मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिरात ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते सफरअली आणि मधुकर मातोंडकर यांचा गौरव
मुंबईः येथील पु. ल.देशपांडे अकादमी रवींद्र नाट्य मंदिर येथे स्वामीराज प्रकाशन मुंबई आणि प्रभा प्रकाशन कणकवली यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सुर्वे मास्तरांच्या साहित्य संमेलनात सिंधुदुर्गातील कवी सफरअली इसफ यांना त्यांच्या अल्लाह ईश्वर काव्यसंग्रहासाठी आणि सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर यांना त्यांच्या सांस्कृतिक योगदानासाठी ‘ मास्तरांची सावली ‘ काव्य पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले तर भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत या संमेलनाचा समारोप झाला. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार हे होते. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार सफरअली इसफ आणि मधुकर मातोंडकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी संमेलनाचे आयोजक ज्येष्ठ पत्रकार रजनीश राणे, कवी तथा स्तंभ लेखक अजय कांडर, मास्तरांची सावली ग्रंथाच्या शब्दांकार लेखिका प्रा. डॉ. स्नेहा सावंत आदी उपस्थित होते.
याचवेळी प्रदीप आवटे पुणे, सुनील उबाळे, छत्रपती संभाजीनगर, सुजाता राऊत मुंबई आणि डॉ. योगिता राजकर वाई या साहित्यव्रतींचाही त्यांच्या उत्तम साहित्यकृतींसाठी मास्तरांची सावली पुरस्काराने गौरविण्यात आले. कवी सफरअली यांना त्यांच्या दर्या प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आजच्या बहुचर्चित अल्लाह ईश्वर या काव्यसंग्रहासाठी मास्तरांची सावली पुरस्काराने गौरविण्यात आले. अल्लाह ईश्वर मधील कविता आजच्या धर्मांध वातावरणाची पोलखोल करतेच परंतु ही कविता माणूसपणाची आस बाळगत असल्यामुळे माणसाच्या असण्यालाच उजगार करू पाहते.
अल्पसंख्यांक गटाची सर्व प्रकारची कोंडी केली जात असताना या कवितेत कुठल्याच जात धर्म वर्गाबद्दल अनुचित उद्गगार नाही. ही या कवितेची मोठी गुणवत्ता असल्यामुळे मास्तराची सावली या पुरस्काराने गौरविण्यात आले असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तर मधुकर मातोंडकर हे कोकणातील आजचे अग्रगण्य सांस्कृतिक कार्यकर्ते असून सुमारे 40 वर्ष ते निष्ठेने सांस्कृतिक काम करत आहेत.
सांस्कृतिक दृष्ट्या समाज प्रगल्भ झाला तरच तो वैचारिक दृष्ट्याही प्रगल्भ होतो ही धारणा ठेवून ते काम करत असल्यामुळे त्यांच्या कामाचं मोल अबाधित राहणार आहे. असा निष्ठावंत सांस्कृतिक कार्यकर्ता आजच्या काळात दुर्मिळ असल्यामुळेच मास्तरांची सावली पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले असल्याचेही मातोंडकर यांना पुरस्कार प्रदान करताना स्पष्ट करण्यात आले. या दोन्ही सिंधुदुर्ग सुपुत्रांचे या यशाबद्दल सिंधुदुर्गच्या साहित्य सांस्कृतिक चळवळीतून अभिनंदन करण्यात येत आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.