२१ डिसेंबरला पाचव्या संस्कृती साहित्य संमेलनात इचलकरंजी येथे वितरण
इचलकरंजी : येथील संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने दिले जाणारे २०२५ सालचे संस्कृती साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. साहित्याच्या विविध प्रांतांत मोलाचे योगदान देणाऱ्या साहित्यिकांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.
यंदाचे लक्ष्मण कांबळे (जिंदा) स्मृती संस्कृती कादंबरी पुरस्कार कोल्हापूर येथील प्रा. डॉ. रमेश साळुंखे यांना त्यांच्या ‘भिंगुळावाणे दिवस’ या कादंबरीसाठी जाहीर झाला आहे. तर दगडूलाल मर्दा स्मृती संस्कृती समीक्षा पुरस्कार समीक्षक जिजा शिंदे यांना ‘श्याम मनोहर : साहित्य आणि समीक्षा’ या समीक्षा ग्रंथासाठी प्रदान करण्यात येणार आहे. तर वसंत-कमल स्मृती संस्कृती काव्य पुरस्कार कवी उदय जाधव यांना ‘पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर’ या कवितासंग्रहासाठी जाहीर करण्यात आला आहे.
या तिन्ही पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी ५,००० रुपये रोख, शाल, स्मृतिचिन्ह व ग्रंथ असे आहे. या पुरस्कारांची निवड निवड समितीचे अध्यक्ष प्रा. रणधीर शिंदे (समीक्षक व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मराठी विभाग प्रमुख) तसेच अंजली कुलकर्णी (समीक्षक व कवयित्री, पुणे) यांनी केली आहे.
हे पुरस्कार २१ डिसेंबर रोजी इचलकरंजी येथे होणाऱ्या ५ व्या संस्कृती साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येणार आहेत. या संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी व समताधिष्ठित विचारांचे लेखक सायमन मार्टिन (मुंबई) आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून अमरसिंह माने, तर उद्घाटक म्हणून उद्योगपती शामसुंदर मर्दा लाभणार आहेत.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात होणारे कविसंमेलन कवी चंद्रकांत पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तसेच महावीर कांबळे यांच्या ‘खुरपं’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मदन कारंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या साहित्य संमेलनास व पुरस्कार वितरण सोहळ्यास साहित्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्कृती प्रतिष्ठानच्या सचिव अनुराधा काळे यांनी केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
