July 11, 2025
Aerial view of Kolhapur Film City with shooting sets and infrastructure, symbolizing its transformation into a cultural and cinematic hub.
Home » कोल्हापूर चित्रनगरी विकासाच्या वाटेवर
मनोरंजन

कोल्हापूर चित्रनगरी विकासाच्या वाटेवर

कोल्हापूर म्हटले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे उमदे व्यक्तिमत्व डोळ्यापुढे येते. श्री अंबाबाई, श्री जोतिबा, गड, किल्ले, जंगल, घाट, वने, धरणे, तांबडा-पांढरा आणि येथील खाद्य संस्कृती डोळ्यापुढे येते. मात्र, आता हे शहर लवकरच आणखी एका वेगळ्या उपलब्धीसाठी ओळखले जाणार आहे. ते म्हणजे कोल्हापूरची चित्रनगरी. राज्य शासनाने मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटी, हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटी प्रमाणेच कोल्हापूरच्या चित्रनगरीचा विकास करण्याचा ध्यास घेतला असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकास कार्य हाती घेतले आहे.

प्रवीण टाके, उपसंचालक (माहिती)
कोल्हापूर विभागीय कार्यालय कोल्हापूर

कोल्हापूरची चित्रनगरी नव्या जोमाने, नव्या रूपात, नव्या दमात उभी राहत आहे. कोल्हापूर आणि चित्रपट निर्मिती याचे नाते तसेच जुनेच आहे. इथल्या मातीत चित्रपट प्रेम रुजले आहे. शाहू महाराजांसारख्या कलासक्त माणसाच्या मशागतीत तयार झालेल्या या शहराने चित्रपटाशी आपले नाते कायम ठेवले आहे. शहराचे नाव इथल्या मातीत रुजलेल्या चित्रपट प्रेमामुळेही खास आहे. दिग्दर्शक, निर्माते, लेखक, तंत्रज्ञ यांच्यासाठी कोल्हापूर ही केवळ एक जागा नसून, एक “शाळा” आहे, असे वक्तव्य नुकतेच ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी राजर्षी शाहू महाराज जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना केले. त्यांच्या या विधानातून कोल्हापूरच्या चित्रसांस्कृतिक वारशाचा गौरव अधोरेखित होतो.

कोल्हापूरने भारतीय चित्रपटसृष्टीला भालजी पेंढारकर, राजा परांजपे, बाबुराव पेंटर, व्ही. शांताराम, अरुण सरनाईक, बाळकृष्ण नरके, चंद्रकांत, सूर्यकांत मांढरे, मास्तर विनायक, बाबुराव पेंढारकर, अनंत माने, सुलोचना, आशा काळे, उषा नाईक अशा कितीतरी दिग्गजांची देणगी दिली आहे. दादा कोंडके,लता मंगेशकर आणि मंगेशकर भगिनी, राजदत्त यांच्यासह दिग्गज संगीतकार, संगीतसूर्य केशवराव भोसले अशा कितीतरी नावांनी कोल्हापूरचे नाव सिने – नाटय क्षेत्रामध्ये अजरामर केले आहे. अनेक कलाकारांसाठी त्यांच्या आयुष्यात कोल्हापूर हे कलाक्षेत्राचे उगम स्थान ठरले आहे. यामध्ये प्रभात फिल्म कंपनीचा नामोल्लेख आवश्यक ठरतो. कोल्हापूरने शालीनी सिनेटोन, जयप्रभा स्टुडीओचाही एक सुवर्ण काळ अनुभवला आहे. चित्रपट कसा तयार करायचा हे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी चेन्नईपासून कराची पर्यंतची अनेक मंडळी पूर्वीच्या काळी कोल्हापूरला येत असत. गांधी पिक्चर साठी पहिले ऑस्कर मिळवलेल्या भानु आथय्या मूळच्या कोल्हापूरच्या. ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके यांची कारकीर्द ही कोल्हापुरातून सुरू झाली. एवढेच काय राज कपूर, पृथ्वीराज कपूर यांनीही भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहे. त्यामुळे कोल्हापूरचे नाव चित्रपटांपासून वेगळे करता येत नाही.

याच चित्रप्रेमाला सन्मान देताना महाराष्ट्र शासनाने कोल्हापूरमध्ये १९८५ साली कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाची स्थापना केली. करवीर तालुक्यातील मोरेवाडी येथील ७८ एकर जागेत ही चित्रनगरी उभारण्यात आली. मात्र, मधल्या काळात ही संस्था तोट्यात गेल्याने बंद करण्याचा निर्णयही घेतला गेला. पण कोल्हापूरकरांच्या मागणीला दाद देत शासनाने २००८ मध्ये पुन्हा चित्रनगरी पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला. आता मात्र कोल्हापूरची चित्रनगरी नफ्यामध्ये घोडदौड करत आहे. या चित्रनगरीला आता वेध लागले आहे, मोठ्या बिग बजेट निर्मितीच्या कार्याचे.

चित्रनगरीचा पुनर्विकास करण्यासाठी कोल्हापूर चित्रनगरी महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार एमआयडीसीने पायाभूत सुविधांच्या विकासाला गती दिली आहे. यामध्ये अंतर्गत रस्ते, शूटिंगसाठी रेल्वे स्टेशन, चाळ, वाडा, मंदिर आदी स्थळांची निर्मिती करण्यात आली आहे. शुटींगसाठी ही स्थळे उभी झाली आहे. दोन मोठे स्टुडिओ या ठिकाणी उभे झाले आहे. तंत्रज्ञ, कारागीर, कलाकार व मान्यवरांसाठी दोन विश्रामगृहांचीही बांधणी झाली आहे.

या चित्रनगरीमध्ये गेल्या तीन वर्षांत असा कोणताही दिवस असा गेलेला नाही, ज्या दिवशी शूटिंग झालेले नाही. मालिका, सिनेमे, प्रादेशिक चित्रपट यांच्या चित्रीकरणाने हे स्थळ सदैव गजबजलेले असते. मुंबईतील शूटिंगला लागणारी परवानगी प्रक्रिया, खर्च आणि गर्दी यामुळे आता निर्माते पर्याय शोधत आहेत. अशा वेळी कोल्हापूरसारखी चित्रनगरी हा एक उत्कृष्ट पर्याय बनत आहे. येथील मोठ्या आकाराचे सेट, खुली जागा, कमी खर्च, स्थानिक सहकार्य आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे दक्षिण भारतातील निर्मातेही येथे येऊ लागले आहेत.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते चित्रनगरीतील नव्या सुविधांचे उद्घाटन व लोकार्पण होत आहे. यामध्ये भविष्यातील आवश्यकतेनुसार अत्याधुनिक पोस्ट-प्रोडक्शन स्टुडिओचेही भूमिपूजन करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ आदींचीही उपस्थिती यावेळी असणार आहे. यामुळे या प्रकल्पास राजकीय पातळीवरही सक्रिय पाठबळ मिळत आहे.

पूर्वीचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकल्पाकडे विशेष लक्ष दिल्यामुळे पायाभूत सुविधा विकसित झाल्या. ही सुरुवात आज पुढच्या टप्प्यात प्रवेश करत आहे. कोल्हापूरची ही चित्रनगरी आता केवळ एक चित्रपटस्थळ न राहता, रोजगार निर्मितीचे मोठे केंद्र बनत आहे. एक पर्यटन स्थळ बनत आहे. एका प्रकल्पासाठी हजारो जणांची गरज भासते. त्यामुळे कलाकार, तंत्रज्ञ, सेट डिझायनर, खानपान, हॉटेल व्यवसाय, वाहनसेवा, सुरक्षा, साउंड, लाईटिंग अशा अनेक सेवा आणि व्यवसायांना यातून चालना मिळत आहे.

हे सर्व लक्षात घेतले तर स्पष्ट होते की कोल्हापूर चित्रनगरीचा विकास हा आता फक्त स्वप्न राहिलेला नाही, तर तो प्रत्यक्षात आकार घेत आहे. गोरेगाव फिल्मसिटी किंवा रामोजी फिल्मसिटीप्रमाणे कोल्हापूर चित्रनगरीही भविष्यात एक नवीन पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येईल. कोल्हापूरच्या विकासात आणि सांस्कृतिक ओळखीत ही चित्रनगरी महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. एकूणच, कोल्हापूर चित्रनगरी विकासाच्या वाटेवर असून ती लवकरच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आर्थिक नकाशावर ठळकपणे उमटणार आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading