स्पर्धा परीक्षा, शिक्षण

मॉस्को येथील आंतरराष्ट्रीय रसोफिल चळवळीच्या चौथ्या परिषदेत शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातील दोन विद्यार्थ्यांचा सहभाग

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातील रशियन भाषेचे विद्यार्थी वैभव कदम आणि प्राजक्ता डवरी हे १६ ते १८ सप्टेंबर २०२६ दरम्यान मॉस्को, रशिया येथे झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय रसोफिल चळवळी’च्या चौथ्या परिषदेत सहभागी झाले. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर ११ ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत मॉस्को शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्राजक्ता डवरी या रशियन भाषा एम.ए. प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी आहेत, तर वैभव कदम हे रशियन भाषा पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत.

‘आंतरराष्ट्रीय रसोफिल चळवळ’ (International Movement of Russophiles) ही संस्था विविध देशांतील सार्वजनिक व्यक्ती, संस्कृती व विज्ञान या विषयांचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञ समुदाय, तसेच रशियन ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व प्रसार यात रस असलेल्या नागरिकांना एकत्र आणते.

यंदाची परिषद ही ऐतिहासिक स्मृती,रशिया आणि त्याचा प्राचीन इतिहास,संस्कृती,तसेच आध्यात्मिक-नैतिक परंपरांप्रति आदर या मूल्यांभोवती सहभागींना एकत्र आणणारा आंतरराष्ट्रीय सार्वजनिक मंच आहे.

या परिषदेची प्रमुख उद्दिष्टे अशी…

  • परस्पर आदर, मैत्री आणि रचनात्मक संवादाच्या आधारे आंतरराष्ट्रीय मानवतावादी व सामुहिक संबंध दृढ करणे;
  • रशियाचे वस्तुनिष्ठ प्रतिनिधित्व आणि सहकार्याच्या विकासात स्वारस्य असलेल्या विदेशी सार्वजनिक व्यक्ती, संस्कृती, विज्ञान या क्षेत्रांतील अभ्यासक आणि तज्ज्ञ समुदायातील घटकांना एकत्र आणणे;
  • स्मृती जपण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय सार्वजनिक उपक्रमांना पाठबळ देणे;
  • ऐतिहासिक सत्याचे जतन करणे आणि ऐतिहासिक तथ्यांचे असत्यीकरण व विकृतीकरण रोखणे;
  • रशियन इतिहास, संस्कृती आणि पारंपरिक आध्यात्मिक-नैतिक मूल्यांप्रति आदर दृढ करणे;
  • तरुण पिढीमध्ये देशभक्तीपर व नागरिकत्वपर शिक्षणाचा प्रसार करणे आणि पिढ्यांतील सातत्य जपणे;
  • विदेशी जनतेमध्ये रशियन ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लोकप्रिय करणे.

या परिषदेसाठी आंतरराष्ट्रीय रसोफिल चळवळीने सहभागी विद्यार्थ्यांचा हवाई प्रवास, तसेच निवासव्यवस्था यांसह इतर संपूर्ण खर्च देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातील विद्यार्थ्यांची अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेसाठी झालेली निवड ही विद्यापीठासाठी, तसेच महाराष्ट्रातील रशियन भाषा-अध्ययन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे.यापूर्वीही गेली दोन वर्षे विदेशी भाषा विभागातील रशियन भाषा शिकणाऱ्या आठ विद्यार्थ्यांनी मॉस्को येथील ‘रशियन पीपल्स फ्रेन्डशिप विद्यापीठा’तर्फे आयोजित १५ दिवसांच्या मोफत समर कोर्समध्ये सहभाग घेतला आहे व ते यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. रशियन भाषेचे अध्ययन कोल्हापुरातील विविध विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील युवा चळवळीशी जोडून घेण्याच्या नवनव्या संधी उपलब्ध करून देत आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विदेशी भाषा विभाग करत आहे.

या परिषदेतील विद्यार्थ्यांच्या सक्रीय सहभागासाठी रशियन भाषा शिक्षिका डॉ. मेघा पानसरे व ज्योती पाटील, तसेच डॉ. अक्षय सरवदे, प्रभारी विभागप्रमुख, विदेशी भाषा विभाग यांचे सहकार्य झाले.

आंतरराष्ट्रीय रसोफिल चळवळ : एक सांस्कृतिक-सामाजिक पार्श्वभूमी

‘रसोफिल’ (Russophile) या संकल्पनेचा ऐतिहासिक संदर्भ रशियन भाषा, संस्कृती, इतिहास आणि स्लाव्हिक सांस्कृतिक परंपरांशी आत्मीयता व्यक्त करणाऱ्या विविध प्रवाहांशी जोडलेला आहे. विशेषतः १९व्या शतकात मध्य आणि पूर्व युरोपातील काही भागांत रशियाशी सांस्कृतिक व ऐतिहासिक जवळीक मानणारा ‘रसोफिलिझम’ किंवा ‘मॉस्कोफिलिझम’ हा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रवाह विकसित झाला. गॅलिशियातील या ऐतिहासिक प्रवाहावर भाषा, धर्म, इतिहास आणि पॅन-स्लाव्हिझमचा प्रभाव होता. मात्र या प्रवाहातील सर्व व्यक्तींची भूमिका समान नव्हती; काहींचा भर सांस्कृतिक व भाषिक परंपरांवर, तर काहींचा रशियाशी राजकीय ऐक्यावर होता.

आजच्या संदर्भातील International Movement of Russophiles (MIR) ही स्वतंत्र आधुनिक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. तिची स्थापना १४ मार्च २०२३ रोजी मॉस्को येथे झालेल्या संस्थापक अधिवेशनातून झाली आणि संघटनेच्या माहितीनुसार तिच्या स्थापनेत विविध देशांतील प्रतिनिधी सहभागी झाले. संघटनेच्या जाहीर भूमिकेनुसार रशियन भाषा, संस्कृती आणि वारशाबद्दल आत्मीयता असलेल्या व्यक्तींना एकत्र आणणे, विविध देशांतील लोकांमध्ये संवाद व परस्परसमज वाढवणे आणि रशियाशी संबंधित सांस्कृतिक व सामाजिक संपर्कासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे तिच्या कार्याचे प्रमुख घटक आहेत.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गीता केवळ ग्रंथ नव्हे, साक्षात परमात्म्याच्या ज्ञानवाणीचा दिव्य आविष्कार!

ज्या परमेश्वराचे स्वरूप वेदांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तोच परमात्मा श्रीकृष्ण भगवद्गीतेचा वक्ता आहे. त्यामुळे…

1 hour ago

बाल वाचकांसाठी दिवाळीची खास मेजवानी : जंगलातील दिवाळी

दिवाळी म्हटले की डोळ्यांसमोर येतात पणत्यांची रोषणाई, आकाशकंदील आणि फटाक्यांची आतषबाजी! पण जंगलात दिवाळी साजरी…

4 hours ago

बृहदेश्वर मंदिर : चोल साम्राज्याचे स्थापत्यवैभव अन् मराठ्यांच्या इतिहासाचा अमिट ठसा !

दगडांमध्ये कोरलेला इतिहास, स्थापत्यकलेचा अद्भुत आविष्कार आणि चोल व मराठा संस्कृतीचा अनोखा संगम म्हणजे तंजावरचे…

13 hours ago

दुर्गांच्या प्रदक्षिणेतून उलगडणार सह्याद्रीचे इतिहासवैभव; भटकंतीचा अनोखा शब्दानुभव!

महाराष्ट्रातील ट्रेकिंगवरील पहिला दिवाळी अंक; २५ दर्जेदार लेखांनी सजलेला ‘दुर्गांच्या देशातून…’चा प्रदक्षिणा विशेषांक सह्याद्रीच्या डोंगररांगा,…

1 day ago

रामलीला मैदानावर इंडिया आघाडीचे शक्तिप्रदर्शन; एकजूट टिकणार किती काळ?

रामलीला मैदानावर विरोधकांनी पुन्हा एकदा एकजुटीचे शक्तिप्रदर्शन केले. ‘व्होट चोरी’ आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह…

1 day ago

बार्शीत २० वे महात्मा फुले प्रबोधन साहित्य संमेलन

फुलचंद नागटिळक संमेलनाध्यक्ष तर डॉ. बी. वाय. यादव स्वागताध्यक्ष बार्शी - अखिल भारतीय मराठी साहित्य…

2 days ago