September 12, 2025
Need To Educate Civil Engineers Properly in Corona Period
Home » स्थापत्य अभियंत्याचे पाऊल पडते पुढे…
काय चाललयं अवतीभवती

स्थापत्य अभियंत्याचे पाऊल पडते पुढे…

यंत्राच्या व स्वतःच्या तांत्रिक कौशल्याच्या मदतीने सर्वत्र नवनवीन प्रकल्प साकार करून सामाजिक व मानसिक जीवन सुखसमृद्ध करणारा माणूस म्हणजे “अभियंता“. अभिनेता ज्याप्रमाणे स्वतःच्या अभिनय कौशल्याच्या आधारे अत्यंत सचोटीने नाटक व सिनेमा रंगवतो आणि आपल्या सर्वांचे मनसोक्त मनोरंजन करतो, अगदी याच पद्धतीने अभियंते सुद्धा आपले तांत्रिक कौशल्य प्राणपणाला लाऊन अत्यंत बिकट परिस्थितीतसुद्धा उपयुक्त असे प्रकल्प साकार करतो.

महादेव ई. पंडीत

स्थापत्य अभियंता
मोबाईल – 9820029646.

`​डिसेंबर 2019 ला चीनमध्ये नोव्हेल कोरोनाचा विषाणू जन्माला आला पण त्याचे अनेक पडसाद मात्र आज भारत देशात अतिशय भयंकर प्रमाणात दिसत आहेत. 22 मार्च 2020 पासून ते आजपर्यंत म्हणजे वर्षपुर्तीनंतर सुद्धा जनता जनार्दन कोरोना ह्या भयानक चक्रव्युहातून बाहेर पडलेले नाहीत त्याचप्रमाणे त्यावर कोणताच ठोस असा रामबाण इलाज सापडलेला नाही. मिशन बिगीणमध्ये अनेक बाबी हळूहळू मार्गस्थ होत आहेत, पण शैक्षणिक व्यवहार चालू करण्यास कोणासही शत प्रतिशत धाडस तसेच प्रयत्न होत नाहीत. अनेक ऑनलाईन व्यवहारासारखे शिक्षण सुद्धा ऑनलाईन सुरू आहे.

40 टक्के अभ्यासक्रम डोक्यावरून

अतिउच्च शिक्षण ऑनलाईन चालू शकते परंतु स्थापत्य अभियांत्रिकीसारखे अनेक व्यावसायिक कोर्सेस ऑनलाईन सुरू ठेवणे तितकेसे पचनी पडत नाही. कोणत्याही शाखेची अभियांत्रिकी पदवी घेण्यासाठी एकंदरीत आठ सत्रे वापरली जातात. ही सुद्धा आजच्या नवनवीन तंत्रज्ञानासाठी अपुरीच पडतात. पण गेल्या मार्चपासून आजपर्यंत सर्व देशात कोरोना धुमाकुळ घालत असल्यामुळे जवळजवळ विद्यार्थ्यांची तीन महत्वाची सत्रे ह्या कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये वायाच गेली आहेत. संपूर्ण आठ सत्रामधील 3 सत्रे ऑनलाईन म्हणजेच जवळ जवळ 40 टक्के अभ्यासक्रम डोक्यावरून गेलेला आहे, व्यावसायिक शिक्षण सध्याच्या लॉकडाऊन काळामध्ये कोणत्या प्रकारे घेतले तर आजच्या विद्यार्थ्यांना त्याचा पूर्णपणे उपयोग होईल यासाठी ना सरकार धावते आहे, ना महाविद्यालये, ना प्राध्यापक आणि ना माजी विद्यार्थी.​

अभियंता अन् अभिनेता…

यंत्राच्या व स्वतःच्या तांत्रिक कौशल्याच्या मदतीने सर्वत्र नवनवीन प्रकल्प साकार करून सामाजिक व मानसिक जीवन सुखसमृद्ध करणारा माणूस म्हणजे “अभियंता“. अभिनेता ज्याप्रमाणे स्वतःच्या अभिनय कौशल्याच्या आधारे अत्यंत सचोटीने नाटक व सिनेमा रंगवतो आणि आपल्या सर्वांचे मनसोक्त मनोरंजन करतो, अगदी याच पद्धतीने अभियंते सुद्धा आपले तांत्रिक कौशल्य प्राणपणाला लाऊन अत्यंत बिकट परिस्थितीतसुद्धा उपयुक्त असे प्रकल्प साकार करतो. अभिनेता या शब्दातील “ने“ ची जागा यांत्रिकीमधील “यं“ ह्या अक्षराने घेतलेली आहे आणि बांधकाम क्षेत्रातील अभिनेत्याचा “अभियंता“ असा गौरवपुर्वक शब्द जन्माला आला आहे, याचे प्रत्येक अभियंत्याने भान ठेवले पाहिजेत.

अभियंते योद्धयासारखे लढले

गेले वर्षभर कोरोना महामारीत अनेक अभियंत्यांनी अहोरात्र मेहनत करून सर्वच ठिकाणी सुसज्ज कोव्हीड हॉस्पीटले उभारली आणि मानवी आरोग्य सुरक्षित करण्यात मोलाचा हातभार लावला. अगदी रेकॉर्ड टाईममध्ये बांद्रा, ठाणे, पुणे, सातारा व मुंबई या विविध ठिकाणी सुसज्ज व सर्व सोयी सुविधांयुक्त अशी रूग्णालये उभारली आणि त्यामुळेच बऱ्याच कोव्हीड रूग्णांची परवड थांबली. खरेतर सर्वच अभियंते कोव्हीडच्या महामारीत अगदी योद्धयासारखे रात्रंदिवस लढले आहेत आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने सर्वच शासकीय अभियंते व निमशासकीय अभियंते गुण गौरवास पात्र आहेत, पण बहुतांशी त्यांच्या वाट्याला गौरवाऐेवजी दुःखच येते.​

नव्या अभियंत्यामध्ये मरगळ

कोव्हीडमुळे मानवी जीवनात एक प्रकारची मरगळ आलेली आहे अगदी तशाच प्रकारची काहीशी शिथिलता आपल्या शिकाऊ अभियंत्यामध्ये आलेली आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या तसेच मधल्या सत्रात शिकत असलेल्या अभियंत्याना व शेवटची तीन सत्रे संपवून नवा कोरा अभियंता होणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या गुरूंचा व सहकाऱ्यांचा प्रत्यक्ष सहवासच लाभलेला नाही. त्याचप्रमाणे त्यांना इंटरनशिप सुद्धा करता आलेली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बँकेत विविध कौशल्यांचे फिक्स डिपाॅजिटच जमा झालेल्या नाहीत. मग ह्या विविध कौशल्यांचे फिक्स डिपाॅजिट कशा मिळवायच्या याचा विचार महाविद्यालयांनी तसेच प्राध्यापकांनी, संस्थाचालकांनी, काही सामाजिक संस्था व माझी विद्यार्थ्यांनी सुद्धा केला पाहिजेत.​

कैलाशजी खेर यांचा आदर्श घ्यायला हवा

फेब्रुवारी 2021 मध्ये कोव्हीड पेशंट कमी होत होते त्यामुळे कदाचित एप्रिलमध्ये व्यावसायिक महाविद्यालये चालु होण्याची धुसर शक्यता होती, पण आज एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा कोव्हीड पेशंटच्या संख्येमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे आता जूनपर्यंत तरी व्यावसायिक महाविद्यालये सुरू होण्याची लक्षणे दिसत नाहीत. मग अश्यावेळी शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी निष्णांत स्थापत्य अभियंत्यांनी सुप्रसिद्ध संगीतकार कैलाशजी खेर यांच्याप्रमाणे कार्य केले पाहिजेत. श्री. कैलाशजी आपल्या प्रत्येक वाढदिवसाला नवीन कलावंत शोधण्यासाठी एक अनोखा संगीताचा व गाण्यांचा कार्यक्रम राबवितात व त्यातून गुणवंत कलावंत शोधून त्यांच्या पुढील व्यावसायिक जीवनाचा “श्रीगणेशा“ करून देतात. मग हाच पॅटर्न आपल्या सुप्रसिद्ध स्थापत्य अभियंत्यांनी केला तर आपल्या स्थापत्य क्षेत्रात खूपच प्रगती होईल. ​

प्रत्यक्ष प्रकल्प भेटींची गरज

सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, एमएसआरडीसी, मेट्रोरेल रोडस् आणि हायवे, पर्यावरण इंजिनिअरिंग ( ENVIRONMENT ENGINEERING ), इमारत बांधकाम विभाग, मलःनिस्सारण विभाग, नदीवरचे पुल ( RIVER BRIDGES ), फ्लायओेव्हर असे अनेक प्रकल्प कोरोना महामारीत सुद्धा प्रगती पथावर आहेत. प्रकल्प चालू आहेत मग व्यावसायिक महाविद्यालये का बंद ? हा प्रश्न संस्था चालकांना लगेच पडला पाहिजेत. बरीच स्थापत्य अभियांत्रिकी महाविद्यालये शहरालगत असतात त्यामुळे ऑनलॉईन शिक्षणासोबतच 10 ते 15 मुलांच्या बॅचेसमध्ये ह्या कोव्हीडच्या कालावधीमध्ये प्रत्यक्ष प्रकल्प अनुभव घेण्यासाठी महाविद्यालयांनी, प्राध्यापकांनी व संस्थाचालकांनी प्रयत्न केले पाहिजेत पण सध्या तरी तसे काही होताना दिसत नाही.

प्रकल्प स्थळावर मार्गदर्शन

आज स्थानिक दहा – दहा विद्यार्थी जमवून प्रकल्प स्थळावर शैक्षणीक सहलींचे आयोजन केले पाहिजेत आणि असे कार्यक्रम करणे अत्यंत आवश्यक आहे.​ प्रत्येक अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच प्राध्यापकांनी स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या आर्कीटेक्ट, आरसीसी सल्लागार, शासकीय अभियंते, महापालिका अभियंते, स्थानिक व्ह्यल्युअर, बिल्डर्स तसेच कंत्राटदार इत्यादी व्यावसायिक निष्णांत लोकांची यादी बनवून त्यांच्याशी व्यावसायिक देवाण-घेवाणीचे करार बनविले पाहिजेत आणि त्यांच्याकडून विद्यार्थ्यांनी छोट्या – छोट्या बॅचेसमध्ये मार्गदर्शन घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

शिकाऊ अभियंत्यांना शिकण्याची संधी

महाविद्यालयीन लेव्हलला प्रकल्प प्रशिक्षण व्यवस्थापन समिती स्थापन करून विद्यार्थ्यांना विविध कौशल्य आत्मसात करता येतील.​अनेक प्रगतशील मेट्रोसीटीमध्ये पंतप्रधान आवास योजनेचे महाकाय प्रकल्प सुरू आहेत. नवी मुंबईमध्ये तळोजा नोडमध्ये नव्वद हजार घरांचे सीडकोचे काम सध्या प्रगती पथावर आहे. ह्या महाकाय प्रकल्पावर मे. एल अँड टी, मे. बी.जी. शिर्के अॅन्ड कंपनी, मे. कपॅसिटाय व मे. शहापूरजी पालनजी सारख्या देशातील अद्यावत व अग्रगण्य कंपन्या बांधकामाचे काम करत आहेत. ह्या प्रकल्पाचे काम कमीत कमी 3 वर्षे तरी चालेल. मग अशा प्रकल्प स्थळावर शिकाऊ अभियंत्यांना शिकण्याची संधी देऊन त्यांचे पुस्तकीय ज्ञान परिपक्व केले पाहिजेत आणि यासाठी संस्था चालकांनी व प्रकल्प स्थळावर कार्य करणाऱ्या अभियंत्यांनी पुढाकार घेतला पाहिजेत. पंतप्रधान आवास योजनेसारख्या प्रकल्पामधून इमारत बांधकामाचे तसेच प्रकल्प स्थळावरील संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरचे संपूर्ण ज्ञान नक्कीच शिकाऊ अभियंत्यांना मिळेल व पुढील व्यावसायिक जीवनात खूपच उपयोगी पडेल.

समृद्धी महामार्गाचा विचार व्हावा

मुंबई व नवी मुंबई परिसरातील सर्व स्थापत्य शिकाऊ अभियंत्यांनी तसेच महाविद्यालयांनी यासाठी सिडकोसोबत किंवा कंपनीसोबत संधाण बांधले पाहिजेत.​ सध्या नागपूर – मुंबईला जोडणारा 700 किमीचा देशातील सर्वात मोठा व अद्यावत तंत्रज्ञानावर आधारीत असलेला समृद्धी महामार्ग प्रकल्प खूपच प्रगती पथावर आहे. ह्या प्रकल्पात एकंदरीत 16 पॅकेज आहेत. समृद्धी महामार्गाच्या प्रकल्प स्थळावर स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे सर्वच सत्रातील बरेच विषय नक्कीच मार्गदर्शक ठरतील. हा महामार्ग 16 जिल्ह्यातून पास होत आहे आणि ह्याचे नियोजन अगदी शहराच्या बाहेरून आहे आणि त्यामुळे अशा प्रकल्प स्थळांवर संसर्गाचे भितीदायक वातावरण नाही. समृद्घी सारख्या अद्यावत तंत्रज्ञान प्रकल्प स्थळावर 10-10 विद्यार्थ्यांनी गृपमध्ये शैक्षणिक शिबीर आयोजन करून अद्यावत तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजेत. मुंबई व पुण्यामध्ये गगनचुंबी इमारतीचे काम चालू आहे. गगनचुंबी इमारत बांधत असणाऱ्या विकासकांशी व्यवस्थित समझोता करार करून विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये शिकत असतानाच अत्यंत उच्च प्रतीचे कौशल्य आत्मसात करता येईल, पण सध्या असे काही होताना दिसत नाही.​ स्थापत्य अभियंते हे अनेक प्रतिकुल प्रसंगावर मात करण्यात वाकबगार असतात.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श

खरेतर प्रत्येक स्थापत्य अभियंत्यांने आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेऊन शिक्षण घेतले पाहिजेत. 300 ते 350 वर्षापूर्वी कोणत्याही सोयी-सुविधा नसताना छत्रपतींनी अनेक दुर्गम भागात, खूपच उंचच उंच डोंगरावर सर्व सोयी सुविधांनी युक्त असे गड किल्ले बांधले तसेच त्या गडकिल्ल्याची डागडुजी सुद्धा चोख पार पाडत असत. महाराजांना कोणीही स्थापत्य अभियांत्रिकेचे शिक्षण दिलेले नव्हते आणि त्याचा कोठेही उल्लेख सुद्धा नाही. महाराज एक उत्कृष्ट, निष्णांत व दर्जेदार स्थापत्य अभियंता होते. त्याकाळात संगणक नसताना सुद्धा स्वतःच्या नैसर्गिक तांत्रिक कौशल्याच्या आधारे गडकिल्यांच्या अगदी उंच कड्यावर भल्या मोठाल्या दगडी भिंती व किल्ल्यांच्या तटबंदी बांधलेल्या आहेत आणि तोफांचा भडीमार अंगावर सोसूनसुद्धा गडाच्या तटबंदी आजसुद्धा सुस्थितीत आहेत. यावरूनच महाराजांच्या तांत्रीक कौशल्याची उंची लक्षात येईल.​

उपाय, पर्याय शोधण्याची गरज

पाटबंधारे विभागातील स्थापत्य अभियंते तर अगदी अति दुर्गम भागात जाऊन मोठ-मोठाली धरणे बांधतात. शहरातील झोपडपट्टी दादांना भिडून अनेक सरकारी भुखंड अतिक्रमणातून मुक्त करून म्हाडा व महानगरपालिकेचे अभियंते त्याठिकाणी उंचेपुरे टॉवर बांधतात. सर्व सरकारी तसेच खाजगी प्रकल्प कोव्हीडच्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा प्रगती पथावर आहेत. सर्व बांधकाम विभाग सुरळीत चालू असतांना फक्त शिकाऊ अभियंत्यानीच तसेच त्यांना शिकविणाऱ्या प्राध्यापकांनी इतके घाबरण्याचे कारणच नाही. जुन्या जाणत्या स्थापत्य अभियंत्यांनी भविष्यात येणाऱ्या महामारीत कश्याप्रकारे अध्ययनाचे काम करायचे याचे नियोजन आताच केले पाहिजेत आणि त्यावर उपाय शोधले पाहिजेत.​ मानवी जीवनातील प्रत्येक अडीअडचणीला स्थापत्य अभियंत्याकडे अनेक सुविध्य पर्याय उपलब्ध असतात आणि ते नेहमीच असले पाहिजेत.

ज्ञान हे पैशासारखे साठवणूक करण्याची बाब नाही. ज्ञान दुसऱ्याला दिल्यामुळे प्रत्येकाच्या ज्ञानात नक्कीच बक्कळ भर पडेल. श्री. विंदाच्या `देणाऱ्याने देत जावे` या कवितेप्रमाणे प्रत्येक अभियंत्याने आपले पूर्ण व्यावसायिक जीवन व्यतित करणे अत्यंत गरजेचे आहे. ​“देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे“.

महादेव ई. पंडीत, स्थापत्य अभियंता

अभियांत्रिकी ज्ञान अपडेट, अद्यावत करण्याची गरज

अभिनेता सिनेमामध्ये विघ्नसंतुष्ठ खलनायकाला पद्धतशीरपणे गनिमी कावा करून संपवतो आणि समाजाला गुण्या गोविंदाने जीवन जगण्यास मदत करतो व जनतेच्या गळ्यातील ताईत म्हणजेच हिरो बनतो अगदी त्याच धर्तीवर स्थापत्य अभियंत्याने सुद्धा ह्या महामारीवर मात करून दर्जेदार शिक्षण कसे घेता येईल याचा सर्वकष विचार केला पाहिजेत आणि आपला कार्यक्रम राबविला पाहिजे.​ शिकाऊ तसेच सध्या स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या सर्व अभियंत्यानी मला सर्व शिक्षण प्राध्यापकांकडूनच मिळेल अशी आभासी वृत्ती न ठेवता स्वतःच्या भुखेने त्या त्या क्षेत्रातील सल्लागारांकडे त्याचप्रमाणे माजी अभियंत्याकडे धाव घेतली पाहिजेत आणि आपले कौशल्य व अभियांत्रिकी ज्ञान अपडेट तसेच अद्यावत केले पाहिजेत.​

सोशल मिडियाच्या वापराची गरज

सध्या कार्यरत असणाऱ्या सर्व अभियंत्यांनी आपले सर्व अनुभव तसेच विविध प्रकल्पांचे व्हीडीओे तयार करून सोशल मिडीयावर प्रकाशित केले पाहिजेत. काही प्रकल्प खूपच अद्यावत व चॅलेंजींग तसेच अडव्हेंचरस असतात. अशा प्रकल्पांचे व्हीडीओे नवीन येणाऱ्या अभियंत्यांसाठी खूपच उपयोगी पडतील. सध्या अभियंते फक्त आपला बायोडाटा अपडेट करत असतात, त्यापेक्षा प्रत्येक अभियंत्याने आपल्या व्यावसायिक जीवनात केलेल्या प्रकल्पांचे चित्रासहीत टाचण करून Facebook किंवा Whatsaap च्या माध्यमातून सोशल मिडीयावर प्रकाशित केले तर नव्या पिढीच्या अभियंत्यांना खूपच उपयुक्त डेटा मिळेल. ​

जुन्यांनी नव्यांना मार्गदर्शन करावे

दूरचित्रवाणीवर प्रदर्शित सारेगामप सिझन जुलै 2008 ते फेब्रुवारी 2009 विजेते लिटल चँप्स आता सारेगामप नवीन सिझनमध्ये परिक्षक व मार्गदर्शकाचे काम करणार आहेत. अगदी याच धर्तीवर उत्कृष्ठ, दर्जेदार, निष्णात आजी व माजी स्थापत्य अभियंत्यांनी त्याचप्रमाणे विविध स्थापत्य सल्लागारांनी जरी कमीत कमी 10-10 कनिष्ठ व शिकाऊ अभियंत्यांना आपल्या आवडत्या क्षेत्राचे तसेच विषयाचे प्रशिक्षण व मागदर्शन केले तर स्थापत्य क्षेत्रात खूपच मोठी क्रांती घडेल आणि याचा सरळ फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच मिळेल. मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजा सारखे निष्णांत, तरबेज, दर्जेदार, अतिहुषार दिग्गज स्थापत्य अभियंते, स्थापत्य सल्लागार, सरकारी अधिकारी तसेच आदर्श विद्यार्थी आपल्याकडे आहेत पण त्या सर्वांनी आपल्या नव्या को-या स्थापत्य अभियंत्यांना तसेच स्थापत्य महाविद्यालयात सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना जमेल तसे प्रशिक्षण व मार्गदर्शन केले पाहिजेत.

स्थापत्य अभियंत्याचे ऐक्य गरजेचे

आता चालू असलेल्या कोरोना लॉकडाऊन मध्ये तसेच भविष्यात उद्भवणा-या कठीण प्रसंगामध्ये जुन्या जाणत्या दिग्ग्जांचे मार्गदर्शन नव्या कोऱ्या नवीन अभियंत्यांच्या पिढीला नक्कीच उपयुक्त ठरेल. मनोरंजन क्षेत्रातील कलावंत जसे एकाच मंचावर येऊन नवीन पिढीला प्रोत्साहीत करतात तसेच राज्यातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील, गावातील स्थापत्य अभियंत्यांनी एकाच व्यासपिठावर येण अपेक्षित आहे आणि हेच आजच्या घडीला अत्यावश्यक आहे. स्थापत्य अभियंत्याच्या एकत्र येण्यामुळे आपले स्थापत्य क्षेत्र नक्कीच फिनीक्स पक्षासारखी भरारी घेईल आणि स्थापत्य अभियांत्रिकी विभाग समाजात नक्कीच मानाचे उच्च स्थान प्राप्त करेल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading