February 22, 2025
Arya Bagwe poem Surrogate Mother wins first place
Home » आर्या बागवे यांच्या ‘सरोगेट आईचा पान्हा ‘ कवितेस प्रथम क्रमांक
काय चाललयं अवतीभवती

आर्या बागवे यांच्या ‘सरोगेट आईचा पान्हा ‘ कवितेस प्रथम क्रमांक

राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत कवयित्री आर्या बागवे प्रथम
अभिनेते अनिल गवस यांच्या उपस्थितीत गौरव

कणकवली – एकता कल्चर मुंबईतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत त्रिंबक येथील कवयित्री आर्या बागवे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. ‘सरोगेट आईचा पान्हा ‘ या कवितेसाठी या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाने बागवे यांचा गौरव करण्यात आला आहे.

सरोगेट आईचा पान्हा

उजवतेस तुझी कुस
वापर करून आपल्याच शरीराचा
मातृत्त्वाच्या सुखाची आस
विचार नसतो बेढब होण्याचा
किंवा ममतेचा पान्हाही
आटून टाकण्याचा

तरीही करतेस दान
तुझ्या रक्तामासाचं
आणि रिती करतेस कूस
तुझ्याही नकळत
नऊ महिनेच फक्त तुझा
अधिकार असतो
तुझ्याच रक्त मासाच्या गर्भावर
आणि नंतर ...

नात्यांची जाण नसलेल्या पिल्लाला
देऊन टाकतेस तू छायेसाठी
आसुसलेले असतात जिथे
कायद्याच्या चौकटीतले हात
चिमण्याला पाखर घालण्यासाठी

पण जन्म तर तुझ्याच उदरातला ना !
काय वाटत असेल तुला ?
कायद्याच्या आई-बाबाकडे
कोवळा अंकुर देताना ?

कधी विचारलंस का स्वतःला ?
सरोगेट मदर म्हणवून घेताना
भावनांचा पदर ओलावत नाही का हृदयाला ?
फुटत असेलच ना पान्हा
बाळ हमसून रडताना ?

वाटतं का तुला धावत जाऊन,
कुरवळावे बाळाला धरून छातीशी
आणि करून द्यावी वाट मोकळी
पान्ह्याला आणि..आणि अश्रूंनाही !

कळलं असेलच तुला आतापर्यंत
नाही समजत कायद्याला
मायेची ती हळवी भाषा
वजन असते तिथे
कागदावरच्या कोरड्या अक्षरांना
तिथे कोणाचे प्रेम कमी,
कोणाचे जास्त
हा प्रश्नच नसतो मुळी

तुझ्या वात्सल्याचे वजन
तराजूत त्या
जास्त भरले तरी
विसरू नकोस तू
तूच दिलीस
तुझी ठेव गहाण
कोणत्याही जामिनाशिवाय
परत कधीही न घेण्यासाठी
परत कधीही न घेण्यासाठी !

आर्या बागवे

मुंबई गिरगाव साहित्य संघ येथे मुंबई एकता कल्चर अकादमीचा वार्षिक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते अनिल गवस यांच्या प्रमुख उपस्थितीत कवी शिवाजी गावडे यांच्या हस्ते सदर पारितोषिकाने कवयित्री आर्या बागवे यांना गौरविण्यात आले.

यावेळी एकता कल्चर अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव, स्त्रीवादी कार्यकर्त्या ज्योती म्हापसेकर, चित्रकार प्रदीप म्हापसेकर, नृत्य दिग्दर्शक सदानंद राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

आर्या बागवे या गेली काही वर्ष सातत्याने निष्ठेने कविता लिहीत असून त्यांना यापूर्वी विविध काव्य स्पर्धेत पारितोषिकही प्राप्त झाली आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्गच्या साहित्या चळवळीतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading