कोल्हापूर – मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई तसेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या सहकार्याने भाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर आणि संत तुकाराम अध्ययन, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्यावतीने ‘संत साहित्य संमेलन–२०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे.
हे संमेलन ३० डिसेंबर रोजी शिवाजी विद्यापीठ येथे होणार आहे. संत साहित्याच्या परंपरेतून निर्माण झालेल्या विचार, भक्ती, समाजप्रबोधन आणि सांस्कृतिक मूल्यांचा मागोवा घेणे, हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे.
संमेलनाची सुरुवात सकाळी नऊ वाजता पारंपरिक वारकरी भजन, लेझीम आणि झिम्मा फुगडी घालत ग्रंथ दिंडीने होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन संत साहित्याचे गाढे अभ्यासक सदानंद मोरे यांच्या हस्ते तर संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सतीश बडवे हे संमनाध्यक्ष आहेत.
दुपारच्या सत्रात ‘वारकरी संप्रदाय, महाराष्ट्र आणि जनजागृतीचे योगदान’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात संत परंपरेने समाजात निर्माण केलेल्या समतेच्या, भक्तीच्या आणि नैतिक मूल्यांच्या भूमिकेवर चर्चा होणार आहे.
सायंकाळी ‘वारी एक आनंदयात्रा’ या विषयावर ज्येष्ठ छायाचित्रकार संदेश भंडारे यांची मुलाखत होणार आहे. त्यानंतर कबीरपंथी भजन होणार असून संमेलनाचा समारोप अभंगवाणी या कार्यक्रमाने होणार आहे.
संत साहित्य, वारकरी परंपरा, भक्ती चळवळ आणि मराठी सांस्कृतिक वारसा याबाबत अभ्यासक, विद्यार्थी, संशोधक आणि रसिकांसाठी हे संमेलन विचारमंथनाचे महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. संमेलनास संत साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
