इचलकरंजी येथे 21 डिसेंबर रोजी संमेलनाचे आयोजन
पुरस्कार वितरण, ग्रंथ प्रकाशन आणि कविसंमेलन
इचलकरंजी – येथील संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित केल्या जात असलेल्या पाचव्या संस्कृती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठीतील जेष्ठ कवी आणि सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टिन (वसई) यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन रविवारी ( 21 डिसेंबर) रोजी सायं. ४ वा. इचलकरंजी, सरस्वती हायस्कूल, सुभद्रादेवी माने सभागृह येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष कवी महावीर कांबळे यांनी दिली.
इचलकरंजी शहर हे कष्टकऱ्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. इथे सांस्कृतिक कार्यक्रमही सातत्याने होत असतात. यातच अजून साहित्य सांस्कृतिक कामाचे योगदान देऊन साहित्याच्या मुख्यधारीतील परिवर्तन विचाराला जोडून घेण्यासाठी पाच वर्षांपूर्वी संस्कृती साहित्य प्रतिष्ठान ही संस्था सुरू करण्यात आली. यानंतर सातत्याने दरवर्षी मराठीतील एका महत्त्वाच्या लेखक कवीच्या अध्यक्षतेखाली एक दिवशीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. यापूर्वी कवी अजय कांडर, समीक्षक प्राचार्य गोविंद काजरेकर, कादंबरी लक्ष्मीकांत देशमुख, कृष्णात खोत यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन झाले आहे.
यावर्षीच्या पाचव्या सदर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विख्यात कवी सायमन मार्टिन यांची निवड करण्यात आली आहे. मागील चार दशकापासून साहित्य आणि परिवर्तनवादी चळवळीत सक्रिय असलेल्या सायमन मार्टिन यांच्या कवितेची जडणघडण ही पुरोगामी विचार, तत्त्वज्ञान सामाजिक उत्थानाचे लढे, उदारमतवादी मूल्य व्यवस्था या सर्व घडामोडीतून आकारास आलेली आहे. त्यामुळे ती वाचकाला परिवर्तनाची वाट दाखवणारी, सामाजिक संघर्षात समताधिष्ठित मूल्यांचा आग्रह धरणारी आणि त्यासाठी ठाम भूमिका घेणारी कविता आहे.
समाजाच्या व्यथावेदनांच सजग भान देणारी त्यांची कविता वाचकाच्या मनाचा ठाव घेते. लोकशाही व्यवस्था अबाधित राहावी हे त्यांच्या कवितेचं मुख्य सूत्र आहे. तेच सूत्र अधिकाधिक सामान्य जनापर्यंत जावं या हेतूने त्यांची पाचव्या संस्कृती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या संमेलनात संस्कृती प्रतिष्ठानच्या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून यात लक्ष्मण कांबळे (जिंदा) स्मृती संस्कृती कादंबरी पुरस्कार प्रा. डॉ. रमेश साळुंखे (कोल्हापूर) यांना तर दगडू लाल मर्दा स्मृति संस्कृती समीक्षा पुरस्कार प्रा.जिजा शिंदे यांना आणि वसंत कमल स्मृती संस्कृती काव्य पुरस्कार कवी उदय जाधव यांना प्रदान करण्यात येणार आहेत. तर संमेलनाच्या उद्घाटन सत्रात प्रभा प्रकाशन प्रकाशित आणि कवी महावीर कांबळे लिखित खुरपं काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
यावेळी कवी चंद्रकांत पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन रंगणार असून यात कविता वाचनासाठी विनायक होगाडे, संचिता चव्हाण, गोविंद फाठक, कुमुदिनी मधाळे, संचित कांबळे, श्वेता लांडे, राहुल राजापुरे, प्रियांका भाटले, अमोल कदम, महेश सटाले, दिनकर खाडे आदी कवी ना कविता वाचनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
