मूठभर प्रस्थापितांचा नंगानाच थोपवण्यासाठी युगांतरांनी क्रांतिकारकांसारखा तसेच समाजसुधारकांसारखा जन्म घ्यायला पाहिजे असे मत कवितेतून मांडणारा. स्वातंत्र्य आणि समतेचा भोक्ता असणारा कवि मैत्रीच्या ओलाव्यात सहजच झिरपून जातो.
परिक्षण – बा. स. जठार
गारगोटी (9850393996)
सामाजिक वास्तवाचे भान साहित्यामध्ये सहजपणे उमटवणाऱ्या बाबा जाधव या कविचा भूक हा कवितासंग्रह सामाजिक परीघातले विविध आशय आणि विषय घेऊन प्रकाशित झालेला आहे. भूलभुलैयाने ओतप्रोत भरलेल्या समाजात आईचे वात्सल्य हरवून गेलेले आहे. तेच वात्सल्य अंतर्मनातून मांडणारा कवि अंधकाररूपी भविष्यातील कस्पटासमान जगावं लागणारं जगणं अनुभवातून मांडताना लिहीतो,
कष्टाचा एक एक पै
संचय करून ठेव माय
म्हातारपणीचं जीणं
कुत्र्यामांजराहून वाईट हाय
तू येणारच असशील तर ही कविता डोळे, बट, चांदणी, लावण्य या श्रृंगाररूपी शब्दांना अलगदपणे कवटाळत वाचकाच्या मनाला सहजपणे प्रेमाची भूरळ घालते. प्रेयसीला येताना गारासवे, गच्च आभाळासवे, कडाक्याच्या थंडीसवे, तसेच परकीय संस्कृतीचं जोखड झुगारून आपल्या संस्कृतीसवे ये अशा आशयाची कविता ऱ्हास पावत चाललेल्या संस्कृतीला नक्कीच पुन्हा नव्याने उभारी देईल असे वाटते. मातीशी इमान राखणारा बाप आणि त्याची अस्वस्थ कन्या, आयुष्यरुपी वाटेवर क्षणाक्षणाला भेटणारा गुरू, सजलेलं जीवनगाणे, भिजलेले मन, हसलेले क्षण, हरपलेले भान, या साऱ्यांना भावूकपणे काव्यपुष्पात गुंफून कवि वाचकाला शब्दरुपी खुराक देण्यात कुठेही कमी पडत नाही. दळणवळणाच्या साधनांमुळे वाढत जाणारा दुरावा, पैशापायी लाचार होणारे मतदार मांडताना भ्रष्टाचारामुळे उज्वल भारताचे स्वप्न कसे साकार होईल या प्रश्नाचा भार कवि थेट वाचकांवर टाकून मोकळा होतो.
मूठभर प्रस्थापितांचा नंगानाच थोपवण्यासाठी युगांतरांनी क्रांतिकारकांसारखा तसेच समाजसुधारकांसारखा जन्म घ्यायला पाहिजे असे मत कवितेतून मांडणारा. स्वातंत्र्य आणि समतेचा भोक्ता असणारा कवि मैत्रीच्या ओलाव्यात सहजच झिरपून जातो. आपल्या मनातली खंत मांडताना तो शिवबा, ज्योतिबा यांच्यासह रयतेचा राजा – शाहूराजा यांना कवितेतून शोधत आहे. अस्वस्थ करणारी, वेदना देणारी, चिंब भिजवणारी कविता शब्दात डुंबवते, पाखरात मिसळते असे एक कविता या कवितेत कवि ठासून सांगतो. काव्यरूपी शब्दांना आयुष्याचे साथीदार बनण्याची आर्त हाक देत तो शब्दांचे शीतल रुप, त्यांची धार, त्यांचा लोभ, त्यांचा आधार, त्यांचे महत्व मांडण्यात थोडाफार का होईना यशस्वी झाल्याचे दिसून येते. सा-यांची भंबेरी उडवणारे कोरोना, लाॅकडाऊन हे शब्द कवितेत मांडताना जगण्यातली आशा सुसह्य करण्याचा प्रयत्न करताना कवि लिहीतो,
खबरदारी ती
नियम पाळू या
स्वच्छ राहू या
जीवनात.
नियमांची पायमल्ली न करता सुखाच्या प्रवासाने आपल्या घरट्यात परतायला लावणाऱ्या बापाचे शब्द थेट हृदयालाच पाझर फोडतात. आपल्या मनातील व्यथांचा कल्लोळ कागदावर मांडताना कशाचाही विचार न करता कविने शब्दांची मांडणी व्यवस्थितरित्या केलेली आहे.
दलितांची छाया
वंचितांची माया…
अशा शब्दात डाॅ. बाबासाहेबांवर स्तुतीसुमने उधळणारा कवि नैसर्गिक आपत्तीखाली पिचलेल्या समाजाचे वर्णन करताना शब्दांच्या यथायोग्य वापराने नजरेसमोर हुबेहुब दृश्य निर्माण करतो. नितीमत्तेला गुंडाळून न ठेवता जीवन जगत गेल्यास जगण्यात मज्जा येईल असे मत व्यक्त करताना एड्स, बेवारस यांची पिल्लावळ आपोआपच थांबेल असा आशावादही तो कवितेतून व्यक्त करतो.
स्त्री भ्रूणहत्या या सामाजिक विषयाकडे लक्ष वेधताना कवि लिहीतो की,
कळी कळी उमलू दे
फुलासवे फुलू दे
वा-यासवे डुलू दे
सुंदर जन्म घेऊ दे
मदिरेच्या नशेत बुडून बरबाद होणाऱ्यांना विनवणीच्या करुण स्वरात हाक देत अंतर्मनातून कवि म्हणतो,
करतो कविराज विनवणी
लई वंगाळ एकच प्याला
तुम्ही समजून घ्या जनहो
आहे मदिरा विषाचा घाला.
मदिरेच्या, निराशेच्या, पाशाच्या मार्गाने जीवन संपवणारे लोक कविला कवितेतून भेटतात. कवितेची सेवा करता करता आपल्या व्यवसायाची महती कवी अखंड चौसष्ट वर्षे या कवितेतून वाचकासमोर मांडतो. यामागील नेमका हेतू ओळखून येत नाही. वेगवेगळ्या रंगांचे ध्वज हातात न धरता माणुसकी जागवण्याचा सल्ला कवि आपल्या कवितेतून तरूण पिढीला देतो.
मनाची स्पंदन खोलत विचारांच्या लाटेवर हिंदोळणा-या दोलायमान कविता कविने आणखी प्रगल्भ कराव्यात अशी आशा व्यक्त करून कवीच्या प्रवासाला शुभेच्छा देतो.
कवितासंग्रहाचे नाव – भूक
कवि – बाबा जाधव
प्रकाशक – पद्मरत्न प्रकाशन
पृष्ठे – 80
किंमत – 120 रूपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.