मुळात ब्रिटिशांसाठी नोंद ठेवणे ही केवळ कारकुनी गोष्ट नव्हती. ती सांस्कृतिक जाणीव होती. शिस्त, वैधता, अभ्यास आणि चिरंतन नोंद म्हणून जे काही अनुभवले वा जिंकले-हरले, त्याची अभिलेख परंपरा त्यांनी मागे ठेवली! लंडनमध्ये भटकताना या नोंदी सर्वदूर दिसत जातात आणि थक्क होण्याची तपशीलवार संधी मिळते!
संजय आवटे
इथल्या एका ग्रंथालयात जातो, तर मित्र हे पुस्तक हातात देतो.
‘चांभार कोण आहेत?’, यावर एखाद्या परदेशी अभ्यासकाने १९२० मध्ये पुस्तक लिहावे ! केवळ एका जातीबद्दल नाही. आपल्याकडच्या सगळ्या जातींवर, जिल्ह्यांवर इंग्रजी अभ्यासकांनी अभ्यासपूर्ण अशी प्रदीर्घ मांडणी केली आहे. नोंदी ठेवल्या आहेत. इतर कोणी नोंदी केल्या असतील, तर तेही संग्रही ठेवले आहे. एखाद्या साध्या विषयाने खुणावले की त्यात बुडी मारायची आणि निष्ठेने संशोधन करायचे, हा इंग्रज माणसाचा स्वभाव आहे.
इंग्रजांनी जगावर राज्य केले, याची कारणे अनेक असतील. ‘दस्तावेजीकरण’ त्यापैकी महत्त्वाचे. ज्यांच्यावर राज्य करायचे, तो परिसर-संस्कृती पार कोळून प्यायची, ही त्यांची खासियत.
एक तुलना करायला हवी.
अफगाणिस्तान आणि इराकमध्ये अमेरिकेला दीर्घकालीन यश मिळू शकले नाही, याचे कारण फक्त लष्करी रणनीतीतील कमतरता नव्हे. इतिहासकारांचे मत आहे की, अमेरिकेच्या हाती शस्त्र होते, पण सांस्कृतिक बुद्धिमत्ता नव्हती. स्थानिक परंपरा, समाजव्यवस्था आणि धार्मिक-सामाजिक संवेदनशीलता यांचा त्यांनी पुरेसा अभ्यास केला नाही. परिणामी युद्ध जिंकूनही ते हरले. याउलट ब्रिटिश साम्राज्य भारतात शतकानुशतके टिकले. त्यामागे त्यांची दस्तऐवजीकरणाची परंपरा होती. त्यांनी गावोगावी सर्वेक्षण केले, जमाबंदी केली, गॅझेट्ससारखी प्रचंड ज्ञानसंपन्न साधने निर्माण केली. भारतीय समाजाची रचना, जात-धर्मांचे नाते, अर्थव्यवस्थेचे तंत्र याचा सखोल अभ्यास केला. त्यातून स्थानिक समाजात शिरकाव करून आपली सत्ता घट्ट केली.
‘डॉक्युमेंटेशन’ हे इंग्रजांचे बलस्थान. आणि, आपली सगळ्यात मोठी मर्यादा. नोंदी करणे, शास्त्रशुद्ध अभ्यास करणे ही सवयच आपल्याला नाही. त्याला तशीच कारणेही आहेत.
पृथ्वी सूर्याभोवती फिरते, असे युरोपात कोपर्निकसनंतर गॅलिलिओ सांगू लागला, तेव्हा त्याला नजरकैदेत राहावे लागले. त्याच कालावधीत संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेल्याची वार्ता आपल्याकडे पसरवली जात होती. आजही ती खरी मानली जाते! युरोपातल्या ‘रेनेसॉं’ने तिथले जगच बदलून गेले. रेनेसॉं हा युरोपच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा काळ. अंधश्रद्धा, धार्मिक कट्टरता यांना त्यामुळे धक्का बसला. विज्ञान, विवेक, स्वतंत्र विचार यांना प्रोत्साहन मिळाले. माणसाच्या विचारविश्वाला नवे आयाम मिळाले. याचा सर्वाधिक फायदा इंग्लंडने करून घेतला.
शिस्तबद्ध अभ्यासाची सवय असल्याने इंग्रज माणसाने अनेक कठीण विषय समजून घेतले. साम्राज्यविस्ताराच्या वाटा शोधल्या. साम्राज्य टिकवण्याचे मार्ग शोधले. प्रशासनावर पकड मिळवली. साहित्य-कला-संस्कृतीचा आवाका मिळवला. एखाद्या विषयाच्या मुळाशी जाऊन तो विषय समजून घेणे, व्यवस्थित नोंदी करणे, गॅझेट्स तयार करणे आणि तर्कसंगत निष्कर्षांपर्यंत पोहोचणे ही साहेबांना सवयच लागली. आजही आपल्याकडच्या अनेक घटनांवर, मुद्द्यांवर इंग्रजी अभ्यासक अभ्यासपूर्ण पुस्तके लिहितात. ‘कॉन्ट्रिब्यूशन टू नॉलेज’ याला म्हणतात.
गंमत बघा. इंग्रजांनी तेव्हा अवघा भारत मोजला. भूमापन केले. त्यानंतर आजतागायत आपल्याला ते जमलेले नाही. अठराव्या शतकात इंग्रजांनी हा खंडप्राय देश मोजला. ‘The Great Arc: The Dramatic Tale of How India Was Mapped and Everest Was Name” हे पुस्तक वाचले की हा पूर्ण प्रवास समजतो. हे पुस्तकही ब्रिटिश इतिहासकार जॉन की यांनीच लिहिले आहे. विल्यम लॅम्ब्टन नावाचा इंग्रज अधिकारी या भूमापनासाठी आपले सर्वस्व देतो. रानावनात ऊन-वारा-पावसात काम करताना सत्तराव्या वर्षी तिथेच मरण पावतो. त्याची समाधी आजही वर्ध्याजवळ हिंगणघाटला आहे.
लॅम्ब्टन गेल्यावर त्याचा सहकारी जॉर्ज एव्हरेस्ट ही सूत्रे हातात घेतो. वयाच्या ५६व्या वर्षांपर्यंत अहोरात्र त्यासाठी काम करतो. अभ्यास करतो, तहानभूक विसरून देशभर फिरून सर्वेक्षणे करतो. माउंट एव्हरेस्टला त्याचे नाव द्यावे, एवढे उत्तुंग काम उभे करतो. नंतर काहीतरी बिनसते. तो आपल्या घरी परतण्याचा निर्णय घेतो. या धांदलीत लग्न करायचे मात्र राहून जाते.
५६व्या वर्षी एव्हरेस्ट लंडनला परततो. तिथे पबमध्ये बीअर पिताना एका सुंदरीच्या प्रेमात पडतो. २३ वर्षांच्या तरूण मैत्रिणीशी लग्न करतो. सहा मुलांचा बाप होतो!
मुद्दा असा की, ब्रिटिश संस्कृतीतील एक कायमस्वरूपी वैशिष्ट्य म्हणजे त्यांची नोंद ठेवण्याची ही काटेकोर सवय. १०८६ सालच्या Domesday Book पासून ही परंपरा सांगता येते. या नोंदवहीत जमिनी आणि संसाधनांची यादी आहे. तिथून पुढे वसाहतवादी काळातील विस्तृत नोंदींपर्यंत ब्रिटिशांनी लेखी शब्दावर प्रचंड विश्वास ठेवला. हा विश्वास केवळ माहिती जतन करण्यासाठी नव्हता. शिस्त, नियंत्रण आणि सातत्य म्हणून त्याकडे पाहायला हवे.
ब्रिटिश साम्राज्याचा कारभार जगभर पसरलेला असताना त्यांना शासनासाठी लेखी नोंदींवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागले. जनगणना, जमीन मोजणी, न्यायालयीन खटले, व्यापार, अन्य व्यवहार असे सर्व काही बारकाईने नोंदवले जात असे. भारतातील Great Trigonometrical Survey ही केवळ वैज्ञानिक महत्त्वाकांक्षा नव्हती. दस्तावेजीकरणावरचा ब्रिटिशांचा विश्वास त्यामुळे समजतो. या सवयीमुळे त्यांनी महाकाय लोकसंख्येवर राज्य केले.
ब्रिटिश बौद्धिक परंपरेतही डॉक्युमेंटेशनचे महत्त्व केंद्रस्थानी होते. कायदा प्रणाली नोंदींवरच उभी राहिली. संसदेतील चर्चांची नोंद झाली. विद्यापीठांनी शैक्षणिक वादविवाद आणि संशोधनाचे अभिलेख जपले. बैठकीचे मिनिट्स, हिशोबवही, अहवाल यामुळे पारदर्शकता आली. संस्थात्मक स्मृतीला बळकटी मिळाली. आजही साहेबांना ही सवय आहे. वैयक्तिक दैनंदिनी, सरकारी कार्यालयांचा कागदी कारभार, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील तपशीलवार नोंदी असे खूप काही सांगता येईल. मुळात ब्रिटिशांसाठी नोंद ठेवणे ही केवळ कारकुनी गोष्ट नव्हती. ती सांस्कृतिक जाणीव होती. शिस्त, वैधता, अभ्यास आणि चिरंतन नोंद म्हणून जे काही अनुभवले वा जिंकले-हरले, त्याची अभिलेख परंपरा त्यांनी मागे ठेवली!
लंडनमध्ये भटकताना या नोंदी सर्वदूर दिसत जातात आणि थक्क होण्याची तपशीलवार संधी मिळते!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.