
स्टेटलाइन
जगभरात ऑनलाइन बिझनेस किती अब्ज होत असेल हे सांगता येणेही कठीण आहे. मग नेपाळ सरकारने युवाशक्तिच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम का केले ? नेपाळमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतातील युवक संविधानाचे रक्षण करतील व मतांची चोरी रोखतील असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे म्हणूनच त्यांना भारतात नेपाळप्रमाणे आंदोलन होऊ शकते, असे सुचवायचे आहे का ?
– डॉ. सुकृत खांडेकर
नेपाळमधे सरकारच्या विरोधात जनरेशन झेड ( युवाशक्ति ) ने उठाव केला, हिंसाचार झाला. युवकांच्या प्रक्षोभापुढे प्रशासन हतबल झाल. सरकारला राजीनामा देऊन पळ काढावा लागला. नेपाळच्या अगोदर श्रीलंका व बांगला देशातही युवाशक्तिच्या आक्रोशापुढे सत्तांतर झाले. मग भारतात तसे घडू शकते का ? याच धामधुमीत काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका ट्वीटमळे अनेकांचा डोळे विस्फारले आहेत. राहुल गांधी म्हणतात- देशातील युवक, देशातील विद्यार्थी, देशातील जनरेशन जी संविधानाचे रक्षण करील. लोकशाही वाचवतील आणि मतांची ( व्होट ) चोरीही रोखतील. मी त्यांच्याबरोबर आहे. जय हिंद….
नेपाळमधे युवकांनी रस्त्यावर येऊन केलेल्या आंदोलनाचा राहुल गांधी यांनी उल्लेख केलेला नसला तरी त्यांचे ट्वीट वाचताना नेपाळमधील युवकांचा संघर्ष डोळ्यापुढे येतो. राहुल गांधी यांनी असे ट्वीट करून युवकांच्या मनात असंतोष खदखदतो आहे. असा सरकारला इशारा दिला आहे ? गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत व्होट चोरी कशी झाली याचे पुरावे देत राहुल गांधींनी गेले काही दिवस निवडणूक आयोगाची व सरकारची झोप उडवली आहे. व्होट चोरीला निवडणूक आयोग संरक्षण देत आहे असा त्यांनी जाहीर आरोप केला आहे. देशातील युवकांची ताकद आपल्या पाठिशी आहे असे काँग्रेस सांगत आहे तर देशात काँग्रेसला नेपाळप्रमाणे आंदोलन घडवायचे आहे असा आरोप भाजप करीत आहे. त्यातच सॅम पित्रोदा यांनी पाकिस्तानात राहणे आपल्याला घरासारखे वाटते असे सांगून भाजपाला अंगावर ओढवून घेतले आहे.
नेपाळमधे सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला हजारो युवकांनी रस्त्यावर येऊन सरकारविरोधात संघर्ष केला, हिंसाचार, जाळपोळ केली. सरकारी इमारती, राष्ट्रपती- पंतप्रधान- मंत्र्यांची निवासस्थाने पेटवली, न्यायालयांच्या इमारतींना आगी लावल्या, मंत्र्याना पळता भुई थोडी केली, मंत्र्यांचा पाठलाग करून त्यांना लाथा घातल्या, हे सर्व आश्चर्यकारक होते. पोलीस गोळीबारात पंचावन्न तरूणाचा बळी गेला. नेपाळ सरकारने फेसबुक, एक्स, यु ट्युब , इंस्टाग्राम आदी सोशल मिडियावर बंदी घातल्याचे निमित्त होऊन युवकांची माथी भडकली व ते रस्त्यावर उतरले. सोशल मिडिया केवळ टाइम पासचे माध्यम नाही तर शिक्षण, रोजगार व जागतिक घडामोडींची वेगवान माहिती मिळविण्याचे साधन आहे असा दावा केला जात आहे. आजकाल तर रिल्स हे कमाईचे साधन बनले आहे. व्हिडिओ कॉलवरून देश विदेशात लक्षावधी लोक संवाद साधत असतात. परस्परांशी संवादाचे सोशल मिडिया प्रभावी साधन आहे. जगभरात ऑनलाइन बिझनेस किती अब्ज होत असेल हे सांगता येणेही कठीण आहे. मग नेपाळ सरकारने युवाशक्तिच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम का केले ? नेपाळमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतातील युवक संविधानाचे रक्षण करतील व मतांची चोरी रोखतील असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे म्हणूनच त्यांना भारतात नेपाळप्रमाणे आंदोलन होऊ शकते, असे सुचवायचे आहे का ?
राहुल गांधी यांनी बिहारमधे व्होट अधिकार यात्रा काढली, राजदचे नेते व लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनीही राहुल यांना तेथे साथ दिली. कर्नाटकात व महाराष्ट्रात एकेका मतदारसंघात सहा- सहा हजाराहून अधिक मतांची कशी चोरी झाली त्याची आकडेवारी त्यांनी दिली. बिहार यात्रेत दिलेली घोषणा व्होट चोर- गद्दी छोड ही देशात घरोघरी पोचली. या घोषणेनंतर भाजपाचे केंद्रातील व राज्याराज्यातील प्रवक्ते, नेते व मुख्यमंत्री हे राहुल खोटे बोलतात म्हणून एक सुरात तुटून पडले. राहुल गांधींनी आपल्या पत्रकार परिषदांमधे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांवर मत चोरांचे संरक्षक असा आरोप केला. आपल्याकडे मत चोरीचे शंभर टक्के पुरावे आहेत असे सांगत त्यांनी दिल्लीत सादरीकरण केले. राहुल गांधी आता शांत बसायला तयार नाहीत. आपला देश व आपले संविधान हे महत्वाचे आहे असे ते वारंवार सांगत आहेत. राहुल गांधीं भारत जोडो यात्रेत युवकांनी न्यायासाठी झटले पाहिजे अशी भाषा वापरल होते आता पुन्हा युवा शक्तिला ते आवाहन करताना दिसत आहेत.
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी एक्सवर म्हटले आहे – जनरेशन झेड घराणेशाहीच्या विरोधात आहे. पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी , सोनिया गांधी आता राहुल आणि प्रियंका या घराणेशाहीला जनरेशन झेड कशी मान्यता देईल ? जेन जी भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. युपीए सरकारमधील घोटाळे कसे विसरता येतील ? राहुल यांचे विदेश दौरे व स’म पित्रोदा यांना विदेशी पैसा कोठून मिळतो याची गृहमंत्रालयाने चौकशी करावी.
नेपाळमधील युवा क्रांती सरकारमधील घराणेशाही विरोधात होती. काँग्रेसची भारतात ओळखच घराणेशाही व घोटाळे अशी आहे असे भाजप खासदार प्रदीप भांडारी यांनी म्हटले आहे. माजी खासदार सुब्रत पाठक यांनी तर कहरच केला आहे. ते म्हणतात- नेपाळसारखी भारतात क्रांती झाली तर लोक राहुल- अखिलेश यांच्या घरांना आगी लावतील…
ठाकरे यांच्या शिवसेनेने राहुल गांधींच्या वक्तव्याला साथ दिली आहे. भारतातही असे घडू शकते, भाजपने तयार राहावे…
जनता दल युनायटेडचे निरज कुमार यांनी म्हटले आहे – भारत म्हणजे बांगला देश नाही आणि नेपाळही नाही. भारताचे संविधान मजबूत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले की, निवडणूक आयोगाला बदनाम करणे ही काँग्रेसची जुनी चाल आहे.
सॅम पित्रोदा यांनी, पाकिस्तानात मी गेलो तर मला घरासारखे वाटते, बांगला देश व नेपाळमधेही असेच वाटते असे म्हटल्याने राहुल गांधींवर तुटून पडणारी भाजपची फळी पित्रोदांकडे वळाली. त्यांना देशद्रोही ठरविण्यापर्यंत मजल गेली. शाहजाद पुनावाला यांनी एक्सवर म्हटले – २६ – ११ च्या दहशतवादी हल्ल्यावर काँग्रेसची चुप्पी, आणि पुलवामा घटनेच्या वेळी पाकिस्तानला साथ अशी काँग्रेसची भूमिका आहे.
राहुल गांधी वारंवार सांगत आहेत की, संविधान धोक्यात आहे. पण हे सांगताना ते केवळ मतांच्या चोरीविषयी बोलत आहेत की रस्त्यावर युवाशक्ति उतरेल असा ते इशारा देत आहेत ? सोशल मिडियावर राहुल यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रियांचा वर्षावर होताना दिसतो आहे. राहुल गांधी एक्सवर व्होट चोरी फॅक्टरी असा उल्लेख करीत आहेत आणि दुसरीकडे मुंबईत रात्री दोन वाजता नवा अेपल फोन खरेदी करण्यासाठी तरूणाईंची झुंबड बघायला मिळत आहे. काँग्रेसच्या काळात घरगुती गॅस सिलिंडरसाठी रांगा दिसायच्या आता ऐपल फोनसाठी रांगा लागत आहेत. बिहारमधील निवडणुकीच्या निकालानंतर समजेल की जनरेशन झेड राहुल गांधीबरोबर आहे की अन्य कोणाबरोबर. आग आणि हिंसाचाराच्या माध्यमातून नव्हे तर मतदानातून सत्तांतर घडविण्याची ताकद देशातील युवकांमधे आहे. भारत हा बांगला देश , श्रीलंका किंवा नेपाळपेक्षा वेगळा आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
