दीपा सावंत खोत यांची निर्मिती, रघुनाथ कदम यांचे दिग्दर्शन
कांडर यांच्या आवानओल काव्यसंग्रहातील कवितांचे नाट्यरूपांतर
मुंबई – मराठीतील सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या प्रतिष्ठित महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार विजेत्या बहुचर्चित ‘आवानओल’ काव्यसंग्रहातील कवितांवरील ‘कळत्या न कळत्या वयात’ या नाटकाचा प्रारंभ सोमवारी (ता. १४ एप्रिल रोजी ) सायंकाळी ७ वाजता मुंबई प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे करण्यात येणार आहे. मुंबई दीप तारांगण प्रोडक्शन हाऊसतर्फे कळत्या न कळत्या वयात नाटक रंगभूमीवर सादर होत असून रघुनाथ कदम यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले असल्याची माहिती या नाटकाच्या निर्मात्या दीपा सावंत खोत यांनी दिली.
निलेश भेरे, डॉ. अनुराधा कान्हेरे, अपर्णा शेट्ये आणि दीपा सावंत खोत आदी कलाकार हे नाटक सादर करणार आहेत. तर रजनीश कोंडविलकर यांचे नेपथ्य लाभले असून संजय तोडणकर यांची प्रकाशयोजना तर अक्षय जाधव यांनी पार्श्वसंगीत दिले आहे.
अजय कांडर यांचा ‘आवानओल’ हा संग्रह 2005 मध्ये शब्दालय प्रकाशनतर्फे प्रकाशित झाला. त्यानंतर या संग्रहाला महाराष्ट्र फाउंडेशन, इंदिरा संत असे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले. या संग्रहातील कविता इंग्रजी, हिंदी, कानडी, तेलगू, उर्दू आदी भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाल्या. हा संग्रह प्रकाशित होऊन वीस वर्षे झाली असूनही अजूनही तो वेगवेगळ्या निमित्ताने चर्चेत असून आता या संग्रहातील समग्र कवितेचे नाट्यरूपांतर कळत्या न कळत्या वयात या शीर्षकाअंतर्गत करण्यात आले आहे.हे नाट्य लेखन कवी अजय कांडर यांनीच केले आहे.
माणूस भवतालातील वेगवेगळ्या अस्मितेतून घडत जातो आणि तो सामाजिक विषमता निर्माण करतो. पण निखळ माणूस म्हणून माणूस जगला तर समाजात समतेचे सौजन्यपूर्ण वातावरण निर्माण होते. यासाठी माणसाने माणसासारखंच जगायला हवे आणि माणसाने माणसाकडून माणसाकडेच जायला हवे. अशा आशयाच्या केंद्रस्थानी हे नाटक असून नाटकाचे लेखक – दिग्दर्शक आणि नाटकाच्या निर्मात्या या तिन्ही व्यक्ती सिंधुर्गातील असल्याने कोकणातील नाट्य रसिकांनी या नाटकाला चांगला प्रतिसाद द्यावा असे आवाहनही दीपा सावंत खोत यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – राजू मोरे – 8689997594
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
