्यावर नाकारायचे हा जो प्रश्न निर्माण होतो..कारण पंडित नेहरूंनी देशाला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. देश अत्यंत गरीब या अवस्थेत होता, कुपोषण होते अन्नधान्याची टंचाई होती, शेती विकसित झालेली नव्हती, औद्योगीकरण झालेले नव्हते आणि त्याच्या आधीच युरोप किंवा पुढारलेल्या देशांमध्ये औद्योगिकरणाने एक टप्पा गाठला होता. अशा कंगाल असलेल्या देशाची सूत्रे आपल्या हातात मिळाल्यानंतर सर्वसमावेशक विकासाचा पाया पंडित नेहरू यांनी घातला. अनेक सार्वजनिक उद्योग त्यांनी उभे केले. अनेक मोठ्या धरणांची उभारणी त्यांनी केली. आधुनिक काळातील मंदिरे म्हणजे ही धरणे आहेत अशी उपमा त्यांनी दिली. जर पंडित नेहरू हिंदू विरोधीच असते तर धरणांना मंदिरांची उपमा कशी दिली असती..? सरकार आणि धार्मिक परंपरा यांचा संबंध असू नये कारण सरकार हे सर्व धर्मीयांचे आहे. धर्म हा प्रत्येकाचा खाजगी विषय आहे, अशी त्यांची भावना होती. म्हणून पंडित नेहरूंनी कधीही धार्मिक तृष्टीकरण मग ते हिंदू असो किंवा मुस्लिम असोत, कोणाचेही केले नाही
आधुनिक भारत
पंडित नेहरू यांच्या नावाने आधुनिक भारताचा इतिहास निर्माण झाला. हीच खंत भाजपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि त्यांना भारताची जी प्रतिमा निर्माण केली, भारताला आधुनिक दिशा दिली. वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. अनेक संशोधन संस्था स्थापन केल्या. शेतीमध्ये विकसित केली आणि पुढे झालेल्या हरितक्रांतीचा पाया त्यांनीच घातला. त्याच मार्गाने जात पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी हरित क्रांतीची योजना आखली. तत्कालीन कृषी मंत्री श्री सुब्रमण्यम आणि अण्णासाहेब शिंदे यांनी हरित क्रांतीची पेरणी केली. त्या काळामध्ये असे म्हटले जात होते की कृषिमंत्री मंत्रालयात कमी बसायचे आणि भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये शास्त्रज्ञांच्या बरोबर विचार विनिमय करण्यात अधिक वेळ ते गुंतलेले असायचे. त्यामुळेच भारताने मोठी चेप घेतली आणि आज भारत अनेक पातळीवर अन्नदानाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला त्याची मुळे तिथे आहेत.
अलीकडच्या काळात भारत आत्मनिर्भर होईल,त्याला आत्मनिर्भर करायचे आहे अशी वल्गना केली जाते. पण तेलबिया, डाळी आणि इतर अनेक कृषी मालाच्या बाबतीत आपण परावलंबी होत चाललेलो आहोत. हरित क्रांतीमुळेच आपला देश गहू आणि तांदूळ उत्पादनामध्ये आत्मनिर्भर झाला. तो नरेंद्र मोदी सत्तेवर येण्याच्या अगोदरच…! त्यामध्ये भाजपच्या सरकारचे काही कर्तृत्व नाही. उलट अनेक कृषी मालाच्या उत्पादनामध्ये आपण आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून राहत आहोत. त्यासाठी आपल्याला अनेक ठिकाणाहून अन्नधान्य आणि कृषी मालआयात करावा लागतो आहे. ही खरंतर नामोषकी आहे. आधुनिक तंत्रज्ञान आले, नवीन बियाण आले तरी देखील देशाचे उत्पादन वाढत नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
आगामी निवडणुका
हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी समाजात दुही निर्माण करण्याचा कोणताही विषय विद्यमान सरकार सोडत नाही. आगामी काळात तमिळनाडू, बंगाल, आसाम, केरळ या राज्याच्या विधानसभांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्यामध्ये सर्वाधिक लक्ष पश्चिम बंगालवर भाजपचे आहे..कारण तो तिथे सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. बंगालमध्ये आपली सत्ता स्थापन व्हावी यासाठी इतिहासाची मोडतोड करून आणि हिंदू मुस्लिम अशी जरी निर्माण करून राजकारण साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. बंगाल आणि आसाममध्ये घुसखोरांचा प्रश्न मोठा आहे, असा प्रचार सध्या त्यांनी चालवला आहे. असाच प्रचार बिहारच्या सीमावरती जिल्ह्यामध्ये जोरदारपणे करण्यात आला होता. बिहारमध्ये निवडणुकीपूर्वी मतदार सखोल पुनर्वेक्षण झाले.
त्याच्यामध्ये केवळ ३१५ , जण परकीय नागरिक असल्याचेस्पष्ट झाले. त्यामध्ये केवळ ८२ मुस्लिम लोक होते. बाकीचे सर्व हिंदू किंवा बौद्ध असावेत. घुसखोर म्हणजे मुस्लिम समाज आहे,असा प्रचार करून त्यांच्या मतासाठी बिगर भाजप राजकीय पक्ष दुर्लक्ष करतात.. अशा स्वरूपाचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांचे सखोल पुनर्नरीक्षण चालू आहे. यातून घुसखोर किती आणि घुसखोर किती आहेत याची स्पष्टता लवकरच होईल.
गेली बारा वर्षे केंद्रामध्ये भाजपचे सरकार आहे या सरकारने किती घुसखोरांना शोधून काढले आणि त्यांना त्यांच्या देशामध्ये परत पाठवले याची एकदा माहिती जाहीर करणे आवश्यक आहे..ही माहिती सरकार जाहीर करत नाही. कारण घुसखोरांना परत पाठवण्याच्या मोहिमे संदर्भात हे सरकार अपयशी ठरलेले आहे आणि घुसखोरांचा विषय सोडवायचा तर नाही मात्र हिंदू मुस्लिम मध्ये दूही निर्माण करण्यासाठी त्याचा वापर करायचा .अशी दुहेरी नीती भाजपचे सरकार अवलंबत आहे तो त्यांचा राजकीय अजेंडा तयार करण्यासाठी वापर केला जातो.
अलिप्ततावाद
याच राजकारणाचा भाग म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांना हिंदू विरोधी म्हणून उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र नेहरू यांची वैचारिक उंची, त्यांच्या कार्याचा विस्तार सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासाची धोरणे याची उंची ते मोजू शकत नाहीत. पंडित नेहरू यांचे नेतृत्व हे जागतिक पातळीवर गेले होते. ज्या काळामध्ये जगाची विभागणी दोन गटात झाली होती. त्यावेळेला नव्याने स्वतंत्र झालेल्या आणि समविचारी देशांना एकत्र करून अलिप्ततावादाची ची नवी लढाई पंडित नेहरूंनी यशस्वी करून दाखवली. तेच धोरण आज देखील भाजपला राबवणे भाग पडत आहे. पंडित नेहरू यांच्या विचारांचा पगडा भारतीय जनमानसावर आजही आहे तो नष्ट करण्याचा प्रयत्न म्हणून वंदे मातरम सारखे विषय उपस्थित करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो.
लोकसभेमध्ये झालेल्या चर्चेचा एकूण सूर पाहता वंदे मातरमच्या आडून पंडित नेहरू यांना छोटे करण्याचा प्रयत्न किंबहुना देशाचे शत्रू म्हणून उभे करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. हेच या चर्चेचे फलित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.

अखंडता व एकजुटीचे दर्शन हवे…