राज्यातील विविध क्षेत्रातील सोळा यशस्वी युवांचा होणार सन्मान
छत्रपती संभाजीनगर : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने मागील सव्वीस वर्षांपासून राज्यस्तरीय युवा पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्राच्या सर्वागीण विकासासाठी विविध क्षेत्रात विधायक, भरीव व विशेष कामगिरी करणाऱ्या युवक-युवतींना हे पुरस्कार देण्यात येतात. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येते.
यावर्षीच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून पुरस्कार वितरण सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवारी (३० मे २०२५ रोजी ) सकाळी ९.३० वाजता रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर येथे होणार आहे. माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम असतील, तर मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२४-२५ सालचे मानकरी असे : साहित्य – विनायक होगाडे (कोल्हापूर), मृदगंधा दीक्षित (पुणे), सामाजिक – आकाश टाले (नागपूर), ऋतुजा जेवे (बुलढाणा), इनोव्हेटर – सुश्रुत पाटील (पालघर), पद्मजा राजगुरू (परभणी), क्रीडा – ओजस देवतळे, नागपूर (क्रीडा प्रकार : धनुर्विद्या), हृतिका श्रीराम, सोलापूर (डायव्हिंग), पत्रकारिता – प्रथमेश पाटील (पुणे), ज्योती वाय. एल. (मुंबई), उद्योजक जयेश टोपे (नाशिक) शिवानी सोनवणे (पुणे), तसेच रंगमंचीय कलाविष्कार विभागात कृष्णाई उळेकर, धाराशिव (लोककला), तन्वी पालव, सिंधुदुर्ग (शास्त्रीय नृत्य), ऋतुजा सोनवणे, जळगाव (शास्त्रीय संगीत), कल्पेश समेळ, रायगड (नाट्य) असे एकूण सोळा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत.
महाराष्ट्रातील युवकांच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, हे या पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे. २१ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटरचे कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव निलेश राऊत, कार्यकारिणी सदस्य डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. श्रीरंग देशपांडे, डॉ. आशिष गाडेकर, डॉ. रेखा शेळके, डॉ. दासू वैद्य, प्रेरणा दळवी, सुबोध जाधव, रुपेश मोरे, राजेंद्र वाळके, वैशाली बावस्कर, संतोष मेकाळे आदींनी केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
