कवी अजय कांडर अध्यक्ष तर डॉ.अनिरुद्ध फडके प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित
कणकवली – सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक कवी डॉ. अमुल महादेव पावसकर यांच्या प्रभा प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘अनुभूती ‘ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार १७ मे रोजी सायं ४ वा. मराठा समाज मंडळ सभागृह कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नामवंत कवी तथा भारत सरकार साहित्य अकादमीचे (मराठी) माजी सदस्य अजय कांडर तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई लिलावती हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर अनिरुद्ध यशवंत फडके यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमाच्या संयोजक डॉ. कादंबरी अमुल पावसकर यांनी दिली.
कवी डॉ.अमुल महादेव पावसकर यांची सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक म्हणून ख्याती आहे. मात्र कवी म्हणूनही ते गेली अनेक वर्ष निष्ठेने काव्य लेखन करत असतात. कवितेबरोबर चित्रकलेची आवड असणाऱ्या डॉ. अमुल पावसकर यांचे यापूर्वी काही काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. कवी डॉ.अमूल पावसकर यांची ‘अनुभूती ‘ काव्यसंग्रहातील कविता माणसाचे समग्र जगणे समजून घेते. पावसकर यांच्या एकूण काव्य लेखनाला कोणाताच विषय वर्ज्य नाही.
प्रेमापासून समाजजीवन, राजकारण, निसर्ग ते मानवी नातेसंबंध या सगळ्यांची ही कविता मांडणी करते. एकाबाजूला यातील असलेली सौंदर्य गुणात्मकता दाखवून देतानाच दुसऱ्या बाजूला त्यातील फोलपणाही दाखवून क्षणभंगूर आयुष्याला आग्रहाने अधोरेखित करत जाते. वरवर साध्या सोप्या शब्दात अवतरणारी सदर कविता जीवनाच्या व्यामिश्रतेचे दर्शन घडवत जगण्याच्या चिंतनाला सहज भिडते.एकूणच मानवी जगणे खरवडून काढताना वाचकाला माणसाच्या विविध स्तराचा, त्याच्या अंतरविरोधाचा, मतभिन्न अस्तित्वाचा विचार करायला भाग पाडते. कष्टाचं मोल जाणणारी ही कविता धर्म मार्तंडांच्या बाजारी राजकारणावर आसूड ओढते. कोणत्याच एका विशिष्ट सामाजिक, राजकीय विचारसरणीचा आग्रह न धरणाऱ्या या कवितेला समकाळाचे भान आहे.म्हणूनच आज घडणाऱ्या प्रत्येक अनिष्ट गोष्टीला ती प्रबोधनात्मक सामोरे जाते. हे या कवितेचं सगळ्यात महत्त्वाचं मोल आहे. कोकणात लिहिल्या जाणाऱ्या आजच्या कवितेत या कवितेचे स्वतंत्र अस्तित्व आहे. तरी साहित्य रसिकांनी सदर कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.