हवामान बदलाच्या वाढत्या परिणामामुळे भविष्यातील साठवण व्यवस्थेला उष्णतेचे आणि आर्द्रतेचे चढउतार झेलण्याची क्षमता असावी लागेल. साठवण सुविधा हवामान सुसंगत रचनेवर आधारित असतील — उष्णतारोधक भिंती, नैसर्गिक वायुविजन, तापमान नियंत्रण, आणि अक्षय ऊर्जा स्रोत ही त्याची वैशिष्टये असतील. सौरऊर्जेवर चालणाऱ्या थंड साठवण प्रणाली आणि फेज-चेंज मटेरियल यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होईल.
शेखर गायकवाड
अन्नसाठवण ही अन्नसुरक्षेची सर्वात महत्त्वाची कडी आहे. शतकानुशतके भारतीय शेतकऱ्यांना पिकानंतरच्या नुकसानीचा सामना करावा लागतोय — खराब साठवण, कीड, आर्द्रतेचा परिणाम आणि बाजारातील चढउतार यामुळे आजही भारतात अंदाजे ६ ते १० टक्के कृषी उत्पादन दरवर्षी नष्ट होते, ज्यामुळे अब्जावधी रुपयांचे नुकसान होते. आगामी चार दशके ही परिस्थिती पूर्णपणे बदलून टाकतील. हवामान बदल, लोकसंख्या वाढ, आणि अन्नाच्या मागणीतील विविधता यामुळे अन्नसाठवण प्रणालीत मोठी क्रांती होईल.
पूर्वी भारतीय शेतकरी अन्नधान्य मातीच्या कोठारांमध्ये, बांबूच्या पात्रांमध्ये किंवा गोण्यांमध्ये साठवून ठेवत असत. ही साधी व किफायतशीर पद्धत होती, पण त्यात कीड, ओलावा आणि गुणवत्तेचा नाश मोठ्या प्रमाणावर होत असे. पुढील काही वर्षांत या पद्धतींची जागा स्मार्ट साठवण तंत्रज्ञान घेईल. अन्नसाठवण म्हणजे केवळ गोदामे किंवा कोठारे राहणार नाहीत, तर ती स्मार्ट, विकेंद्रित आणि हवामान-लवचिक प्रणाली बनेल — जी तंत्रज्ञान, शाश्वतता आणि डेटावर आधारित असेल. पारंपरिक कोठारामध्ये आता सेन्सर्स, सौरऊर्जा आणि ब्लॉकचेन प्रणाली एकत्र येऊन “बुद्धिमान अन्न परिसंस्था” तयार करतील.
आय ओ टी सेन्सर्सयुक्त स्मार्ट सायलो तापमान, आर्द्रता, वायूंचे प्रमाण आणि कीड हालचाली मोजतील. कोणत्याही घटकात बदल झाला की शेतकऱ्याला मोबाईलवर तत्काळ सूचना मिळेल. हे सायलो संयुक्त पदार्थांपासून बनवलेले असतील — टिकाऊ, हलके आणि तापमान-स्थिर. शेतकरी मॉड्युलर साठवणीचे युनिट्स वापरतील, जे हंगामानुसार वाढवता किंवा कमी करता येतील.
हवामान बदलाच्या वाढत्या परिणामामुळे भविष्यातील साठवण व्यवस्थेला उष्णतेचे आणि आर्द्रतेचे चढउतार झेलण्याची क्षमता असावी लागेल. साठवण सुविधा हवामान सुसंगत रचनेवर आधारित असतील — उष्णतारोधक भिंती, नैसर्गिक वायुविजन, तापमान नियंत्रण, आणि अक्षय ऊर्जा स्रोत ही त्याची वैशिष्टये असतील. सौरऊर्जेवर चालणाऱ्या थंड साठवण प्रणाली आणि फेज-चेंज मटेरियल यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होईल. या प्रणाली वीज नसतानाही थंडावा टिकवून ठेवतील. भाज्या, फळे, दूध आणि मासे यांसाठी समूह-आधारित मिनी कोल्ड स्टोरेज युनिट्स मोठया प्रमाणावर ग्रामीण भागात स्थापन होतील. स्थानिक सहकारी संस्था किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या यांची साठवण केंद्रे सौरऊर्जेवर चालतील आणि संपूर्ण वर्षभर तापमान नियंत्रित ठेवतील.
भविष्यात अन्नसाठवण व्यवस्थेचा मेंदू म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असेल. सेन्सर्सद्वारे मिळणारे तापमान, आर्द्रता आणि हवेतील घटकांचे डेटा AI सॉफ्टवेअर विश्लेषित करून साठवण स्थितीचे आकलन करेल. AI प्रणाली पिकाच्या श्वसन दरानुसार हवेचा प्रवाह, तापमान, आणि साठवणीचा कालावधी ठरवेल. उदाहरणार्थ, जर कृत्रिम बुद्धिमत्तेने ठरवले की पुढील तीन आठवड्यांत मका दर वाढतील, तर ती शेतकऱ्याला साठवण वाढवण्याचा सल्ला देईल आणि आर्द्रता नियंत्रण कसे ठेवावे हे सुचवेल. परिणामी, साठवण व्यवस्था प्रतिसादात्मकतेऐवजी पूर्वनियोजनाधारित बनेल.
आगामी चार दशकांत शेतकरी हे स्वत:च्या मालकीचे स्थानिक साठवण जाळे उभे राहतील. मोठ्या सरकारी गोदामांवर अवलंबून न राहता, लहान व मध्यम शेतकरी एकत्र येऊन डिजिटल सहकारी साठवण संस्था हायवे किंवा रस्त्याच्या शेजारी स्थापन करतील. हे नेटवर्क “ग्रामीण अन्नबँक” म्हणून कार्य करेल — जिथे शेतकरी आपला माल ठेवू शकतील, त्याची स्थिती मोबाईलवर पाहू शकतील आणि योग्य दर मिळाल्यावर विक्री करू शकतील. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे व्यवहार पारदर्शक होतील आणि गैरव्यवहार टळतील. या विकेंद्रीकरणामुळे वाहतुकीतील विलंब आणि नाश कमी होईल.
जैवतंत्रज्ञान आणि पदार्थ विज्ञान पुढील काळात साठवण व्यवस्थेचे स्वरूपच बदलतील. धान्यांवर आणि फळांवर नॅनोतंत्रज्ञान आधारित जैविक आवरण लावले जाईल, जे बुरशी आणि कीड वाढ रोखेल. जैव-पडदे आणि वनस्पतीजन्य नैसर्गिक संरक्षक पदार्थ वापरले जातील. फळे-भाज्यांसाठी नियंत्रित वातावरण साठवण पद्धत सार्वत्रिक बनेल — जिथे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण आपोआप नियंत्रित राहील, त्यामुळे श्वसन क्रिया मंदावेल आणि ताजेपणा टिकेल.
साठवण आता फक्त “पिके ठेवण्याची प्रक्रिया” राहणार नाही — ती बाजाराशी थेट जोडलेली डिजिटल कडी बनेल. २०५० पर्यंत प्रत्येक साठवण युनिट राष्ट्रीय कृषी डेटा नेटवर्कशी जोडलेले असेल. शेतकरी आपल्या साठवणीचा डेटा ऑनलाईन अपलोड करतील, ज्यावरून व्यापारी, सहकारी संस्था आणि शासन लॉजिस्टिक्स नियोजन करतील. ब्लॉकचेन तंत्रज्ञान साठवलेल्या प्रत्येक मालाचा मागोवा घेईल — बीयाणांपासून ते उपभोक्त्यापर्यंत. त्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि अन्नसुरक्षा नियमांचे पालन सुलभ होईल.
भविष्यातील साठवण सुविधा पर्यावरणपूरक आणि शून्य कचरा तत्वावर चालतील. विकले न गेलेले किंवा खराब झालेले अन्न जैवऊर्जा, कंपोस्ट किंवा पशुखाद्य निर्मितीसाठी वापरले जाईल. धान्याच्या अवशेषांपासून बायोगॅस प्लांट्स उभे राहतील, ज्यातून वीज निर्माण होऊन साठवण युनिट्स चालतील — अशा प्रकारे एक स्वयंपूर्ण चक्र निर्माण होईल. थंड साठवणगृहांचे पाणी पुन्हा वापरले जाईल, सौरछतांवरून वीज मिळेल, आणि पॅकेजिंग संपूर्णपणे जैवविघटनशील असेल. साठवण केंद्रे अशा प्रकारे “हरित औद्योगिक समूह” बनतील.
या सर्व बदलांसाठी तंत्रज्ञानाबरोबरच धोरणात्मक पाठबळ आणि मानव संसाधन विकास आवश्यक असेल. भविष्यात सरकारकडून “डिजिटल वेअरहाऊस इंडिया” किंवा “नॅशनल कोल्ड चेन ग्रिड” सारख्या योजना राबवल्या जातील. साठवण व्यवस्था केवळ कृषी प्रक्रियेचा शेवटचा टप्पा न राहता राष्ट्रीय अन्नसुरक्षेचा मुख्य स्तंभ बनेल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
