December 14, 2025
Illustration showing divided hands of different religions trying to reach each other under the Indian flag symbolizing lost unity
Home » या धार्मिक विद्वेषाचे काय करायचे ?
मुक्त संवाद

या धार्मिक विद्वेषाचे काय करायचे ?

आपण प्रत्येक जण शाळेत असताना प्रतिज्ञा म्हणायचो, “भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत…” पण आपण आपल्याच बांधवांविषयी असे वर्तन करत आहोत की, त्यामुळे त्यांना आपल्या देशात राहत असताना इथल्या वातावरणाची भीती वाटते. भारत देश हे आपले घर आणि तिथे राहणारे सर्व आपले बांधव असे आपण मानतो. मग आपल्याच घरात आपल्या बंधूला भीती वाटावी हे कशाचं लक्षण आहे? असली कुठली संस्कृती आहे जी आपल्याला बांधवाला आपल्याविषयी भीती वाटायला भाग पाडते?

यशवंती शिंदे, कोल्हापूर

नुकताच रमजान ईदचा सण साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या मैत्रिणीचा मला फोन आला, “तू यायलाच पाहिजेस. मी वाट बघतेय, नक्की ये!” तिने खूप आग्रह केला. एवढ्या आग्रहाने कोण बोलवतं सध्या? असा विचार मनात आला. ईददिवशी आम्ही पती-पत्नी दोघेही माझ्या मैत्रिणीच्या घरी गेलो. तिला खूप आनंद झाला. घरच्यांना ओळख करून देत माझ्याकडे अभिमानाने बघत म्हणाली, “माझी बालमैत्रीण आहे. आम्ही दोघी एका शाळेत शिकलो. मी बोलावलं म्हणून कोल्हापूरवरून आली आहे”. तिला मोठं अप्रूप वाटत होतं. “तू जर आली नसती तर तू आल्यावर करायला म्हणून वेगळा मसाला काढून ठेवला होता बघ”, असं म्हणत तिने मला काढून ठेवलेला शिरखुर्मा बनविण्याचा मसालाही दाखवला.

मला एका खोलीत बसवून गेली. परत येताना एका ट्रेमध्ये गरमागरम भजी, गुलगुले, शिरखुर्मा असं बरंच काहीबाही घेऊन आली. तिची जाऊही माझी मैत्रीण बनलेली होती. “ताई, तुम्हाला काय आणू ? तुम्ही आता शिरखुर्मा खावा, जाताना बिर्याणी घेऊन जावा आणि घरी खावा”, असा सातत्याने आग्रह करत होती. त्यांचा पाहुणचार पाहून नेहमीप्रमाणेच दडपून जायला झालं आणि मनात प्रश्न आला, आपल्याकडच्या कुठल्या सणांना आपण त्यांना इतकं आग्रहाने बोलावतो का? “अगं, बस गं. मी किती खाणार आहे! हेच खूप झालं.” असं म्हणताच जरा टेकली आणि बोलायला लागली, “सकाळपासून २०० लीटर दूध संपले. आणखी १०० लीटर मागवले आहे. अजूनही लोकांची रांग लागलेली आहे.

या वर्षी तरी कामाला बायका लावल्या आहेत. त्यामुळे आम्हाला जरा आराम आहे.” इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर म्हणाली, “ताई, आपले शाळेचे दिवस किती छान होते ना? सगळ्या जाती-धर्मांची, गरीब-श्रीमंत अशी मुले एकाच शाळेत असायची. आपली मैत्री धर्मातीत असायची, आजही आहे. परंतु आज आमच्या मुलांचं काय भवितव्य असेल या विचारांनी काळजी वाटत राहते.

आजकाल सिनेमा, सोशल मीडिया यांच्या माध्यमातून वारंवार असा भडिमार केला जात आहे की, मुस्लीम हे दुष्टच असतात, ते आतंकवादी असतात, त्यांचा द्वेष करायला पाहिजे, त्यांना या देशातून हाकलून दिले पाहिजे. अशा विचारांच्या छायेत सध्याची पिढी शिक्षण घेत आहे. जाणीवपूर्वक काहीतरी टाँटिंग करणं, टार्गेट करून बोलणं, टिंगलटवाळी करणं, त्यांच्याकडे पाहून हसणं असले प्रकार मुलांच्या बाबतीत केले जातात. या वातावरणाचा आमच्या मुलांच्या मनांवर काय परिणाम होईल, याची आम्हाला सतत भीती वाटत असते. एक नागरिक म्हणून त्यांच्या घडणीच्या काळात असे वातावरण समाजात मिळाले तर त्यांची निकोप वाढ कशी होईल? “

आमचं झालं कसंतरी. पण आमच्या मुलांचं काय होईल? या विचारांनी मन विषण्ण होते. करमत नाही. विद्वेष पसरविणारे सिनेमे का येतात ? तुम्ही आमच्याकडे माणूस म्हणून बघणार आहात का?” तिच्या बोलण्याने मन पिळवटून निघत होतं. भारत हा देश जसा तुमचा आहे तसा आमचा आहे. भारताचा, महाराष्ट्राचा जयजयकार करताना मन उल्हसित होते, पण तरीही आमच्याच राष्ट्रनिष्ठेची परीक्षा का घेतली जाते ? गुन्हेगार काय फक्त आमच्या धर्मात आहेत का ? जात, धर्म, वंश, लिंग पाहून ते गुन्हा करतात का ? ती तर सर्वच मानवांत असणारी एक वाईट प्रवृत्ती आहे. त्याला धर्माचे लेबल लावून फूट पाडण्याचा, विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न का केला जातो ? सकाळपासून आमच्याकडे पाच-सातशे माणसं येऊन गेली, अजूनही येतच आहेत. पण आमच्या मनात कधीही त्यांच्याविषयी असले वाईट विचार येत नाहीत, आणि जे लोक आमच्या घरी येतात, तेही आमचे खूप चांगले मित्र आहेत. मग असा विखारी प्रचार आमच्या धर्मातील लोकांविषयी का केला जातो? आजवर आपण या देशात राहतो आहोत, पण आताच असं भीतीचं वातावरण का निर्माण केलं जात आहे? हे काहीही कळत नाही.”

अतिशय अस्वस्थ मनाने ती माझ्यापुढे प्रश्नांची मालिकाच वाचत होती. एक आई म्हणून तिला आपल्या मुलांचे भवितव्य काय असणार याची काळजी आणि परिस्थितीबद्दलचा उद्वेग तिच्या बोलण्यातून जाणवत होता. एक सुजाण नागरिक, जागरुक आई म्हणून तिला सध्याच्या वातावरणाची काळजी वाटणं स्वाभाविक होतं. माझा अकरावीत शिकणारा मुलगा त्याच्या होस्टेलमधील अनुभव सांगतो. त्याचा एक रूम पार्टनर मुस्लीम आहे. तो हुशार आहे, मनमिळावू आहे. तरीही केवळ तो मुसलमान असल्यामुळे काही विद्यार्थी त्याला एकटं पाडायचा प्रयत्न करतात. आतंकवादी, दहशतवादी वगैरे कॉमेंट्स त्याच्यावर करतात. सध्याच्या वातावरणात जे चाललं आहे, त्याचाच परिणाम या तरुण मुलांवर आहे.

आपण प्रत्येक जण शाळेत असताना प्रतिज्ञा म्हणायचो, “भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत…” पण आपण आपल्याच बांधवांविषयी असे वर्तन करत आहोत की, त्यामुळे त्यांना आपल्या देशात राहत असताना इथल्या वातावरणाची भीती वाटते. भारत देश हे आपले घर आणि तिथे राहणारे सर्व आपले बांधव असे आपण मानतो. मग आपल्याच घरात आपल्या बंधूला भीती वाटावी हे कशाचं लक्षण आहे? असली कुठली संस्कृती आहे जी आपल्याला बांधवाला आपल्याविषयी भीती वाटायला भाग पाडते? ती कोण निर्माण करत आहे? त्याचा कुणाला फायदा होईल? याचा विचार आपण कधी करणार आहोत? आपणा प्रत्येकाला मुस्लिमांची बिर्याणी आवडते, शिरखुर्मा आवडतो, त्यांचे पोशाख तर आज सर्वांत जास्त लोकप्रिय आहेत; परंतु ती माणसे मात्र आवडत नाहीत. केवळ ती इतर विशिष्ट धर्माची आहेत म्हणून? हा कसला दुटप्पीपणा आहे?

आपल्या आसपास राहणाऱ्या अल्पसंख्य समुदायाला केवळ त्यांच्या नि आपल्या धार्मिक भिन्नतेमुळे भीती वाटत असेल, साशंकता निर्माण होत असेल तर ते भारतासारख्या सर्वसमावेशी परंपरा असलेल्या देशाचे अपयश आहे आणि ते इथल्या व्यवस्थेमुळे आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. भारत हा देश इथल्या विविधतेमुळे, सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वामुळे जगभर ओळखला जातो. ती ओळख पुसली जाणार नाही, याची दक्षता घेणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. हे धर्मभेदाचे विष समाजात का पेरले जातेय? याची मुळे तपासून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. यामध्ये ना हिंदूंचे हित आहे ना मुस्लीम बांधवांचे. आपल्याकडे अलीकडच्या काही वर्षांमध्ये ही भीती ज्या प्रकारे मूळ धरत आहे, तसे वातावरण पूर्वी कधीही नसायचे. मग आताच अचानक असे काय झाले की, एकाच गल्लीत, घराला घर लागून शेजारी असणारे आपले बांधव आपले शत्रू होऊ लागले, त्यांची भीती वाटू लागली, याचा आपण विचार करणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे.

खरे तर सध्या देशातील विकासाचा दर ढासळत आहे. देशावर प्रचंड मोठे कर्ज आहे. सरकारी मालकीच्या उद्योगधंद्यांचे खाजगीकरण केले जात आहे. अर्थव्यवस्था संपूर्णपणे उद्योगपतींच्या फायद्याचा विचार करत आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने आपण पहिला क्रमांक कधीच मिळवलेला आहे. दारिद्र्य दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य, शिक्षण, रोजगार, महागाई, शेतीमालाला हमीभाव अशा महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले जाऊ नये म्हणून आपला शेजारी शत्रू आहे की मित्र ? कुठल्या मशिदीच्या खाली कुठली मूर्ती/मंदिर आहे, अशा अत्यंत फुटकळ प्रश्नांमध्ये लोकांना गुंतवले जात आहे.

जगभर एआय क्रांतीविषयी वातावरण ढवळून निघाले आहे. मोठमोठी हॉस्पिटल्स, वैद्यकीय महाविद्यालये, आयआयटीज, आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचे शिक्षण देणाऱ्या शिक्षणसंस्थांचे जाळे उभारण्याऐवजी लोकांना आपला मेंदू गहाण ठेवून मंदिरे, मेळे, पूजा-अर्चा, कर्मकांड, शेण, गोमूत्र, दगड, धोंडे यांच्या नादी लावून मुख्य प्रश्नांपासून बाजूला वळविण्यात येत आहे. याचा विचार आपण कधी करणार? गावोगावी असंख्य बेरोजगार तरुण गावातल्या कट्ट्यावर चकाट्या पिटत बसलेले असतात. त्यांच्या डोक्यामध्ये रोजगार, प्रगती अशा प्रश्नांऐवजी अमुक पुतळा, तमुक शत्रू असले विषय भरवले जात आहेत. याचा तरुणाई विचार करणार आहे की नाही? हे सगळे असे असे आहे. मग आपण काय करू शकतो? या धार्मिक विद्वेषाचे काय करायचे? आपण सर्व जे मुस्लीम किंवा इतर अल्पसंख्याकांचे मित्रमैत्रिणी म्हणवतो, त्यांच्याविषयी आदर बाळगतो, त्या आपणा सर्वांची जबाबदारी आहे की, आपल्या अल्पसंख्य बांधवांना आपण आश्वस्त केले पाहिजे.

जर कुणी आपल्यासमोर जातीय, धार्मिक विद्वेषाची भाषा बोलत असेल, विखार पसरवत असेल तर त्याला त्यापासून परावृत्त केले पाहिजे. तसा विखारी अनुभव आपल्याला कधी व्यक्तिगतरीत्या आला आहे का? आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना आला आहे का? याची चिकित्सा केली पाहिजे. तसा अनुभव नक्कीच नसतो. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी फोडा आणि राज्य करा, भीती निर्माण करा आणि मुख्य प्रश्नांपासून समाजाला दूर करा, अशी नीती आज राजकारणी पुढारी वापरत आहेत. खरे तर प्रत्येक हळव्या माणसाला विचारप्रवृत्त करणारे, अस्वस्थ करणारे, विचलित करणारे असे हे वर्तमानातील वातावरण आहे. आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीशी वाद घालू शकत नाही, पण निदान तिच्यापुढे असे असे नाही, हे सांगू शकतो. ज्याला पटते, त्या प्रत्येकाने अशी साखळी निर्माण करणे गरजेचे आहे, ज्यातून आपण ही विखाराची नदी वाहणे थांबवू शकत नसलो तरी त्यातला विखार तरी नक्कीच कमी करू शकतो.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading