March 29, 2024
Book Review of Sandeep Tapkir Forts in Nashik District
Home » महाराष्ट्राची दुर्गपंढरी – एक विक्रम वारी
मुक्त संवाद

महाराष्ट्राची दुर्गपंढरी – एक विक्रम वारी

किल्ल्यांनी आपल्याला किती द्यावं – किती सोसावं ! पण हजारो वर्षांचा वारसा जपण्यासाठी, त्यांच्याशी कृतज्ञ राहण्यासाठी आपण त्या गडांना काय दिलं ? ‘राकट देशा, कणखर देशा… अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा…’ असे म्हणताना हा ‘महाराष्ट्र’ दगडांच्या देशाबरोबरच ‘गडांचा देश’ही आहे, याचे भान ठेवायला हवे.

विद्या केसकर

पंढरी, विठोबा आणि वारी हे अविभाज्य समीकरण शेकडो वर्षे महाराष्ट्राच्या कानामनात भरून राहिलं आहे. वारी म्हणजे ‘एकच कृती वारंवार करणे.’ पंढरीची वाट चालणारी पावले पुण्यवान! त्याचप्रमाणे, महाराष्ट्रातील गडकिल्ले, छत्रपती शिवराय आणि ‘हरहर महादेव’चा घोष सह्याद्रीच्या कडेकपारी घुमवणारे शूर मावळे हे महाराष्ट्राला लाभलेले विक्रमी वरदानच आहे. किल्ल्यांचा इतिहास हजारो वर्षांचा असला, तरी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने, पदस्पर्शाने पावन झालेले किल्ले यांना आगळे स्थान आहे. त्यांचे दर्शन घेणे ही दुर्गपंढरीची वारीच. नाशिक जिल्ह्यातील साठ किल्ल्यांना २० वर्षांच्या कालावधीत वारंवार भेट देऊन त्यांचे समग्र दर्शन दुर्गप्रेमी व ट्रेकर्सना घडावे या भावनेने दुर्गपंढरीच्या निष्ठावंत भक्त संदीप तापकीर यांनी ‘महाराष्ट्राची दुर्गपंढरी’ हे ३०० पानांचे पुस्तक वाचकांसमोर ठेवून ‘वारी’च घडविली आहे.

महाराष्ट्रात सुमारे ४०० किल्ले आहेत. इतिहासाचा अभ्यासक या नात्याने विविध गडकिल्ल्यांचा वेध घेणे ही लेखकाची भूमिका आहे. जिल्हानिहाय किल्ल्यांसंबंधी स्वतंत्र पुस्तक लिहिण्याचा संकल्प मनात ठेवून त्यांनी आजपर्यंत पुणे, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यांतील किल्ले ही स्वतंत्र पुस्तके अगोदरच प्रकाशित केली आहेत आणि अजूनही काही पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. ‘आधी केले मग सांगितले’ यानुसार श्री. तापकीर यांनी बहुतांश सर्व गडांची पायवाट पायाखाली, नजरेखाली घातली. प्रसिद्ध-अप्रसिद्ध, उपेक्षित दुर्लक्षित अशा सर्व किल्ल्यांचे डोळसपणे निरीक्षण करून तो वृत्तांत शब्दबद्ध केला आहे. इथला इतिहास व भूगोल गडकिल्ल्यांनी व्यापलेला आहे. शिवकालीन, शिवपूर्वकालीन, पुराणकालीन अशा गडकोटांचे अवशेष शूरवीरांच्या पराक्रमाच्या, जय-पराजयाच्या ऐतिहासिक खुणा जपणार्‍या गडांची सचित्र, रंगीबेरंगी सफर स्फूर्तिदायी आहे, असे म्हणावेसे वाटते.

जिल्ह्याचा भौगोलिकदृष्ट्या विचार करायचा, तर डोंगराच्या सुमारे १२ रांगा आहेत. कळसूबाई, सातमाळा, चणकपूर, सेलवारी रांग, तसेच नाशिक, पेठ, त्रिंबक उपरांगादेखील आहेत. विशेष म्हणजे, दक्षिणवरदायिनी गोदावरीचे उगमस्थान असलेला त्र्यंबकगड त्रिंबकरांगेवर असून, याच रांगेवर बरेचसे दुर्गम किल्ले वसलेले आहेत. काळेकभिन्न कडे, दुर्गम वाटा, पाण्याचे दुर्भिक्ष हीच या किल्ल्यांची वैशिष्ट्ये, असे लेखकाने नमूद केले आहे. या रांगांवर आगळीवेगळी वैशिष्ट्ये मिरविणारे हे गड म्हणजे जणू पवित्र तीर्थक्षेत्रेच आहेत. या गडगंगेच्या वाटेवर काटेकुटे, दर्‍याखोर्‍या, चोरवाटा, भुयारी मार्ग, पायवाटा, पायर्‍या, गुहा आहेत. या किल्ल्यांनी विक्रमी वीरांचे पराक्रम पाहिलेत, त्याप्रमाणे तोफांचा भडिमार सोसला आहे. त्याचबरोबर महाराजांच्या पदस्पर्शाचे पुण्यही प्राप्त केले आहे. दुर्गम किल्ल्यांवरील या बिकट वाटा, येथे भेट देणार्‍या दुर्गप्रेमींना शक्य तितक्या सुगम व सुलभ व्हाव्यात या दृष्टिकोनातून श्री. तापकीर यांनी अनेक गोष्टींचा तपशील देऊन काही सावधगिरीच्या सूचनाही केल्या आहेत, हे लक्षणीय आहे. त्यामुळे ही केवळ ऐतिहासिक माहिती नसून, एक ‘आदर्श मार्गदर्शक’ आहे, असे म्हणावेसे वाटते.

साठ किल्ल्यांमधील प्रत्येक किल्ल्यासंबंधी स्वतंत्र प्रकरण आहे. त्यांच्या केवळ शीर्षकावरून नजर टाकली तरी मन मोहून जाते. ‘साल्हेर-महाराष्ट्राचे एव्हरेस्ट’, ‘त्र्यंबकेश्वराच्या भक्तीतला तपस्वी त्र्यंबकगड’, ‘मोगलांना साडेपाच वर्षे झुंजविणारा रामसेज, ‘अकल्पनीय निसर्गनवल हरिहरगड, ‘युद्धशास्त्रीय द्वाररचनेचे प्रतीक अंकाई-टंकाई’, ‘जिल्ह्यातला एकमेव भुईकोट किल्ला मालेगाव’ ही उदाहरणादाखल शीर्षके!

पुस्तकाचा प्रारंभ ‘डुबेरगड’ आणि सांगता ‘गाळणा’ किल्ला या प्रकरणाने करण्यात लेखकाने औचित्य साधले आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले ‘डुबेरवाडी’ हे गाव म्हणजे पहिला बाजीराव पेशवा याचे जन्मस्थान. या बाजीराव पेशव्याचा पराक्रम शिवाजीमहाराजांच्या तोडीचा समजला जातो. म्हणून या किल्ल्याला पहिला मान दिला. गाळणा किल्ल्याचे महत्त्व म्हणजे, तो नाशिक जिल्ह्यात पायथ्यापासून माथ्यापर्यंत अभेद्य तटबंदी लाभलेला आणि शिलालेखांची राजधानी समजला जाणारा, तसेच अवशेष व इतिहास यांच्या बाबतीत परिपूर्ण असा किल्ला आहे.

‘प्रत्येक किल्ला आपल्याला काही ना काहीतरी देऊन जातो,’ असे लेखकाने म्हटल्याप्रमाणे, खरोखरच नाशिक जिल्ह्याचे हे परमभाग्य आहे. काही किल्ल्यांना विशेष भाग्य लाभले आहे. त्यांपैकी ‘सातमाळा रांगेतील कांचना’ हा किल्ला. कांचनबारीच्या लढाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सुरतेच्या लुटीनंतर खजिना बरोबर घेऊन जाणार्‍या शिवरायांनी ‘कांचनबारी’ ही खिंड रणक्षेत्र म्हणून निवडली. या युद्धाचे नेतृत्व त्यांनी स्वत: केले. महाराज स्वत: चिलखत घालून दोन्ही हातांत पट्टे लावून युद्धाच्या तयारीत राहिले. अपूर्व व्यूहरचनेच्या साहाय्याने त्यांनी लढाईत शत्रूला जेरबंद केले. तुंबळ युद्धात शेवटी मराठ्यांचाच विजय झाला. खुल्या मैदानात समोरासमोर झालेल्या या लढाईच्या विजयाने मराठी सैन्यात नवचैतन्य संचारले.

‘पट्टागड’ हा किल्लाही भाग्यवंत आहे; कारण या किल्ल्यावर महाराजांनी १५ दिवस मुक्काम केला होता. मोगलांचे जालना शहर लुटल्यानंतर मोगल सरदार त्यांच्यावर चालून आला होता. सारे सैन्य श्रमले होते. अशा वेळी बहिर्जी नाईक हेरखात्याचा प्रमुख याने महाराजांना या पट्टा किल्ल्यावर कौशल्याने सुखरूप आणले. येथे महाराजांनी १५ दिवस विश्रांती घेतली आणि स्वत:च त्या गडाचे नाव ‘विश्रांतीगड’ असे ठेवले. ‘प्रचंड विस्तार असलेल्या या किल्ल्याच्या संरक्षणासाठी कमीत कमी २००० तोपची लागतील.’ या उल्लेखावरून त्याच्या विस्तृत स्वरूपाची कल्पना येते.

‘हरिहरगड’ म्हणजे निसर्गाने बनविलेली उत्तम कलाकृती असे वर्णन केले गेले आहे; पण तितकीच दुर्गम वाट असणाऱ्या या किल्ल्यावर जाण्यासाठी मानवाने बनविलेला मार्गही वैशिष्ट्यपूर्ण आहे. ७० कोनाच्या १५० पायर्‍यांचा अवघड चढ चढावा लागतो आणि या वाटेवरून केवळ एकच सशस्त्र सैनिक जाऊ शकतो, अशी रचना!

‘रामसेज’ किल्ल्याने मोगलांना साडेपाच वर्षे झुंजविले आणि शेवटी त्यांनी तो फितुरीनेच जिंकला. मुख्य म्हणजे औरंगजेबाने जेव्हा स्वराज्यातील किल्ले जिंकण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांत ‘रामसेज’ हा पहिला किल्ला होता. आणि म्हणून मोगल त्याला ‘शकुनाचा किल्ला’ म्हणत. तरीपण कडवी झुंज द्यावी लागली. हा किल्ला पेशव्यांच्या काळात मराठ्यांच्या ताब्यात आला. वाचताना असं जाणवतं की, प्रत्येक किल्ल्याला ‘स्वत:चं’ असं वेगळं स्वतंत्र रूप आहे. आपले पूर्वज युद्धशास्त्र, वास्तुशास्त्र, दुर्गशास्त्र अशा विविध विद्या जाणत असत.

‘हरगड’ हा किल्ला युद्धशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा असूनही दुर्लक्षित. त्यादृष्टीने ‘युद्धशास्त्रातील दुर्लक्षित किल्ला’ हे शीर्षक उत्सुकता वाढविणारं आहे. या गडाची शान म्हणजे, बुरुजावरील १५ फूट लांब व दोन फूट रुंद अशी, अजूनही सुस्थितीत असलेली प्रचंड तोफ. ही ‘हजारबागदी’ तोफ मिश्र धातूची असून, तिच्या महाकाय आकारामुळे ती गडावर कशी आणली, हा प्रश्न मनात येतो. त्यावरून कदाचित येथे तोफा ओतण्याचा कारखानाही असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिवलिंगासारखा आकार असलेल्या ‘धोडप’ या किल्ल्याचा ‘तुरुंग’ म्हणून उपयोग केला जात असे. किल्ल्यात आणि गावात ठिकठिकाणी तोफा पडलेल्या दिसतात. ‘हातगड’ किल्लाही दुर्गशास्त्रदृष्ट्या महत्त्वाचा. चौल्हेर हा भुयारी मार्ग असलेला किल्ला, तर ‘पिसोळगड’ हा दुर्गावशेषांचा ‘खजिना’ म्हणून वैशिष्ट्यपूर्ण आहे.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दिमाखाने मिरवणारा ‘सालोटा’ हा किल्ला. त्याचे दर्शन निसर्गाची किमया वाटावे असेच. मुख्य म्हणजे, हा अवघड श्रेणीतला किल्ला आहे. त्यामुळे ‘भटकंतीची कसब जोखणारा’ असा सावधानतेचा इशारा श्री. तापकीर देतात. त्याची चढाई करणारे केवढे कौशल्याचे, जिकिरीचे आहे, याची कल्पना करण्यापेक्षा ते प्रकरण प्रत्यक्ष वाचले पाहिजे. त्याचप्रमाणे, ‘साल्हेर-मुल्हेर’ असे जोडीने नाव घेतले जात असले, तरी ‘सालोटा’ हाच साल्हेरचा जोडकिल्ला आहे, असा खुलासा लेखक करतात. ‘मुल्हेर’ गडासंबंधात कवी मधुकर याने ‘मोरामोरी हरगड त्रिकुटाचलवत् अवघड’ असे वर्णन केले आहे. मुल्हेर, मोरा व हरगड हे ते किल्ल्यांचे त्रिकूट होय! मुल्हेरचा उल्लेख महाभारतातही आढळतो. पुराणकाळात मयूरगिरी किंवा मयूरध्वज राजाचा उल्लेख आहे.

मुल्हेरगडावर झाडे विपुल आहेत. विशेष म्हणजे, गवताच्या सुवासिक जाती हे आगळेवेगळे निसर्गवैभव! हे गवत उकळून, त्यापासून निघणारे सुवासिक तेल फ्रान्समध्ये अत्तरे, सेंट्स बनविण्यासाठी पाठवले जात असे. अर्थात, आज त्याची दुरवस्था झाली आहे, ही खेदाची गोष्ट होय. मुल्हेर शिवाजीराजांनी कधी जिंकला नाही, असा एक समज आहे; पण तो अपसमज असल्याचा खुलासा संदीप तापकीर करतात.

काही किल्ल्यांची नावे जोडीनेच घेतली जातात. मावळातील लोहगड-विसापूर, तुंग-तिकोना. याचप्रमाणे, नाशिक जिल्ह्यातील मांगी-तुंगी, रवळ्या-जवळ्या, अंकाई-टंकाई. यांपैकी रवळ्या-जवळ्या हे एक जुळं दुर्गवैभव. मैलोनमैल पठारावर विसावलेली ही दुर्गजोडी म्हणजे अपवादानेच आढळणारे उदाहरण! यांपैकी रवळ्या कठीण आहे. जवळ्याहून उंच असलेल्या या गडावर पायर्‍या होत्या. त्या मॅकिन्टॉश या इंग्रज अधिकार्‍याने तोडून टाकल्यामुळे वाट अधिक खडतर झाली आहे. जवळ्याचे वैशिष्ट्य म्हण,जे एका कातळात खोदलेला बोगदा हेच त्याचे प्रवेशद्वार! शहाजीराजांच्या ताब्यात असलेले हे किल्ले अलावर्दीखानाने जिंकले. १६७० मध्ये शिवरायांनी ते स्वराज्यात आणले.

अफाट विस्तार असलेल्या या किल्ल्यांना शत्रूने वेढा कसा घातला असेल, हे कोडेच आहे. कारण त्यासाठी लाखभर सैन्य लागणार किंवा ते गनिमी काव्यानेच जिंकावे लागतील. हे सांगताना लेखक म्हणतात, ‘वेढा घालून जिंकणे ही मोगलांची पद्धत. त्यांना गनिमी कावा कधीच जमला नाही. ते कौशल्य आणि वैशिष्ट्य शिवाजी महाराजांचे !’

‘अंकाई-टंकाई’ ही जोडी ‘युद्धशास्त्रीय द्वाररचनेचे प्रतीक’ आहे. येथे आढळणार्‍या लेणी – गुहा यावरून हे किल्ले ८व्या ते १२व्या शतकात बांधले गेले असावेत. टंकाईच्या पोटात खोदलेल्या लेणी म्हणजे ‘एक हजार वर्षांपूर्वी हिंदू व जैन शिल्पकृतींचे सुरेख मिश्रण! हा सात जैन लेणींचा समूह आहे. अंकाईवरील गुहा ‘अगस्तीची गुहा’ म्हणून ओळखली जाते.’ मध्ययुगात या जोडदुर्गावरून गोदावरी खोरे व खानदेशची टेहळणी केली जात असे. कॅप्टन मॅक्डोवलने या ठिकाणी तोफांचा मारा केल्याची नोंद आहे. त्या वेळेस किल्लेदाराने शरणागती पत्करून किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात दिला.

हे असे सर्व किल्ले बहुरंगी-बहुरूपी वैशिष्ट्याचा ध्वज मिरवीत असले, तरी साल्हेर, मुल्हेर, त्र्यंबकगड, चांदवड हे किल्ले वाचकांचे मन गुंतवून ठेवतात.

भौगोलिकदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी असलेला चांदवड किल्ला व्यापारी मार्गावर लक्ष व नियंत्रण ठेवण्यासाठी बांधला गेला. तसेच आक्रमकांच्या हालचालीवर वचक निर्माण करणे हा मुख्य उद्देश होता. या विस्तीर्ण पठाराची शान म्हणजे येथील टाकसाळीची इमारत! टाकसाळीत पाडण्यात येणारा – पेशवाईच्या काळात चलन म्हणून वापरला जाणारा ‘चांदीचा रुपया’ म्हणजे चांदवडी म्हणून ‘चांदवड!’ पेशव्यांच्या काळात येथे दरमहा ‘एक लक्ष’ नाणी पाडली जात; परंतु आज भग्नावस्थेत असलेली ही इमारत पाहून वाईट वाटते. तिचे संवर्धन करून त्यासंबंधीचे फलक लावले जावेत, असे संदीप तापकीर तळमळीने सांगतात. अजून एक लक्षणीय गोष्ट म्हणजे, अहिल्यादेवी होळकरांनी जीर्णोद्धार केलेल्या रेणुकामातेचे मंदिर. मातेचा मुखवटा दोन किलो वजनाचा, सोन्याचा आहे. तोही आवर्जून पाहावा.

लेखकाने ‘साल्हेर’ किल्ला म्हणजे ‘महाराष्ट्राचे एव्हरेस्ट’ असं म्हटलं आहे आणि ते सार्थच आहे; कारण हा महाराष्ट्रातला सर्वांत उंच किल्ला आहे. आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे, या किल्ल्याचा घेरा ११ किलोमीटरचा आणि ६०० हेक्टर क्षेत्राचा आहे. प्राचीन यज्ञवेदी, परशुरामाचे मंदिर, रेणुकामातेची शस्त्रसज्ज चतुर्भुज मूर्ती, गंगासागर तलाव हे गडाचे अलंकार आहेत.

ऐतिहासिक दृष्टीने साल्हेरच्या रणसंग्रामाला शिवरायांच्या चरित्रात महत्त्वाचे स्थान आहे. दिलेरखानासोबत झालेल्या या लढाईत मोरोपंत आणि प्रतापराव यांनी कुशल व्यूहरचना करून या डोंगराळ भागात घोडदळापेक्षा पायदळाचा वापर प्रभावी ठरेल या भूमिकेतून झंझावाती हल्ला केला आणि मराठे विजयी ठरले. या विजयामुळे मोगलांचा दरारा संपविला गेला. त्याचप्रमाणे, गनिमीकाव्याच्या तंत्राबरोबरच खुल्या मैदानातदेखील बलाढ्य मोगलांचा पराभव करू शकतो, हा आत्मविश्वास मिळवला.

कविराज भूषणने ‘शिवबावनी’ या काव्यात युद्धाचे सुंदर वर्णन केले आहे, तसेच कवी जयराम पिण्ड्ये याने साल्हेरचा ‘सह्याद्रिमस्तक बग्गुलानामभूतपूर्व जगतीतल विश्रुत:!’ असा गौरव केला आहे. ‘साल्हेर शिवाजी महाराजांनी जिंकल्याचे ऐकून मोगलांच्या काळजात धडकी भरली. स्वर्ग-मृत्यू-पाताळ तिन्ही लोक महाराजांचे गुणगान करू लागले,’ असे भूषण कवीने वर्णन केले आहे. हे सर्व वाचून ‘साल्हेरला एकदा तरी भेट द्यावी’ असे वाटल्याशिवाय राहणार नाही.

या पुस्तकाच्या सुरुवातीस ‘मनोगत’ मांडताना लेखक संदीप तापकीर यांनी ‘दंडकारण्याच्या प्रदेशात शिरण्यापूर्वी’ असे म्हटले आहे. म्हणजे, नाशिक जिल्ह्यातील किल्लेच केवळ प्राचीन नाहीत, तर हा संपूर्ण प्रदेशच हजारो वर्षांच्या खुणा जपणारा प्राचीन आहे. गडांचा हा प्रदेश घोड्यांच्या टापा, तलवारींचा खणखणाट, तोफांचा भडिमार ह्यांनी दणाणला. तितकीच ही भूमी ऋषीमुनींच्या मंत्रोच्चाराने दुमदुमली आहे. त्यामुळे या प्रांताला ‘रणक्षेत्र’ म्हणण्याबरोबरच ‘तीर्थक्षेत्र’ही म्हणणे अधिक औचित्यपूर्ण ठरेल. प्रभू रामचंद्रांचा पदस्पर्श लाभलेली ही पुण्यभूमी आहे.

‘त्र्यंबकगड’ हे नाव घेतलं की, त्या क्षेत्राशी निगडित बारा ज्योतिर्लिंगांपैकी स्थान असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर दक्षिणवरदायिनी गोदावरीचे उगमस्थान. रॉकी लाव्हाचा उत्तम नमुना – जटाशंकर मंदिर, गौतमऋषींचा आश्रम, गोरक्ष गहिनीनाथांच्या गुहा ही स्थाने आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. त्र्यंबकगड म्हणजेच ब्रह्मगिरी! विस्तीर्ण अशा ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेसाठी पाच-सहा तास लागतात. पेशवेकाळात गुन्हेगारांना शिक्षा म्हणून ही प्रदक्षिणा घालण्यास सांगितले जाई. याविषयी संत नामदेव म्हणतात,

‘दृष्टी पाहता ब्रह्मगिरी । त्यासी नाही यमपुरी।

नामा म्हणे प्रदक्षिणा। त्याच्या पुण्या नाही गणना॥’

हे झाले गडाचे आध्यात्मिक रूप; पण ऐतिहासिक रूप जपणारा त्र्यंबकगड म्हणजे यावर चिलखती बांधणीचा बुरूज आहे. गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यांपैकी पायर्‍यांचा मार्ग सोयीचा; परंतु या बुलंद, प्रचंड ब्रह्मगिरीवर जाण्यासाठी पायात गोळे आणणार्‍या ७५० पायर्‍या चढाव्या लागतात. हे वाचूनच छाती भरून येईल. दुर्गभांडार किंवा भांडारदुर्ग हा गडावरील अद्भुत आविष्कार! शेवटच्या टोकापर्यंत गड लढविता यावा म्हणून शत्रूवर तोफांचा मारा करण्यासाठी गडाच्या एका टोकावर दगडात खोदून पिछाडीचा चिलखती बुरूज बांधला आहे. त्याला ‘कडेलोटाचा बुरूज’ म्हणतात.

संदीप तापकीर येथे महत्त्वाचा खुलासा करतात, ‘पर्णालयपर्यंतग्रहणाख्यानम्’ या ग्रंथात हा किल्ला शिवाजी महाराजांनी सुरतेच्या लुटीनंतर घेतला’ असा उल्लेख आहे; परंतु सभासद बखरीनुसार, प्रत्यक्षात हा गड साल्हेर युद्धाच्या प्रसंगी मोरोपंत पिंगळे यांनी १६७०मध्ये घेतला. लेखकाची अभ्यासू वृत्ती येथे दिसते. नानासाहेब पेशव्यांनी त्या काळी किल्लेदाराला फितवून मेहनतीने मोगलांच्या ताब्यातील हा किल्ला जिंकला. १८१८ मध्ये कर्नल मॅक्डोवेल याने केलेल्या तोफांच्या भडिमारामुळे येथील हत्तीमेट प्रदेश उद्ध्वस्त झाला. तरीपण किल्ला जिंकल्यानंतर गावाच्या पायथ्याशी औरंगजेबाने बांधलेली मशीद पाडून मंदिराची पुनर्बांधणी केली व त्याच वेळी कुशावर्त कुंडही बांधण्यात आले. ही जमेची बाजू!

जिल्ह्यातील या बहुविध किल्ल्यांच्या मांदियाळीत अपवादात्मक किल्ला म्हणजे ‘मालेगावचा भुईकोट किल्ला’. मालेगावचे भूषण असणार्‍या या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे, अन्य गिरीदुर्गांना शत्रूपुढे अल्पकाळात शरणागती पत्करावी लागली, अशी वस्तुस्थिती असूनही या एकमेव भुईकोट किल्ल्याने ब्रिटिशांना एक महिनाभर अक्षरश: सळो की पळो करून सोडले होते. रावबहादूर नारोशंकर या ब्राह्मण सरदाराने १८ व्या शतकात हा किल्ला बांधला. या भव्य किल्ल्याभोवतीचा नळदुर्गाप्रमाणे असलेला खंदक नऊ मीटर खोल होता. तटबंदीत अनेक भुयारी मार्ग असल्याचा उल्लेख सापडतो. महत्त्वाचे म्हणजे, या वास्तूत कांकणी विद्यालय असून, किल्ल्याच्या मूळ स्वरूपात कोणतेही बदल केलेले नाहीत. शाळेच्या वहिवाटेमुळे आजही हा किल्ला नांदता आहे. त्यामुळे दुर्गप्रेमींचे मन सुखावते ! ब्रिटिश व अरब यांच्यात महिनाभर चाललेल्या युद्धात अरबांनी माघार घेऊन गड इंग्रजांच्या ताब्यात दिला; परंतु लेखकाच्या म्हणण्यानुसार, अरबांचा पराक्रम आठवण्यासाठी या किल्ल्याला भेट दिलीच पाहिजे.

एकंदरीत पाहता, या ६० दुर्गांची सफर नक्कीच स्फूर्तिदायक आहे; पण त्याच वेळी संवेदनशील मनावर जखमांचे ओरखडेही उठतात. तोफांच्या भडिमाराने भग्न झालेले दुर्गावशेष, दुर्लक्ष केल्यामुळे भंगलेले, अस्पष्ट दिसणारे, तत्कालीन इतिहासाची छोटी-मोठी नोंद ठेवणारे साक्षीदारस्वरूपी अनेक शिलालेख, बर्‍याचशा प्रकरणांत शेवटी नेहमीप्रमाणे ‘किल्ला ब्रिटिशांनी ताब्यात घेतला किंवा नाइलाजाने द्यावा लागला’ हे उल्लेख मन व्यथित करतात. असं वाटतं की, या किल्ल्यांनी आपल्याला किती द्यावं – किती सोसावं ! पण हजारो वर्षांचा वारसा जपण्यासाठी, त्यांच्याशी कृतज्ञ राहण्यासाठी आपण त्या गडांना काय दिलं ? ‘राकट देशा, कणखर देशा… अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा…’ असे म्हणताना हा ‘महाराष्ट्र’ दगडांच्या देशाबरोबरच ‘गडांचा देश’ही आहे, याचे भान ठेवायला हवे.

अ‍ॅड. मारुती गोळे यांनी प्रस्तावनेत म्हटल्यानुसार, ‘दुर्ग हे केवळ हौसमौजेची ठिकाणे नव्हेत, तर आपल्या जगण्याची ऊर्मी आहेत.’ हे भान ठेवूनच संदीप भानुदास तापकीर यांनी २५ ते ३० वर्षे आपल्या मित्रांसोबत किल्ले पायाखाली घातले, अभ्यास केला, इतिहास शोधला. निधड्या छातीने दुर्ग सर केले आणि या ऐतिहासिक, पौराणिक काळाचे अनुसंधान ठेवून आधुनिक काळाशी त्याची नाळ घट्ट ठेवण्याच्या तळमळीने या गडावर जाण्यासाठीचे मार्ग, प्रवासात येणार्‍या अडचणी, कमतरता, वाहनव्यवस्था, त्या त्या स्थानावर पोहोचण्यासाठी असणारे अंतर, कालावधी ह्यांचे सविस्तर वर्णन या ‘दुर्गपंढरी’ची वारी घडविताना केले आहे. अनेक गडांची रंगीत व कृष्णधवल छायाचित्रे अचूक टिपून त्यांचा समावेश पुस्तकात केल्यामुळे किल्ल्यांचे महत्त्व आणि आकर्षण वाढते.

निसर्गदत्त डोंगर – माथा – पठार यांच्याभोवती तटबंदी, बुरूज बांधून त्या किल्ल्यांचा उपयोग ‘संरक्षण’ म्हणून करताना त्या काळात तेथे निवास, भांडार, दारूगोळा साठवणे, युद्धशास्त्राच्या दृष्टीने वास्तुरचना या सर्व गोष्टींचा विचार केला, तर आपले पूर्वज किती कुशल होते याचा अभिमान वाटतो. दंडकारण्यभूमी असल्यामुळे त्या त्या काळातील परशुराम, गौतम, मार्कंडेय, कपिल आदी मुनींच्याही अस्तित्वाच्या खुणा प्रकर्षाने आढळतात. अध्यात्म – सात्त्विकता आणि शौर्य – विक्रम यांचा अपूर्व संगम असलेली नाशिक जिल्ह्यातील ही विस्तीर्ण प्राचीन भूमी. तिची उंची डोंगराच्या उंचीप्रमाणे मोजता न येणारी आहे. वेगवेगळ्या प्रसंगी झालेल्या लढाया, युद्ध यांबद्दलची माहिती किंवा वर्णन हे प्रत्यक्षच वाचायला हवे. तेव्हाच वीरश्रीयुक्त ऊर्मी हृदयात जागेल-उफाळेल!

या सर्व किल्ल्यांचे जिल्ह्यातील अचूक स्थान दर्शविणारा नकाशाही त्यांच्या नावाच्या यादीसह पुस्तकात सुरुवातीस दिला आहे. पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या संदर्भसूचीवर नजर टाकली, तर लेखकाची पावले जशी मैलोनमैल चालली, तितकेच त्यांचे डोळेही विविध इतिहासतज्ज्ञ लेखकांची पुस्तके, त्यातील संदर्भ शोधण्यासाठी किती श्रमले असतील, याची कल्पना येते.

अ‍ॅड. श्री. मारुती गोळे यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘आपण आपल्याच पूर्वजांच्या पाऊलखुणांवर पाऊल टाकत आहोत, ही जाण मनी असायला हवी आणि त्या पावन भूमीतील चिमूटभर माती भाळी लावून या दुर्गांना अभिमानाने मुजरा करायला हवा.’

या पुस्तकात संदीप तापकीर या दुर्गमावळ्याने केलेली दुर्गसेवा, भ्रमंती, अनुभवनिष्ठेने, तन्मयतेने शब्दबद्ध केली आहे. हे पुस्तक म्हणजे, दुर्गपंढरीच्या वारकर्‍यांसाठी उत्तम, आदर्श मार्गदर्शक आहे. त्यांनी म्हटल्यानुसार भारतातील सर्व राज्यांची नावे पाहिली, तर ‘राष्ट्र’ हा शब्द केवळ आपल्या महाराष्ट्र राज्याच्याच भाग्यात आहे. या राष्ट्राचा इतिहास, वारसाही महान आहे. तो जपण्यासाठी गडांची सफर पुण्यच प्राप्त करून देईल, हे निश्चित !

पुस्तकाचे नाव – महाराष्ट्राची दुर्ग पंढरी – नाशिक जिल्ह्यातील किल्ले
लेखक – संदीप भानुदास तापकीर
प्रकाशक – विश्वकर्मा प्रकाशन, पुणे
किंमत – ४५० रुपये
पुस्तकासाठी संपर्क – 9168682201, 9168682202

Related posts

तपोवन आश्रमाची स्थापना

भात बियाणे संवर्धकाचा सन्मान

गुरु हा दुःख हरण करणारा खरा मित्र

Leave a Comment