रानभाज्यांची ओळख करुन देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजची रानभाजी आहे टाकळा..
प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी
9403464101
भारतातील जंगली पर्वतीय भागात सुमारे 427 आदिवासी जमाती आहेत. जगभरात वनस्पतींचा 32 लाख 83 हजार प्रजाती असून भारतीय आदिवासी पंधराशे तीस पेक्षा अधिक वनस्पती दैनंदिन आहारात खाण्यासाठी वापरतात. यात प्रामुख्याने 145 कंद, 521 हिरव्या भाज्या, 101 फुल भाज्या, 647 फळभाज्या, 118 बियाणांच्या व सुका मेव्याच्या प्रजाती आहेत. आदिवासी श्रृतूमानानुसार रानभाजांचा आपल्या आहारात उपयोग करत असतात.
आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजची रानभाजी आहे टाकळा..
शास्त्रीय नाव : Cassia tora
स्थानिक नाव : तरोटा, टाकळा
उपयोगी भाग : पान
औषधी उपयोग : कफदोष, त्वचारोग, दातरोग यात उपयोगी
ही वनस्पती प्रामुख्याने पावसाळ्यात सर्वत्र उगवते. पडीक किंवा ओसाड जमीन, शेतात, बागेत, जंगलात, रस्त्याच्या कडेने कुठेही वाढते. सर्व प्रकारच्या त्वचारोगामध्ये ही वनस्पती अतिशय उपयुक्त आहे. त्वचा जड झाल्यास ही वनस्पती खाल्ल्याने विशेष उपयोग होतो. इसब ॲलर्जी सोरायसेस खरुज यासारखे त्वचा विकारही कमी होतात. पानांच्या भाजीच्या रुपात सेवन केल्याने पोटातील कृमी नष्ट होतात. दात येणाऱ्या मुलांना ताप येतो. अशा वेळी टाकळ्याच्या पानांचा काढा त्यावर नियत्रंण करतो. पित्त, ह्रदयविकार, श्वास, खोकला आदी विकारांवर पानांचा रस मधातून दिला जातो.
ही भाजी मुळात उष्ण असल्यामुळे शरीरातील वात आणि कफ दोष कमी होण्यास मदत होते. पावसाळ्यात शरीराला सुटणारी खाजही कमी करते. अर्थातच हे सर्व तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली उपाय करणं अत्यावश्यक आहे.
भाजीसाठी फुले येण्यापूर्वीची कोवळी पाने घ्यावीत. पाने स्वच्छ धुवून पाणी गळून जाऊ द्यावे, कढईत तेल टाकून कांदा परतून घ्या. मोहरीची फोडणी घ्यावी. त्यात ओली मिरची अथवा तिखट आवडीनुसार वा गरजेनुसार घालावे. हळद टाकावी. त्यानंतर त्यावर भाजी टाकून ती वाफेवर शिजू द्यावी. भाजी शिजत आली की थोडासा गुळ आणि मीठ घालावे. किसलेले ओले खोबरे घालावे. भिजवलेली तूर डाळ किंवा फणसांच्या बियांचे बारीक तुकडे ती शिजत असताना टाकल्यास भाजी अधिकच चविष्ट बनते. केवळ लसणाच्या पाकळ्यांमध्येही फोडणी घालून आणि हिंगाचा वापर करुन ही भाजी रुचकर बनविता येते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
