December 18, 2025
Cover of Khurpan Marathi poetry collection by poet Mahavir Kamble highlighting rural and social themes
Home » दबलेल्या विस्कळीत माणसांच्या वेदनेचा घाव
मुक्त संवाद शेती पर्यावरण ग्रामीण विकास

दबलेल्या विस्कळीत माणसांच्या वेदनेचा घाव

मनाची जेव्हा घुसमट होते तेव्हा कविता लेखणीतून कागदावर उतरते. स्वतःच्या आतल्या आवाजाला दबवून अश्रूमध्ये लपलेल्या वेदनेत तो स्वतःच शांतता शोधतो. स्वतःचं जगणं शब्दबद्ध करताना समाजातील धागा तो अचूकपणे टिपतो. कारण कुठल्याही व्यक्तीचं आयुष्य वैयक्तिक नसतं तर ते समाजाशी जोडलेलं असतं. हेच या कवितेचे आशयसूत्र आहे.

अनुराधा काळे, लेखिका

महावीर कांबळे हे सरस्वती हायस्कूल या अग्रेसर व नामांकित शिक्षणसंस्थेत पर्यवेक्षक या पदावर कार्यरत आहेत. ते मराठी विषयाचे एक तज्ज्ञ अभ्यासक आहेत. एक लेखक, कवी व कथाकार या अंगाने त्यांचे लेखन सकस, दर्जेदार व समृद्ध आहे. साहित्यिक विचारांचे आदान-प्रदान करणे नव्या साहित्य निर्मितीला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, साहित्य संस्कृतीची परंपरा दृढ करणे हाच विचार डोळ्यासमोर ठेवून इचलकरंजी येथील संस्कृती प्रतिष्ठान गेली चार वर्षे संस्कृती साहित्य संमेलन आयोजित करीत आहे या प्रतिष्ठानचे कांबळे हे अध्यक्ष आहेत. त्यांनी निबंधसरिता, काकासाहेब – आत्मचरित्र व खुरपं या काव्यसंग्रहाचे लेखन केलं आहे.

21 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या पाचव्या संस्कृती साहित्य संमेलनात खुरपं या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा कवी सायमन मार्टिन (वसई) यांच्या हस्ते होणार आहे. या काव्यसंग्रहात 39 कविता आहेत. खरं तर कवितेची संख्या न पाहता गहनता आणि जीवनाशय पाहणं महत्वाचं आहे. कवितेची शब्दकळा साधी व ओघवती आहे. त्यामुळे तिची भावोत्कटता वाढली आहे. कविता ही आरशासारखी असते त्यात डोकावताना आपल्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. मनाचा तळ दिसतो आणि ती कविता आपली होऊन जाते. याचाच प्रत्यय या वाचताना होतो.

मनाची जेव्हा घुसमट होते तेव्हा कविता लेखणीतून कागदावर उतरते. स्वतःच्या आतल्या आवाजाला दबवून अश्रूमध्ये लपलेल्या वेदनेत तो स्वतःच शांतता शोधतो. स्वतःचं जगणं शब्दबद्ध करताना समाजातील धागा तो अचूकपणे टिपतो. कारण कुठल्याही व्यक्तीचं आयुष्य वैयक्तिक नसतं तर ते समाजाशी जोडलेलं असतं. हेच या कवितेचे आशयसूत्र आहे. जगणं या कवितेत कवी म्हणतात –
अहो, ऊस गोड असतो
त्याचंही चिपाड केले जातं
कडूपणाचं चिपाड होत नाही आशानिराशेच्या डोहात
मी वाटतो सूर्यकिरण ही कविता अलंकाराचा गाजावाजा न करता समाजाला आरसा दाखवते. खऱ्या अर्थाने दांभिकतेवर बोट ठेवणारी आणि त्यावर प्रकाश टाकणारी ही कविता आहे.

ग्रामीण जीवनाच्या मातीचा गंध घेऊन उभा राहिलेला खुरपं हा काव्यसंग्रह. हा कवीच्या अनुभवविश्वाचा प्रामाणिक अविष्कार आहे. हे केवळ शेती साधन नसून ग्रामीण जीवनातील जगण्याचं मर्म आहे. जसं खुरपं हे तण काढून पिक वाचवतं तसेच या काव्यसंग्रहातील कविता समाजातील जीवनातील आणि मनातील ज्या गोष्टी निरर्थक आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करतात. खुरपं हे शीर्षक संपूर्ण काव्यसंग्रहातील आशयाशी ग्रामीण जीवनदृष्टीशी आणि कवीच्या परिवर्तनशील भूमिकेशी पूर्णतः सुसंगत ठरते. हा कवितासंग्रह म्हणजे समकालीन समाजजीवनातील विसंगती वेदना आणि संघर्ष यांचे प्रभावी दर्शन घडवतो. कवीची कविता ही केवळ शब्दांची न राहता ती समाजाच्या अंतर्मनाशी संवाद साधणारी ठरते. शोषित वंचित आणि उपेक्षित घटकांचे दुःख कवीने अत्यंत संवेदनाशीलतेने मांडले असून त्यामागे तीव्र सामाजिक जाणीव प्रकर्षाने जाणवते. भाषाशैली साधी थेट आणि लोकाभिमुख असल्यामुळे कविता वाचकांच्या मनात सहज पोहोचते. प्रतीकात्मक प्रतिके व वास्तववादी मांडणी यांचा समतोल साधत कवीने सामाजिक प्रश्नांना कलात्मक अधिष्ठान दिले आहे. काही ठिकाणी कविता वाचकाला अस्वस्थ करतात तर काही ठिकाणी अंतर्मुख होण्यास भाग पाडतात हीच या संग्रहाची खरी ताकद आहे. एकूणच हा काव्यसंग्रह समाजपरिवर्तनाची आस बाळगणाऱ्या साहित्यपरंपरेत भर घालतो.

‘आई असते छत’ ही कविता शब्दात मावणारी नसून प्रतिमातून उलगडणारी आहे. छतासारखी सावली देणारी आई जगण्याची मूर्ती बनते. चुलीतल्या निखाऱ्यापासून जात्यातल्या पिठापर्यंत तिचे अस्तित्व ऊब, श्रम आणि पोषणाचे रूप देते. आई म्हणजे अश्रू या ओळीत तिच्या न बोललेल्या वेदनांची शांत सरिता वाहते त्यामुळे ही कविता वाचकांच्या हृदयाशी भिडते.

मार्मिकता, वर्मावर बोट, अचूक निरीक्षण व अनोखी शब्दकळा या गुणवैशिष्ट्यांनी कविता प्रभावशाली ठरते. कवीची कविता जीवनाविष्कार व चिंतनात अधिक रमताना दिसते. जीवनचिंतन सूक्ष्म व्यापक असल्याचेही जाणवते. समाज आणि व्यवस्था यांनी आपल्याला आखून दिलेला एक परीघ आहे. हा परीघ डोळसपणे पहावा त्यातील सत्यासत्यता तपासून पाहावी ही तळमळ या संग्रहातून दिसून येते.

‘माझा भीमा ‘ या कवितेत
गावकुसाबाहेर ढकललं
माणसातून उठवलं
जगणं आणि पाणी नाकारलेली माणसं या ओळी अन्याय, अस्पृश्यता आणि बहिष्काराचे भयाण वास्तव उघड करतात. ही माणसं केवळ शोषित नव्हती तर माणूस म्हणून जगण्याचा हक्कच हिरावून घेतलेली होती हे कवी येथे अधारेखित करतो. अशा परिस्थितीत बाबासाहेबांनी त्या माणसांना माणूस म्हणून उभं केलं हा या कवितेचा मध्यवर्ती गाभा आहे.
सगळीकडं अंधारच अंधार होता युगांचा अंधार होता.
हा अंधार क्षणिक नव्हता तर पिढ्यानपिढया चालत आलेला, शतकानूशतके रुजलेला अंधार होता. या अंधाराच्या विरोधात बाबासाहेबांनी ज्ञानाची ज्योत पेटवली. त्यामुळेच ही कविता स्तुतीगान न राहता सामाजिक व ऐतिहासिक आशय गडद करते. प्रचंड मोठ्या जलाशयातील पाणी पाहून आपण स्तिमित होतो. भिंत मात्र छोटी आहे. पण या भिंतीवर पाणी पेलण्याची प्रचंड ताकद आहे. त्याचप्रमाणे या काव्यसंग्रहातील कविता म्हणजे फक्त शब्दांचे अवडंबर नाही किंवा पोकळ शब्द नाहीत तर त्यामध्ये अनुभवाचे संचित व अनुभवाचे कोंदण लाभले आहे. त्यामुळे या कविता सशक्त वाटतात आणि तितक्याच ताकदीच्या वाटतात.

‘माहेर ‘ही कविता सामाजिक वास्तव उघड करणारी आहे. सत्ताधारी वाटणारा पुरुष परंपरेच्या चौकटीत अडकलेला आहे ही जाणीव ही कविता करून देते . स्त्रीपुरुषसमानतेचा मुद्दा नव्या दृष्टीने मांडते.

माणूस कुठपर्यंत लढतो उर्मी आहे तोपर्यंत नाहीतर कणाकणानं मरतो पण जीवनातल्या अनुभवांच्या संदर्भात कोणत्याही कवीच्या काहीही प्रतिक्रिया असल्या तरी हे अनुभवच त्याच्या काव्य निर्मितीला प्रेरक ठरतात, यात काही शंका नाही. ती खरे आहे ! जगाने, जीवनाचे केलेले आघात पचवून शेवटी त्या जगासाठीच सुंदर काव्यनिर्मिती करण्याची किमया कवी खेरीज दुसऱ्या कुणाला साधते ! मातृभाषेतून मिळणाऱ्या ज्ञानाला संस्कृतीचा सुगंध आहे. नाती आणि संस्कृतीशी नाळ जुळलेला हा काव्यसंग्रह सर्वांच्या पसंतीस उतरेल अशी आशा व्यक्त करते आणि या काव्यसंग्रहाचे मनापासून स्वागत करते.

कवितासंग्रहाचे नाव – खुरपं
कवी – महावीर कांबळे
प्रकाशक – प्रभा प्रकाशन, कणकवली
किंमत – १६० रुपये

सामान्य माणसाच्या जगण्याच्या संघर्षाचं प्रतिनिधित्व करणारा कवितासंग्रह

महावीर कांबळे यांची पश्चिम महाराष्ट्रातील एक अग्रेसर सांस्कृतिक कार्यकर्ते अशी ओळख आहे. त्यांच्या खुरपं या कवितासंग्रहातील कविता म्हणजे सामाजिक दृष्ट्या दबल्या गेलेल्या विस्कळीत माणसाच्या वेदनेचा एक पीळ आहे. हा कवितेचा पीळ जसजसा वाचकाच्या मनात अधिकाधिक सुटा होत जातो तसतसे या कवितेतील दुःखाचे रांजण जास्तीत जास्त भरलेले लक्षात येत राहते. एका बाजूला ही कविता एका व्यक्तीचं आत्मचरित्र कथन करते तर दुसऱ्या बाजूला सामाजिक समूहाचा एक मोठा आवाज मुखर होत जातो. साध्या सोप्या शब्दात अवतरणाऱ्या या कवितेतून आजच्या जगण्याची कोंडी जशी मांडली आहे तशीच या कवितेतून ‘ जगण्याची कीव यावी एवढं नियोजन बोगस नसावं’ अशा शब्दात जगण्याच्या जमाखर्चाचा हिशोब घातला गेला आहे. त्यामुळे सामान्यातल्या सामान्य माणसाच्या जगण्याच्या संघर्षाचं प्रतिनिधित्व ही कविता करत असल्यामुळे दुर्लक्षित विशिष्ट समूहाला न्याय देण्याची भाषा ती बोलते आहे. हे या कवितेचं सर्वाधिक सामर्थ्य आहे. चांगल्या माणसांच्या चांगुलपणाच्या संरक्षितवृत्ती बद्दल बोलताना ही कविता माणसाच्या भल्याचेही गोडवे गाते तर ‘ आयुष्याची फेसाटी झाली आहे’ असं म्हणत ही कविता गोंधळलेल्या माणसाच्या संवेदनशीलतेचे तीव्रतेने प्रकटीकरण करते.

अजय कांडर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading