March 27, 2023
where are u missing Out article by Sunetra Vijay Joshi
Home » कुठे चुकतेय का ?
मुक्त संवाद

कुठे चुकतेय का ?

ज्या अनोळखी व्यक्तीशी काही घेणे देणे नसते त्याला आपण जपतो. पण आपलीच जिवाभावाची असलेली मात्र आपण का जपत नाही. एवढे काय त्यात असे म्हणून सोडून देतो. असे का? याचा एकदा विचार प्रत्येकाने करायला हवा. तिथे इगो आड येतो ? किंवा गृहीत धरतो का ? रागावून फार तर दोन दिवस बोलणार नाही जास्त काय होईल ? असे वाटते का ?

सुनेत्रा विजय जोशी

रत्नागिरी

अनुला गावाला जायचे होते. गाडी रात्री 12 वाजून 10 मिनीटांची होती. रिझर्वेशन केले. स्टेशनवर गेली. गाडी आली आणि मग कळले की तिकीट तर कालचे आहे. गाडी रात्री 12 वाजून 10 मिनिटांची म्हणजे 12 नंतर दुसरा दिवस असतो. आज जे तिकीट हातात होते त्याचा काही उपयोग नाही. मात्र घाईत ते लक्षात आले नाही. घरी परतल्यावर चर्चा सुरू झाली. जवळच छोटा चिंटू ते ऐकत होता तो लगेच म्हणाला अग पण तुझ्या लक्षात कसे आले नाही. तो नुकताच घड्याळ शिकला होता. खरे तर तो सहजच बोलला. पण अनू एकदम म्हणाली. हो आता तूच तेवढे शिकवायचा राहिला होतास. खरे तर ती स्वतःवर वैतागली होती पण राग चिंटूवर निघाला…

ती तशीच आत गेली.. अजून एक प्रसंग.. अनु चहा करत होती तेवढ्यात राजेश तिचा नवरा आला. आणि पाणी पिण्यासाठी पेला हवा म्हणून खसकन ट्राॅली ओढली. अनुचा हात होता तिथे तिला कोपराला एकदम लागले..ती कळवळली. अरे बघता येत नाही का ? त्यावर राजेश साॅरी म्हणायचे सोडून तिलाच उलट म्हणाला तुला दिसत होते ना मी ट्राॅली ओढतोय मग हात बाजूला का नाही घेतला…

खरे तर दोन्ही प्रसंग साधेच. नेहमी कुणाच्या ना कुणाच्या घरात थोड्याफार फरकाने घडणारे.. यात कदाचित व्यक्तीमधे बदल असू शकतो. पण हे घडताना मी त्या प्रसंगांची साक्षीदार होते. मनात विचारचक्र सुरु झाले. खरेच चिंटू खरे तर काय असे चुकीचे बोलला होता ? त्याच्या बोलण्यावर हो रे राजा माझ्या लक्षातच आल नाही बघ.. असे हसून बोलून विषय संपला असता. पण एवढासा मुलगा मला अक्कल शिकवतो असा समज नव्हे गैरसमज करुन त्याला फटकारले. तो हिरमुसलाच आणि अनुचा पण मुड खराब झालाच. खरे तर आपण आपला मुर्खपणा झाला हे लक्षात आल्याने स्वतःवरचा राग त्याच्या वर काढला. त्यात काय चुका सगळ्या जणांच्या हातून केव्हा ना केव्हा होतातच. मग कमीपणा वाटून घेण्याचे कारणच काय ? असा विचार आपण खरे तर करायला हवा ना ?

तसेच दुसर्‍या वेळी जर राजेशने साॅरी माझे लक्षच नव्हते ग. लागले का जास्त ? असे विचारले असते तर मन दुखावले गेले नसते. एरवी आपण अनोळखी व्यक्तीला चुकून घाईत जरासा धक्का जरी लागला तरी पटकन साॅरी म्हणतो. शिवाय आपल्या कडून घडलेल्या त्याबद्दल सारवासारव करून त्या व्यक्तिचा गैरसमज होणार नाही याची काळजी सुद्धा घेतो. पण इथे आपल्याच माणसाला साॅरी म्हणणे सोडाच उलट अरेरावी करून तुला दिसले नाही का असेही म्हणतो. ज्या अनोळखी व्यक्तीशी काही घेणे देणे नसते त्याला आपण जपतो. पण आपलीच जिवाभावाची असलेली मात्र आपण का जपत नाही. एवढे काय त्यात असे म्हणून सोडून देतो. असे का? याचा एकदा विचार प्रत्येकाने करायला हवा. तिथे इगो आड येतो ? किंवा गृहीत धरतो का ? रागावून फार तर दोन दिवस बोलणार नाही जास्त काय होईल ? असे वाटते का ?

खरे तर परक्या माणसांपेक्षा आपल्या माणसांची मने जास्त जपायला हवीत ना ? बघा बर वाचल्यावर तुम्ही पण या प्रकारात मोडता का ? आणि तसे असाल तर त्यावर विचार नक्की करा कुठे चुकतेय का ?


Related posts

अभ्यासकांसाठी प्रस्तावनांचा अमूल्य ठेवा

मराठी गझलेच्या समृद्धीत भर घालणारा गझलसंग्रह : ‘ एक कैफियत ‘

Saloni Art : लिप्पन आर्ट…

Leave a Comment