शिवाजी विद्यापीठातील श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्यावतीने कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया : भाग २ या पुस्तकाचे प्रकाशन २३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता होत आहे. या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांचे स्त्री सक्षमीकरणः आव्हाने आणि संधी या विषयावरील व्याख्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. भारती पाटील यांचा या पुस्तकातील संपादकीय लेख…
गेल्या ३०-४० वर्षांत, स्त्रीवादी इतिहास लेखनाने इतिहासाची मांडणी स्त्रीवादी दृष्टिकोनातून करायला सुरुवात केलीच, शिवाय स्त्रियांचा इतिहास, स्त्रियांचे इतिहासातील योगदानही मांडायलाही सुरुवात केली. History केवळ ‘His’ (त्याची) ‘story’ (कथा) नसून ‘Her’ (तिची) ‘story’ (कथा) सुदा आहे. याचे भान याच स्त्रीवादी इतिहासलेखनाने दिले. यातूनच इतिहासकार, स्त्रियांचे इतिहासातील योगदान मांडू लागले, स्त्रीवादी दृष्टिकोनातून इतिहासाची पुनर्माडणी होऊ लागली. नवे संदर्भ शोधले जाऊ लागले, तर जुने पुन्हा तपासले जाऊ लागले. परिणामी, तोपर्यंत अंधारात राहिलेल्या स्त्रियांचे कार्यकर्तृत्व उजेडात येऊ लागले. सुरुवातीला अभिजन स्त्रियांचा आणि हळूहळू तळागाळातील स्त्रियांचा इतिहास मांडला जाऊ लागला. या इतिहास लेखनाने इतिहासाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिले. अन्यथा, अनेक स्त्रियांचे इतिहासातील योगदान झाकोळलेले राहिले असते. आजच्या काळात स्त्रियांचे विशेषतः तळागाळातील, अल्पसंख्याक स्त्रियांचे योगदान दडपून टाकण्याचे जेव्हा प्रयत्न होत आहेत, तेव्हा ‘स्त्रियांचा इतिहास’ अधिक ठळकपणे मांडण्याची गरज निर्माण झाली आहे.
आपले कर्तृत्व सिद्ध केलेल्या स्त्रियांचा इतिहास समाजापुढे आला तर त्यातून दोन गोष्टी साध्य होतील. एक म्हणजे, कर्तृत्व सिद्ध केलेल्या स्त्रियांना इतिहासामध्ये योग्य श्रेय देता येईल, योग्य स्थान देता येईल. दुसरे म्हणजे, वा कर्तृत्ववान स्त्रियांकडून नव्या पिढीतील स्त्रिया, तरुण मुली प्रेरणा घेऊन आपापल्या आयुष्यात काही भरीव समाजोपयोगी कार्य करतील. कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया : भाग २ हे पुस्तक या प्रयत्नाचाच एक बिंदू आहे.
कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया : भाग २
ब्रिटिश कालखंडात कोल्हापूर हे स्वतंत्र संस्थान असले, तरी भारतीय राष्ट्रीय चळवळीचे धुमारे संस्थानापर्यंत पोहोचत होते. त्यामुळेच येथील अनेक लोक ब्रिटिशविरोधी लढ्यात सहभागी होत होते. यामध्ये काही स्त्रियांनीही महत्त्वपूर्ण भूमिका पार पाहून इतिहासाला त्यांची नोंद घेण्यास भाग पाडले. त्यापैकी काही महत्त्वाच्या स्त्रियांचे योगदान प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट केले गेलेले आहे.
जयाबाई हविरे आणि भागीरथीबाई तांबट यांच्याविषयी डॉ. छाया पोवार यांनी योग्य पुराव्यांसह लहान-सहान तपशील मांडत लेख लिहून त्यांना योग्य न्याय दिला आहे असे मानले जाते की विळीतील भूमिका राहिली आहे. परंतु कोल्हापूरमधील जयाबाई हविरे आणि भागीरथीबाई अतिशय अलौकिक होते. विशेषत: त्यांनी ब्रिटिश अधिकारी विल्सन यांच्या पुतळ्याला डांबर फासणे ही एक अत्यंत देदीप्यमान अशी घटना होती. या दोन्ही धाडसी स्त्रियांचा परिचय आपल्याला या पुस्तकाद्वारे होईल, स्वातंत्र्य दृष्टिक्षेपात येताच भारताची नवीन पिढी घडवणे, त्यांना योग्य शिक्षण देणे हे एक मोठे आव्हान होते. त्यास प्रतिसाद देत माईसाहेब बावडेकर यांनी कोल्हापुरात बालशिक्षणाचा श्रीगणेशा केला. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे उच्च शिक्षण मिळावे यासाठी रत्नमाला घाळी आणि रजनीताई मगदूम यांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या आणि अतिशय नेटाने चालवल्या. याच उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात बुद्धिमत्तेच्या व संशोधनाच्या जोरावर प्र-कुलगुरू पदापर्यंत मजल मारलेल्या प्रा. डॉ. माया पंडितही याच कोल्हापूरच्या मातीत वाढलेल्या, रुजलेल्या या सर्व स्त्रियांनी कोल्हापूरच्या शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला.
कोल्हापूरला करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी आणि छत्रपती जिजाबाई राणीसरकार यांचा समृद्ध वारसा लाभला आहे. छत्रपती ताराराणींनी अतुलनीय शौर्य दाखवत औरंगजेबाशी ७ ते ८ वर्षे कडवी झुंज देऊन संस्थानाचा विकास केला. तर जिजाबाई राणीसरकारांनी संस्थानाचे रक्षणच केले नाही तर अत्यंत कुशलतेने प्रशासकीय घडी बसवली. या दोघींनी रचलेला राज्यकारभाराचा वसा स्वातंत्र्यानंतर कोल्हापुरातील राजकारणातील स्त्रियांनी पुढे नेला. विमलाबाई बागल हे त्यापैकी एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व.
जेव्हा स्त्रिया फारशा राजकारणात येत नव्हत्या, त्या काळात सरोजिनीताई खजिरे यांनी राजकारण, समाजकारण, सहकार, बँकिंग या क्षेत्रात भरीव योगदान दिले. १९९० सालानंतर स्त्रियांचा राजकारणात काही प्रमाणात प्रवेश होऊ लागला, त्यास ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीने गती मिळाली. परंतु विधानसभा व लोकसभा या पातळीवर आरक्षण नसतानाही स्व. बाळासाहेब मानेंच्या सूनबाई निवेदिता माने यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांच्या राजकारणातील प्रवेशाने संपूर्ण जिल्ह्याला, राज्याला एक उत्तम स्त्री नेतृत्व मिळाले. आपल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांना ३० % आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी १९९० साली घेतला. पुढे १९९३ साली संपूर्ण देशपातळीवर स्त्रियांना ३३ % आरक्षण मिळाले ते ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीने. १९९० साली महाराष्ट्र पातळीवर स्त्रियांना आरक्षण लागू झाल्यावर कोल्हापूरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे स्वाभाविकच मोठ्या प्रमाणात स्त्रियांना राजकारणात प्रवेश केला. १९९० च्या दशकात ज्या स्त्रियांनी राजकारणात प्रवेश करून आपले वेगळेपण सिद्ध केले ते भारती पोवार आणि हसीना फरास यांनी. भारती पोवार यांचा मूळ पिंड चळवळीचा. त्यामुळे चळवळीतून तयार झालेले त्यांचे तेजस्वी नेतृत्व राजकारणात आजही तळपते आहे. कुटुंबाचा राजकीय वारसा असूनही हसीना फरास या कोल्हापूरच्या महापौर झाल्यावर, आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू शकल्या ते त्यांच्यातील स्वतंत्र प्रतिभेमुळे आणि नेतृत्वगुणांमुळे, त्यात कोल्हापूर जिल्ह्याच्या आर्थिक विकासात येथील उद्योग, शेती, सहकार या सर्वांचाच वाटा महत्त्वाचा राहिला आहे. या सर्व क्षेत्रांत प्रामुख्याने पुरुषांचेच वर्चस्व राहिले आहे.
कोल्हापुरातील काही स्त्रियांनी मात्र येथील अर्थकारणात यशस्वी घोडदौड केली आहे. वारणानगरला जे सहकारी संस्थांचे जाळे निर्माण झाले, स्त्रियांची भागीदारी महत्त्वपूर्ण राहिली आणि त्याचे नेतृत्व केले शोभाताई कोरे यांनी. विविधांगी जबाबदाऱ्या पार पाडत शोभाताईंनी या परिसरातील स्त्रियांच्या कौशल्यांना व गुणांना वाव दिला, ज्यातून या स्त्रिया स्वयंपूर्ण झाल्या. स्त्रियांना स्वयंपूर्ण करण्यासाठीच विजयमाला देसाई यांनी महिलांचा भारतातील पहिला साखर कारखाना कोल्हापूर जिल्ह्यात स्थापन करून क्रांतिकारी पाऊल उचलले. त्यांची त्यामागची प्रेरणा काय होती, त्यांना अडथळे काय आले हे समजून घेणे प्रेरणादायी ठरेल. स्त्रियांना स्वयंसिद्ध करणे हा उद्देश उराशी बाळगून कांचनताई परुळेकर या आजन्म संघर्ष करत आहेत. हजारो स्त्रियांना त्यांनी केवळ आपल्या पायावरच उभे केले नाही, तर त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला आहे.
भारताच्या रिझर्व्ह बँकेत डेप्युटी गव्हर्नर पदावर काम केलेली व्यक्ती आहे आणि तीही कोल्हापूरची सून आहे याचा सर्व कोल्हापूरकरांना सार्थ अभिमान असणे स्वाभाविक आहे. डॉ. उषा थोरात हे या व्यक्तीचे नाव आहे. हे वेगळे सांगायला नको. त्यांचा या पदापर्यंत पोहोचण्याचा प्रवास अतिशय प्रेरक असून, लेखिकेने तो अतिशय समर्पकपणे मांडला आहे.
‘तेज कुरियर्स’ या कंपनीने संपूर्ण भारतात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या कंपनीच्या स्थापनेपासून तिला नावारूपाला आणण्यापर्यंत कठोर परिश्रम घेतले ते साधनाताई घाटगे यांनी. त्यांचे इतर उद्योगामधील योगदानही, त्यांचे कर्तृत्व सिद्ध करते. माहिती-तंत्रज्ञानाने गेल्या ३०-४० वर्षांत प्रचंड क्रांती केली, उद्योग, सेवा क्षेत्रात नवे आयाम निर्माण केले. मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरातच त्याचा विस्तार झाला. परंतु माहिती व तंत्रज्ञान वा क्षेत्रात कोल्हापुरात नवी ओळख निर्माण केली. ती अश्विनी दानिगोंड यांनी. त्यांचा आजपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहेच, पण त्यांची जिद्द त्यांना यशाची नवनवीन शिखरे गाठण्यास प्रेरणा देणारी आहे.
डाव्या पक्षांचे जाळे असणारा जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची सुरुवातीस ओळख होती. येथे कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, लाल निशाण पक्ष इत्यादी पक्षांचा प्रभाव होता. स्वाभाविकच कोल्हापूरच्या मुशीतून डाव्या विचारसरणीच्या स्त्रिया तयार झाल्या. या स्त्रियांनी पक्षाचा, चळवळीचा झेंडा हाती घेतलाच, शिवाय स्त्रियांचे प्रश्नही हाती घेतले. सुमित्राताई पाटील, माई ऐतवडेकर, ऊर्मिलाकाकी सबनीस, सुशीलाताई कुलकर्णी, इंदुताई सावंत, सुमन पाटील या त्यापैकी काही तळपत्या तारका. या स्त्रियांचा वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय जीवनाचा पट हा त्यांच्या संघर्षाची, त्यागाची, कर्तृत्वाची साक्ष देणारा आहे.
१९७५ हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून भारतात व सर्व जगभर साजरे केले गेले. त्यानंतर भारतातील स्त्री चळवळीला नवे धुमारे फुटू लागले. नवनव्या स्त्री संघटना आकाराला येऊ लागल्या. त्यांनी स्त्रियांचे विविध प्रश्न हाती घेत स्त्रियांचे जगणे सुसह्य करण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर तर स्त्रियांच्या प्रश्नांबाबत सुरुवातीपासूनच संवेदनशील होते. त्यामुळेच इथल्या काही कार्यकर्त्या पुढे सरसावल्या आणि त्यांनी स्त्री प्रश्नांना संघटनात्मक पाया पुरविला. अन्यायग्रस्त स्त्रियांना मदतीचा हात देण्यासाठी महिला दक्षता समिती स्थापन झाली. शकुंतला पाटील, सुचेताताई कोरगावकर, आशा अपराद यांच्या प्रयत्नांमुळे महिला दक्षता समितीने स्त्रियांच्या मनात विश्वास निर्माण केला.
दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात देवदासी प्रथा मोठ्या प्रमाणात सुरू होती. या देवदासी स्त्रियांचे जीवन अतिशय दुर्धर होते. त्यांना संघटित करून मदतीचा हात दिला तो साधनाताई झाडबुकेनी. बालविवाह आणि स्त्रियांवर होणारे अन्याय यांना वाचा फोडली, रुपा शहा यांच्या ‘दिलासा’ या संस्थेने. तर येथील मोलकरणींना संघटित करून त्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष केला तो सुशीलाताई यादव यांनी. या सर्व कार्यकर्त्या स्त्रियांनी इतके भरीव काम केले की कोल्हापूरला त्यांच्यामुळे एक ओळख मिळाली.
‘हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड्’ ही देखील अशीच एक संस्था, जिने राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविला. ही संस्था स्थापन करणाऱ्या नसीमा हुरजूक उर्फ दीदी आयुष्यभर लढल्या अपंगांना अभिमानाने व आत्मनिर्भरतेने जगता यावे यासाठी. कोल्हापूर आणि परिसरातील अनाथ, निराधार बालकांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरलेल्या अनुराधा भोसले यांनीही आपल्या आयुष्याचे ध्येय मानले ते या मुलांना अन्न, वस्त्र, निवारा पुरवणे. त्यातूनच ‘अवनि’ संस्थेचा जन्म झाला. पण अनुराधाताईच्या अथक परिश्रमातून आणि दूरदृष्टीतून त्यांच्या संस्थांचा पसारा इतका वाढला की त्यांची राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली.
मध्यमवर्गीय स्त्रियांना संघटित करून त्यांच्या माध्यमातून संस्था उभारण्याचे अतिशय अवघड काम करणाऱ्या आहेत अनुराधा सामंत. स्त्रियांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करणे, पर्यावरणासंबंधी जागृती करणे, स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे करणे, त्यांचा सर्वांगीण विकास करणे ही उद्दिष्टे घेऊन त्यांनी स्थापन केलेली संस्था आज यशस्वी वाटचाल करत आहे.
१९९० च्या दशकात कोल्हापूरचे नाव गाजले ते वाशी गावातील दारू बंदी आंदोलनामुळे, याचे नेतृत्व करत होत्या, पार्वतीबाई माळी. अल्पशिक्षित पार्वतीबाई गावच्या सरपंच झाल्या आणि त्यांच्यात एकवेगळेच स्फुरण चढले. त्यांनी स्त्रियांच्या आयुष्याची धूळदाण करणाऱ्या दारूला यशस्वीपणे हद्दपार केले. त्यांचा लढा अनेक वर्षे राज्यभरातील दारूबंदी चळवळीला प्रेरणा देणारा ठरला. फासेपारधी ही जमात समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटक असणारी, गुन्हेगारीचा चुकीचा ठपका असणारी जमात. या जमातीच्या सर्वागीण उत्कर्षासाठी झटणाऱ्या मालुबाई काळे यांचे काम त्यांच्या जमातीपुरते मर्यादित असले तरी, त्यांचे कर्तृत्व मात्र मोठे आहे.
पुरुषांचे क्षेत्र म्हणून समजल्या जाणाऱ्या क्षेत्रामध्ये नाभिक समाजाच्या शांताबाई यादव यांनी बिनदिक्कत पदार्पण केले आणि उदरनिर्वाहासाठी त्या पुरुषांची दाढी करू लागल्या, केस कापू लागल्या. असे क्रांतीकारी कार्य करणाऱ्या शांताबाईही कोल्हापूर जिल्ह्यातीलच.
कोल्हापूर जिल्ह्यातील या सर्व कर्तृत्ववान स्त्रियांना आपल्या ध्येयाचे यशोशिखर गाठताना खाचखळग्यातून जावे लागले. यापैकी काहींना घरचा भक्कम पाठिंबा होता, तर काहींनी शून्यातून आपले कार्य उभे केले. एक स्त्री समाजात वावरताना त्यांना कधी संकटे झेलावी लागली, तर कधी समाजाच्या चांगुलपणाने त्यांना साथ दिली. पण या सर्व स्त्रियांची वैचारिक बांधिलकी, प्रबळ होती. त्यांच्या कार्याला पक्के नैतिक अधिष्ठान असल्यामुळे त्या आपला कार्यविस्तार करू शकल्या.
वास्तविक, ज्या स्त्रियांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे, त्यांच्या पलीकडेही काही स्त्रिया असतील, आहेत ज्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केलेले आहे. परंतु पुस्तकाची मर्यादा लक्षात घेता सर्वांचाच समावेश करता आला नाही. इथून पुढच्या काळात त्यांची नोंद इतिहासामध्ये निश्चितच घेतली जाईल.
कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया भाग-२ हे पुस्तक, कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रियांची इतिहासामध्ये नोंद घेतली जावी या उद्देशाने तयार केलेले आहेच. परंतु याशिवाय स्थानिक इतिहासाच्या अभ्यासासाठीही हा महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरेल अशी अपेक्षा आहे. वाचक या पुस्तकाचे निश्चितच स्वागत करतील !
- प्रा. (डॉ.) भारती पाटील
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
