July 11, 2025
प्रा. रमेश साळुंखे यांची भिंगुळवाणे दिवस ही कादंबरी ही कोरोना काळातील असहायता आणि मानवी उमेद याचे संवेदनशील चित्रण करते.
Home » भिंगुळवाणे दिवस ही निराशेतून सकारात्मकतेकडे नेणारी कादंबरी
मुक्त संवाद

भिंगुळवाणे दिवस ही निराशेतून सकारात्मकतेकडे नेणारी कादंबरी

अत्यंत प्रगत मेंदू असलेल्या मनुष्याच्या बुद्धिमत्तेचा कस लागावा आणि प्रसंगी त्याच्या असहायतेवर, मानवी मर्यादेवर त्याने खजिल व्हावे अशी कोरोना काळात उद्भवलेली परिस्थिती हा या कादंबरीचा विषय. त्या पार्श्वभूमीवर कोरोना हाच कादंबरीचा खरा नायक किंवा खलनायक म्हणावा लागेल. जो मनुष्याला कठपुतळी बनवतो..नव्हे त्याचाच घास घेतो. कादंबरीतला मानवी रूपातला नायक यशवंत यांनी कोरोना काळात अनुभवलेली भीषण स्थिती ही या कादंबरीची पार्श्वभूमी.

मुग्धा गोखले, सांगली.

घुबडं निदान रात्री तरी त्यांच्या ढोलीबाहेर पडतात पण आपण ?
ॲम्बुलन्स कुठल्या या ? आज काल तर हिंडतीफिरती स्मशानच वाटू लागल्या आहेत की
या अशा गाड्या म्हणजे स्वतःची स्वतःला स्पर्श करण्याचीही भीती वाटू लागली आता.
लूत भरलेल्या कुत्र्याकडे पाहतात ना लोक तसं वाटू लागलं आहे माझं मलाच
अंधाराच्या समुद्रात पोहत राहायचं झालं
मुठभर मिरे घेऊन साऱ्या जगाच्या डोक्यावर ते वाटायला निघाल्याच्या अविर्भावात हा विषाणू सगळीकडे मोठ्या वेगाने पसरू लागला

या वाक्यातून तत्कालीन कोरोनाची भीषण स्थिती कळून येते जी आपणही अनुभवली आहे. या परिस्थिती विरुद्ध दाद मागणे, चळवळ करणे या गोष्टी कशा फोल होत्या ते या कादंबरीत तपशीलवारपणे आले आहे. फोनवर आणि व्हाट्सअप, फेसबुक इत्यादींवर गुपचूप चळवळ बिळवळ करायची ही पांढरपेशा वृत्तीवर प्रकाश टाकणारी वस्तुस्थिती होती. त्याचं वर्णन या कादंबरीत आलं आहे.

एक जबाबदार व्यक्तिमत्व, पत्रकारितेची जाण आणि त्याचे योग्य ते भान असणारे यशवंतराव कोरोना काळातल्या कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, भावनिक स्थित्यंतरांना नीट समजून घेतात, प्रसंगी त्यांच्या अवतीभवतीच्या लोकांना धीर देतात. आत्मविश्वास वाढवतात. माणसा माणसात अंतर पडायला लागलेलं पाहून ते अस्वस्थ होतात. त्यांच्या भोवतालचे एकनाथ भाऊ, वसंतराव, काका, शामराव, गुरुजी ,आप्पा, चाचा या प्रत्येकाचं त्यांच्या पुरत असं तत्त्वज्ञान होतं ते प्रांजळही आहे. नानूची यशवंतरावांना लिहिलेली पत्रं त्यांना मानसिक समाधान देणारी आहेत. प्रसंगानुरूप येणाऱ्या झेन कथा सहजच उपदेश देतात. कोरोनामुळे जगभर सुरू असलेली प्रत्येक गोष्टीतली वेगवेगळ्या जवळजवळ शंभरहून अधिक प्रकारची सक्ती अत्यंत प्रत्ययकारीपणे रमेश साळुंखे यांनी या कादंबरीत वर्णिली आहे.

मुळात यशवंतराव हे अत्यंत समाधानी समंजस सर्वांशी सहचर्याने वागणारे आहेत. कोरोना काळातील एकूण परिस्थिती भीषण असूनही कुठे कडवटपणा, सूडबुद्धीची टोकाची टीका ते करताना दिसत नाहीत. स्वतःला कोरोना झाला असताना त्यांनी पाहिलेल्या, अनुभवलेल्या कोरोना योद्यांबद्दल ते आपुलकी आणि अभिमान बाळगतात. सरकारी यंत्रणांना असलेली मर्यादा तसेच लोकांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन स्वतःचे खिसे भरणाऱ्यांविषयी ते स्पष्टपणे पण योग्य भाषेत व्यक्त होतात. याच काळात जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन एक मानवजात मानून एकमेकांना मदत करणाऱ्या प्रवृत्तीचेही या कादंबरीत दर्शन घडते. या परिस्थितीत माणसाने पुढचं फार पाहू नये आणि मागचं पुन्हा रंगवू नये असा उपदेशही सहजच मिळतो. याच काळात अंधश्रद्धा बुवाबाजीला आलेला ऊत याकडेही लेखक आपले लक्ष वेधतात.

विशेष म्हणजे यशवंतरावांचे टेकडीवर फिरायला जाणे आणि दृष्टीस पडलेला निसर्ग याचं अत्यंत सुंदर वर्णन या कादंबरीत आलं आहे. ते प्रत्ययकारी चित्रण आपल्या डोळ्यापुढे जसच्या तस उभं रहातं. इथे लेखकाच्या निरीक्षण शक्तीला मनापासून दाद द्यावीशी वाटते.

यशवंतरावांचं चौकोनी कुटुंब अगदी आदर्शवत आहे. कोरोना काळात ज्यांना भोगावे लागलं ते कामगार, शेतकरी, भाजीवाले, दूधवाला, किराणा दुकानदार ,अगदी ट्युशन चे शिक्षक या सर्वांबद्दल त्यांच्या मुलांच्या मनात आपुलकी कशी निर्माण होईल हे ते जाणीवपूर्वक पाहतात. कोरोनाने बाधित यशवंतराव हॉस्पिटलमध्ये असताना त्यांची नोकरी गेल्याचे कळताच साहजिकच ते थोडे खचून जातात. पण घरी आल्यानंतर अंगणातल्या मुंग्यांच्या रांगांनी मातीत तयार केलेला रस्ता पाहून पुनश्च उठतात आणि आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहतात.

आपण सर्वांनीच कोरोना काळ अनुभवला. त्यामुळे त्यातली प्रत्येक परिस्थिती आणि माणसं मनाला भिडतात. यापुढेही अशा प्रकारच्या काळात माणूस धैर्याने, समजूतदारपणाने वागून कोणत्याही संकटांवर निश्चित मात करणार हाच संदेश या कादंबरीतून मिळतो.

सुफी कवी रुमी जे म्हणतात
जिथे जखम आहे तिथे प्रकाश प्रवेश करतो
ते मनोमन पटतं. दुःख, वेदना या कायमच्या नसतात संधी या नेहमीच खुणावत असतात, त्यातून आपण पुन्हा जीवन जगण्यास सिद्ध होऊ शकतो.

प्रा. रमेश साळुंखे यांची ही कादंबरी जरूर वाचली पाहिजे अशीच आहे. ती निराशेतून सकारात्मकतेकडे, अंधारातून प्रकाशाकडे, अडखळण्यापासून सावरण्याकडे, विद्वेषातून सहकार्याकडे नक्कीच घेऊन जाते.

पुस्तकाचे नाव – भिंगुळवाणे दिवस
लेखक – प्रा. रमेश साळुंखे मोबाईल – 9403572527
प्रकाशक – लोकवाङ्मय प्रकाशन
पृष्ठसंख्या – २८०
किंमत – ३५० रुपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading