April 14, 2024
chhatrapati-shivaji-maharaj-ethics through the eyes of Ismail Pathan
Home » डॉ. इस्माईल पठाण यांच्या नजरेतून शिवरायांची धर्मनीती
मुक्त संवाद

डॉ. इस्माईल पठाण यांच्या नजरेतून शिवरायांची धर्मनीती

शिवरायांची धर्मनीती पुस्तक खरेदीसाठी लिंकवर क्लिक करा https://amzn.to/4aznUub

शिवकाळाचा विचार करता तत्कालीन अन्य राजवटीमध्ये शस्त्र अन् सत्तेच्या जोरावर धार्मिक अत्याचार सुरु होते. अशावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अत्यंत उदात्त अशी धर्मनीती स्वीकारली. मानवतावादी आणि पुरोगामी अशी ही धर्मनीती होती. हे त्यांचे गुणवैशिष्ट ठळकपणे नजरेत भरते. मानवी कल्याण हा छत्रपतींच्या भूमिकेचा गाभा होता. सध्याच्या जागतिक परिस्थितीचा विचार करता सध्या छत्रपतींच्या धर्मविषयक विचार आणि आचारांना उजाळा देण्याची गरज आहे. यावर सखोल अभ्यास अन् संशोधनाचीही गरज आहे, असे मत डॉ. इस्माईल पठाण यांनी शिवरायांची धर्मनीती या पुस्तकांत व्यक्त केले आहे.

डॉ. पठाण यांच्या मते १६५७ मध्ये आदिलशाहीतील ७०० पठाण हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात दाखल झाले होते. कारण १६५७ मध्ये मोगल आणि आदिलशाहीमध्ये युद्धबंदीचा तह झाला होता. त्यामुळे आदिलशाही दरबाराने खर्च कमी करण्यासाठी सैन्य कमी करण्याचे धोरण अवलंबले होते. यात ७०० पठाणांना आपली नोकरी गमवावी लागली. हे सर्वजण शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात दाखल झाले. या भरतीनंतर शिवाजी महाराज यांचे लष्कर हे एक राष्ट्रीय लष्कर बनले. ज्यामध्ये धर्मनिरपेक्षता या मानवतावादी तत्त्वाला शिस्तीइतकेच उच्च दर्जाचे स्थान होते. पराक्रमी वीर दिसला की त्याची महाराज परीक्षा घेत अन् त्याला लष्करात योग्य स्थान देत. यामुळे त्यांचे लष्कर हे सर्व जातीधर्माचे होते. त्यामध्ये उच्चकुलीन मराठे, मावळे, हेटकरी, ब्राह्मण, प्रभु, रामोशी, महार, मांग, कोळी, भंडारी, मुस्लिम असे विविध जाती-जमातीचे लोकही त्यात होते.

शिवरायांची धर्मनीती पुस्तक खरेदीसाठी लिंकवर क्लिक करा https://amzn.to/4aznUub

यामुळेच आता शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्य याचा अर्थ खऱ्या अर्थाने समजून घेणे गरजेचे आहे. महाराजांनी वंशदर्शक, पददर्शक, धर्मदर्शक, जातदर्शक न देता हिंदवी म्हणजे भारतीय अशी व्यापकसंकल्पना स्वीकारली आहे आणि ती प्रशासक व रयत यांच्या मनामध्ये जाणीवपूर्वक रुजविली. हे राज्य केवळ मराठ्यांचे नव्हते अथवा केवळ हिंदूंचे नव्हते. हिंदवी याचा अर्थ हिंदुस्थानातील जनता त्यामध्ये हिंदुस्थानातील सर्व धर्मांचा सर्व भाषिकांचा समावेश होतो. मग ते हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन अशा सर्व भूमिपुत्राचा समावेश यामध्ये होता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यातील सर्व धर्माच्या बांधवांना सन्मान देत सामाजिक सलोखा निर्माण करत सर्वार्थाने हिंदवी स्वराज्य बळकट केले. निरपेक्ष धर्मनिष्ठा या सुत्रानुसार त्यांनी हिंदू धर्माच्या वाढीसाठी इतर धर्मियांवर अन्याय अथवा जबरदस्ती केली नाही.

शिवरायांची धर्मनीती पुस्तक खरेदीसाठी लिंकवर क्लिक करा https://amzn.to/4aznUub

शिवाजी महाराज हे आध्यात्मिक वृत्तीचे होते. मूर्ती दर्शन आणि सत्पपुरषांचा सहवास याबद्दल ते नेहमीच भावूक असत. तत्कालिन सत्पुरषांची योग्य ती दखल घेत त्यांनी त्यांना सन्मानितही केले. यामध्ये चिंचवडचे मोरया गोसावी, चिंतामणी देव, चाकणचे सिद्धेश्वर भट ब्रह्मे, महाबळेश्वरचे गोपाळ भट, केंजळचे महंत केवलभारती, मुदलगावचे देवभारती, पाटगावचे मौनीबुवा, केळशीचे बाबा याकुत, भागानगरचे केशवबुवा, कर्नाटकातील सिताराम वाजपेय, पुरषोत्तमभट बुरडी, पाटेश्वरी डोंगरातील रत्नागिरी गोसावी, नागठाणकडील तानपाठक नाकील, गणपतीपुळ्याचे श्रीधरभट्ट बापट, सज्जनगडचे समर्थ रामदास आदींचा समावेश होतो.

हिंदुधर्मामध्ये अनेक पंथ, परंपरा आहेत. पण छत्रपती शिवाजी हे कोणाच्याही एकाच्या आहारी गेले नाहीत. त्यांचा धर्माभिमान व श्रद्धा डोळस व प्रागतिक होती. नौकानयन बंदी किंवा धर्मांतर केलेल्या व्यक्तीला कायमची धर्मबंदी असे कधीही केले नाही. पुरोगामीत्वाच्या आहारी जावून लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील असा कोणताही निर्णय त्यांनी घेतला नाही. प्रागतिक विचार कायम ठेवत त्यांनी धार्मिक क्षेत्रामध्ये सुवर्णमध्य साधण्यामध्ये ते यशस्वी झालेले पाहायला मिळते, असे मत डॉ. पठाण यांनी व्यक्त केले आहे.

शिवाजी महाराज यांच्यावर विषप्रयोग झाला होता. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे मत काही इतिहासकार व्यक्त करतात. पण यावरही डॉ. पठाण यांनी महाराजांचा मृत्यूच्या आजाराचे दाखले देत चुकीचा इतिहासा खोडून काढला आहे. इंग्रजांनी महाराजांचा मृत्यू रक्तातिसाराने झाल्याचे म्हटले आहे. तर समकालिन पोर्तुगीज कागदपत्रामध्ये इंटेस्टायनल अॅन्थ्रॅक्स (INTESTINAL ANTHRAX ) या आजाराची नोंद आढळते. हा रोग संसर्गजन्य असून जनावरांमध्ये आढळतो. या रोगाने ग्रस्त जनावरांच्या सानिध्यात आल्यास हा आजार मनुष्यासही होतो. यात न्युमोनियासारखी लक्षणे आढळतात. अन्नावाटे हे जंतू पोटात गेल्यास आतड्यावर ते परिणाम करतात. शौच्यावाटे रक्त पडून रोगी दगावतो. वरकरणी ही लक्षणे विषप्रयोगाची वाटतात. पण महाराज यांना जालना दौऱ्यादरम्यान या रोगाची लागण झाली असावी. पन्हाळगडावर आल्यानंतर त्यांना थकवा जाणवत होता. तरीही ते राजाराम महाराज यांचे मौजीबंधन अन् विवाह सोहळ्यामुळे ते तातडीने रायगडावर आले. यामुळेच हा आजार बळावला व त्यात त्यांचा मृत्यू झाला, असे मत मांडले आहे.

यातून असे स्पष्ट होते की शिवाजी महाराज यांनी आंतरभारती, प्रांतभारती संकल्पनेप्रमाणे सर्व धर्मीयांना, प्रांतांना एकत्र बांधत स्वराज्याची स्थापना केली. महाराजांचा गौरव करण्यासाठी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये शिवाजी उत्सव नावाची प्रदीर्घ कविता लिहिली आहे. या कवितेतील एका कडव्यात गुरुदेव टागोर म्हणतात, तुझ्या ध्यानमंत्राद्वारे सर्व भारत एक व्हावा अशी भावना प्रत्येकाच्या कंठामध्ये, प्रत्येकाच्या उरामध्ये आहे. विद्युलता चमकून जावी त्याप्रमाणे मी खंडीत, छिन्न, त्रुटीत झालेल्या भारताला एके दिवशी एका न्यायधिष्ठित राज्यामध्ये एकत्र गुंफेन, अशी भावना तुझ्याठायी निर्माण झाली. असे अनेक दाखले देत शिवरायांच्या धर्मनीतीची ओळख डॉ. पठाण यांनी करून दिली आहे.

पुस्तकाचे नाव – शिवरायांची धर्मनीती
लेखक – डॉ. इस्माईल हुसेन पठाण
प्रकाशक – मनोविकास प्रकाशन, मोबाईल – 8888550837
किंमत – १८० रुपये

शिवरायांची धर्मनीती पुस्तक खरेदीसाठी लिंकवर क्लिक करा https://amzn.to/4aznUub

( शब्दांकन – राजेंद्र कृष्णराव घोरपडे)

Related posts

साठी पार योगा…

महाराष्ट्रातील ५७ बोलींचा कथासंग्रह ‘माझी बोली माझी कथा’

आई…

Leave a Comment