October 25, 2025
सुनील पांडे संपादित 'निवडक मुलाखती : तेजश्री प्रधान' या संग्रहातून अभिनेत्री तेजश्री प्रधान यांचे विचार, आठवणी, संघर्ष व कलात्मक प्रवास वाचकांसमोर येतो.
Home » तेजश्री प्रधान : अभ्यासू व्यक्तिमत्त्व….!
मनोरंजन मुक्त संवाद

तेजश्री प्रधान : अभ्यासू व्यक्तिमत्त्व….!

तेजश्रीचे हस्ताक्षर खूप सुंदर असल्याचं सांगून तिच्या शिक्षिका सांगतात, तिने हस्तलेखनाच्या अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसं पटकावली आहेत. तेजश्रीने शाळेतील एका नाटकात राक्षशीणीची भूमिका केली होती. इतकी गोड चेहऱ्याची मुलगी चक्क राक्षशीणीचा रोल करते यावर वाचकांना नक्कीच आश्चर्य वाटेल.

नागेश शेवाळकर, पुणे
मोबाईल – ९४२३१३९०७१

जान्हवी आणि शुभ्रा या दोन भूमिकांच्या माध्यमातून घरोघरी नव्हेतर स्वयंपाक घरात पोहोचलेल्या गुणी अभिनेत्रीच्या निवडक मुलाखतींचा ‘अभिनेत्री तेजश्री प्रधान’ हा संग्रह वाचण्यात आला. महाराष्ट्रातील ख्यातकीर्त लेखक सुनील पांडे यांनी मुलाखत संग्रहाचे संपादन केले असून त्यातून तेजश्रीची नायिकेशिवाय इतर खूप छान अशी माहिती वाचकांना मिळते.

प्राजक्त प्रकाशन, पुणे यांनी अत्यंत सुबक अशा स्वरूपात प्रकाशित केलेल्या संग्रहात ज्यांनी ज्यांनी तेजश्रीला बोलकं केलं त्यात संजय मोने, ज्ञानदा कदम, अतुल कुलकर्णी, सुलेखा तळवळकर, विशाल पाटील, नीलिमा कुलकर्णी, जयंती वाघदरे, अंकिता लोखंडे, अमृता कदम, नेहा जोशी, सोनाली खरे, अजय परचुरे या मान्यवरांसह कै.रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला, सेलिब्रिटी लाईव्ह यांचा समावेश आहे.

तेजश्रीच्या अभियानाची सुरुवात मुळातच ‘चेटकीण’ या शालेय जीवनात केलेल्या नाटकातील भूमिकेमुळे झाली. शाळेत असताना समूह गीतांमध्ये तेजश्रीला तिच्या उंचीमुळे सर्वात मागे उभे राहावे लागे. अनेकदा तिच्या मनात विचारही आला की, आपण अभिनयाकडे जावे का? परंतु तो विचार मनातच राहिला. परंतु, नशिबात तेही रसिकांच्या नशिबात एका सर्वगुणसंपन्न अभिनेत्रीला पाहण्याचा योग असल्यामुळे तिला अभिनयाकडे जावे लागले. त्यामुळे ‘तेजा’चा सोन्याचा लख्ख प्रकाश आज सर्वत्र पसरला आहे.

आयुष्यात वेळेला किती महत्त्व द्यायचे हे कलाकारांकडे पाहून समजते. रात्री उशिरा घरी पोहोचून केवळ दोन तास झोप घेऊन सकाळी पहिली ४-१० ची रेल्वे पकडणं म्हणजे तारेवरची कसरत! रुपाच्या सौंदर्यापेक्षा व्यक्तिरेखेला तेजश्री अधिक महत्त्व देते,

“अत्यंत सुरेख प्रचंड देखण्या मुलीला जर काम करता येत नसेल ना, तिच्या इतकं कुरूप स्क्रिनवर कोणीच दिसत नाही. तुमच्या वरवरच्या दिसण्यापेक्षा तुमचं अंतरंग म्हणा, अंतर्मन म्हणा, तुमची बौद्धिक कुवत छान पाहिजे, तरच तुम्ही छान दिसाल.”

सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिला ट्रोलिंगला सामोरं जावचं लागतं. तेजश्रीच्या ‘होणार सून मी…’ या मालिकेतील प्रेग्नंसीवर भलतेच विनोद झाले. तेजश्री म्हणते, मला त्याचा त्रास झाला नाही, उलट मी आनंद लुटला. मालिकेतील एखाद्या गोष्टीवर प्रेक्षकांचा संयम संपून ते त्याच बाबीवर विनोद करत असतील तर ती एक प्रकारची पब्लिसिटी आहे, मग ती चांगली असो वा वाईट!

तेजश्री लहानपणापासून खूप विसराळू आहे. जवळच्या अनेकांचे वाढदिवस तिला अगोदर आठवण करून देऊनही ती विसरते. अनेकदा मित्र- मैत्रिणींसोबत फिरायला जाण्याचे नियोजन करूनही तिच्या लक्षात राहत नाही. तिचा दिशांच्या बाबतीत नेहमीच घोळ होतो. एखाद्या ठिकाणी जायचं असताना चौकातून डाव्या बाजूला वळायचे सांगितले असूनही ती उजव्या बाजूला वळते.

तेजश्री लहानपणी खूप मस्ती करत असे, तशीच ती रडतही असे. तिच्या शिक्षिका, तिचे वर्गमित्र, मैत्रिणी तिच्या मस्तीबद्दल भरभरून बोलल्याचे वाचायला मिळते. शाळेच्या आठवणी सांगताना रमलेली प्रधान एक छान आठवण सांगते. शाळा भरताना विद्यार्थी आपापल्या वर्गात जाताच कार्यालयात चार-पाच विद्यार्थी माईकसमोर उभे राहून राष्ट्रगीत,वंदे मातरम् नि प्रतिज्ञा म्हणत. परंतु एकेदिवशी माईकसमोर उभ्या असलेल्या तेजश्रीसह कुणालाच प्रतिज्ञेचे शब्दच आठवत नव्हते. ‘भारत माझा देश…’ ही रोज म्हटली जाणारी प्रतिज्ञा ते पाचजण चक्क विसरल्यामुळे शिक्षकांची बोलणी खावी लागली. प्रयोगशाळेत प्रयोग करताना बाईंच्या शिकवणीकडे लक्ष नसल्यामुळे तारांबळ उडून काचेची अनेक उपकरणं फुटायची हेही तेजश्री हसत कबूल करते. स्वतः सेलिब्रिटी असणारी प्रधान आपल्या शिक्षकांना सेलिब्रिटी मानून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करते.

तेजश्रीचे हस्ताक्षर खूप सुंदर असल्याचं सांगून तिच्या शिक्षिका सांगतात, तिने हस्तलेखनाच्या अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसं पटकावली आहेत. तेजश्रीने शाळेतील एका नाटकात राक्षशीणीची भूमिका केली होती. इतकी गोड चेहऱ्याची मुलगी चक्क राक्षशीणीचा रोल करते यावर वाचकांना नक्कीच आश्चर्य वाटेल.

इतिहासाच्या अभ्यासाच्या बाबतीत तेजश्रीचे विद्यार्थी असताना फार गमतीदार मत होतं, तिच्या मते, इतिहास ही बाब फक्त चोवीस तास स्मरणात ठेवायची असते, त्यामुळे ती इतिहासाच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्रभर जागून अभ्यास करीत असे. हे सांगताना ती लहान मुलांना हे तुमच्याशी संबंधित नाही हे सांगायला विसरत नाही. अभिनयाच्या क्षेत्रात सर्व प्रकारच्या घटना घडतात. प्रत्येक वेळी समोरचा माणूस वाईट असेल असं नसतं. याबाबतीत तेजश्री स्पष्टपणे सांगते, समोरचा माणूस आपल्याशी काय वागतो, हे समोरचा माणूस ठरवत नाही. आपण ठरवतो. त्यांनी आपल्याशी कसं वागायचं आहे ते. तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडा, तुम्ही स्वतःला खूप छान सांभाळू शकता.

नैराश्य येणं स्वाभाविक आहे हे सांगून तेजश्री म्हणते, एखाद्या दिवशी तुम्हाला रडू आलं तर मोकळेपणी तेही करा. पण ते केल्यानंतर स्वतःला सांगा की, आता आपल्याला उठायचं आहे. नव्यानं उभं राहायचं आहे. थोडक्यात सुखदुःख म्हणजे सापशिडीचा खेळ आहे… कधी वर तर कधी खाली!

कलावंतांना नाटक आणि मालिका दोन्हींमध्ये काम करताना तारेवरची कसरत करावी लागते, तिथे समयसूचकता महत्त्वाची असते. एका नाटकात तेजश्रीचा प्रशांत दामले यांच्यासोबत प्रयोग सुरू असताना अचानक रंगमंचावर एक मांजर येते. दामले यांचे तिकडे लक्ष नसते तर तेजश्री घाबरून जाते परंतु तिला प्रशांतची एक सवय माहिती असते. प्रवेश सुरू असताना उद्भवलेल्या परिस्थितीचा चपखलपणे उपयोग करून ‘शो मस्ट गो ऑन’ असं वागायचं. त्याप्रमाणे तेजश्री संवादात बदल‌ करून म्हणते,”आता तुम्हाला मी नकोशी झाली आहे म्हणून माझ्या अंगावर प्राणी सोडणार आहात का?”

‘होणार सून…’ या मालिकेतील गर्भवती असलेली तेजश्री एका नाटकातही काम करत असते. एकदा प्रयोग संपताच एक आजी तिच्याजवळ येऊन म्हणते,”तू एवढ्या उड्या मारू नकोस नाटकात.”

नाटकात भूमिका करताना नायिकेला सिगारेट ओढायची सवय असते. ते सारे सिगारेट प्रकरण तेजश्रीने हातचे काहीही राखून न ठेवता सांगितले आहे. ते वाचताना वाचक मुग्ध होऊन जातो. तसेच तेजश्रीचे अनेक विचार ठाम आहेत, ते ती स्पष्टपणे मांडताना दिसते. बसमध्ये बायकांसाठी राखीव जागा ही बाब आवडत नाही. याबद्दलचे तिचं प्रदीर्घ मत वाचताना तिचा अभ्यास किती सखोल आहे हेही जाणवतं. व्यायामाबद्दल त्यातही धावण्याबद्दल, चालण्याबाबत, खाण्याच्या सवयीबद्दल, भ्रमणध्वनीचा वापर, नकारात्मक विचारसरणी इत्यादीबाबत तेजश्रीचे मतं तिच्या परिपक्व विचारांना स्पष्ट करते. तिच्या आईबाबांच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस ती कसा साजरा करते ते सारे मनोरंजनात्मक आहे.

एकंदरीत तेजश्री प्रधान यांची मुलाखत ऐकताना वाचक एका वेगळ्याच विश्वात जातो. त्यांचे स्पष्ट विचार, ठाम मतं हे नक्कीच दिशादर्शक आहेत. त्यांच्या निवडक विचारांचा खजिना वाचकांसाठी खुला केल्याबद्दल संपादक सुनील पांडे तसेच प्राजक्त प्रकाशन, पुणे यांना धन्यवाद! आणि हो, तेजश्री यांची ‘ऑस्कर’ इच्छा पूर्ण होण्यासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा!

पुस्तकाचे नाव – निवडक मुलाखती: तेजश्री प्रधान
संपादन: सुनील पांडे (९८१७८२९८९८)
प्रकाशक:प्राजक्त प्रकाशन, पुणे ☎️ 020 24469595
पाने : २४८
किंमत :३६०/-

“कदाचित माझ्या आयुष्यात मी अनेक पुरस्कार मिळवेन. कलाकार म्हणून मी खूप मेहनत घेईन. कदाचित मी ऑस्कर मिळवीन. पण तो ऑस्करचा पुरस्कार पण मी या जागी नाही ठेवणार. कारण ही जागा मला सतत सांगते की नाही अजून खूप करायचं आहे. आणि ही जागा प्रत्येकाच्या आयुष्यात खूप गरजेची आहे…”

तेजश्री प्रधान


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading