स्पर्धा परीक्षा, शिक्षण

मुलींच्या शिक्षणासाठी कायदा, शिष्यवृत्ती अन् संघर्ष! शाहू महाराजांची क्रांतिकारी दूरदृष्टी

स्त्रीला शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवून समाजात समानतेचा अधिकार मिळवून देणे, ही राजर्षी शाहू महाराजांच्या समाजसुधारणेची महत्त्वपूर्ण दिशा होती. मुलींच्या शिक्षणासाठी कायद्याची ताकद, शिष्यवृत्तीचे पाठबळ आणि उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत त्यांनी स्त्रीशिक्षणाची चळवळ केवळ विचारांपुरती मर्यादित ठेवली नाही, तर ती प्रत्यक्षात उतरवली. जातिभेद आणि स्त्री-पुरुष विषमतेच्या भिंती ओलांडत मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या शाहू महाराजांचे कार्य आजही स्त्री-सक्षमीकरणासाठी प्रेरणादायी ठरते. २४ जुलै १९१७ रोजी लागू केलेल्या मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या कायद्याने त्यांच्या या परिवर्तनवादी विचारांना ऐतिहासिक बळ दिले. स्त्रीशिक्षणाचा हा दूरदृष्टीपूर्ण प्रवास उलगडून दाखवणारा लेख…

  • डॉ. मनीषा झोंबाडे,बार्शी,जि. सोलापूर
    संपर्क 8830079432

राजर्षी शाहू महाराज अन् स्त्री शिक्षणाचा कायदा

राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये २४ जुलै १९१७ रोजी मोफत आणि सक्तीचा प्राथमिक शिक्षणाचा कायदा लागू केला. हा कायदा केवळ मुलांसाठीच नव्हे, तर मुलींच्या शिक्षणासाठीही अत्यंत क्रांतिकारी ठरला. शाहू महाराजांच्या परिवर्तनवादी विचारांच्या संकल्पनेत ‘स्त्री शिक्षण’ ही अतिशय महत्वपूर्ण अशी संकल्पना होती. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यानंतर सामाजिक समतेची उत्स्फूर्त जाणीव असणाऱ्या शाहू महाराजांनी स्त्री उध्दाराचा वसा हाती घेतला होता. स्त्रीला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी, तिला स्वावलंबी करण्यासाठी सर्वप्रथम कोणत्या गोष्टीची गरज असेल तर ती शिक्षणाची. प्रथम स्त्री वर्ग शिक्षित करणे गरजेचे आहे, हा महात्मा फुलेंचा परिवर्तनवादी विचार राजर्षी शाहू महाराज यांनी अंगीकरला आणि त्यातूनच स्त्री शिक्षण हे त्यांच्या सुधारणेचे प्रथम ध्येय ठरले.

कोल्हापूर संस्थानचा कारभार हातात येताच सर्वप्रथम त्यांनी शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडविण्यास सुरवात केली. प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम झाला तर आपोआप उच्च शिक्षणाकडे मुलां-मुलींचा कल वाढेल असा त्यांचा विचार होता. यासाठीच त्यांनी आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षणाची सक्ती केली. जे पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवीत नाहीत अशा पालकांना एक रुपया दंड आकारण्याचा हुकूम काढला. प्राथमिक शिक्षणासाठी ते कोल्हापूर संस्थानच्या एकूण उत्पन्नातून दरवर्षी एक लाख रुपये खर्च करीत. पुढे हा खर्च एक लाख मर्यादित न ठेवता तीन लाखांपर्यंत केला. त्यासाठी त्यांनी श्री. परांजपे हे शिक्षणमंत्री नेमले होते. राजर्षी शाहू महाराजांच्या शिक्षण प्रसाराच्या या सर्व सुधारणामध्ये प्रामुख्याने ‘स्त्री शिक्षण’ हे अग्रस्थानी होते.

तळागाळातील मुलींनी शिकावे, यासाठी शाहू महाराजांनी दऱ्या खोऱ्यात, ग्रामीण मागासलेल्या भागांमध्ये मुलींसाठी शाळा सुरु केल्या. आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या ४-५ वर्षांतच त्यांनी स्त्री शिक्षणावर विशेष लक्ष केंद्रित केले. स्त्रीला सवांगीण दृष्टीने भक्कम व बळकट बनविण्यासाठी शिक्षण हेच प्रभावी शस्त्र आहे हे त्यांनी जाणले होते. त्यामुळे सह्याद्री पर्वत रांगेतील भुदरगडसारख्या मागासलेल्या भागात त्यानी मुलीच्या शाळा स्थापन केल्या. ज्या ठिकाणी मुलीसाठीच्या स्वतंत्र शाळा नाहीत, अशा ठिकाणी मुलीना शाळेत पाठविण्यास पालक धजत नव्हते. अशा पालकाचे व मुलींचे विचार परिवर्तन करण्यात राजषी शाहू महाराज समर्थ ठरले मुलींनीही शाळेत येऊन मुलाच्या बरोबरीने एकत्रित शिक्षण घ्यावे हा विचार त्यांनी पालकांच्या व मुलीच्या मनात रुजविला.

चांभार व ढोर मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढल्या. मुलगा-मुलगी असा भेदभाव मानणारा समाज वर्ग त्या काळात मोठ्या प्रमाणात होता. मुलींना शिक्षणाचा उपयोग काय? त्यांनी केवळ चूल आणि मूल सांभाळावे. हा विचार समाजामध्ये प्रचलित होता. त्यामुळे शाळेतील शिक्षकही मुलींना दुय्यम स्थान देत. अध्यापनाच्या बाबतीत ह्या शिक्षकांचे मुलींकडे अजिबात लक्ष नव्हते. ही बाब जेव्हा शाहू महाराजांच्या नजरेस आली तेव्हा त्यांनी मुलींच्या शिक्षणाकडे शिक्षकांनी विशेष लक्ष द्यावे यासाठी काही आगळा-वेगळा उपक्रम राबविला. मुलांच्या शाळेत पास होणाऱ्या मुलींच्या संख्येवर त्या शिक्षकांना बक्षिसे देऊन मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष वळविले. प्राथमिक शिक्षणानंतर मुलींना माध्यमिक शिक्षणासाठी महाराजांनी दरबारतर्फे शिष्यवृत्त्या ठेवल्या. त्यांची कन्या आक्कासाहेब महाराजांच्या विवाहाच्या निमित्ताने महाराजांनी प्रत्येकी ४० रुपयांच्या पाच शिष्यवृत्या जाहीर केल्या. इयत्ता ४ थीच्या वार्षिक परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनींसाठी या शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम राबविला. अशा प्रकारच्या शिष्यवृत्त्या त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर गुजरातमध्येही मुलीसाठी चालू केली.

उच्च शिक्षण घ्यावे ही दूरदृष्टी ठेवणारे शाहू महाराज हे परिवर्तनवादी मुलींनी केवळ प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावरच भर न देता समाजसुधारक होते. अत्रिकाबाई डॅनियल बेकर या ख्रिश्चन मुलीला त्यांनी उच्च शिक्षणासाठी पुण्याला पाठवले. केवळ आत्रिकाबाईला नव्हे तर राधाबाई सूर्यवशी, ताराबाई खानोलकर याच्यासह पाच मुलींना त्यांनी उच्च शिक्षणासाठी मुंबईला पाठवले. तर कृष्णाबाई केळवलकर यांना मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये पाठवून त्याना डॉक्टर बनवले. पुढे याच कृष्णाबाईंना महाराजांनी उच्च वैद्यकीय अभ्यासासाठी इंग्लडलाही पाठवले. डॉ. आनंदीबाई जोशी नंतर भारतातील दुसऱ्या महिला डॉक्टर कृष्णाबाई केळवलकर ठरतात. अशा या उदात्त विचाराच्या शाह महाराजानी स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले.

याशिवाय त्यांनी कोल्हापुरात फिमेट ट्रेनिंग स्कूल सुरु केले आणि तेथे रखमाबाई केळवलकर या हुशार व बुध्दिमान स्त्रीची शिक्षिका म्हणून नेमणूक केली. रखमाबाईनी आपल्या बुध्दीच्या जोरावर अतिशय कौशल्याने कोल्हापूर संस्थानातील स्त्री शिक्षणाचे कार्य उंचावले. छत्रपती राजर्षी शाहू यांच्या कारकीर्दीत शिक्षणाधिकारी असणाऱ्या मिस लिटल यांच्या सेवा निवृत्तीनंतर त्यांच्या जागी महाराजांनी याच रखमाबाई यांची शिक्षण अधिकारी या पदावर नेमणूक केली. शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाचा परिघ पूर्ण केला तो त्यांची स्नुषा इंदुमतीदेवी हिच्यापासून. वयाच्या ११ व्या वर्षी विधवा झालेल्या इंदुमतीला महाराजांनी अतिशय जिद्दीने शिकविले.

विधवा इंदुमतीच्या शिक्षणासाठी सर्व राजकुटुंबाचा विरोध त्यांनी पत्करला. इंदुमतीच्या पाठीशी ते पित्याप्रमाणे खंबीरपणे उभे राहिले. इंदुमतींच्या शिक्षणाची व्यवस्था त्यांनी सोनतळी कॅम्प या ठिकाणी केली. इंदुमती सोबत शाहू महाराजांनी चार वेगवेगळ्या जातींतील मुलींचीही शिक्षणाची सोय केली. विशेष म्हणजे, त्यात एक ख्रिश्चन मुलगीही होती. यावरुन शाहू महाराज हे केवळ स्त्री शिक्षणाचा ध्यास घेतलेले, जातव्यवस्थेला लाथाडणारे सच्चे समाजसुधारक होते हे सिध्द होते. शाहू महाराजांनी इंदुमतींना केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर त्या निर्भीड व्हाव्यात, त्यांच्यामध्ये प्रतिकार करण्याची ताकद निर्माण व्हावी म्हणून त्यांनी सारथ्य, शिकार, अश्वारोहण, मोटार ड्रायव्हिंग अशा अनेक गोष्टीमध्ये पारंगत केले. इंदुमतींनी डॉक्टर व्हावे ही महाराजांची इच्छा होती. पण दुर्दैवाने ही ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. कारण त्या दरम्यान शाहू महाराजांचा मृत्यू झाला. त्यामुळे इंदुमतीला डॉक्टर करण्याची त्यांची इच्छा अधुरी राहिली.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

राजेशाही थाट, दूरदृष्टी अन् लोककल्याणाचा ध्यास ! राजर्षी शाहू महाराजांच्या आठवणींना उजाळा

अंगावर राजेशाही पोशाख, गळ्यात अलंकारांची माळ, हातात तलवार आणि चेहऱ्यावर करारी व्यक्तिमत्त्वाची छाप… हे केवळ…

1 hour ago

संसाराला तिलांजली देणारे विश्वरूप माधवाचे दर्शन !

तीर्थक्षेत्री स्नान करून शरीर शुद्ध होते; पण सद्भाव, भक्ती आणि आत्मज्ञानाच्या संगमात डुबकी घेतली की…

10 hours ago

विज्ञानाच्या आधारावर सत्याचा शोध घेणारी दुर्गा!- प्राजक्ता खैरनार

गुन्ह्याच्या घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांना विज्ञानाची जोड देत सत्याचा शोध घेणे आणि निर्दोष व्यक्तीला न्याय मिळवून…

23 hours ago

महिलांच्या न्यायासाठी पेटली संघर्षाची मशाल; सत्यभामा सौंदरमल यांची धगधगती कहाणी

ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!..१० अन्यायाची झळ स्वतः सोसली, पोलिस कोठडीचा धाक अनुभवला; पण त्या…

1 day ago

संपत्ती आणि दया यांचा संगम म्हणजेच परमात्म्याची विभूती!

संपत्ती मिळवणे हे एक यश असू शकते; परंतु त्या संपत्तीचा उपयोग इतरांच्या जीवनात आशेचा प्रकाश…

2 days ago

वंचितांच्या न्यायासाठी संघर्षाची मशाल पेटवणारी पंचशीला कुंभारकर !

ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!..९ संघर्ष माणसाला खचवतोच असे नाही, तर त्याच संघर्षातून स्वतःची ओळख…

2 days ago