ज्या शेतात मी आज बसलो आहे त्या शेतातून निघालेल्या पिकावरच, माझे शिक्षण पूर्ण झालं. घडलो, वाढलो, संस्कारीत झालो, ते याच शेतातल्या मातीच्या कुशीत. शेतातल्या वस्तीतील गोठ्यातील शेणा मुताचा वास, आजही जसाच्या तसा मला आठवतो. तो कोणत्याही अत्तरा पेक्षा मला अधिक जवळचा वाटतो. उन्हाळ्यात नांगरून टाकलेल्या मातीवर वळवाचा पाऊस पडला, की मृदगंध साऱ्या आसमंतात दरवळायचा.
राजा माळगी , 9421711367
दिवाळी सुट्टीत गावी गेलो असता, संध्याकाळी फिरायला म्हणून, शेताकडे गेलो. आमच्या शेतात माझ्या वडिलांनी लावलेले चिंचेचे भले मोठे झाड आहे. त्या झाडाखाली बसण्यासाठी म्हणून एक लोखंडी कॉट टाकला आहे. त्यावर बसून सारं शिवार मी न्याहाळत होतो. सूर्य पश्चिम क्षितिजावर कलंडलेला होता. त्यामुळे लाल पिवळ्या किरणांनी सारा आसमंत फुललेला होता.
दोन-चार काळे ढग आकाशात दिसत होते आणि माझ्या मनामध्ये आठवणींचे ढग दाटू लागले. जिथे मी आज बसलो होतो, त्या मातीचे अनंत उपकार माझ्या व्यक्तिमत्त्वावर झाले आहेत .कधीकाळी आमचे शेत म्हणजे, ओसाड माळरान होते. माझ्या वडिलांनी आपल्या साऱ्या शेतीविषयक ज्ञानाचा या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला. त्यामुळे ज्या मातीत कुसळं उगवत होती, तिथे आता ऊस, सोयाबीन सारखी नगदी पिकं डोलताना पाहायला मिळतात.
माझे वडील नेहमी म्हणायचे शेतकऱ्याने मातीशी बोलण्याचे कौशल्य आत्मसात केले पाहिजे. हे कौशल्य प्राप्त होण्यासाठी शेतकरी आणि माती यांच्यात अनुसंधान निर्माण झाले पाहिजे. कुशल शेतकरी हा मातीची पूजा नाही करत. तर तो त्याच्याशी अनुसंधान साधत असतो. अनुसंधान या शब्दाचा अर्थ तादात्म्य पावणे होय. एकदा तुम्ही मातीशी एकरूप झाला, तर माती तुमच्याशी बोलू लागते. काय हवे काय नको ते सांगू लागते. तिचे लाड पुरवले की, ती भरभरून आपल्याला देते. माझे वडील तासंतास शेतात बसून असायचे. ऊन, वारा, पाऊस याचा नेमका अंदाज त्यांना होता. त्यामुळे मुठीने पेरून, खंडीणे धान्य ते निर्माण करायचे.
त्यांच्याबरोबर मंचप्पा नावाचा एक वाटेकरी आमच्या शेतात होता. त्याच्या दोन पिढ्या आमच्या शेतात खपल्या. मंचाप्पा मातीच्याच रंगाचा होता. तो इतका मातीशी एकरूप झाला होता, की तो ज्याला हात लावायचा त्याचं सोनं व्हायचं. आमच्या शेतात अक्षरशः गोकुळ होतं. चार-पाच म्हशी, दोन-चार रेडकं, दोन बैल, बैलगाडी, शेतीची औजारे, शेतात मोठच्या मोठं खळं. सारी कृषी संस्कृती नांदत होती.
कांदा, लसूण, टोमॅटो, बटाटे, भेंडी, मिरची, कोथिंबीर या भाज्यांची रेलचेल असायची. माझे वडील स्वतःच्या हाताने रोहिणी नक्षत्रावर भाताची पेरणी करायचे, त्यामुळे भाताचे पीक हमखास यायचं. पोटरीला आलेल्या भाताच्या शेतातून फिरताना साळीचा वास मनाला बेहोश करायचा. भाताची मळणी म्हणजे एक उत्सव असायचा. भात कापून खळ्यावर अंथरायचे आणि त्याच्यावरून जनावर रात्रभर फिरवायचं म्हणजे मळणी काढायची. खळ्यावरची गाणी मध्यरात्री आसमंतापर्यंत पोहोचायची. आदी मध्ये तीन दगडाची चूल करून गुळाचा चहा व्हायचा. रात्रभर जागून पहाटे पहाटे मळणी काढली जायची. भाताचा पिंजरा शेतात पसरून, खाळयावरचा भात, वारं द्यायला तयार व्हायचं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याची राखेने रास बांधली जायची. मग डोक्यावर टोपी घालून, लाभ, एक, दोन, तीन असे अंक मोजत, पोती भरली जात असत.
भुईमुगाच्या शेंगा तोडणे, वाळवणे यात मोठी गंमत होती. शेंगा रात्रीच्या वेळेला राखण करण्यासाठी आम्ही खळ्यावर झोपत असू. जेवण झाल्यानंतर शेंगा भाजून खात असतानाच गजाल्याना ऊत येत असे. खळ्यावर झोपून आकाश निरीक्षणाचा अनोखा अनुभव आम्ही कित्येक वर्ष घेत होतो. माझ्या लहानपणी माझ्या वडिलांनी आकाशातील नक्षत्रांची ओळख करून दिली होती. रात्रीच्या निरभ्र आकाशात चंद्र आणि चांदण्या न्याहाळताना, बाल मनाला विलक्षण आनंद होत असे.
बऱ्याच वेळेला इरिगेशनच्या चेंबरमध्ये मनसोक्त डुंबताना आणि एकमेकांच्या खोड्या काढताना खूप मजा यायची. सुगीच्या दिवसात आंब्याच्या झाडाखाली घरातल्या सर्वांची अंगत, पंगत बसायची. तसं जेवण नेहमीचच असायचं, पण शेतात झाडाखाली बसून केलेले जेवण म्हणजे, संतृप्तीचा वेगळा अनुभव असायचा. अनेक वेळेला मी, गाई आणि म्हशींच्या धारा काढल्या आहेत. पान्हावलेल्या म्हशींची धार काढताना, सर सर करत फेसाळले दूध भांड्यात साठले, की खूप समाधान वाटायचे.
मी लहान असताना, खळ्यावर धान्य वाळवून पोत्यात भरत असताना, गावातले सगळे बलूतेदार यायचे. माझी आई सुपाने, सगळ्या बलुतेदारांच्या पोत्यात धान्य ओतत असे. बलुतेदारांचा चेहरा आनंदाने उजळुन जायचा. मग वर्षभर विनासायास तुटलेले चप्पल शिवणे, केस कापणे, कपडे शिवणे बिन खर्चाचे व्हायचे.
कित्येक सुट्ट्यांमध्ये म्हशीं चरायला सोडून, कधी कधी तिच्या पाठीवर बसून, अनेक कथा, कादंबऱ्या, कविता मी वाचल्या आहेत. त्या काळात इरिगेशनच्या पाठातून आलेले नदीचे पाणी, आम्ही थेट पित होतो. इतके ते पाणी, नितळ आणि शुद्ध होतं. त्या हिरण्यकेशीमाईच्या पोटातल्या पाण्यावरच आमचा सारा जित्राब फुललेला असायचा. ज्या शेतात मी आज बसलो आहे त्या शेतातून निघालेल्या पिकावरच, माझे शिक्षण पूर्ण झालं. घडलो, वाढलो, संस्कारीत झालो, ते याच शेतातल्या मातीच्या कुशीत. शेतातल्या वस्तीतील गोठ्यातील शेणा मुताचा वास, आजही जसाच्या तसा मला आठवतो. तो कोणत्याही अत्तरा पेक्षा मला अधिक जवळचा वाटतो. उन्हाळ्यात नांगरून टाकलेल्या मातीवर वळवाचा पाऊस पडला, की मृदगंध साऱ्या आसमंतात दरवळायचा. आज त्या आठवणीच्या निमित्याने मन पुन्हा ताजे तवाने झाले. पण खंत एकाच गोष्टीची आहे. आता माझ्या शेतात गाई ,म्हशींचा गोठा नाही. त्यांच्या शेणा, मुताचा वास नाही. बैल, बैलगाडी, नांगर, कुळव, कुरी अशी औजारे नाहीत. ट्रॅक्टरने नांगरणी केल्यामुळे भली मोठी ढेकळं सारी कडे दिसतायेत. आज शेतात आधुनिकता दिसते. समृद्धी कुठेतरी लोक पावलेली आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
