कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा सन २०२२ चा ‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’ ज्येष्ठ कवी व साहित्यिक वसंत आबाजी डहाके (अमरावती) यांना तर ‘ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार’ दिशा पिंकी शेख (श्रीरामपूर) यांना जाहीर करण्यात आला आहे.
कवी सतीश काळसेकर व ऋत्विज काळसेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार देण्यात येत आहे. अनुक्रम रुपये २१,०००/- व १०,०००/- आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सतीश काळसेकर यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या देणगीतून शिवाजी विद्यापीठ प्रती वर्षी दोन पुरस्कार देणार आहे. काव्यक्षेत्रात मौलिक योगदान देणाऱ्या कवीस दर वर्षी ‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’ तर नव्या पिढीतील कवीस ‘ऋत्विज काळसेकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
वसंत आबाजी डहाके हे प्रसिद्ध कवी, कादंबरीकार, समीक्षक, ललित गद्यलेखक व संपादक म्हणून परिचित आहेत. साठोत्तरी पिढीतील ते महत्त्वाचे कवी आहेत. त्यांनी आधुनिकतावादी व राजकीय जाणिवांची लिहिलेली कविता महत्त्वाची आहे. लघुनियतकालिक चळवळीत त्यांचा महत्त्वाचा असा सहभाग होता. कविता, समीक्षा, कलामीमांसा या क्षेत्रातील त्यांची कामगिरी मौलिक ठरली. कवितेविषयी, काव्यप्रतिती, कविता विसाव्या शतकाची, मराठी साहित्य : इतिहास आणि संस्कृती, मराठी समीक्षेची सद्य:स्थिती अशा महत्त्वपूर्ण समीक्षाग्रंथांचे लेखन त्यांनी केले आहे. अतिशय गांभीर्यपूर्ण आणि चिंतनशील लेखनाबरोबरच त्यांनी ज्ञानकोशनिर्मितीमध्येही मौलिक योगदान दिले आहे. त्यांच्या या वाङ्मयीन योगदानाबद्दल पहिल्या ‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कारा’साठी वसंत आबाजी डहाके यांची निवड केली आहे.
तर ‘ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार’ दिशा पिंकी शेख यांना जाहीर झाला आहे. दिशा पिंकी शेख ह्या सामाजिक कार्यकर्त्या, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या म्हणून सर्वपरिचित आहेत. भारतीय जनजीवनातील लिंगभाव, जातीयवाद, धार्मिक मूलतत्त्ववाद, समूहांच्या अस्मिता, स्त्री-पुरुष नात्यातील गुंतागुंतीचा अनोखा पट त्यांनी आपल्या कवितांतून चित्रित केला आहे. पारलिंगी समूहातील स्त्रियांचे दु:ख, तृतीयपंथीयांचे प्रश्न त्यांनी ‘कुरूप’ या काव्यसंग्रहातून मांडले आहे. रुपये दहा हजार आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार निवड समितीमध्ये मा. कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. अविनाश सप्रे, डॉ. नितीन रिंढे (मुंबई) आणि डॉ. गोविंद काजरेकर (सावंतवाडी) यांनी काम पाहिले. पुरस्कार प्रदान समारंभ दि. ५ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ४.०० वाजता मा. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व प्रा अविनाश सप्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती मराठी विभागप्रमुख प्रा. (डॉ.) रणधीर शिंदे यांनी दिली.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.