June 18, 2024
challenges-before-marathi-language-article-by-dr-arun-shinde
Home » मराठी भाषेपुढील आव्हाने
विशेष संपादकीय

मराठी भाषेपुढील आव्हाने


अमेरिकेतील डायनीयल एब्राम या गणिती तज्ज्ञाच्या मतानुसार जी भाषा, ती बोलणाऱ्या समाजास व्यवसाय देऊ शकत नाही ती भाषा तो समाज सोडून देण्याचा प्रयत्न करतो. एब्राम यांच्या अंदाजाप्रमाणे 21 व्या शतकाच्या अखेरीपर्यंत संपूर्ण जगात 300 भाषा अस्तित्वात राहू शकतात. जगात आज अस्तित्वात असणाऱ्या सहा हजारांहून अधिक बोलीभाषांपैकी निम्म्या भाषा या कायमच्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. असा निष्कर्ष 2009 मध्ये नोंदविला आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर जगातील भाषांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. मानवजातीच्या वाटचालीमधील संपन्न भाषिक वारसा नष्ट होण्यामुळे मानवी संस्कृती, बौद्धिक संपदा, कला, ज्ञान, शहाणपण वगैरेंचा ठेवा या जगाच्या पाठीवरून कायमचा नाहीसा होणार आहे.

डॉ. अरुण शिंदे

सर जॉर्ज ग्रिअर्सनच्या लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया (1903-1923) नुसार भारतात त्या काळात 179 भाषा आणि 544 बोली अस्तित्वात होत्या. 1961 च्या जनगणनेनुसार 1652 भाषा भारतात बोलल्या जात होत्या. जी भाषा दहा हजारांपेक्षा जास्त संख्येच्या जनसमूहांमध्ये बोलली जात असेल, त्याच भाषेचा जनगणनेमध्ये मातृभाषा म्हणून समावेश करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. त्यामुळे भारतीय भाषांची नेमकी संख्या आजही उपलब्ध नाही. भाषा धोक्‍यात आलेल्या देशांमध्ये भारत प्रथम क्रमांकावर असून 198 भारतीय भाषा मृत्यूपंथावर आहेत. असा इशारा युनेस्कोने दिला आहे.

मराठी भाषा व बोली

स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट केल्या गेलेल्या बावीस भाषांपैकी मराठी ही महत्त्वाची भाषा आहे. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात मराठी बोलणाऱ्यांची संख्या दहा कोटींवर आहे. इंटरनेटवरील विकिपीडिया या ज्ञानकोशातून मिळणाऱ्या माहितीनुसार मराठी ही जगातली 19 व्या क्रमांकाची भाषा आहे. जॉर्ज ग्रिअर्सन यांच्या लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या खंड 7 व 9 मध्ये सुमारे 40 बोलीं व उपबोलींचे नमुने दिले आहेत. त्यांच्या सर्वेक्षणात तत्कालीन निजाम संस्थानचा समावेश नसल्याने मराठवाड्यातील बोलींच्या वस्तुस्थितीबद्दल आजही आपणास फारशी माहिती मिळत नाही. भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण या महाराष्ट्र खंडामध्ये (पद्‌मगंधा, 2013) मराठीच्या 60 बोलींची माहिती येते. बोलींचे प्रदेशवार, जिल्हावार भेद आढळतात. जात तत्त्वावरही बोलीतील भेद अवलंबून असल्याने एकंदर मराठी बोलींची संख्या शंभराहून अधिक असण्याची शक्‍यता आहे. वऱ्हाडी, हळवी, पोवारी, नागपुरी, अहिराणी, कोकणी, वारली, ठाकरी, डांगी, सामवेदी, कोल्हापुरी, नगरी, सोलापुरी, पुणेरी, चित्पावनी असे बोलीचे अनेक प्रकार उपप्रकार आढळतात. आदिवासींच्याही भौगोलिक, सामाजिकस्तरानुसार पोटबोली आहेत. मराठी बोलींची निश्‍चित संख्या व स्वरूप आजही अधिकृतपणे उपलब्ध नाही. शासनस्तरावरून या संदर्भात प्रयत्नही होत नाहीत.

मराठीपुढील आव्हाने

आधुनिकीकरण, स्थलांतर, संपर्क व दळणवळणाची वेगवान साधने, वाढते आदानप्रदान, इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांचा प्रभाव, इंग्रजीचे वाढते महत्त्व, रोजगाराच्या संधी यांसारख्या घटकांचा परिणाम प्रादेशिक, स्थानिक बोलींच्यावर होत आहे. पारंपरिक बोलींमध्ये प्रमाण मराठी, इंग्रजी, हिंदी वगैरे भाषांचा प्रभाव वाढत आहे. ध्वनीपरिवर्तन होत आहे. पोटबोलीतील अंतर कमी होत आहे. चंद्रपूरकडील नाईकी, यवतमाळ, वर्धा, नांदेड भागातील “कोलामी’या बोली आगामी काळात नाहीशा होण्याचा संभव युनेस्कोच्या रिपोर्टमध्ये व्यक्‍त झाला आहे.

महाराष्ट्राच्या भाषिक व्यवहारांचे निरीक्षण केल्यास मराठीच्या पीछेहाटीची कारणे लक्षात येतात. जन्मल्यानंतर कौटुंबिक परिचितांशी संदेशनाची व्यवहाराची भाषा, स्थानिक बोली, त्या त्या विशिष्ट प्रदेशातील एक प्रादेशिक बोली, औपचारिक शिक्षणाचे माध्यम प्रमाणमराठी, न्यायसंस्था, आर्थिक संस्था, उद्योगधंदे वगैरे उपजीविकेशी संलग्न व्यवहाराची भाषा इंग्रजी, महाराष्ट्राच्या शासन व्यवहाराची भाषा मराठी व इंग्रजी, मोठ्या शहरातील बाजाराची, विनिमयाची भाषा हिंदी, करमणूकीच्या क्षेत्रात मुख्यत्वे हिंदी, केंद्रसरकारच्या कार्यालयांची भाषा हिंदी व इंग्रजी असा भाषिक व्यवहाराचा नकाशा दर्शवता येतो. अशा भिन्न भाषिक व्यवहारामुळे नेहमीच्या जगण्यातून आपल्याला ज्ञानप्राप्ती होते नाही आणि आपल्या हातून ज्ञाननिर्मितीही होत नाही. ज्ञान पाश्‍चिमात्यांनी निर्माण करायचे आणि आपण त्याची फक्‍त माहिती मिळवायची असा प्रकार सतत चालू असतो. आपली विद्यापीठेही ज्ञाननिर्मितीची नव्हे तर माहिती वितरणाची केंद्रे झाली आहेत. नैसर्गिक विज्ञान, सामाजिक शास्त्रे, मानव्यविद्या व आधुनिक ज्ञानक्षेत्रांमध्ये जर आपण मौलिक भर घालीत गेलो, तरच या क्षेत्रातील आपले “दुय्यम नागरिकत्व’ नाहीसे होईल. यासाठी मातृभाषा याच ज्ञानभाषा होणे हा एक मार्ग आहे.

शिक्षणाचे माध्यम व मराठी

मराठीपुढील सर्वात मोठे आव्हान शिक्षणाच्या क्षेत्रात आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे राज्यभाषेला स्पर्शही न होता, विद्यार्थी अंतिम पदवीपर्यंत पोहचू शकतो. हा चमत्कार फक्‍त महाराष्ट्रात घडत असेल. आपल्याला शिक्षणप्रसाराचे काम करायचे आहे, की मुलांच्या स्वाभाविक जीवनधारणेवर वेगळ्या जीवनपद्धतीचे आरोपण करायचे आहे, हे विसरले जात आहे. स्वभाषेपासून मुलांना दूर नेणे म्हणजे त्यांची सामाजिक पाळेमुळे खणून काढणे आहे. आजच्या इंग्रजीचा चेहरा हा व्यापारी आणि कारखानदारी बाजारपेठेचा असल्याने सर्वसाधारण विद्यार्थ्यांना कोणतीच बांधीलकी राहत नाही.

स्वतःच्या घरात आणि समाजातही एक तुटलेपण त्यांच्यावर लादले जात आहे. येत्या शतकात मराठीपण संपूर्णतः हरवलेला आणि सकस इंग्रजीकरणापर्यंत न पोचलेला असा एक अस्मिताहीन, बाजारू समाज आपल्याला येथे निर्माण करावयाचा आहे का? याचा विचार धोरणकर्त्यांनी करावयास हवा.

पदवीधर होऊनही दोन ओळी नीट न लिहिता येणे किंवा मुद्देसूदपणे आपले विचार व्यक्‍त न करता येणे हे आजचे वास्तव आहे. आजची शिक्षणव्यवस्था मराठीकडे फार गांभीर्याने पाहत नाही, हेच यातून सूचित होते. मराठी मातृभाषा-राजभाषा म्हणून तिला कायम दुय्यम स्थानावर ठेवायचेही आपले शैक्षणिक धोरण आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठी शाळांतून हीच स्थिती दिसते. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून मराठी जवळपास हद्दपार झालेली आहे.

विद्यापीठीय व महाविद्यालयीन स्तरावर मराठीचा अभ्यासक्रम अध्ययन-अध्यापन यांचा दर्जा कमालीचा घसरला आहे. पुरेसे विद्यार्थी कागदोपत्री दाखवून विभाग टिकवून ठेवण्यात प्राध्यापक धन्यता मानत आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थिती, अध्ययन-अध्यापनाचा दर्जा व अपेक्षित उद्दिष्टपूर्ती/कौशल्यप्राप्ती यांची सद्यःस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. सामाजिकशास्त्रे व मानव्यविद्यांचे शिक्षण सामान्यतः मराठी माध्यमातून दिले जावे. महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना चांगली दर्जेदार पाठ्यपुस्तके, संदर्भग्रंथ उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थी गाइडे वाचून पदवी व पदव्युत्तर पदवी उच्च श्रेणीत मिळवतात. अशा परीक्षार्थी शिक्षणपद्धतीतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचा ज्ञानात्मक, गुणात्मक स्तर कोणता असणार? जागतिकीकरणाच्या आजच्या तीव्र स्पर्धेत ते कितपत टिकाव धरणार? असे अनेक प्रश्‍न यासंदर्भात निर्माण होतात.

आज मराठी भाषेचे शिक्षण म्हणजे मराठी ललित साहित्याचे शिक्षण अशी स्थूलमानाने स्थिती आहे. यात आता व्यावहारिक मराठी, विविध विद्यांच्या अभ्यासासाठी मराठी असे अधिक व्यापक होणे सुरू झाले आहे. पदव्युत्तर मराठीच्या अध्यापनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी अभ्यासक्रमनिर्मितीतील उपक्रमशीलता वाढविली पाहिजे. त्यासाठी पदव्युत्तर विभाग व शिक्षकांना स्वायत्तता व स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्याची मुभा दिली पाहिजे. पदव्युत्तर अभ्यासकेंद्राचा स्वतःचा विकास आराखडा आणला पाहिजे. आणि त्यातील सर्वेक्षण, संशोधनादी अभ्यासप्रकल्पांना पूरक ठरणारे अभ्यासक्रम, अध्ययनपद्धती व मूल्यमापन तंत्रे निर्माण करण्याचे स्वातंत्र्य या विभागांना घेता आले पाहिजे. अशी लवचिकता लाभली तर परिभाषानिर्मिती, प्रमाणभाषा व बोलीकोश, संगणकासाठी भाषिक उपकरणे वगैरेंचा अभ्यासक्रमात थेट समावेश झाल्यास भाषेच्या संवर्धनासाठी पदव्युत्तर अध्यापन केंद्रे क्रियाशील योगदान देऊ शकतील.

विज्ञान, तंत्रज्ञान व मराठी

आजचे युग हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे, प्रसारमाध्यमांच्या महापुराचे युग आहे. संगणक, मोबाईल, इंटरनेट ही जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत. या नव्या माध्यमांमध्येही इंग्रजीबरोबरच मराठीचा वापर करता येतो. ईमेल, एसएमएस, ब्लॉग, फेसबुक, ट्विटर, इंटरनेटवरील विविध साइट्‌स यावर मराठीतून देवाणघेवाण करू शकतो. परंतु मराठी टंकलेखनासाठी सर्वमान्य सहजसुलभ फॉण्ट आजही उपलब्ध नाही. डिस्कव्हरी, हिस्ट्री यांसारख्या वाहिन्या, तामिळ, हिंदी सारख्या भाषांमध्ये आहेत. त्या मराठीतून सुरू होणे गरजेचे आहे. ज्ञान विज्ञान, तंत्रज्ञान ज्या भाषेतून प्रकटते ती भाषा जगावर अधिराज्य गाजविणार. म्हणून विज्ञान तंत्रज्ञानातील नव्या नव्या संकल्पना, शोध, नवनिर्मित वस्तू यांच्याशी निगडित शब्दांना सामावून घेण्यासाठी मराठीचा शास्त्रीय पारिभाषिक परीघ तातडीने विस्तारला पाहिजे.

विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकांमधील मराठी परिभाषा कठीण व अर्थाचे नीट वहन न करणारी आहे. बरेचसे पारिभाषिक शब्द संस्कृतोद्‌भव आहेत. वैज्ञानिक परिभाषा व विज्ञानविषयक लेखन विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिक यांना समजेल, त्यांच्यात विज्ञानविषयक आस्था व अभिरूची निर्माण होईल अशा सोप्या भाषेत केले पाहिजे. अपरिचित प्रतिमाविश्‍व असलेले संस्कृत शब्द वैज्ञानिक परिभाषा रूढ करताना वापरण्याऐवजी आपल्या बोलीभाषांतील शब्द घेऊन सोपी, सुलभ वैज्ञानिक परिभाषा घडविली पाहिजे. सोप्या व परिचित प्रतिभाविश्‍वाच्या जवळ जाणाऱ्या परिभाषेची निकड ग्रामीण, गरीब बहुजनांतील विद्यार्थ्यांना सगळ्यांत जास्त आहे. म्हणून यादृष्टीने विचार व काम करण्याची फार आवश्‍यकता आहे. या थरातील आलेले शिक्षक, संशोधक, विद्यार्थी, अभ्यासक, लेखक यांची जबाबदारी सर्वाधिक आहे. आपल्याला किंवा आपल्यासारख्या लोकांना जे हवे ते आपणच तयार केले पाहिजे.

वैज्ञानिक क्षेत्रात इंग्रजीचे महत्त्व असले तरीही फ्रान्स, जर्मनी, जपान, रशिया, चीन, इटली इत्यादी प्रगत देशांत विज्ञानातील शिक्षण-संशोधन त्यांच्या मातृभाषांतच चालते. यासाठी त्यांनी मातृभाषांमध्ये आवश्‍यक ते काम करून ठेवले आहे. भाषकांच्या संख्येचा विचार करता मराठी भाषावर उल्लेख केलेल्या भाषांच्या समकक्षच आहे. आपला शब्दसंग्रह मोठा आहे. परंतु विज्ञान क्षेत्रातील वावर कमी असल्याने त्या क्षेत्रातील शब्द कमी आहेत. ते वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील.

त्यासाठी वैज्ञानिक संशोधनाचा, अभ्यासाचा विविध पातळ्यांवर अनुवाद आपल्या भाषेत होत राहिला पाहिजे. आधुनिक विज्ञान आपल्या भाषेत येत राहिले किंवा आले की वैज्ञानिक प्रश्‍नांचा आपल्या भाषेत विचार करण्याची सवय लोकांना लागेल. विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीची ही पहिली पायरी असेल. आजच्या काळावर विज्ञानाची सत्ता आहे. या सत्तेला आपल्या भाषिक अवकाशात घेतले की आपली भाषा वापरती राहील व ती नक्‍कीच टिकेल. पायाभूत विज्ञान, मध्यम व उच्च दर्जाचे विज्ञान व अत्याधुनिक वैज्ञानिक संशोधन व तंत्रज्ञान अशा साऱ्या पातळ्यांवर विज्ञान मराठीत येत राहिले पाहिजे. त्यासाठी दीर्घकालीन व व्यापक पातळीवर योजना आखावी लागेल.

विज्ञानासाठी मराठी या अंगाने बलिष्ठ होणे गरजेचे आहे. आपली भाषा टिकायची असेल तर ती काळाशी संवादी हवी आणि आजच्या विज्ञानयुगात ती प्रामुख्याने विज्ञानाची झाली पाहिजे. भाषा आणि नैसर्गिक विज्ञान यांचे शिक्षक, अभ्यासक, संशोधक, धोरणकर्ते, राज्यकर्ते या अंगाने किती आस्था व कार्य करू शकतात यावर हे सारे अवलंबून आहे. आपल्या भाषेला शक्‍ती देण्यासाठी जोरकस प्रयत्न करीत राहिले पाहिजे. त्यासाठी मैदानात राहिले पाहिजे. मुळात आपल्या भाषेवर पुरेसे प्रेम असले पाहिजे.

सामाजिकशास्त्रे व मराठी

महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार पुस्तके तयार करण्याच्या हेतूने विद्यापीठ पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ अस्तित्वात आले. सामाजिक शास्त्रांची पदवी पातळीवरची अनेक चांगली पुस्तके या मंडळाने प्रसिद्ध केली. परंतु पुढे शासनाने हे मंडळ बंद केले. मराठीत निरनिराळ्या ज्ञानशाखांतील विषयांची ग्रंथसंपदा पुरेशा प्रमाणात आम्ही निर्माण करू शकलो नाही. मराठीत दर्जेदार पाठ्यपुस्तके, संदर्भग्रंथ नाहीत. ज्ञानकोश, परिभाषाकोश आणि शब्दकोश हे पुरेशा प्रमाणात आम्ही निर्माण करू शकलो नाही. मराठीच्या शब्दसंग्रहामध्ये लक्षणीय स्वरूपाची भरही आम्हास टाकता आलेली नाही. उच्च शिक्षणातील मराठीचा अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांमधून अपेक्षित कौशल्ये निराश करणारा आहे.

मराठी माध्यम सकारात्मक व सर्जनशील असावे त्यासाठी नवी परिभाषा घडवावी व वाढवावी लागेल. परिभाषा लोकभाषेच्या हातात हात घालून पुढे जायला हवी. मात्र हे फार प्रयत्नपूर्वक व संघटितपणे करण्याचे काम आहे. नवे पारिभाषिक शब्द अध्यापनात व पाठ्यपुस्तकांमध्ये जाणीवपूर्वक वापरावे लागतील. विद्यापीठै ग्रंथनिर्मिती मंडळाचा प्रयोग पुनरूज्जीवित करण्याची गरज आहे. तशीच नवी संज्ञापन तंत्रे व माध्यमे यावर हुकूमत प्राप्त करण्यासाठी मातृभाषेत ज्ञानाची मूलभूत स्वरूपाची निर्मिती करत ती जगाच्या प्रांगणात धाडली पाहिजे.

इंग्रजीचे आव्हान

एखाद्या भाषेचे दुसऱ्या भाषेवरील आक्रमण हे चार पद्धतीने होऊ शकते. 1) एखाद्या भाषेतील भरमसाठ शब्दांचा व वाक्‍प्रचारांचा शिरकाव दुसऱ्या भाषेत होणे व त्यांचा वापर वाढत जाणे 2) अशा शिरकाव झालेल्या शब्दांना मूळ भाषेत पर्याय नसणे किंवा पर्याय निर्माण होण्याची प्रक्रिया थांबणे. 3) शासनव्यवहार व लोकव्यवहारात मूळ भाषेला हरवून आक्रमक भाषेतच सर्व प्रकारचे व्यवहार चालणे. 4) त्या भाषेतील ग्रंथनिर्मिती व ग्रंथवाचन थांबणे. सध्या पहिल्या व दुसऱ्या प्रकारामध्ये इंग्रजी व हिंदीने मराठीवर जोरदार आक्रमण केले आहे. हळूहळू तिसऱ्या प्रकारचे आक्रमणही होत आहे..

इंग्रजीचे मराठीवरील आक्रमण हा सर्वाधिक चिंतेचा व चर्चेचा विषय आहे. मध्यमवर्गीय नागर, उच्चभ्रू वर्ग यापूर्वीच इंग्रजीधार्जिणा होऊन नव्या संधी, रोजगार, पदे यांचे लाभ भोगत होता. आता निमशहरी, ग्रामीण भागातील जनसमूहही इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहे. ग्रामीण भागातून निर्माण होत असणारा नवमध्यमवर्ग मराठीकडे झपाट्याने पाठ फिरवून आपली पाळेमुळे विसरून आंधळेपणाने आंग्लशरण होत आहे. त्यांचे अनुकरण इतर सामान्य जनसमूह करीत आहेत. त्यामुळे मराठी माध्यमातून शिकून काय उपयोग? हा प्रश्‍न टोकदारपणे, सार्वजनिकरीत्या विचारला जात आहे. याचे समाधानकारक उत्तर आज तरी आपल्या राज्यकर्ते व धोरणकर्त्यांकडे नाही. परवापर्यंत शालेय स्तरावरील विज्ञानाचे शिक्षण मराठीतून दिले जात होते. सध्या “सेमी इंग्लिश’च्या नावाखाली पहिलीपासून गणित व विज्ञान विषयांचे शिक्षण इंग्रजीमधून दिले जाऊ लागले आहे.

विज्ञानाच्या शिक्षणासाठी महाविद्यालयीन स्तरावर मराठीला प्रवेश बंद होतो. याचा अर्थ सरकारने गणित, विज्ञान यांचे शिक्षण देशी भाषांतून कायमचे बंद करण्याचे काम सुरू केले आहे. एक प्रकारे मानव्यविद्या, सामाजिकशास्त्रे, वाणिज्य या क्षेत्रांमध्ये मराठी माध्यम कालबाह्य ठरत असून पालकांचा, विद्यार्थ्यांचा इंग्रजी माध्यमाकडे मोठ्या प्रमाणावर कल वाढला आहे.

हिंदीचा वाढता प्रभाव

हिंदीचेही एक मोठे आक्रमण मराठीवर होत आहे. स्वातंत्र्यानंतर राष्ट्रभाषा म्हणून हिंदीतून शास्त्रव्यवहार, संपर्कव्यवहार व्हावा यासाठी मराठी माणसांनी सुरूवातीपासूनच पाठिंबा दिला. त्रिभाषा सूत्रानुसार शालेय अभ्यासक्रमात हिंदी आज सक्‍तीची केली. याचा परिणाम महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात हिंदीचा प्रसार झाला. महाराष्ट्राच्या झपाट्याने होणाऱ्या औद्योगिकीकरणामुळे मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, नागपूर या शहरात हिंदी भाषकांचे प्रमाणही खूप वाढले. या शहरांमधून सार्वजनिक व्यवहाराची भाषा हिंदीच होत आहे. मुंबईमध्ये “बंबैया हिंदी’ म्हणून ही भाषा स्थिरावली आहे. इतर शहरेही हिंदीच्या कक्षेत येत आहेत. शाळा, व्यवहार, प्रसारमाध्यमे, करमणूक क्षेत्रे, केंद्रिय कार्यालये, जाहिरात क्षेत्रे, औद्योगिक कंपन्या, अशा क्षेत्रामंध्ये हिंदीचा वापर होत असल्याने हिंदीचे प्रभावक्षेत्र कमालीचे वाढले आहे. हिंदी व मराठी एकाच भाषाकुलातील असल्याने हिंदीचा प्रभाव मराठी शब्द-उच्चार यांच्यावर पडत आहे. याच्या जोडीला अनेक हिंदी शब्द व वाक्‍यप्रयोग मराठीत येत आहेत. हिंदी व्याकरण, हिंदी वाक्‍यरचना व शब्द यांचाही प्रभाव मराठीवर पडत आहे. यामुळे मराठी आणि हिंदी यांच्या व्याकरणातील भेदही कमी होत चालला आहे. हे असेच वाढत राहिले तर आगामी दीड दोन दशकात मराठी ही हिंदीची उपबोली होण्याचाही धोका संभवतो.

कुठल्याही भाषेच्या अस्तित्वाला आणि विकासाला दोन गोष्टी आवश्‍यक असतात. एकाच भाषक समूहाने एक सलग भूभाग व्यापलेला असणे आणि अशा भूभागातील सर्व जीवनव्यवहार त्या समाजाच्या भाषेतून होणे आवश्‍यक असते. आज महाराष्ट्रातील अनेक शहरे ही बहुभाषिक म्हणून हिंदी-इंग्रजीची बेटे होऊ लागली आहेत. तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचा जीवनव्यवहार हिंदी इंग्रजीतून होऊ लागला असून मराठी भाषेचा वापर कौटुंबिक आणि भाषिक व्यवहारापुरता सीमित होऊ लागला आहे. मराठी भाषेच्या अस्तित्वाला ही परिस्थिती चांगली नाही.

जागतिकीकरणाचा प्रभाव

जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे भाषांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. बोलीभाषा तर कायमच्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जागतिकीकरणाच्या वेगवान रेट्यात निर्माण होणाऱ्या संधीचा लाभ घेण्याची जनसमूहांची मानसिकता हाही भाषिक ऱ्हासाला कारणीभूत ठरणारा घटक आहे. भारतातच नव्हे, तर आशियात तसेच आफ्रिकी देशांतही लोकांना असे वाटते की त्यांनी त्यांच्या मुलांना इंग्रजी, फ्रेंच किंवा स्पॅनिश भाषेतून शिक्षण दिलं तर मोठेपणी मुलांना व्यवसायाच्या आंतरराष्ट्रीय बाजारात रोजगार मिळेल. जेव्हा एखाद्या समाजाला असं वाटायला लागतं की त्याला उदरनिर्वाहासाठी दुसऱ्या भाषेत शिक्षण घेणं गरजेचं आहे, तेव्हा तो समाज नवीन भाषिक परिस्थिती स्विकारायचा निर्णय घेतो. म्हणूनच सध्याच्या विकासाच्या कथित भांडवली जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये भाषिक-सांस्कृतिक संहार दडला आहे का? असा प्रश्‍न निर्माण होतो.

जागतिकीकरणात अख्ख्या विश्‍वाची एक भाषा असावी असा सुप्त हेतू वर्चस्ववादी गटांचा असतो. जागतिकीकरणाची भाषा म्हणून आज आपण इंग्रजीला मान्यता दिलेली आहेच. त्यामुळे इंग्रजीवरील प्रभुत्व हे जागतिकीकरणात यशस्वी होण्याची गुरूकिल्ली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आजच्या उच्च शिक्षणाचे माध्यम तर केवळ इंग्रजीच आहे. इंग्रजी भाषेतील अनेक शब्द मराठीत येत आहेत. उदा. कॉंप्युटरला संगणक हा आपण पर्यायी शब्द शोधला असला तरी माऊस, सॉफटवेअर, हार्डवेअर, कीबोर्ड, हार्डडिस्क, मेमरी, सीडी, पासवर्ड, डेस्कटॉप, फोल्डर, फाईल, डिलीट, कर्सर, ब्लॉग असे अनेक शब्द मूळ इंग्रजी शब्दरूपात आपण वापरतो. मोबाइलमुळेही असेच पन्नास-साठ इंग्रजी शब्द मराठीत आले आहेत. त्यांना पर्यायी शब्द निर्माण करण्यात आपण कमी पडल्यामुळे मराठीचे वेगाने इंग्रजीकरण होत आहे. इलेक्‍ट्रॉनिक युगातले अनेक शब्द बोलीमध्येही वापरले जातात.त्यामुळे बोलीभाषांचे पारंपरिक नैसर्गिक रूप हरवत असून इंग्रजी-िंहंदी शब्दांचा संकर मोठ्या प्रमाणावर होत आहे. विशिष्ट बोलीभाषकांच्या तरूण पिढ्या इंग्रजी या रोजगारभाषेकडे आकृष्ट झाल्याने पुढच्या पिढ्यांमध्ये बोलीभाषा लोप पावणार हे लख्खपणे दिसत आहे. इंग्रजीचे हे मोठे आव्हान मराठीसमोर उभे ठाकले आहे.

ग्रामीण बोलीतील शब्द नामशेष होण्याच्या मार्गावर

ग्रामीण जनसमूहांच्या बोलींतील अनेक शब्द आज नामशेष होत आहेत. पारंपरिक कारागिरी संपत असून त्याच्याशी निगडित शेकडो शब्द व त्यांचे ज्ञान विस्मृतीत जात आहे. कुंभार, सुतार, सोनार, लोहार, चांभार, कासार, तेली, बुरूड, कोष्टी, कोळी, पांचाळ यांसारख्या अनेक जातींनी आपले पारंपरिक व्यवसाय जवळजवळ सोडून दिले आहेत. तरूण पिढीचा या व्यवसायाशी संबंध संपत चालला असून बदलत्या संदर्भाप्रमाणे त्यांनी नव्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. या व्यवसायाशी निगडित शेकडो शब्द, ज्ञान, शहाणपण कायमचे लुप्त होत आहे. आधुनिकीकरणाचे, यांत्रिकीकरणाचे बोलींवर आक्रमण होत असून कृषिजनसमूहातील पारंपरिक ज्ञान, संस्कृती मागे पडत चालली आहे. उदा. पूर्वी विहिरींवर “मोट’ असे. अलीकडे इंजिन आले. त्याबरोबर मोटेशी निगडित कणा, धाव, चाव, नाडा, माचाड, सोंदूर, कडेपाट, वरवट, सुळका, माळ, पडनाडा, बाहुली, हाताळी, शिवळ, खिळसापती, चाकदांडी, मोरक्‍या, दारक्‍या, वाफा, दंड यांसारखे पन्नासहून अधिक शब्द व मोटेवरची गाणी लोप पावली आहेत. दुसरे उदाहरण खळ्याचे देता येईल.

मळणीयंत्राच्या आगमनाबरोबर पारंपरिक खळे नाहीसे झाले. तिवडा, पाळ, पाचुंदा, आळे, मदाण, करदोडा मारणे, वावडी, हातणी, फावडे, दात्याळ, आदुळ, काणीकवळ, डावरा, खंडी, बोंड, मात्रं, भुस्काट, वारदेव, रवंदं, चिपाड, बुचड, बनीम, सरमाड यासारखे तीसहून अधिक शब्द व गाणी नामशेष झाली आहेत. जागतिकीकरणाचे प्रतीक असणाऱ्या क्रिकेटने देशी खेळ जवळपास मारले आहेत. पिल्लुपाणी, मुरमेंढी, आबुकडुबुक, विटीदांडू, कट्टीकोडे, गदीपाणी, आंधळीमाशी, लपाछपी, चिरघुडी, जिबळ्या, सुरपारंब्या, बक्‍काबक्‍की, सरमाड कोल्हा, गोट्या, लगोरी, फुगडी, चिकट भोपळा, लंगडा जावई, झोका, चक्‍कार, आट्यापाट्या, लेझीम, खांडोळी, भोवरा, हंटर, यांसारखे भूप्रदेशानुसार बदलणारे शेकडो झिरोबजेट लोकखेळ काळाच्या उदरात गडप होत आहेत. त्यांच्याशी संबंधित कितीतरी शब्द, एक देशी क्रीडाशास्त्र व परंपरा मराठीतून कायमची संपत आहे.पारंपरिक अवजारे, हत्यारे, भांडी, जाते, दागिने, पदार्थ, वाद्ये, कपडे, वनस्पती, औषधे, रोग यांसारख्या अनेक जुन्या गोष्टी कालबाह्य होत आहेत. यामुळे बोलीभाषेतील शेकडो शब्द, ज्ञान परंपरा व एक संस्कृतीच नामशेष होत आहे. एकंदरीत वर्तमान मराठी बोली आपल्या अमूल्य भाषिक, सांस्कृतिक संचितासह हरवत चालल्या आहेत. तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

ज्ञानभाषा बनविण्याचे आव्हान

आज जागतिक भाषा असणारी इंग्रजी अकराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते चौदाव्या शतकाच्या अखेरपर्यंत फ्रेंच भाषेची बळी ठरली होती. फ्रेचांनी इंग्लंड जिंकल्यानंतर सर्व राज्यकारभार फ्रेंचमधून सुरू केला होता. त्यामुळे राज्यकारभार, व्यापार, शिक्षण, व्यवहार, न्याय अशा सर्व क्षेत्रांत फ्रेंच भाषेचे अधिपत्य स्थापन झाले व इंग्रजीची पीछेहाट झाली. तीनशे वर्षांनंतर स्थानिक लोकांनी इंग्रजीच्या वापरासाठी चळवळ सुरू केली. सतराव्या शतकात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या इंग्रजी भाषकांनी आपापल्या क्षेत्रांतील इतर भाषांमध्ये ग्रंथित झालेले सर्व ज्ञान इंग्रजीत भाषांवर व ग्रंथलेखन करून सर्वांना उपलब्ध करून दिले. त्यामुळे इंग्रजीतील ज्ञानभांडार समृद्ध झाले. भारतापाठोपाठ इस्त्रायल 1948 मध्ये स्वतंत्र झाला तेव्हा अनेक देशातले विविध भाषक ज्यू तिथं स्थानिक झाले. त्यानंतर इस्त्रायलमध्ये “हिब्रू’ या मातृभाषेचा राष्ट्रभाषा म्हणून स्विकार केला. आज हिब्रू ही इस्त्रायलची ज्ञानभाषा आहे. लिपीच्या अनेक अडचणींवर मात करून विज्ञान तंत्रज्ञानविषयक सर्व विषय हिब्रूतच शिकवले जातात आणि आपल्याकडे मराठीतून विज्ञान तंत्रज्ञानाच्या अध्ययनास विरोध होतो.

गेल्या साठ वर्षात ज्ञानभाषा म्हणून मराठीचा विकास करण्याचे प्रयत्न गांभीर्याने झालेले नाहीत. एखादी भाषा केवळ शिक्षणाचे माध्यम बनल्याने ज्ञानभाषा होत नसते. जेव्हा त्या भाषेत ज्ञाननिर्मिती होते, ज्ञान पसरवू लागते तेव्हा ती ज्ञानभाषा होते. मराठी ज्ञानभाषा बनविणे याचा अर्थ मराठीतून सर्व ज्ञानशाखांचे अध्ययन-अध्यापन करणे, या ज्ञानशाखांचे ज्या ज्या जीवनव्यवहारात उपयोजन होते त्या त्या जीवनव्यवहारातही उपयोजन करणे. मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी ज्या मराठीत बालपणापासून आपल्या प्राथमिक संकल्पनांची जडणघडण होते, त्याच मराठीत त्याचे रीतसर, औपचारिक शिक्षण झाले पाहिजे आणि त्याच मराठीत आपले सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, राजकीय, शैक्षणिक, दैनंदिन व्यवहार झाले पाहिजेत. तरच जीवनाच्या सर्व क्षेत्रांत व व्यवहारात आपल्याला ज्ञानाचे नीट उपयोजन करता येईल. कला, विद्या, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान या क्षेत्रात मूलभूत निर्मिती करता येईल.

Related posts

श्रीशब्द काव्य पुरस्कार जाहीर

दैव अनुकूल झाले, तर….

देहातील चैतन्याचे ज्ञान

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406