September 8, 2024
called-to-the-hotel-for-prostitution story by Ajay Kandar
Home » देहविक्रीसाठी हॉटेलवर बोलवलं अन्…
मुक्त संवाद

देहविक्रीसाठी हॉटेलवर बोलवलं अन्…

वेश्यावस्तीमधील आवडत्या मुलीला हॉटेलवर घेऊन गेल्यावर तिला एका रात्रीचे पैसे जास्त प्रमाणात दिले जातात. मात्र हॉटेलच्या कोणत्या रात्री कोणती वेळ आपल्यावर येईल याची शाश्वती त्या मुलीला नसते. तनिषाने आपला अनुभव सांगताना जी जीवघेणी घटना सांगितली, त्यातून हादरायला झालं.

तनिषा म्हणाली,” त्या रात्री वळूसारखे तिघे माझ्या खोलीमध्ये आले. तिघांनी एकाच वेळी माझ्या गुप्तांगाला स्पर्श केला. त्या त्यांच्या किळसवाण्या स्पर्शाने माझी सगळी भावनाच मरून गेली. तरी त्या नराधमांनी आळीपाळीने माझ्यावर जबरदस्ती केली आणि माझ्या साऱ्या शरीरावर दारूच्या चार- पाच बॉटल ओतून मला विवस्त्र अवस्थेत ठेवून दारूची आंघोळ घातली. मग नशेत धुंद असलेल्या त्या तिघांनी पुन्हा माझ्यावर आळीपाळीने जबरदस्ती केली”. हे सगळं सांगताना तनिषाचे ओठ कापत होते. हात थरथरत होते. जणू काही ती घटना सर्व तिला आठवून आता तोच प्रसंग तिच्यावर घडतो आहे, की काय असे तिला भास होऊ लागले होते.

या सगळ्यावरून असं लक्षात येतं, की त्या कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेने एकदा मुली देहविक्री व्यवसायात आल्या, की त्यांच्या हातात काहीच नसतं. पुरुषांच्या मर्जीनुसारच त्यांना जगावं लागतं, हे सांगितलेले खरेच होते. हे पटू लागलं. हे सांगून एक तिरकस नजर आमच्यावरही टाकून ती महिला आतमध्ये निघून गेली होती. मात्र तनिषा आमच्यासमोर बसूनच होती. आम्ही तिला बोलतं करण्यासाठी आलो होतो; परंतु तिला आधी झालेल्या मारहाणीमुळे ती शून्यात नजर लावून जमिनीकडे बघत राहिली होती. त्यामुळे तिला बोलतं कसं करावं हेच लक्षात येत नव्हतं.

जॉन भाईंनी माझ्या चेहऱ्याकडे पाहिले. पुन्हा मान वळून तिच्याकडे नजर स्थिर ठेवली आणि तिला म्हणाले, “तुझ्यासाठी चहा मागू का ? तुला भूक लागली आहे का ? काही खायला मागू का ?”

जॉन भाईंच्या या आपलेपणाच्या शब्दातून तिला थोडा धीर आला असावा. काही मिनिटापूर्वी संपूर्ण कुंटणखान्यातील महिला आपल्या विरोधात बोलत होत्या, मारपीट करत होत्या. त्याच कुंटणखान्यात आपल्याला कोणीतरी प्रेमाने काही खाणार का ? असं आग्रहाने विचारतोय हीच भावना तिला सुखावणारी होती. त्यामुळे जॉन भाई यांचे हे आपलेपणाचे शब्द ऐकून तिने शून्यात नजर लावून जमिनीकडे स्थिरपणे पाहत असलेली मान वर केली आणि जॉन भाईंशी अगदी आतल्या ओलाव्याने स्मित हास्य केले. तनिषाच्या चेहऱ्यावरील ते हसू बघून जॉन भाई यांना खूप समाधान वाटलं. मग जॉन भाई यांनी तिला बोलतं करण्याला सुरुवात केली.

जॉन भाईनी सहज म्हणून तिला विचारलं हॉटेलवर गेल्यावर तुला नेमकं काय त्रास होतो. हे ऐकून ती भरभरून बोलायला लागली. अनेक दिवसांची कोंडलेली भावना ती मोकळी करत होती. तनिषा म्हणाली, “सर, मला हॉटेलसाठी मोठ्या प्रमाणात मागणी येते. हॉटेल मालकच ग्राहकांना माझ्यासाठी इथला संपर्क देतात; पण हॉटेलवर गेल्यावर कधीतरी एखादी रात्र छान जाते. एखादा पुरुष अतिशय प्रेमाने आपल्याला जवळ करतो. आपल्या शरीराचा आनंद घेतो. मोठ्या प्रमाणात पैसे देतो आणि पुन्हा भेटीच आश्वासन देऊन सकाळी निघून जातो. पण हॉटेलवरच्या काही रात्री अशा जातात, की संपूर्ण देहाची चाळण केली जाते.”हे सांगताना वरील अंगावर दारू ओतून दारूची आंघोळ घातलेला प्रसंग तिच्याकडून ऐकताना अंगावर शहारे आले.

तनिषा म्हणाली, “मला कुंटणखाणा सोडून हॉटेलवर देहविक्रीसाठी जायला आवडायचं नाही; पण इथे आलेल्या एका ग्राहकाने मला हॉटेलवर बोलवलं. तेही हॉटेल मालकाकडून बोलवलं गेलं. त्यामुळे मी प्रथमच हॉटेलवर गेली. तेव्हा अतिशय प्रेमाने त्या ग्राहकाने माझ्या सोबत रात्र घालवली. त्याने त्या रात्री दारू प्याली. मलाही पिण्याचा आग्रह करत होता; पण मी दारू पीत नसल्यामुळे त्याला दारूला नकार दिला. मग त्यानेही दारू पिण्याचा आग्रह केला नाही किंवा मारहाण केली नाही, सिगारेट ओढण्याचा आग्रह केला नाही. मध्यरात्रभर तो दारू पित होता; पण त्याने कसलाच त्रास दिला नाही. मी सेक्स वर्कर समजून त्याने माझ्याशी तसे व्यवहार केले एवढंच. बाकी खूप सौजन्याने तो वागला आणि एका रात्रीचे त्याने मला पैसेही भरपूर दिले”. हे सांगताना तनिषाच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

जॉन भाईना आश्चर्य वाटले. ते तिला म्हणाले,” काय झालं मधेच हसायला?”, तर ती म्हणाली,” काही नाही” आणि पुन्हा हसली…तिच्या हसण्यात एक प्रेमळ, निर्व्याज भाव होता. तेव्हा पुन्हा जॉन भाई म्हणाले, “अगं सांग, सांग का हसतेस ते?… आम्हालाही जरा कळू दे”.

यावर तनिषा म्हणाली, “साहेब, तो जो ग्राहक होता. तो त्या रात्री नंतर रोज फोन करायचा आणि प्रेमाच्या बाता बोलायचा. माझा जरी रात्रीचा धंद्याचा वेळ असला तरी त्याच्याशी बोलावचं लागायचं. मग तो मला थोडे थोडे पैसेही पाठवायला लागला आणि एके दिवशी माझ्याशी लग्न करण्याची मागणी घातली; पण त्या भल्या माणसाच आयुष्य माझ्यासारख्या तवायफशी लग्न करून काय भलं होणार होतं ? असा मी विचार केला आणि मी त्या माणसाला लग्नाला नकार दिला. त्यापासून त्याने माझ्याशी काहीच संपर्क ठेवला नाही.

मात्र हे सांगितल्यानंतर तनिषाने हॉटेलवरील दुसरा प्रसंग जो सांगितला तो ऐकताना हादरूनच जायला झालं. तिने पहिल्या ग्राहकाला हॉटेलवर चांगली सेवा दिल्यामुळे त्या हॉटेल मालकाकडून अजून काही दिवसांनी पुन्हा एका रात्रीसाठी तनिषाला बोलवण्यात आलं. त्या रात्री तिच्या देहाशी असा व्यवहार केला गेला, की त्या नरकयातना तिला सहनही करता येत नव्हत्या. तिला विवस्त्र करून दारूची अंघोळ घालण्यात आलीच; परंतु दारू पिऊन तर्र असलेल्या तीन-चार नराधमानी तिचं अंगांग पिळवटून टाकल. त्यावेळी तिला श्वासही घेता येत नव्हता. संपूर्ण जीव गुदमरून गेला होता. तरीही ते तिच्या देहाची विटंबना करतच राहिले होते…!

अजय कांडर
लेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

भारतीय गणराज्य आणि स्त्रियांचा राजकीय सहभाग या विषयावर पोस्टर स्पर्धा

देईल गुरुसेवा…

एका दिवसाचे परान्न…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading