डॉक्टर व वकील नकारात्मक स्थितीतून सकारात्मक परिस्थिती निर्माण करतात पण माझे स्थापत्य अभियंते नेहमीच सकारात्मक स्थितीला अति सकारात्मक म्हणजे सुपर पॉझीटीव्ह परिस्थिती निर्माणाकडे नेण्याचा चंग बांधत असतात. मग सांगा पाहू स्थापत्य अभियंता हा प्रगतीचा केंद्रबिंदू आहे की नाही?
स्थापत्य अभियंता,
– महादेव ई. पंडीत
E-Mail- mip@pioneerengineers.co.in
9820029646.
स्थापत्य अभियांत्रिकी ही सर्वात जुनी व प्राचिन अभियांत्रिकी शाखा आहे. यामध्ये नागरी आयोजन, बांधकाम आणि बांधलेल्या इमारतींचे अनुरक्षण व इतर सामाजिक प्राधिकरण संबंधित क्षेत्रे येतात. पृथ्वी, जल किंवा संस्कृती आणि त्यांच्या क्रिया यांच्या सबंधित असल्यानेच इंग्रजीत याला सिव्हील
संबोधले जाते. आज स्थापत्य क्षेत्रात पाणी पुरवठा, मलनिःस्सारण, पूर व्यवस्थापन आणि वाहतूक या विभागांचाही अंतर्भाव होतो. स्थापत्य शास्त्र आपल्या विश्वाला, राहत्या जागेला व परिसराला अधिक सुखकर तसेच आल्हाददायक बनविण्यास मदत करते. आजच्या प्रगतशील काळात अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी खरोखरच स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्राची अत्यंत निकडीची गरज भासते आणि म्हणूनच स्थापत्य अभियांत्रिकी शाखा प्रत्येक मानवाचा जिवलग मित्रच आहे असे संबोधणे सार्थ ठरेल.
साधारणपणे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदूलकराच्या हस्ते रायगड किल्ला राजधानीसाठी बांधून घेतला. पण कोठेही स्वतःचे नाव न कोरता फक्त हिरोजी इंदूलकरांचे नाव त्यांच्या मागणीप्रमाणे जगदीश्वराच्या पायरीवर कोरले यावरून छत्रपतीची मानपानाची पद्धत आपल्या लक्षात येईल. पण आज कोणत्याही प्रकल्पस्थळी कोणत्याही स्थापत्य अभियंत्याचे तसेच प्रकल्प उभा करणाऱ्या व्यावसायिकाचे अथवा कुशल कारागीराचे नाव आपल्या पाहण्यात आलेले नाही.
महादेव ई पंडीत
बांधकाम अभियंत्याचे काय काम असते ?
बांधकाम अभियंत्यास काम करण्यास आभाळाएवढे विस्तृत कार्यक्षेत्र आहे. स्थापत्य अभियंत्यास प्रत्येक वेळी चाचणी परीक्षणावरूनच प्रत्यक्ष प्रकल्पाचे नियोजन करण्यासाठी त्याला लॉजीकल विचाराअंती अंतिम निष्कर्ष काढावा लागतो. बांधकाम अभियंत्यास संगणक सॉफ्टवेअर वापरून जलीय प्रणाली व उभारण्या यांचे नियमनानुसार आरेखन करावे लागते. त्याचप्रमाणे सर्व बांधकामे योग्य पद्धतीने व बरोबर होतात की नाही हे बघणे बांधकाम अभियंत्याचेच काम असते. सुरक्षेसोबतच त्यांना बांधकाम क्षेत्र हे स्वच्छ व कोणत्याही अडथळ्याविना राहील याची काटेकोर काळजी घ्यावी लागते. अनुभवी तसेच वरिष्ठ बांधकाम अभियंते प्रकल्पाचे योग्य त-हेने नियोजन होते आहे अथवा नाही हे पण बघतात. प्रकल्पाचा नियोजित खर्च वाढू नये व सर्व नियोजित कामे अंदाजपत्रकाच्या मर्यादेतच राहतील याकडे सर्वच अभियंते लक्ष ठेवतात. बांधकामास आवश्यक असणारी माहिती पुरविणे, अश्या माहितीच्याकडे सर्वाचे लक्ष वेधणे, काही बदल झाल्यास त्याचे आदेश निर्गमित करणे, साहित्य पुरवठ्याचे तसेच प्रकल्पावरील कुशल व अकुशल कामगारांचे देयक देणे इत्यादी कामे बांधकाम अभियंत्याच्या दैनंदिन व्यवहारात असतात आणि ती काळजीपूर्वक पार पाडावी लागतात.
बांधकाम अभियंत्यात कोणते गुण असायला हवेत ?
बांधकाम अभियंत्यास गणित, विज्ञान त्याचप्रमाणे निसर्गाचे पुरेपूर व सखोल ज्ञान असते. याव्यतिरिक्त स्थापत्य अभियंत्याच्या अंगी अनेक योग्यता तसेच क्षमता असतात. प्रत्येक बाबीचे चिंतन, अडथळ्यावर व समस्यावर मात करणे, सल्लागाराचे म्हणणे नीट ऐेकून घेणे, प्रत्येक गोष्ट शिकणे व त्याचा अभ्यास, बारीक देखरेख तसेच निर्णय क्षमता इत्यादी महत्वाचे गुण स्थापत्य अभियंत्याच्या अंगी असणे अत्यंत गरजेचे आहे. पुढे येणा-या प्रत्येक अडथळ्यावर सर्वकष विचार करणे, इतर सहका-याच्या त्याविषयीच्या कल्पना निट ऐेकणे, त्याचा अभ्यास करून प्रकल्प सुरू होण्याआधी त्याबद्दलची संपूर्ण माहिती प्रकल्पावरील सर्व सहका-यांना देणे ही अत्यंत गरजेची बाब आहे. बांधकाम अभियंत्याला प्रकल्प निर्माणा दरम्यान गणित व विज्ञानातील त्यांचे ज्ञान वापरून बांधकाम प्रकल्पात येणारे अडथळे व त्यावरील समस्या सोडवाव्याच लागतात. बांधकाम अभियंत्यांनी प्रकल्पाच्या कामावरील कामगार व उपकरणे/ यंत्रे यांची देखभाल व नियंत्रण ठेवणे अत्यंत जरूरीचे आहे. नियोजित प्रकल्प निर्धारित वेळेत कसा पूर्ण हाईल् व त्याची योग्य ती गुणवत्ता कशी राखली जाईल हे पण बघावयास लागते. बांधकामा दरम्यान काही अचानक समस्या उभ्या राहिल्या तर त्यांची उकल बांधकाम अभियत्यांनाच त्वरीत करावी लागते.
बांधकाम अभियंत्याच्या अंगी असंख्य क्षमता
बांधकाम अभियंत्याच्या अंगी असंख्य क्षमता असतात. स्थापत्य कामात तृटी आढळल्यास त्याबद्दल कारणे देणे, सहकाऱ्यासोबत सूचनांचे आदानप्रदान करणे, प्रकल्पाची बदलती परिस्थिती जाणून घेणे, समस्या उद्भवण्यापूर्वीच अंदाज येणे अथवा घेणे, तोंडी, लेखी व आरेखित सूचना समजणे, आकडेवारीचे संच लावणे, स्पष्ट व स्वच्छ समजेल असे बोलणे, चतुर्थ परिमितीचे काळ क्षेत्र यांचे आकलन करू शकणे व वास्तविक आरेखन व बांधकाम पद्धतीतील विविध प्रकारांचे ज्ञान असणे इत्यादी ब-याच क्षमता स्थापत्य अभियंता स्वतःच्या अंगी जोपासत असतो.आभाळा एवढ्या विस्तृत क्षमता तसेच योग्यता असताना देखील आज स्थापत्य अभियंत्याचे त्याचप्रमाणे स्थापत्य क्षेत्राचे नाव बाजारात तळागाळाला गेल्यासारखे वाटते आणि हे का घडते? याचे चिंतन प्रत्येक स्थापत्य अभियंत्याने केले पाहिजेत. स्थापत्य अभियंता ही पदवी किंवा पदविका संपादन केल्यानंतर त्याचे बाजारातील स्थान व मुल्य अतिशय उच्च दर्जाचे असणे आवश्यक आहे पण आज ते स्थान व मुल्य अबाधित राहिलेले नाही. डॉक्टर फक्त वैयक्तिक मानवी जीवन सुखी व निरोगी राहण्याची काळजी घेतो पण आपले स्थापत्य अभियंते प्रत्येक मानवाचे संपूर्ण जीवन सुखकर, संस्कारी, आनंदमय, सुरक्षित त्याचप्रमाणे निरोगी रहाण्याची अगदी तंतोतंत काळजी घेत असतात आणि म्हणूनच आज समाजामध्ये डॉक्टरला जेवढा मान सन्मान तसेच आशिर्वाद मिळतो तेवढाच मान सन्मान एव्हाणा त्यापेक्षाही जास्त मानसन्मान स्थापत्य अभियंत्याला मिळाला पाहिजेत पण आज स्थापत्य अभियंत्याला डॉक्टर इतके मानाचे स्थान मिळालेले नाही. स्थापत्य अभियंता नेहमी आपले तन, मन व धन या त्रीसुत्रीचा अचुक सदूपयोग करूनच प्रत्येक प्रकल्प विहीत वेळेतच यशस्वी करण्याचा अटोकाट प्रयत्न करत असतो.
स्थापत्य अभियंत्याचे स्थान नेहमी उच्च अन् सकारात्मक
डॉक्टर, वकील व स्थापत्य अभियंता या तिन्ही जगतात खरोखरच स्थापत्य अभियंता हा उच्च स्थानावर राहतो. पृथ्वीतलावर रोगराई व अत्यंत भयानक रोगांची साथ अवतरल्यावर डॉक्टरचे स्थान उच्च होते. तसेच पृथ्वीतलावर भ्रष्टाचार व गुन्हेगारी वाढल्यानंतर वकीलाचे स्थान उच्च होते म्हणजेच काय नकारात्मक परिस्थितीत डॉक्टर व वकीलाचे स्थान तसेच मुल्य वाढलेले निदर्शनास येते पण आज स्थापत्य अभियंत्याचे स्थान तसेच मुल्य प्रत्येक माणसाच्या आणि संपूर्ण जगताच्या उत्कर्षाबरोबर वाढत जाते. स्थापत्य अभियंत्याचे स्थान नेहमी उच्च व सकारात्मक असते व ते स्थान नेहमी वाढीचे संकेत दर्शविते. डॉक्टर व वकील नकारात्मक स्थितीतून सकारात्मक परिस्थिती निर्माण करतात पण माझे स्थापत्य अभियंते नेहमीच सकारात्मक स्थितीला अति सकारात्मक म्हणजे सुपर पॉझीटीव्ह परिस्थिती निर्माणाकडे नेण्याचा चंग बांधत असतात. मग सांगा पाहू स्थापत्य अभियंता हा प्रगतीचा केंद्रबिंदू आहे की नाही? हो, स्थापत्य अभियंता खरोखरच प्रगतीचा केंद्रबिंदू आहे.
कोण श्रेष्ठ? डॉक्टर का वकील का स्थापत्य अभियंता?
डॉक्टर समोर त्यांचा पेशंट बोलु शकतो त्याचप्रमाणे वकीलासमोर त्याचा अशील बोलू शकतो. त्याचप्रमाणे डॉक्टर व वकील हे दोघे निष्णांत, पेशंट व अशीलांच्या हालचालीच्या माध्यमातून विचारपूर्वक निर्णय घेऊन त्यांच्यावरील संकटातून त्यांना मुक्त करतात. पण स्थापत्य अभियंत्यासमोर अबोल, जीव नसणारी बांधकामे उभी असतात त्याचप्रमाणे स्थापत्य अभियंता ब-याच प्रकल्पाचे आरेखन निर्जिव कागदावर करतो पण तोच कागद प्रत्येकाचे लक्ष वेधत असतो आणि हि किमया फक्त स्थापत्य अभियंत्याच्या हातात आहे. स्थापत्य अभियंता निर्जिव रचनेसोबत बोलतो, चालतो त्यांच्या व्यथा समजावून घेतो आणि त्याला पुढे काय उपायांची गरज आहे त्याचे आराखडे बांधतो आणि कित्येक जीवसृष्टी सुरक्षित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो मग सांगा पाहू कोण श्रेष्ठ? डॉक्टर का वकील का स्थापत्य अभियंता? याचे अचुक उत्तर आहे- स्थापत्य अभियंता.
प्रत्येक स्थापत्य अभियंत्याने हा शोध घ्यायला हवा ?
धरण बांधकामामुळे सर्वच प्राणीमात्रांना प्रत्येक ऋतुत पाणी मिळते, उत्तुंग इमारतीमुळे छोट्या जागेत अनेक कुटुंबे गुण्यागो॑विंदाने एकत्र आनंदी व सुखाने वास्तव्य करतात, रस्त्यामुळे दळणवळणाबरोबर प्रत्येकास रोजगार मिळतो, अत्याधुनीक बगीच्यामुळे व तलावामुळे आबालवृद्धाना रोजच्या रामरगाड्यातून विरंगुळा मिळतो, मोठाल्या मॉलमुळे अख्खे कुटुंब आनंदाने बाजारहाट तसेच मनोरंजन व खान पान करू शकते. पाटबंधारे व कालव्याच्या जाळ्यामुळे आपले अन्न, वस्त्र व निवारा निर्माण होतो, साकव व पुलांमुळे गावोगावच्या लोकांना दळणवळणाच्या सुविधा मिळतात. तलाव क्षेत्रामुळे मासे संवर्धन व नौका विहार होऊ लागले, सिव्हेज ट्रिटमेंट प्लांटमुळे लोकांचे जीवन निरोगी व स्वच्छ व सुखकर झाले, स्थापत्य शास्त्रामुळेच मोठाली हॉस्पीटले व न्यायालये तयार होऊ लागली, दऱ्याखोऱ्यातून मार्गस्थ होणाऱ्या रेल्वेमुळे प्रवास जलद, आरामदायी व आल्हाददायक होऊ लागला. स्थापत्य शास्त्राची तसेच अभियंत्याची उपयुक्तता उठता बसता सिद्ध होऊन सुद्धा त्याला म्हणावे तितके यश समाजात संपादन करता आलेले नाही याचे नेमके कारण काय? याचा शोध प्रत्येक स्थापत्य अभियंत्याने घेतला पाहिजेत.
स्थापत्य अभियंत्यासमोर अनेक अडी-अडचणी
नविन नियोजीत प्रकल्पस्थळी अनेक प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध नसतात तरी पण दिवसरात्र स्थापत्य अभियंत्याला उभे राहूनच बांधकामाचे सुपरव्हीजन करावे लागते. अनेक अडी-अडचणीवर मात करत कुशल व अकुशल कारागीरांना घेऊनच प्रकल्प विहीत वेळेतच पूर्ण करावा लागतो. ब-याचवेळा स्थापत्य अभियंत्याला नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी दंगली, मारामारी तसेच दादा लोकांच्या रोषाला सामोर जावे लागते तरीसुद्धा न डगमगता स्थापत्य अभियंता वारंवार प्रयत्न करून तो नियोजित प्रकल्प पुर्णत्वाला घेऊन जातो. नियतीने प्रत्येक स्थापत्य अभियंत्याला त्याचे प्रायवेट जीवन न जगण्याचा शापच दिलेला आहे असे प्रत्येक ठिकाणी पहाण्यास मिळते. खरेतर स्थापत्य अभियंता नियोजनाचा महामेरू असताना सुद्धा त्याच्या मुलांच्या वाढदिवसादिवशी नेमके वरिष्ठ अधिकाऱ्याची प्रकल्प स्थळी अचानक भेट ठरते, कुटुंबांसोबत रात्रीच्या स्नेह भोजनाच्या वेळी स्लॅबचे कॉक्रीट वेळेवर उरकत नाही आणि त्याच्या स्वतःच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी अर्जंट मिटींगला बोलवणे आलेले असते. इतक्या पर्सनल आनंददायक व सुखकर घटना आपल्या पोटात दाबून ठेवून तो प्रामाणिकपणे प्रकल्पाचे कामकाज विहीत वेळेत आणि गुणनियंत्रणाच्या मापदंडानुसार नियमितरित्या पार पाडत असतो तरीसुद्धा आज समाज त्याच्याकडे वाकड्या नजरेने बघत असतो हे कोठेतरी थांबले पाहिजेत तरच स्थापत्य अभियंत्याच्या सर्व कार्यक्षमता प्रत्यक्ष प्रकल्पात रूजतील आणि त्याचा सरळ फायदा प्रत्येक नागरिकाला मिळेल.
स्थापत्य अभियंत्याकडे पाहण्याची वृत्ती बदलण्याची गरज
डॉक्टरशी किंवा वकीलांशी आपण मनमोकळणेपणाने आजारांविषयी तसेच कोणत्याही घटनात्मक विषयांविषयी साधे बोलु शकत सुद्धा नाही तरी सुद्धा त्याचे आजचे बाजारातील किंवा समाजातील स्थान बरेच उच्च असल्याचे जाणवते. डॉक्टर आपला फोन नंबर सुद्धा पेशंटला देत नाही. पण मित्रहो स्थापत्य शास्त्र या डॉक्टर व वकील पेशाच्या अगदी विरूद्ध दिशेला उभे आहे. समाजातील प्रत्येक नागरिक बांधकामा विषयीच्या सर्व शंखा कुशंखा स्थापत्य अभियंत्याकडून फोनवरच निरसण करून घेत असतो त्याचप्रमाणे आपल्या सोयीनुसार त्याला प्रकल्पस्थळी येण्याचे आमंत्रण देतो आणि स्वतः वेळेचे तसेच नियमांचे पालन सुद्धा करत नाही असे विदारक विषमतेचे चित्र आपल्याला स्थापत्य शास्त्रात पहायला मिळेल. तरी सुद्धा स्थापत्य अभियंता माणुसकीचा विस्तृत विचार करून आपला अमुल्य वेळ समाजासाठी खर्ची घालतो तरी सुद्धा त्याच्याकडे समाजाची बघण्याची वृत्ती अगदी आज सुद्धा बदललेली नाही.
स्थापत्य अभियंत्यांचे खच्चीकरण
स्थापत्य शास्त्रातील पदवीका, पदवी व डॉक्टरेट संपादन केल्यानंतर कोणी सरकारी नोकरीमध्ये प्रवेश करतो, तर कोणी खाजगी नोकरी पकडतो, बरेचजण स्थापत्य व्यवसाय करतात, तर कोणी स्थापत्य सल्लागार बनतात आणि काहीजण स्थापत्य शास्त्रीय शैक्षणिक क्षेत्रात शिकविण्याचे काम करतात. जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात आपणास स्थापत्य अभियंते पहाण्यास मिळतात, पण त्यांची म्हणावी तेवढी पत बाजारात दिसत नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांचे खच्चीकरण होत असते. स्थापत्य शास्त्राचा गंध नसलेले बरेच व्यावसायिक त्याचप्रमाणे बिल्डर बऱ्याच स्थापत्य अभियंत्याचे मानसिक तसेच आर्थिक नुकसान करतात आणि ही परिस्थिती सर्रास सर्व ठिकाणी पहाण्यास मिळते.
नाममात्र चुक किंवा तृटी आढळल्यास चौकशीचा ससेमिरा
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या बऱ्याच सल्लागारांचे मुल्य त्या शास्त्राचा काडीमात्र गंध नसणारा मालक ठरवत असतो त्याचप्रमाणे त्यांना तो मालक वेळेवर मानधन सुद्धा देत नाही, आणि याच्याही पुढे जाऊन स्थापत्य अभियंत्याच्या नाममात्र तृटीला सुद्धा अतिमहत्व देऊन त्या सल्लागाराचे शेवटचे देयक सुद्धा डुबवितो, इतकी निच पातळीची वागणूक सहन करत प्रत्येक स्थापत्य अभियंता स्वतःच्या बरोबरच समाजाच्या भवितव्याचा काळजीपूर्वक विचार करून आपली जबाबदारी चोख पार पाडत असतो. बरेच कार्पोरेट व्यावसायिक आगाऊ मोबदला सुद्धा प्रदान करत नाहीत तरी सुद्धा प्रत्येक स्थापत्य अभियंता आपले तन, मन, धन पणाला लाऊन आपल्याला मिळालेले काम प्रामाणिकपणे पार पाडतात त्याचप्रमाणे सर्व गुणनियंत्रणाचे मापदंड सुद्धा व्यवस्थित पार पाडत कामाची डेडलाईन सुद्धा क्रॉस करत नाहीत. काही स्थापत्य व्यावसायिक आपली राहती घरे तसेच घरचे दागदागिने गहान ठेऊन त्यावर कर्ज घेऊन निविदेमार्फत मिळालेली कामे सर्व प्रयत्नाअंती पूर्ण करून देतात तरी सुद्धा केलेल्या कामाची देयके प्राप्त करण्यासाठी सरकार दरबारी तसेच व्यावसायिकांच्या अलिशात चेंबर्स पर्यंत दररोज खेटे घालावे लागतात त्याचप्रमाणे नमस्कार चमत्कार इत्यादी बाबी कराव्या लागतात. इतका आटापिटा करून सुद्धा देयक वेळेवर प्राप्त होत नाही, आणि त्यामुळे काहीजणाच्या गळ्यात व्याजाचा घट्ट विळखा पडतो. बघा किती भयानक चित्र! आज हॉस्पीटलमध्ये पेशंटला अॅडमिट करताना आगाऊ रक्कम जमा करावी लागते त्याचप्रमाणे काही हॉस्पीटलमध्ये पेशंट मरण पावल्यानंतर त्याचा मृतदेह पूर्ण बिलाचा भरणा केल्यानंतरच नातेवाईकांच्या हाती दिला जातो, तरीसुद्धा डॉक्टरला कोणी जाब विचारत नाही. पण आज स्थापत्य क्षेत्रात स्थापत्य अभियंत्याकडून तसेच स्थापत्य व्यवसायिकाकडून नाममात्र चुक किंवा तृटी आढळल्यास त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा चालू होतो तर काही ठिकाणी त्याचे नावे काळ्या यादीत समाविष्ठ करतात आणि त्यांच्या प्रगतीचे दोर कायमचे कापून टाकतात.
स्थापत्य सल्लागारांची दयनीय अवस्था
स्थापत्य काम पूर्ण झाल्यानंतर सुद्धा बऱ्याच सल्लागारांचे तसेच व्यावसायिकांचे शेवटचे बील तसेच सुरक्षा रक्कम देखभालीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सुद्धा मिळत नाही, तर काही ठिकाणी त्याच्यावर तुळशीपत्र ठेवावे लागते. डॉक्टरच्या बिलामध्ये आपण कधी सुरक्षा रक्कमेचा नियम पाहिला आहे का? याचे उत्तर नाही
असेच आहे. अगदी याच धर्तीवर सल्लागारांच्या फी मध्ये सुद्धा सुरक्षा रक्कमेचा क्लॉज अंर्तभुत असता कामा नये. आज आपले मायबाप सरकार सुद्धा बऱ्याच स्थापत्य सल्लागारांचे देयक अदा करत नाही, ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे. निविदे अंतर्गत प्राप्त केलेल्या कामाचे सर्व रिपोर्ट अत्यंत काळजी पूर्वक तपासून त्यांच्या कामाची अत्यंत चिकीत्सक शहानिशा केल्यानंतर सुद्धा निविदेतील क्लॉजप्रमाणे बीले किंवा देयके त्यांना दिली जात नाही. पण आज वैद्यकीय क्षेत्रात आपण ऑॅपरेशन सक्सेस झाल्यानंतर माझ्या पेशंटचे बील देईन असे म्हटले तर डॉक्टर त्या पेशंटकडे ढूंकूनसुद्धा बघत नाही आणि सर्वप्रथम त्या पेशंटला हॉस्पीटलच्या दारातून पुढे जाण्याचा सल्ला देतो आणि म्हणूनच स्थापत्य सल्लागारांची ही दयनीय अवस्था का होते? याचे चिंतन प्रत्येक सल्लागाराने करणे आवश्यक आहे.
स्थापत्य अभियंता देशाच्या उत्कर्षाचा केंद्रबिंदू
स्थापत्य अभियंत्याची बाजारातील पत वृद्धींगत करण्यासाठी प्रत्येक स्थापत्य अभियंत्याने स्वाभिमानी जीवन जगण्याची वृत्ती अंगिकारली पाहिजेत. कोणासमोरही दबून जाता कामा नये. सर्व स्थापत्य अभियंत्यांनी एकाच छताखाली येण्याची अत्यंत गरज आहे. स्थापत्य अभियंत्याच्या फुटीरता वादी वृत्तीमुळे प्रत्येक कार्पोरेट व्यावसायिक तसेच बिल्डर त्याचा गैरफायदा अगदी सहजपणे खिशात टाकून आपली पोतडी भरतात. स्थापत्य शाखेत काम करणा-या प्रत्येक अभियंत्यास मानपानाची चांगली वागणूक मिळणे अगदी अत्यावश्यक आहे. स्थापत्य अभियंता देशाच्या उत्कर्षाचा केंद्रबिंदू आहे आणि म्हणूनच नेहमी त्याचे बाजारातील स्थान व समाजातील पत नेहमीच उच्च राहील त्याचप्रमाणे त्याचे वैयक्तिक जीवन सुखकर कसे बनेल याकडे सरकारने अत्यंत काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजेत.
स्थापत्य अभियंत्याची समाजातील पत खालावली
आज देशात सरकारी, निमसरकारी तसेच खाजगी प्रकल्प उभे रहातात त्याचप्रमाणे प्रत्येक प्रकल्पाचे लोकार्पन होत असते. प्रकल्प लोकार्पनाच्या वेळी त्याचे उद्घाटन आपले मा.मंत्री, आमदार, खासदार, प्रशासकीय आयुक्त त्याचप्रमाणे न्यायाधिश इत्यादी लोकप्रिय व्यक्तीच्याच हस्ते केले जाते. कधी कधी प्रकल्पाचे उद्घाटन करणा-या सेलेब्रिटीला प्रकल्पाचे महत्व तसेच प्रकल्पाच्या मुख्य बाबीसुद्धा माहीत नसतात. प्रकल्प कोणत्या व्यावसायिकाने बांधला? कोणते स्थापत्य अभियंते अहोरात्र काम करत होते? कोणते मुख्य कारागीर होते? यांचा साधा उल्लेख देखील केला जात नाही. माननीय मंत्री महोदय, उदघाटनाच्या वेळी लांबलचक भाषण हातात घेऊन मी ह्या प्रकल्पासाठी अतोनात प्रयत्न केले आणि फक्त माझ्यामुळेच हा प्रकल्प उभा राहिला इत्यादी असे अगदी बेंबीच्या देठापासून आवाज काढत श्रोत्यांच्या कानठळ्या बसवत असतात. कोणत्याही स्थापत्य अभियंत्याच्या उल्लेखाविना प्रकल्पाचे उद्घाटन तसेच लोकार्पण पार पडते. यावरून आपल्या लक्षात येईल की आज स्थापत्य अभियंत्याची समाजातील पत किती खालावली आहे?
छत्रपतींची मानपानाची पद्धत
साधारणपणे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदूलकराच्या हस्ते रायगड किल्ला राजधानीसाठी बांधून घेतला. पण कोठेही स्वतःचे नाव न कोरता फक्त हिरोजी इंदूलकरांचे नाव त्यांच्या मागणीप्रमाणे जगदीश्वराच्या पायरीवर कोरले यावरून छत्रपतीची मानपानाची पद्धत आपल्या लक्षात येईल. पण आज कोणत्याही प्रकल्पस्थळी कोणत्याही स्थापत्य अभियंत्याचे तसेच प्रकल्प उभा करणाऱ्या व्यावसायिकाचे अथवा कुशल कारागीराचे नाव आपल्या पाहण्यात आलेले नाही. आज त्या ठिकाणी लोकनियुक्त प्रतिनिधींची नावे आपल्या पाहण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराजांची मानसन्मानाची पद्धत काही अंशी गेल्या सत्तर वर्षात आपल्या लाडक्या राजकर्त्यांनी अवलंबिली असती तर बांधकाम क्षेत्रात आज भारत देश अग्रस्थानी पोहचला असता यात तीळ मात्र देखील शंका नाही.
शासनाने स्थापत्य शास्त्राकडे चांगल्या नजरेने पाहण्याची गरज
आज आपल्याला काही महत्वाच्या तसेच अद्यावत प्रकल्पासाठी परकीय तंत्र आयात करावे लागते आणि त्यासाठी भरमसाठ मुल्य मोजावे लागते. आय.आय.टी सारख्या अत्यंत प्रगत व अद्यावत संस्थेतून बाहेर पडणारे स्थापत्य अभियंते उच्च पगारासाठी परदेशी रवाना होतात, म्हणजेच काय आपल्या देशात त्यांना उचित मान तसेच उच्च मुल्य मिळत नाही आणि म्हणूनच उच्च॑॑शिक्षीत व अतिहुशार स्थापत्य अभियंत्यांना आपल्या देशात थांबविण्यासाठी उचित प्रयत्न शासनाने केले पाहिजेत. अतिहुशार स्थापत्य अभियंत्यांचा सदूपयोग व मानपान चांगल्या प्रकारे केले तर भारताला बांधकाम क्षेत्रात परकीय तंत्राच्या परावलंबाला बळी पडावे लागणार नाही. शासनाने स्थापत्य शास्त्राकडे चांगल्या नजरेने पाहिले तर खरोखरच भारत देश बांधकाम क्षेत्रात अग्रेसर तसेच अतिप्रगत बनेल आणि म्हणूनच प्रत्येक स्थापत्य अभियंत्याला त्याचा योग्य मोबदला तसेच त्याचा उचित मानसन्मान केला पाहिजेत. प्रजा सुखी तर राजा सुखी
ह्या अत्यंत पुरातन तंत्राप्रमाणे स्थापत्य अभियंता मानाने उच्च व पानाने सुखी तर त्याच्या हातातील प्रत्येक प्रकल्प गुणनियंत्रणाच्या मापदंडानुसार टिकाऊ व सुरक्षितच बनेल आणि देशाला त्या प्रकल्पांचा अनंत काळासाठी अत्यंत सुखकर व सुरक्षित उपभोग घेता येईल आणि भारत देश बांधकाम क्षेत्रात जगप्रसिद्ध होईल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
स्थापत्य अभियंत्यांची व्यथा आणि वेदना मांडताना आपण त्याची शक्तीस्थळं ; सामर्थ्य ; समाजप्रति असणारे समर्पण भाव ; सामूहिक बांधिलकी ; सर्व सुखांचा त्याग करून कामात झोकून देणे इत्यादी त्याचे गुण अचूक टिपले आहेत.अनेक बाबींचा आपण सखोल आढावा घेतला आहेच आणि स्थापत्य अभियंत्याच्या काळजालाच हात घातला आहे. छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या प्रति आपले असलेले प्रेम त्यांच्या पुसटश्या उल्लेखनातूनही व्यक्त होते.
एक विनंती वजासुचना आपण हम्पी पासून थेट शिवाजी महाराजांपर्यंत स्थापत्यशास्त्र कसे विकसित होत गेले त्यावर लिहावे
धन्यवाद 🙏