आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
प्रश्न – मॉन्सूनचा प्रवास कसा सुरू आहे ?
माणिकराव खुळे – नैऋत्य मॉन्सून, म्हणजेच भारतीय मॉन्सून (यंदाचा पावसाळा), विषुवृत्त समांतर , पूर्वेकडून पश्चिमेकडे, प्रशांत महासागरीय प्रवास करत, मलेशिया, सिंगापुर, सुमात्रा बेटाचा उत्तरेकडील भाग ओलांडून भारताच्या अंदमान व निकोबार बेटांच्या दक्षिणेकडील आग्नेय बंगालच्या उपसागरात म्हणजे १० डिग्री उत्तर अक्षवृत्त व १०० डिग्री पूर्व रेखावृत्त दरम्यान, येत्या आठच दिवसात म्हणजे १३ मे दरम्यान मजल-दरमजल करत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अर्थात भारत महासागरीय परिक्षेत्रात मान्सून प्रवेशला तरी भारत भू -भागावर म्हणजे केरळात व त्यानंतर सह्याद्री ओलांडून महाराष्ट्रात येण्यासाठी बराच कालावधी लोटला जातो. मात्र मान्सूनच्या ह्या गती-विधिमुळे त्या अगोदर पडणाऱ्या पूर्वमोसमी गडगडाटी पावसाला चालना मिळते.
प्रश्न – मॉन्सून अंदमानात येण्याची सरासरी तारीख काय ?
माणिकराव खुळे – साधारण १९ मे ला मॉन्सून अंदमान व निकोबार बेटावर व आग्नेय बंगालच्या खाडीत येतो.
प्रश्न – मागील पाच वर्षात मॉन्सून अंदमानात कधी पोहोचला होता ?
माणिकराव खुळे – २०२४, २०२३, २०२२ अश्या तीन वर्षात लागोपाठ त्याच्या सरासरी तारखेला म्हणजे १९ मे, तर २०२१ ला २१ मे व २०२० ला १७ मे ला मॉन्सून अंदमानात पोहोचला होता.
प्रश्न – अवकाळी पावसाचा व तापमानाचा अंदाज काय आहे ?
माणिकराव खुळे – उर्वरित महाराष्ट्राबरोबरच, मुंबईसह कोकणातही आज ( ७ मे) तर मराठवाड्यातही आज व उद्या (७ व ८ मे ) ला अवकाळी च्या वातावरणाची शक्यता वाढली आहे. दिवसाचे तापमान कोकण ३३ ते ३५ डिग्री, मध्य महाराष्ट्र ३७ ते ४१, विदर्भ व मराठवाडा ३८ ते ४१ डिग्री असे राहील.
कोकणातील ही तापमाने सरासरी तर उर्वरित महाराष्ट्रात ही तापमाने सरासरीच्या खाली असुन भर उन्हाळ्यात उष्णतेच्या तापेपासून महाराष्ट्राला सुसह्यताच मिळत आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.