मुंबई कॉलिंग
मतदारयादीतील घोळ चव्हाट्यावर …
विविध राज्यात विधानसभा निवडणुकीत विशेषत: महाराष्ट्र, हरियाणामधे मतांची चोरी झाला या मुद्द्यावरून राहुल गांधी गेल्या तीन महिन्यांपासून राष्ट्रीय पातळीवर आवाज उठवत आहेत. आता महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांनी एकत्र येऊन सदोष मतदार यादीविरोधात मुंबईत आवाज उठवला आहे. सत्ताधारी पक्षाचा एक आमदार जाहीर कार्यक्रमात आपण निवडणुकीत वीस हजार मते बाहेरून आणली असे बेधडकपणे कसा सांगू शकतो ? मतदार यादीत वयांमधे तफावत आहे, अनेकांची नावे दुबार आहे, चुकीचे पत्ते आहेत, छायाचित्रे गायब आहेत.
डॉ. सुकृत खांडेकर
गेल्या वर्षी २०२४ मधे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप, शिवसेना ( शिंदे ) व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) अशा महायुतीला विक्रमी बहुमत मिळाले. २८८ जागांच्या विधानसभेत २३५ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला होता, मग अवघ्या चार सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला एवढे आश्चर्यकारक यश कसे मिळाले हे एक गूढ होते. राज्यात महायुतीला प्रचंड यश मिळाल्यावरही फारसा कुठे जल्लोश झाला नाही, जंगी विजयी मिरवणुका निघाल्या नाहीत, आपण एवढ्या मतानी कसे निवडून आलो याचे अनेक उमेदवारांना आश्चर्य वाटले. निकालानंतर काँग्रेस, उबाठा सेना, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) या पक्षांना नैराश्याने घेरले होते. मतदार याद्यांतील घोळ मात्र आता चव्हाटयावर येऊ लागला आहे.
काँग्रेसचे माजी मंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे विधानसभेवर आठ वेळा तरी निवडून आले. संगमनेर मतदारसंघात त्यांचा जनाधार भक्कम आहे. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी सारा मतदारसंघ जोडला आहे. दरवेळी ८० ते ९० हजार मतांनी निवडून येणाऱ्या बाळासाहेबांच विधानसभा निवडणुकीत लाखाने पराभव कसा होऊ शकतो ? वसई विरार मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर हे यापुर्वी सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले. वसई विरार महापालिकेत तर त्यांचे पूर्ण वर्चस्व आहे. वसई विरार या पट्यात त्यांचे नेते व कार्यकर्ते यांचे अफाट जाळे आहे, मतदारसंघात त्यांचा घरोघरी थेट संपर्क आहे मग त्यांचा अवघ्या साडेतीन हजार मतांनी पराभव कसा होऊ शकतो ? ही दोन उदाहरणे केवळ वानगी दाखल दिली आहेत.
विविध राज्यात विधानसभा निवडणुकीत विशेषत: महाराष्ट्र, हरियाणामधे मतांची चोरी झाला या मुद्द्यावरून राहुल गांधी गेल्या तीन महिन्यांपासून राष्ट्रीय पातळीवर आवाज उठवत आहेत. आता महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांनी एकत्र येऊन सदोष मतदार यादीविरोधात मुंबईत आवाज उठवला आहे.
सत्ताधारी पक्षाचा एक आमदार जाहीर कार्यक्रमात आपण निवडणुकीत वीस हजार मते बाहेरून आणली असे बेधडकपणे कसा सांगू शकतो ? मतदार यादीत वयांमधे तफावत आहे, अनेकांची नावे दुबार आहे, चुकीचे पत्ते आहेत, छायाचित्रे गायब आहेत.
बाहेरील राज्यातून आलेले विद्यार्थी महाराष्ट्रात मतदार कसे झाले ? महापालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा निवडणुकीत व्हिव्हीपीएटी असणार नाही असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे, मग हजारो कोटी रूपये खर्च करून ती खरेदी कशाला केली ? आपण दिलेले मत कुणाला दिले हे इव्हिएमवर मतदाराला समजणार नाही. व्हिव्हिपीएटी नसेल तर पुरावे नष्ट होतील. मुळात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थामधे गेली चार ते पाच वर्षे निवडणूक झालेली नाही आणि आता सदोष मतदार यादीवर निवडणूक घेण्याचा निवडणूक आयोगाचा अट्टाहास कशासाठी ?
मुंबईत एक वॉर्ड एक नगरसेवक अशी निवडणूक होणार आहे. मग अन्य महापालिकांमधे एक प्रभाग तीन नगरसेवक कशासाठी ? बहुसदस्य प्रभाग पध्दती रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. मुरबाडमधे एका घरात ४०० मतदार आहेत, बडनेरामधे एका घरात ४५० मतदार आहेत, कामठीमधे घराला क्रमांकच नाही पण तेथे ८६७ मतदारांची नोंद आहे, नालासोपारा येथे सुषमा गुप्ता या नावाची सहा वेळा मतदार म्हणून नोंद आहे मतदार यादीत नावे कोण घुसवतो व कोण काढून टाकतो ? निवडणूक आयोगाचा सर्व्हर दुसरा कोणी ऑपरेट करीत आहे काय हा माजी प्रदेशाध्यतक्ष व माजी मंत्री जयंत पाटील याचा प्रश्न मार्मिक आहे.
मतदार यादीत वडिलाचे वय लहान व मुलीचे वय जास्त अशी नोंद आहे, हे दुरूस्त करायचे नाही का ? निवडणूक आयोगासमोर दोन दिवस विरोधी पक्षांनी खूप आदळ आपट केली, त्यानंतर तरी मतदार यादीत सुधारणा होणार आहे का ? सर्वाधिक व्यवहार डिजिटलवर होत असताना निवडणुकीची मतदार यादी डिजिटलवर का उपलब्ध नाही ?
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर नेम धरून आरोपांची राळ उडवली पण पुढे काहीच झाले नाही. मग शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील (एनसीपी ), बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील ( शेकाप ), जितेंद्र आव्हाड, आदींनी विचारलेल्या प्रश्नांनंतर मतदार यादीत सुधारणा होईल काय ? जोपर्यंत सदोष मतदारयाद्या दुरूस्त होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊन नका, अशी भूमिका विरोधी नेत्यांनी मांडली आहे. राज्यातील जनता मात्र संभ्रमात आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
