ऐतिहासिक दस्तावेजांचा अभ्यास करुन इतिहास लिहीणे हा एक स्वतंत्र विषय आहे. पण आपल्या आठवणी एकत्र करुन आणि त्यामध्ये इतरांनी सांगितलेल्या विश्वासार्ह माहितीची भर घालून एक महत्वाचा दस्तावेज तयार करणे हे ही तितकेच अवघड व कौशल्यपूर्ण काम आहे. हे काम केले आहे ॲड.अजित पुरोहित यांनी…
सुहास रघुनाथ पंडित, सांगली
9421225491
माता आणि माती म्हणजेच मातृभूमी या दोन्हीही आपल्यासाठी वंदनीय आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या मातेविषयीच्या आठवणी भिन्न भिन्न असू शकतात. त्यांच्यातील कौटुंबिक नाते व त्यातून निर्माण होणारे मर्मबंध वेगळ्या स्वरुपाचे असू शकतात. पण जी अनेकांची माता आहे त्या मातृभूमीविषयी आपल्या भावना व्यक्त करताना आपला दृष्टिकोन कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता अधिक व्यापक ठेवावा लागतो. एकाच मातीत रमलेलं एक खूप मोठं कुटुंब म्हणजे आपलं गाव. आयुष्याचा दीर्घ प्रवास झाल्यानंतर या गावाकडे वळून पाहताना , गावाविषयी, तेथील लोक व लोकजीवन याविषयी जे जे वाटलं, समजलं ते लिहून काढताना गावाचचं एक सुंदर ‘व्यक्तिचित्र ‘ रेखाटण्याचं काम ॲड. पुरोहित यांनी केलं आहे. त्यांनी लिहीलेले ‘ गड्या आपला गाव बरा ‘ हे पुस्तक वाचनात आले. कोणतं आहे हे गाव आणि काय लिहीले आहे त्याविषयी हे सांगण्याचा हा एक प्रयत्न.
सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील कोकळे हे ॲड. पुरोहितांचे गाव. सांगलीच्या पूर्वेला, ६५ कि. मी.अंतरावर, सुमारे साडेचारहजार लोकवस्तीचे हे गाव. या गावाविषयी लिहीताना त्यांनी पुस्तकाची मांडणी अत्यंत नियोजनबद्ध केलेली आहे. सुरुवातीलाच या गावाचे भौगोलिक स्थान सांगून ते कर्नाटकच्या खूप जवळ असल्यामुळे, भाषा, संस्कृती, व्यक्तींची नावे अशा अनेक बाबतीत कन्नड छाप पडलेली आहे हे ते स्पष्ट करतात. पुढे पुस्तक वाचताना आपल्याला याचे प्रत्यंतर येते.
या पुस्तकात एकूण वीस प्रकरणे आहेत. या गावाची श्रद्धास्थानं, धार्मिक सप्ताह, यात्रा, सांस्कृतिक परंपरा, वाड्यावस्त्या, शेती, शिक्षण, नाट्यपरंपरा, खेळ अशा विविध पैलूंचा विचार करण्यासाठी स्वतंत्र प्रकरणे आहेत. याशिवाय येथील कर्तृत्ववान व्यक्ती, जीवसृष्टी, गावचा ओढा, १९७२ चा दुष्काळ व त्याचे झालेले परिणाम आणि कोरोनाचे आलेले संकट या सर्वांविषयी त्यांनी लिहीले आहे.
कोरोना काळात २१ दिवसांच्या लाॅकडाऊनच्या काळात या पुस्तकाचे बरेचसे लेखन झाले आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.
गावाच्या श्रद्धास्थानांविषयी लिहीताना त्यांनी श्री हनुमान, बसवेश्वर, ग्रामदैवत यल्लम्मा म्हणजेच रेणुकादेवी, परशुराम, मायाक्का, लक्ष्मी, मरगुबाई, म्हसोबा, बालाजी यांबरोबरच यमनूर पीर, चिंध्यापीर, मिरासाहेब दर्गा यांविषयी माहिती देऊन गावातील धार्मिक ऐक्याचे दर्शन घडवले आहे.
देव हा आयुष्यात संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग असतो अशी श्रद्धा असणारे लोक आजही आहेत व म्हणून ही श्रद्धास्थाने आजही पहायला मिळतात.
१९७२ पर्यंत जीवंत असलेल्या गावच्या ओढ्याबद्दल त्यांनी सविस्तरपणे लिहीले आहे. ग्रामीण लोकजीवन हे ओढ्यातील पाण्यावरच अवलंबून असल्यामुळे त्यांनी हे अत्यंत आत्मियतेने लिहीले आहे.ओढ्याची पूर्वीची स्थिती,गावठाणाची जागा,आजुबाजूची झाडे व वनस्पती,नंतर बांधलेले पूल,७२ च्या दुष्काळानंतर झालेली अवस्था,अलिकडेच बांधलेले बंधारे अशा अनेक विषयांचा आढावा घेत ओढ्याच्या आजच्या अवस्थेविषयी ते हळहळ व्यक्त करतात.
गतकाळातील ‘सप्ता ‘ म्हणजेच सप्ताह कसा असायचा याचेही त्यांनी छान वर्णन केले आहे. बदलत्या काळात त्याचे स्वरुप बदलले, महत्व कमी झाले. तरीही परंपरा चालू ठेवणारे काही लोक अजूनही गावात आहेत.
मार्गशीर्ष महिन्यात भरणाऱ्या गावच्या यात्रेनिमित्त ते म्हणतात की पूर्वीची यात्रा आणि आताची यात्रा यात फार बदल झाला आहे. म्हणूनच हे प्रकरण वाचण्यासारखे आहे. कारण त्याशिवाय पूर्वीची यात्रा कशी होती ते समजणार नाही. शिवाय जत्रेतील काही विशिष्ट कार्यक्रम किंवा विधी म्हणजे काय हे ही समजणार नाही. उदा. कीच, बोनी, वालगे, लिंब नेसणे, मुले उधळणे हे सर्व वाचल्याशिवाय कसे समजेल ?
‘जगण्यासाठी सर्व काही ‘ या प्रकरणात लेखकाने ग्रामीण अर्थव्यवस्थेचे सुंदर चित्रण केले आहे. बारा बलुतेदार, कुटीरोद्योग, लघुउद्योग हे सर्व मुख्य शेतीव्यवसायाशी कसे निगडीत व पूरक होते हे समजून घेण्यासारखे आहे. यातही स्थित्यंतरे होत गेली. त्याचीही नोंद लेखकाने घेतली आहे. कष्ट करण्याची फारशी तयारी नाही, कमी कष्टात कमी वेळेत भरपूर पैसा मिळावा आणि वाढत जाणारी स्पर्धा यामुळे पूर्वीचे चित्र बदलले आहे. पण सर्वांनी विचार केला तर गाव परिपूर्ण होईल अशीही त्यांना आशा आहे.
‘शेती ‘ या प्रकरणात सुरुवातीलाच ‘कोकळे ‘ हे गावाचे नाव कसे पडले असावे याचा अंदाज लेखकाने व्यक्त केला आहे. कोकळ्यातील हळद, केळ, ऊस, पानमळे, बागायती शेती, गुऱ्हाळे, भाजीपाला, फळबागा यांविषयीचे लेखन वाचताना त्यांनी सगळ्या शेतातूनच फिरवून आणले आहे असे वाटते.
गावातील सांस्कृतिक परंपरांविषयी त्यांनी लिहीले आहे. गोकुळाष्टमी, नागपंचमी, खंडेनवमी यासारख्या सणातील पारंपारिक खेळ, गाणी, विधी यांचे वर्णन वाचायला मिळते. अलिकडच्या काळात महापुरुषांचे स्मरण करण्याच्या निमित्तानेही सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. काही पारंपारिक गीतेही त्यांनी या प्रकरणात दिली आहेत.
सर्वसाधारणपणे खेडेगाव म्हटलं की मनोरंजनासाठी तमाशा हेच आपल्या डोळ्यासमोर येतं. पण कोकळ्याचे रहिवासी नाट्यवेडे आहेत हे वाचून आश्चर्य वाटत. कोकळ्याला असलेली नाट्यपरंपरा, तिथले स्थानिक कलाकार, तिथे बसवलेली नाटके, कधी मशिदीच्या कट्ट्यावर तर कधी बॅरलचे केलेले स्टेज अशा अनेक गोष्टींचा उल्लेख करत कोकळ्याचा नाट्यसृष्टीपट लेखकाने आपल्या डोळ्यासमोर मांडला आहे. परगावाहून येणाऱ्या स्त्री कलाकारांनीही कोकळेकरांचे कौतुक केले आहे हे रसिकतेला प्रमाणपत्रच मिळाल्यासारखे आहे.
कोकळ्यात प्राथमिक शाळा सुमारे ९० वर्षांपूर्वी सुरु झाली. त्यामुळे या गावाला शैक्षणिक परंपराही आहे. देवळात किंवा एखाद्या वाड्यात शाळा भरवली जायची. शिक्षक परगावाहून आले तरी गावातच सहकुटुंब रहायचे. पहिली ते चौथी एकच शिक्षक असायचे. शाळेची स्वच्छता, छोटेसे ऑफिस तेही एका वर्गातच, दर वारी म्हणायच्या प्रार्थना हे सर्व वाचताना त्या काळातील शाळेची कल्पना येते. शाळेच्या सहली, सेंटरच्या परीक्षा, त्या शिवाय चित्रकला, हिंदी, गणित अशा बाहेरच्या संस्थांच्या परीक्षाही होत असत. शैक्षणिक प्रगतीमुळे मुला मुलींच्या वेगवेगळ्या शाळा आता सुरु झाल्या आहेत. महिला प्रौढ शिक्षण वर्ग ही सुरु झाले. शैक्षणिक वातावरण चांगले असल्यामुळेच
या गावाने अनेक इंजिनिअर, डाॅक्टर, वकील, न्यायाधीश, सरकारी नोकर दिले आहेत.
शिक्षणाबरोबरच खेळाच्या क्षेत्रात काय परिस्थिती होती याविषयीही लेखकाने लिहीले आहे. पूर्वी तालमी असत. कुस्तीगिर परिषदेकडून सत्कार झालेले पहिलवान या गावाने दिले आहेत. सुरफाट्या, चिन्नीदांडू, लगोरी, भोवरा, गोट्या, लंगडी, काचाकवड्या यासारख्या बिनभांडवली खेळाबरोबरच व्हाॅलीबाॅल, बुद्धीबळ अशा खेळांनाही गावाने आपलेसे केले आहे.
काही कारणानी किंवा पोट भरण्याचा व्यवसाय म्हणून गावात काही मंडळी नियमितपणे यायची. त्यांना लेखकाने ‘पाहुणे’ असे म्हटले आहे. हे पाहुणे म्हणजे गारुडी, दरवेशी, हेळवी, डोंबारी, माकडवाले, बहुरुपी, तांबट, पिंगळा, मोतीवाले, छत्रीवाले इत्यादी. हे आता दुर्मिळ होत चालल्यामुळे वाचनातूनच त्यांच्याविषयी माहिती मिळू शकते.
विविध क्षेत्रात नाव कमावून गावचा झेंडा फडकवणाऱ्या कर्तृत्ववान कोकळेकरांचा परिचयही लेखकाने करुन दिला आहे. अशाप्रकारे आपल्या गावाविषयी लिहीताना लेखकाला काय लिहू आणि काय नको असे झाले आहे…त्यांनी वाड्या, वस्त्यांविषयी लिहीले आहे. एवढेच नव्हे तर
पशू, पक्षी, किटक, झाडे अशा जीवसृष्टीवरही लिहीले आहे.
आणि चुकून काही राहू नये म्हणून ‘उरलं सुरलं ‘ या प्रकरणात अनेक लहान सहान गोष्टी व त्यात होत गेलेले बदल यांवर लिहीले आहे. कोरोना काळात या पुस्तकाचे बरेचसे लेखन झाल्यामुळे त्या कटू आठवणींचा उल्लेख करुन आपले गावाविषयीचे लेखन त्यांनी थांबवले आहे.
शेतात न जाता शेताच्या बांधावरून फिरताना शेताची साधारण कल्पना येते. पण संपूर्ण शेत नजरेसमोर येत नाही. पुस्तकाच्या या परिचयाचेही तसेच आहे. खूप सांगण्यासारखे आहे. पण शेवटी लेखन मर्यादा आहे. म्हणून पुस्तक वाचण्याला पर्याय नाही. ग्रामीण भारताचे प्रतिनिधित्व करणारे एक खेडे व त्याची माहिती म्हणून या पुस्तकाकडे पाहिले तर तर इंडिया नव्हे तर भारताविषयी कल्पना येऊ शकेल. ग्रामीण भागाशी संबंध असणाऱ्यांना हे गाव आपले वाटेल आणि ग्रामीण भागाशी संबंध नसणाऱ्यांना ‘गाव’ समजून घेता येईल.
” निशिदिनी नित्य जन्मुनी मरण सोसावे
परी कोकळ्यातच पुन्हा जन्मा यावे “
असे म्हणणाऱ्या ॲड. अजित पुरोहित यांचे हे पुस्तक अन्य ‘गावक-यांना’ स्वतःच्या गावाविषयी लिहायला उद्युक्त करो हीच सदिच्छा !
पुस्तकाचे नाव: गड्या आपला गाव बरा
लेखक : ॲड. अजित लक्ष्मण पुरोहित 9637730625
प्रकाशक :सरस्वती प्रकाशन, कोकळे
किंमतः 251 रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.