मुंबई कॉलिंग –
मुंबईत मराठीची अस्मिता फुलविण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानावर १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा मुंबई तुमची, भांडी घासा आमची अशी टिंगल टवाळी अमराठी लोकांनी व बड्या माध्यमांनी केली होती. पण आज नेमकी तशीच पाळी मराठी माणसावर महाराष्ट्राच्या राजधानीत आली आहे.
डॉ. सुकृत खांडेकर
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मराठी माणूस सतत कमी होत आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला ६५ वर्षे झाली. मुंबई महाराष्ट्राला सहजासहजी मिळालेली नाही. बॉम्बेचे मुंबईसुध्दा सहजासहजी झालेले नाही. त्यासाठी विधिमंडळात आणि संसदेतही मोठा संघर्ष करावा लागला आहे. मुंबईत रोजगार मिळतो म्हणून देशभरातून वर्षानुवर्षे परप्रांतीयांचे लोढे या महानगरावर आदळत आहेत. गेल्या साडेसहा दशकात राज्यावर अनेक राजकीय पक्षांची सत्ता आली पण मुंबईवर आदळणारे अमराठी भाषिकांचे लोंढे कुणाला थांबवता आले नाहीत. कोकणातसुध्दा परप्रांतीयाची संख्या गेल्या काही वर्षात लक्षणीय वाढली आहे. अशा परिस्थितीत आपल्याच मराठी भाषिक राज्यात मराठी माणसाला रोजगारासाठी, घरासाठी, शिक्षणासाठी, वैद्यकीय उपचारासाठी इकडून तिकडे धावावे लागत असेल तर ते दुर्दैव म्हणावे लागेल.
गिरगाव, दादर, परळ, लालबाग, वरळी, माहीम, भायखळा, चिंचपोकळी, करीरोड, ग्रँट रोड, चर्नी रोड, कुलाबा हा दक्षिण मुंबईतला परिसर पंचवीस वर्षापूर्वीपर्यत मराठी लोकांनी गजबजलेला असायचा. आता सर्वत्र उत्तुंग टॉवर्सचा विळखा पडलेला दिसतो. तीस-चाळीस मजली टॉवर्समधे मराठी लोक किती राहतात हे शोधावे लागते किंवा त्यांचे प्रमाण अतिशय अल्प सापडते. मात्र उत्तुंग इमारतीत बहुसंख्य आलिशान फ्ल’टवर झाडू पोचा, धुणी भांडी , स्वयंपाक पाणी करणाऱ्या माता भगिनी आणि नोकर चाकर मात्र मराठीच सापडतील. मुंबईत मराठीची अस्मिता फुलविण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानावर १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा मुंबई तुमची, भांडी घासा आमची अशी टिंगल टवाळी अमराठी लोकांनी व बड्या माध्यमांनी केली होती. पण आज नेमकी तशीच पाळी मराठी माणसावर महाराष्ट्राच्या राजधानीत आली आहे. केवळ व्होट बँक राजकारण करणाऱ्यांना राजकीय नेत्यांना मराठी- मराठी केलेले आवडत नाही. निवडणुकीच्या राजकारणात त्यांची मराठीपेक्षा अमराठी मतदारांवर जास्त भिस्त असते. कारण मुंबईत अमराठी मतदारांची संख्या कितीतरी जास्त आहे. मुंबई घरांची किमती कोटी कोटीवर गेल्याने लक्षावधीच्या संख्येने मराठी माणूस गेल्या दोन अडिच दशकात वसई विरार, नालासापारा, पालघर, नेरूळ, पनवेल, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, बेलापूर, खारघर, आसनगाव, टिटवाळाकडे सरकला आहे. हीच वस्तुस्थिती अभिनेते महेश मांजरेकर यांच्या एका भाषणातून व्यक्त झाली आहे.
शिवाजी पार्कवरही मराठी माणूस उरला नाही, अशी खंत महेश मांजरेकर यांनी व्यक्त करत मुंबईतील मराठी टक्का कमी होतो आहे याकडे लक्ष वेधले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुलुंड शाखेचा ११ वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. या कार्यक्रमात लेखक दिग्दर्शक गजेंद्र अहिरे व अभिनेत्री अंजली वळसणकर यांना कमल शेडगे रंगकर्मी पुरस्कार देण्यात आला. मुंबईतील मराठी टक्का कमी होत असून जे काही मराठीपण शिल्लक आहे ते पुणे व मुलुंडमधे शिल्लक आहे असे मत महेश मांजरेकर यांनी व्यक्त केले. शिवाजी पार्क म्हणजे मराठी माणसाचा गड म्हणून ओळखला जातो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वाधिक विक्रमी सभा शिवाजी पार्क मैदनावरच झाल्या. ते नेहमी या मैदानाचा उल्लेख शिवतीर्थ असाच करीत असत. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचे तर शिवाजी पार्कशी ऋणानुबंध आहेत. शिवाजी पार्क ही मराठी माणसाची शान आहे. मराठी खेळाडू, कलाकार व राजकीय नेत्यांचे शिवाजी पार्कशी आपुलकीचे नाते जडलेले आहे, पण उत्तुंग टॉवर्स व व्यापारीकरणाने शिवाजी पार्कचा चेहरा विलक्षण बदलला आहे, महेश मांजरेकरांनी मराठी माणसाची वेदना व्यक्त केली आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.

1 review
फक्त घरांच्या किंमती हे एकच कारण आहे का ? मनुष्य मग तो कोणीही असो त्याच्या मनोवृत्तीचं काय ? यात राजा आणि प्रजा दोन्ही आले. कारण फक्त एकानेच समाज निर्मिती होत नाही आणि टिकतदेखील नाही. मला वाटतं आणखीन सखोल चिंतनाची जरूर आहे. कारण आहार, निद्रा, भय आणि मैथुन हे तर सर्व प्राण्यांना सारखेच. पण मनुष्य प्राण्यापाशी असणार्या विवेकाचं काय ?. त्याचा वापर त्यानं कधी करायचा ? आणि तो प्रत्येकानच करायला हवा. तरच संघटित समाजाची निर्मिती होणं शक्य आहे. त्यात जातीयवाद, भाषावाद आशा कोणत्याही गोष्टींना थारा नसायला हवा. मनुष्याच्या प्राथमिक गरजा जर पूर्ण होणार नसतील तर त्याच्या शोधार्थ त्याला तो राहातो त्या प्रदेशाचा त्याग करावच लागेल ना ?. भगवान श्रीकृष्णानंदेखील प्रगतीसाठी, उन्नतीसाठी, एका शांतताप्रिय समाजासाठी द्वारीका वसवली. अशाच काही कारणांनी मनुष्यास बदलआवश्यक ठरतो. याच नुसतं दुःख करून काहीही साध्य होईल असं वाटत नाही