गेले चार- पाच दिवस महायुती सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांना हटवणार अशा बातम्या मिडियातून रोज झळकत आहेत. चार मंत्र्यांना डच्चू देणार तर कोणी आठ मंत्र्यांची नावे सांगत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यावर अशा चर्चेला उधाण आले. अशा बातम्यांमुळे प्रशासनात अस्थिरता येतेच पण राजकारणही ढवळून निघते आहे.
डॉ. सुकृत खांडेकर
घरात बेडवर बॅगेत नोटांची पुडकी, आमदार समर्थकांत शिविगाळ व मारहाण, कँन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, विरोधकांना धमक्या, विधिमंडळात रमीचा डाव आणि डान्सबारसुध्दा अशा असंख्य प्रकरणात गुंतलेल्या मंत्री व आमदारांमुळे महायुती सरकारची रोज बदनामी होते आहे. मंत्रिमंडळातही सुंदोपसंदी वाढली आहे. सत्ताधारी महायुतीत मानापमानाचे नाट्य सतत रंगते आहे. प्रचंड बहुमत असुनही सरकारची बेअब्रु होते आहे, अशा परिस्थितीत राज्यातील राजकारणावर व प्रशानसावर काहीच परिणाम होत नाही असे समजयाचे का ? मस्तवाल व बेलगाम सहकारी मंत्र्यांवर व आमदारांवर कारवाई करण्यास मुख्यमंत्री का संकोच करीत आहेत ? ते दुर्लक्ष करीत आहेत की हतबल आहेत ? अशी चर्चा आता उघडपणे लोकांमधे सुरू झाली आहे.
गेले चार- पाच दिवस महायुती सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांना हटवणार अशा बातम्या मिडियातून रोज झळकत आहेत. चार मंत्र्यांना डच्चू देणार तर कोणी आठ मंत्र्यांची नावे सांगत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यावर अशा चर्चेला उधाण आले. अशा बातम्यांमुळे प्रशासनात अस्थिरता येतेच पण राजकारणही ढवळून निघते आहे. नेमके खरे काय, फेरबदल कधी होणार हे स्वत: मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे आणि राजकीय पटलावर निर्मण झालेले मळभ दूर करावे. विशेष म्हणजे वादग्रस्त मंत्र्याच्या यादीत शिवसेना ( शिंदे ) व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजितदादा ) च्या मंत्र्यांची नावे ठळकपणे पुढे येत आहेत.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर तीन महिन्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटक झालेला वाल्मिक कराड हा मुंडे यांचा निकटर्तीय असल्याचे आरोप झाले होते. आमदार अर्जुन खोतकर यांच्या धुळ्यातील बंगल्यावर पीएच्या खोलीत १ कोटी ८५ लाख रूपये सापडले होते. त्यावर माजी आमदार अनिल गोटे यांनी आगपाखड केली. पुढे हे प्रकरण गुलदस्त्यात गेले.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस ) यांचे नाव अजेंडावर आघाडीवर आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू असताना सभागृहात ते आपल्या आसनावर बसून रम्मीचा डाव खेळत असल्याच्या क्लिप व्हायरल झाल्या. राज्यात शेतकरी आत्महत्या चालूच आहेत. कर्जमाफीचे आश्वासन हवेतच आहे. शेतमालाला किमान भाव नसल्याने दलालांकडून लूटमार चालूच आहे. कृषीमंत्री मात्र बिनधास्त आहेत. कृषी खाते म्हणजे ओसाड गावची पाटिलकी त्यांना वाटते, तर शेतकरी नव्हे सरकार भिकाऱी आहे, असा खुलासा करून त्यांनी मुख्यमत्र्यांची नाराजी ओढवून घेतली आहे. त्यांना हटविणार की त्यांचे खाते बदलणार ? शनिवारी त्यांनी शनिमंदिरात जाऊन पूजा केली, शक्तिप्रदर्शन करू नका, असे समर्थकांना आवाहन केले. आपला अजित पवारांवर पूर्ण विश्वास आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
समाजकल्याणमंत्री संजय शिरसाट (शिवसेना ) यांनी आपल्याला आयकर विभागाची नोटीस आल्याचे सांगितले आहे. घरात बेडवर ते आरामात बसले आहेत. बाजुला बॅगेत नोटांची पुडकी दिसत आहेत, असे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्याच पुत्राने मोठे हॉटेल लिलावात घेण्याचा प्रयत्न केला होता. नंतर माघार घेतली.
विधिमंडळ अधिवेशनात उबाठा सेनेचे अनिल परब यांनी सावली डान्सबा चा विषय काढला व तो गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा असल्याचा आरोप केला. खरे तर हा बार गृहराज्यमंत्र्यांचे वडिल रामदास कदम यांच्या पत्नीच्या नावावर असून तो तीस वर्षापूर्वीच एका दाक्षिणात्य व्यावसायिकाला चालवायला दिला आहे. पण राज्यात डान्सबारला बंदी असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरात सावली कसा चालू असतो ? गृहराज्यमंत्री म्हणून मुंबई योगेश कदम यांच्या कार्यक्षेत्रात येते. मुंबई पोलिसांनीच सावलीवर धाड टाकली असेल तर गृहराज्यमंत्र्यांना काहीच कसे ठाऊक नाही ? मग कोणाच्या आदेशाने पोलिसांनी ही धाड टाकली ?
आमदार संजय गायकवाड ( शिवसेना ) यांना जेवण चांगले मिळाले नाही म्हणन अंगात बनियन व कमरेला टॉवेल गुंडाळेल्या अवस्थेत कॅन्टीनमधे गेले व तेथे कर्मचाऱ्याला बदडून काढले. त्यांच्यावर पोलिसांनी काय कारवाई केली हे समजले नाही पण अ्न्न व औषध प्रशासनाने कॅन्टीनवर कारवाई केली. आमदार भरतशेठ गोगावले ( शिवसेना ) हे तांत्रिकाकडून अघोरी पूजा करताचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.
अधिवेशन काळात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांत विधानभवनातच तुंबळ हाणामारी झाली. त्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक सामील होते. ते विधानभवनात आलेच कसे , कोणाच्या शिफारसीवरून हे गूढ आजही कायम आहे. अशा हाणामारीच्या घटनांनंतर मंत्रालय व विधान भवनात प्रवेशावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारने राज्याचा तमाशा केलायं अशी टीका केली आहे. राज्यात महिला असरक्षित आहेत, गुजरातमधून आलेल्या ड्रग्जचा धंदा वाढला आहे. आका व कोयता गँगचा धुडगूस चालू आहे. मंत्र्यांमधे कुरघोड्या चालू आहेत, अशीही टीका त्यांनी केली आहे. समाज सेविका अंजली दमानिया तर वादग्रस्त मंत्र्यांवर रोज पुराव्यानिशी तोफा डागत आहेत. मग त्यांच्यावर कारवाई करायला मुख्यमंत्री वेळकाढूपणा का करीत आहेत ?
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.