July 27, 2024
A writer should find the beautiful village of humanity
Home » माणुसकीचा देखणा गाव साहित्यिकाने शोधावा
विशेष संपादकीय

माणुसकीचा देखणा गाव साहित्यिकाने शोधावा

साहित्याने रिकाम्या जागांचे अक्षर व्हावे…

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब, स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती शंभुराजे, जातीअंताचे प्रवर्तक छत्रपती शाहू महाराज, बहुजनांचे उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, जिच्यामुळे आज मी तुमच्यासमोर उभी आहे ती शिक्षणदायिनी सावित्रीमाई फुले. या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी उभी आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषदेच्या यापूर्वीच्या माझ्या पंधरा पूर्वसुरींनी घालून दिलेल्या आदर्श पायवाटेवर मी उभी आहे. ज्यांच्या विचारांची उंची आभाळाएवढी तर अभ्यासाची खोली पृथ्वीच्या तळाला पोहोचणारी असे मार्तंड यशवंतराव सावंत, इतिहासाचार्य मा. म. देशमुख, म. भा. चव्हाण, प्रा. गंगाधर बनबरे, डॉ. सय्यद जब्बार पटेल, प्रा. रतनलाल सोनग्रा, भा. ल. ठाणगे, रावसाहेब पवार, अविनाश ठाकरे या माजी संमेलन अध्यक्षांचा भला मोठा वारसा या संमेलनाला लाभला आहे.

धोक्याचं असणारं परंतु मोक्याचं ठरणारं हे सोळावं वरीस सोबत घेऊन म्हणूनच तर अवगुंठून आदरयुक्त दबावानं मी तुमच्यासमोर उभी आहे. कऱ्हा आणि निरेच्या काठावर कृष्णेच्या पाण्याची ओंजळ घेऊन मी तुमच्यासमोर उभी आहे.  शंभर चौरस मैलांच्या जुन्या कऱ्हा पठाराला, सात गड नऊ घाटांच्या महाराष्ट्राच्या दौलतीला मी लवून मुजरा करते. कऱ्हेचं स्नान घेणाऱ्या जेजुरीच्या खंडोबाला मी प्रबोधनाच्या जागराला बोलवते. सासवड – खानवडी – पुरंदरची माती माझ्या कपाळी लावते. श्रीधरपंत नाझरेकर, सोपान देव, साहित्य मार्तंड यशवंतराव सावंत, शाहीर होनाजी बाळा, शाहीर सगनभाऊ,आचार्य अत्रे, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, लीला गांधी, शरद पवार या अलौकिक व्यक्तीमत्त्वांना हात जोडून मनोभावे नमस्कार करते .

दशरथ यादव नावाचा कवी म्हणतो –

सात गड नऊ घाटाची, ही दौलत महाराष्ट्राची
आल्याड कऱ्हा आणि पल्याड निरा
हा शिवशाहीचा झरा रं
शिवशंभोचा पुरंदर
मोतियाचा तुरा रं…

याची प्रचिती इथे येणाऱ्या प्रत्येकास आल्याशिवाय राहत नाही .

पुरंदर, वज्रगड, कानिफनाथ गड, गवळगड, दौलत मंगळगड, मल्हारगड, कडेपठार गड हे सात गड तर दिवेघाट, शिंदवणे घाट, ताम्हण घाट, भुलेश्वर घाट, चिवेघाट, भोपदेव घाट, पांगारघाट, बांदलवाडी घाट, दौंडजखिंड घाट हे नऊ घाट तसेच स्वराज्याची पहिली लढाई लढताना वीर बाजी पासलकर जिथे धारातीर्थी पडले त्या बेलसरच्या पावनभूमीवर मी शब्दांनी ओथंबून उभी आहे.

ज्यांच्या वैचारिक क्रांतीवर माझे भरण – पोषण झाले ते समाजसुधारक, समाजप्रबोधक, थोर विचारवंत, समाजसेवक, लेखक ,तत्त्वज्ञ, क्रांतिकारी कार्यकर्ते ,समाजशिक्षक, अस्पृश्योद्धारक, बालविवाह प्रतिबंधक, विधवा बंदीचे प्रवर्तक, सत्यशोधक, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अंगाखांद्यावर आज मी उभी आहे .

बा….ज्योतिबा तू मला उचलून घेतले आहेस…दशरथाच्या परिसस्पर्शाने स्वाती नक्षत्राचा मोती होतो आहे. माझ्या आयुष्यातील हा अतुलनीय आनंदाचा क्षण आहे. या क्षणाचे साक्षीदार होण्यास उपस्थित असणाऱ्या सर्वा – सर्वांची मी आजन्म ऋणी आहे.

सोळाव्या महात्मा फुले प्रबोधन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा गौरव हा माझ्या मायभाषेचा गौरव आहे. जिच्या अंगा खांद्यावर मी वाढले त्या वांङ्मयीन परंपरेचा हा गौरव आहे. ज्यांच्या हातात हात घालून मी चालते आहे त्या समकालीन साहित्यिकांचा हा गौरव आहे. मराठी भाषेचे ऋण मस्तकावर घेऊन मी जगते आहे. कवितेने मला जगायला शिकवले आहे. माझी कविता हे न मिटणारं जगणं आहे. सागराची अथांगता…अश्रूंची अगतिकता..उपासमारीचे आक्रंदण..भावनांची अनावरता…मनातलं औदार्य…सारं – सारं काही या कवितेची देण आहे. व्यक्तिगत जीवनातील संघर्षाच्या आणि साफल्याच्या साऱ्या – सार्‍या क्षणांचे वास्तवात तिने यशाचे कोरीव शिलालेख केले आहेत. माझ्या आयुष्यातील कवितेचे ऋण न फिटणारे आहे.

मी कविता जगले आहे. कविता जगते आहे आणि कवितेनेच मला जगविले आहे. कवितेने अस्मितेचा अविष्कार दिला तसेच कवितेने नक्षत्रांची सारी आमंत्रणे सुद्धा दिली. जनाबाई कान्होपात्रेपासून ते आजपर्यंत व्यापक जाणिवेने स्त्री लेखन करणाऱ्या इंदिरा संत, शांता शेळके, पद्मा गोळे ,संजीवनी मराठे बहिणाबाई चौधरी, अनुराधा पाटील यांच्यापर्यंत कवितेने आपला व्यापक इतिहास निर्माण केला आहे.

माझ्या साहित्याने अनेक मनाची भिजभुई निरखून पहावी…ऊबदारपणाचं  अलिंगन देऊन मनाला उभारी देणारे साहित्य लेखणीच्या अग्राने प्रसवावे. माझ्या हातून लिहिला जाणारा प्रत्येक शब्द मोडून पडलेल्यांना लढण्याचे सामर्थ्य देणारा ठरावा. जगाच्या दुःखाला वाचा फोडून त्याच्यावर पर्याय शोधणारे उत्तर म्हणजे माझ्या हातून लिहिले जाणारे साहित्य असावे. माझ्या लेखणीने सकस पेरणी करावी. निराशावादाला गाडून नवा आशावाद संवर्धन वाद वाढीस लागावा.

अक्षरांचा घोटीवपणा, नात्यांचा बांधिवपणा, विचारांचा रेखीवपणा, शब्दांचा सुबकपणा यातून दांडगी वैचारिक मशागत व्हावी. साहित्यिकांनी निसर्गाकडून दातृत्व घ्यावं. संतांकडून शांती – दया – करूणा घ्यावी. जेत्यांकडून कणखरपणा खंबीरपणा घ्यावा. समाजसुधारकांकडून समाजभान, जागृती, कळवळा घ्यावा. फुला – मुलांकडून उत्साहाची लागण घ्यावी. भूमीची सहनशीलता, आकाशाची निरभ्रता, सागराची विशालता साहित्याच्या अंगोपांगी रुजून जावी. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, आदर, करुणा, प्रेम, नम्रता, मदतभाव, पर्यावरणप्रेम इत्यादी साऱ्या – साऱ्या गोष्टींचा समावेश डौलदार लेखणीच्या व्यक्तिमत्त्वात असावा.

अलौकिकत्वाची जाणीव ही पारलौकिकतेशी निगडित असते. आजच्या घडीला समाजव्यवस्था, राजव्यवस्था, न्यायव्यवस्था या सर्व व्यवस्थांनी मानवतेचे व्यवस्थापन फारच बिघडविले आहे. सर्व व्यवस्थांची दांडगी अडचण झाली आहे. मानव्याचा मुडदा पाडला जाण्याचा हा काळ आहे. वर्तमानात माणूसपण हरवलं आहे.  जगण्याच्या मार्गात अनेक अडसर आहेत. चांगुलपण देणारी माणसं हवालदिल झाली आहेत. अशा संभ्रमाच्या काळात निद्रिस्थांना जागृत करण्याचे काम साहित्यिकच अधिक चांगल्या रीतीने करू शकतात. रूढी – परंपरांना हादरा देण्याचे काम यापूर्वीही साहित्याने केले आहे.

कोणत्याही वेदनेचे एकारलेपण झुगारून तेजाची ठिणगी पेटविणारा माणुसकीचा अंश आता साहित्यिकानेच व्हावा लागेल. इमानदारीची पायमल्ली होणारा हा काळ आहे. कोडगेपणा, आत्मकेंद्रितपणा, यंत्रवतपणा आलेल्या या काळात जखमांचे कोणतेच व्रण सुकताना दिसत नाहीत. कोणत्याच चेहऱ्यावर स्मिताची लकेर उठताना दिसत नाही. समतेची सरळरेषा केव्हाच कालबाह्य झाली आहे. काळाच्या पठडीवर माणूसपणाची वजावट केली आहे. चंगळवाद माजला आहे. स्वास्थ्याला बिलकुल थारा नाही. चिरंतन मुल्यांची नैतिकता कुठल्यातरी कोपऱ्यात सांदीला अवघडून पडलेली आहे. नित्यनूतन मंगलाची कोणतीच आराधना आज घडताना दिसत नाही. “हीच आमुची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे… माणसाने माणसाशी माणसासम वागणे” असे म्हणताना आम्ही माणूस म्हणून वागत नाही हेही तितकेच खरे. पद – प्रतिष्ठा – पैसा या सगळ्या अशांततेच्या गदारोळात आम्हाला शांतता हवी आहे. दुभंगलेल्या माणूसपणाला एकसंघ करणे सध्याच्या वातावरणात फार महत्त्वाचे आहे. मूल्याधिष्ठित समाजव्यवस्था,आपण समाजाचं देणं लागतो हा संस्कार, माणूसपण पेरणारी, कमालीची लालसा हाती घेऊन माणसाचं वैचारिक भरण – पोषण करणारी लेखणी पुन्हा एकदा साहित्यिकांनी हाती घ्यायला हवी. 

आपल्या साहित्याने माऊली व्हावं. त्यानं दुनियेचं दुःख झाकुन घ्यावं. आपलेपणाने आलिंगन द्यावं. पोळलेल्यांना जिव्हारी नजरेने पहावं. लढण्याचे सामर्थ्य बहाल करावं. माझ्या साहित्याने रिकाम्या जागांचं अक्षर व्हावं. त्याने अवखळपणाचे कान पकडावेत. मुक्या जाणीवांना वाचा फोडावी. दबलेलं आणि दाबलेलं उसळी मारून त्यानं वर आणावं. लिहित्या हातानी कंपुशाहीचं दहन करावं. गटातटाने निर्माण झालेल्या लेखकांच्या नेतेपनाला जाणत्या साहित्यिकांनी मूठमाती द्यावी.

आजच्या काळाची हाक म्हणून साहित्याचा दुराग्रह टाळायला हवा. द्वेष, मूल्यहणन या प्रवृत्तीला रोखायला हवं. ‘ नेते’गिरीला पायबंद घालायला हवा. समर्थनाला बाजू द्यायला शिकायला हवं. एकंदर वाड्.मय व्यवहाराकडे तटस्थपणे पाहायला शिकणं खूप गरजेचे आहे. सध्याचा काळ भ्रष्ट आहे, परंतु आपण भ्रष्ट काळाचे प्रतिनिधी असायला नको. साहित्यिकांनी स्वतःचे वेगळे घरोबे करू नयेत. जात – धर्म – वंश – भेदापलीकडे माणुसकीचा असलेला देखणा गाव साहित्यिकाने शोधून काढावा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेली हक्काची जाणीव, समाजाचे सत्यशोधन यांची पताका खांद्यावर घेऊन साहित्यिकाने आपली वाट चोखंदळावी. कोणत्याच राजकीय रंगाचा झेंडा हाती न घेता साहित्यिकाने तटस्थपणे चालत राहावे. साहित्यिकाकडे विवेकी बुद्धी भाव असेल तर धाक – धमकीचं आक्रमण रहात नाही तर ज्ञानवंतांच्या सशक्त विचारांवर तरणारे लेखन मग जन्माला येते.

मी माणसावर प्रचंड विश्वास ठेवते .मराठीतील सगळ्या प्रवाहांचं जोरदार स्वागत करते. माणसाच्या जगण्याला….लढण्याला एक प्रयोजन असतं. तसं त्याच्या लिहिण्यालाही प्रयोजन असावं अशी माझी धारणा आहे. साहित्यिकाची त्याची म्हणून स्वतःची एक भूमिका असावी त्या भूमिकेशी त्याने आयुष्यभर प्रामाणिक राहावे. साहित्याने लढणाऱ्याला धीर द्यायला हवा. अश्रूंचा अर्थ समजून घ्यायला हवा. लिहित्या मनगटात बंडाची वीज सळसळायला हवी. स्वातंत्र्य – समता  – बंधुता या मूल्यांवर अधिष्ठित असणारे गाव त्याने उभं करायला हवं. साहित्यिकाने डोळ्यातली स्वप्ने समजून घेतली पाहिजेत. श्रमाला प्रतिष्ठा देणारे लेखन केले पाहिजे. स्वतःला मुख्य समजणाऱ्या प्रवाहाने नव्या – नवेली अंकुरांना आपल्या काळजात स्थान दिलं पाहिजे. राबणाऱ्या पावलांच्या कष्टाला आलेली सुंदर फुलं साहित्यातून टिपली गेली पाहिजेत. आपल्या मुक्कामाचं ठिकाण कोणतं हे प्रत्येक साहित्यिकाने समजून घेतले पाहिजे आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी त्याने थांबले पाहिजे. इतके बोलून मी पूर्णविराम घेते .

आपण मला आजच्या संमेलनाचे अध्यक्षपद दिलेत याबद्दल आपणा सर्वांचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद…!!!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

देहूचे शिळा मंदिर भक्तीच्या शक्तीचे केंद्र – नरेंद्र मोदी

Navratri Biodiversity Theme : निळ्या रंगातील जैवविविधतेची छटा…

आगामी अंतरिम अंदाजपत्रकाकडून असलेल्या अपेक्षां

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading