December 8, 2022
Nana Shankarshet brings train in India
Home » इंग्रजांमुळे नाही तर नानांमुळे भारतात रेल्वे आली..
मुक्त संवाद सत्ता संघर्ष

इंग्रजांमुळे नाही तर नानांमुळे भारतात रेल्वे आली..

सगळेजण इंग्रजांना भारतात रेल्वे सुरु करण्याच क्रेडीट देतात पण नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या योगदानाविषयी, त्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल बऱ्याच जणांना ठाऊक नव्हते.

सुवर्णा नाईक- निंबाळकर

मुंबईने ज्यांना श्रीमंत केले अशी खूप लोकं आपल्याला दिसतील, पण आपल्या कर्तृत्त्वाने आणि दातृत्वाने ज्यांनी मुंबईला श्रीमंत केले असे अगदी हातावर मोजण्या ईतपतच सापडतील. नानांनी उभारलेल्या संस्था पाहिल्या की आजही आवाक् व्हायला होते. नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ हे ह्या कर्तबगार लोकांच्या यादीतील अग्रगण्य नाव. आजच्या काळात टाटा, बिरला, महिंद्रा ह्यांना मुंबईचा किंग म्हंटलं जातं पण ह्यांच्याही आधी नाना शंकर शेठ यांच्यामुळेच मुंबईचा हा रुबाब आज सुद्धा टिकून आहे हे मुंबईकरांनी विसरता कामा नये!

१५ सप्टेंबर १८३०. इंग्लंडमध्ये लिव्हरपूल ते मॅन्चेस्टर या शहरादरम्यान जगातली पहिली इंटरसिटी रेल्वे धावली. इंडस्ट्रीयल रिव्होल्युशनचा काळ होता. मॅन्चेस्टर मध्ये सगळ्या कापड गिरण्या होत्या. अख्ख्या जगाला पुरेलएवढ कापड तिथ तयार होत होता. तर या गावाला लागणारा कच्चा माल कापूस भारत, अमेरिकेतून लिव्हरपूलच्या बंदरावर यायचा आणि मग तिथून मॅन्चेस्टरला रवाना व्हायचा. म्हणून लंडनच्या आधी तिथे पहिली वाफेच्या इंजिनवर धावणारी रेल्वे सेवा सुरु झाली. या रेल्वे मुळे मॅन्चेस्टरच्या प्रगतीचा स्पीड दुप्पट वेगाने सुरु झाला.

इंडस्ट्री मोठी करायची असेल तर तर ट्रान्सपोर्ट चांगला करावा लागणार हे निश्चित होतं.लिव्हरपूल ते मॅन्चेस्टर दरम्यान टाईमटेबल नुसार रेल्वे धावतीय. शेकडो लोक या गावाहून त्या गावी सुखकर प्रवास करतायत, कच्चा माल निर्धोक पणे कारखान्यावर पोहचतोय हे सगळ त्याकाळच नवल होतं. ही बातमी सगळीकडे पसरली.

मुंबईमध्ये एका माणसाला या गोष्टीचे खूप अप्रूप वाटलं. आपल्या पण गावात रेल्वे धावली पाहिजे असं त्याच्या मनात बसलं. अजून अमेरिकेत रेल्वे उभी रहात होती आणि हा भारतासारख्या गरीब आणि ब्रिटीशांच्या पारतंत्र्यात असणाऱ्या देशात राहणारा माणूस रेल्वेची स्वप्न बघत होता. दुसरे कोण असते तर लोकांनी खुळ्यात काढलं असत. पण हा माणूस कोण साधा सुधा नव्हता. खुद्द इस्ट इंडिया कंपनीला कर्ज देणारा मुंबईचा सावकार नाना शंकरशेठ*

नाना शंकरशेठ यांचं खर नाव *जगन्नाथ शंकर मुरकुटे* जे इतरांनाच काय पण सोनारांचे नेते म्हणून मिरवणाऱ्यांनाही माहीत नसेल. त्यांचे मूळगाव मुरबाड. पिढीजात श्रीमंत. त्यांचे वडील इंग्रजांना उधारी देणारे मोठे सावकार. इंग्रज टिपू सुलतान युद्धात त्यांनी बराच पैसा कमवलेला. त्यांचाचं एकुलता एक मुलगा म्हणजे नाना.सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेलं हे पोरग. पण फक्त लक्ष्मीच नाही तर सरस्वतीचा ही आशीर्वादाचा हात डोक्यावर होता. बापानेही खास स्पेशल शिक्षक लावून इंग्लिश वगैरे मध्ये पोराला तयार केलं होतं. वडिलांच्या मृत्यूनंतर घरचा बिझनेस त्यांनी आणखी मोठा केला. सगळ जग इंग्रजांपुढे माना झुकवून उभ राहायचं तेव्हा नाना शंकरशेठच्या आशीर्वादासाठी इंग्रज अधिकारी पाय घासत असत.

एकदा एका पार्टीमध्ये नानांची ओळख मुंबई इलाख्याचा गव्हर्नर लॉर्ड स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टनशी झाली. दोघे चांगले दोस्त बनले. एल्फिन्स्टनची भारतीयांबद्दल सहानुभूती होती. इथली गरिबी मिटावी, देश आधुनिक जगाशी जोडला जावा यासाठी तो प्रयत्नशील असायचा.

त्याच्या मैत्रीचा इफेक्ट म्हणा अथवा आणखी काय पण नानांनी सुद्धा आपल्या बांधवांच अडाणीपणा दूर व्हावा, आपल्या गावाची प्रगती व्हावी यासाठी प्रयत्न सुरु केले. मुंबई विद्यापीठ, एल्फिन्स्टन कॉलेज, ग्रट मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज, जेजे स्कूल ऑफ आर्ट, मुंबईमधली पहिली मुलींची शाळा, मुंबई विद्यापीठ अशा अनेक शैक्षणिक संस्था उभारल्या. मुंबईत अनेक रस्ते उभारले, दवाखाने सुरु केले, भारतातली पहिली जहाज कंपनी सुरु केली.सात बेटांच्या गावाला मुंबई शहर बनवण्यात नाना शंकर शेठ यांचा सिंहाचा वाटा आहे हे इंग्रजही कधी नाकारू शकणार नाहीत.

तर अशा या नाना शंकरशेठ यांच्या मनात आलं की मुंबईत रेल्वे सुरु करायची. साल होत १८४३. तेव्हा त्यांच्या वडिलांचे मित्र सर जमशेठजी जीजीभोय उर्फ जेजे यांच्याकडे ते गेले. नानांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर नानांसाठी ते वडीलांसमानच होते. या सर जेजेनां त्यांनी आपली कल्पना सांगितली, त्यानाही ही कल्पना पटलीमुंबईत रेल्वे सुरु होऊ शकते का याबद्दल त्यांनी इंग्लंडहून आलेले सुप्रीम कोर्टाचे जज सर थॉमस एरसकीन पेरी यांचं मत घेतलं. ते सुद्धा या कल्पनेने खुश झाले. या तिघांनी मिळून इंडियन रेल्वे असोशिएशनची स्थापना केली ,तेव्हा कंपनी सरकारच्या जरासुद्धा मनात नव्हतं की भारतात रेल्वे व्हावी. पण नाना शंकरशेठ, सर जेजे, सर पेरी असे लोक पाठ लागलेत म्हटल्यावर त्यांना यामध्ये लक्ष घालावेच लागले. १३ जुलै १८४४ रोजी कंपनीने सरकारला प्रस्ताव सादर केला. मुंबईपासून कुठपर्यंत रेल्वे लाइन टाकता येऊ शकते, याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर ‘बॉम्बे कमिटी’ स्थापन करण्यात आली.

नानांनी आणखी काही मोठी व्यापारी मंडळी, ब्रिटीश अधिकारी, बँकर्स यांना एकत्र करून ग्रेट इंडियन रेल्वेची स्थापना केली. याच काळात इंग्लंडमधल्या भांडवलदारांना भारतात मुंबईमध्ये रेल्वे सुरू करण्यासाठी चालू असलेल्या हालचालींची कुणकुण लागली. लगोलग लॉर्ड जे. स्टुअर्ट वॉर्ली यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश भांडवलदारांनी लंडनमध्ये ग्रेट इंडियन पेनिनसुलर रेल्वेची स्थापना केली. या कंपनीचं मुंबईमध्ये देखील ऑफिस उघडण्यात आलं.

नानांच्या बंगल्यात कंपनीचं कार्यालय सुरु करण्यात आलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडहून आलेले तज्ञ इंजिनियर रेल्वेमार्ग उभारणीच काम करू लागले. फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण आशिया खंडात पहिल्यांदा रेल्वे धावणार होती. अखेर तो दिवस उजाडला.१६ एप्रिल १८५३ दुपारी ठीक ३.३० वाजता मुंबईच्या बोरिबंदरहून ठाण्यासाठी ट्रेन निघाली. या ट्रेनला १८ कंपार्टमेंट आणि तीन लोकोमोटिव्ह इंजिन्स होती. पहिल्या प्रवासासाठी खास फुलांनी शृंगारलेल्या या ट्रेनच्या प्रवाशांमध्ये नाना शंकरशेट व जमशेटजी जिजीभोयदेखील होते. सगळेजण इंग्रजांना भारतात रेल्वे सुरु करण्याच क्रेडीट देतात पण नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या योगदानाविषयी, त्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल बऱ्याच जणांना ठाऊक नव्हते.

आज भारतीय रेल्वे ही जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यापैकी एक आहे. रेल्वेला मुंबईची तर लाइफ़लाइन समजल जात. आज मुंबई मेट्रो सिटी आहे, उद्योगनगरी म्हणून जगभरात ओळखली जाते या मागे नाना शंकर शेठ या एका मराठी माणसानं पाहिलेलं अशक्यप्राय स्वप्न आहे. अप्रतिम, कोणत्याही प्रसिद्धीचा हव्यास नसणारी ही माणसे खूप खूप काही असे करतात की मनोमनी नतमस्तक होऊन जावे असे वाटते

Related posts

कवा बी येवा भुदरगड आपलाच हाय की…

मुलं गेली अवकाशात’ : गोष्टींचा गुच्छ!

आडवळणाच्या समाज व्यथाकथांचा प्रदेश

Leave a Comment