June 19, 2024
Development Of Konkan By Conservation of Biodiversity
Home » World Environment Day : कोकणचा जैवविविधता संवर्धनातूनच विकास
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

World Environment Day : कोकणचा जैवविविधता संवर्धनातूनच विकास

एकीकडे सह्याद्रीचे राकटकडे, सदाहरितपासून पानझडी सारखी विविध श्रेणीतील जंगलं आणि दुसरीकडे नदी, खाडी किनारे, समुद्र, कातळाचे सडे यांनी वसवलेली सपाट जमीन. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर अशा प्रकारची सर्व भूरूपे या जिल्ह्यात संख्येने आढळून येतात. अशा विविधतेने नटलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या जैवविविधतेचा पर्यावरणाचा आणि नव्याने निर्माण होत असलेल्या काही समस्यांचा धांडोळा आपण जागतिक पर्यावरण दिन 5 जून च्या निमित्ताने घेऊया.

प्रतिक मोरे

निसर्गसंपदेने भरलेल्या कोकण भूमीतील निसर्गाची ओळख अशी लेखात करून देणे खूपच औपचारिक आणि रुक्षपणाचं वाटतं कारण कोकणात नेहमी राहणाऱ्यालाच नव्हे तर कधी एखादा दिवस आलेल्या पर्यटकाला सुद्धा इथल्या विविध निसर्ग अविष्कारांचे दर्शन सहजपणे घडते. कोकण म्हणजे पश्चिमेचा अरबी समुद्र आणि पूर्वेच्या सह्याद्री पर्वतरांगा यांच्यात वसलेली चिंचोळी सुवर्णभूमी. भगवान परशुरामांनी समुद्रामध्ये बाण मारून समुद्र मागे हटवला आणि आणि यातून जी भूमी सागराच्या बाहेर आली ती म्हणजे कोकण अशी एक आख्यायिका सांगितली जाते.

एकीकडे सह्याद्रीचे राकटकडे, सदाहरितपासून पानझडी सारखी विविध श्रेणीतील जंगलं आणि दुसरीकडे नदी, खाडी किनारे, समुद्र, कातळाचे सडे यांनी वसवलेली सपाट जमीन. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर अशा प्रकारची सर्व भूरूपे या जिल्ह्यात संख्येने आढळून येतात. अशा विविधतेने नटलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या जैवविविधतेचा पर्यावरणाचा आणि नव्याने निर्माण होत असलेल्या काही समस्यांचा धांडोळा आपण जागतिक पर्यावरण दिन 5 जून च्या निमित्ताने घेऊया.

ॲमेझॉन ची जळणारी जंगले, ऑस्ट्रेलियामध्ये लागणाऱ्या बुश फायर, युरोपीयन देशांमध्ये पडलेली कडाक्याची थंडी, सागरामध्ये सततची उठणारी चक्रीवादळ, आफ्रिकेच्या मरूद्यानातून उठलेली टोळधाड, आणि दुसरीकडे दुष्काळ, वणवे, कोरोना सारख्या साथी आणि रोगराई. एकाच वेळी अशा घडणाऱ्या घटना पाहिल्या की जाणवतं यातलं सगळंच काही निसर्गनिर्मित नक्की नाही.‘

वन्यजीव नष्ट होत असल्याच्या बातमीला आपण हिंगदेखील लावत नाही. समजा, ६० टक्के मानवजात नष्ट झाली असती तर उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका व चीन हे रिकामे झाले असते. अशा सातत्याने चालू असलेल्या विनाशामुळे आपण झोपेत टकमक टोकाकडे चाललो आहोत.

माइक बॅरेट

कार्यकारी संचालक,
वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड’

दरवर्षी अनेक प्रजाती होताहेत लुप्त

जीवशास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, पर्यावरणाच्या विनाशामुळे दरवर्षी २००० प्रजाती (दररोज ५.४) नष्ट व लुप्त (एक्स्टिन्क्ट) होत आहेत. अ‍ॅमेझॉन सदाहरित अरण्यातील अग्निसंहारात असाच लाखो जीवांचा विनाश झाला होता. मागील वर्षी अलास्कातील आगींमुळे १६ लक्ष हेक्टर जंगल, रशियाच्या सायबेरियातील १० लक्ष हेक्टर जंगल व इंडोनेशियामधील ११ लक्ष हेक्टर जंगलाची राखरांगोळी झाली. नागरीकरण व औद्योगिकरणामुळे आणखीन जमीन मिळवण्यासाठी जंगलांवर टाच येण्याचा वेग वाढतच चालला आहे. त्यातून वन्यजीव नागरी वसाहतींकडे येऊ लागले. या संघर्षांत प्राण्यांची हार अटळ आहे. श्रीलंकेत कीटकनाशकांमुळे शेकडो हत्ती मरत आहेत. आपल्याकडे सुद्धा काही परिस्थिती वेगळी नाही.

प्राण्यांचे स्थलांतर नवी समस्या

गेल्या काही वर्षात वन्य प्राणी आणि माणूस यांच्यात होणाऱ्या संघर्षाच्या विविध घटना पाहिल्या तर ही परिस्थिती प्रकर्षाने जाणवत राहते. काही दिवसांपूर्वी गणेशगुळे येथे ये जा करणाऱ्या वर होणारे बिबट्याचे हल्ले, अगदी गावखडी किंवा गुहागर इथल्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यंत वाढलेलं गव्यांचे भ्रमणक्षेत्र, बिबट्यांच्या मानवी वस्तीत येण्याच्या आणि पाळीव जनावरांवर हल्ले करण्याच्या वाढलेल्या घटना, रान कुत्र्यांचे फिरणारे कळप, खवले मांजरासारख्या आंतरराष्ट्रीय दृष्ट्या तस्करी होणाऱ्या प्राण्यांच्या शिकारी आणि तस्करीचा घटना यांनी रत्नागिरी जिल्हा ढवळून निघाला आहे. वनविभाग त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न करत असला तरी या प्राण्यांचे स्थलांतर आणि होणारे शेतीचे नुकसान हा प्रश्न हाताबाहेर गेला आहे.

वादळांना रोखण्यासाठी कांदळवन विकास

सह्याद्रीच्या जंगलांमध्ये तृणभक्षी प्राण्यांचे घटलेले प्रमाण आणि त्यामुळे ढळलेला पर्यावरणीय समतोल हे या घटनांमागचे मुख्य कारण मानले जात आहे. नुकतेच बंगालच्या उपसागरात आलेले अंफान नावाचे वादळ तिथल्या सुंदरबन म्हणजेच कांदळवन किंवा खारफुटी जंगलाने रोखून धरले होते अशी माहिती मिळते आहे. कोकण किनारपट्टीवरतीसुद्धा चालू असलेल्या निसर्ग वादळाची तीव्रता रोखण्यामध्ये ही कांदळवन मोलाची भूमिका निभावतील अशी शक्‍यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी या कांदळवनांची चाललेली तोड आणि भराव टाकून जमिनी हस्तगत करण्याचे होणारे प्रयत्न हेसुद्धा दुर्लक्षित करता येण्यासारखे नाही. या कांदळवनमध्येच अनेक प्रजातीचे मासे, खेकडे आणि कोळंबी आपली पिल्ले देण्यासाठी आणि खाद्यासाठी अवलंबून असल्यामुळे त्यांची घटलेली संख्या ही मत्स्यव्यवसायावरती परिणाम करणारी ठरते. समुद्रातील पर्ससिन मासेमारीवर सुद्धा नियंत्रण ठेवण्यात आले नाही तर मत्स्य दुष्काळाचा प्रश्न सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यातसमोर आवासून उभा राहिला आहे.

पर्यावरण पूरक पर्यटनाची गरज

पर्यटनाच्यादृष्टीने विचार केला तर रत्नागिरी जिल्हा हा बऱ्याच प्रमाणात धार्मिक स्थळांवर ती अवलंबून आहे. मार्लेश्वर, गणपतीपुळे, परशुराम अशा ठिकाणांमुळे पर्यटकांचीही जरी असली तरी त्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे येथील समुद्र किनारे खाड्यांचे बॅकवॉटर आणि तेथील परिसराचे सुशोभीकरण हे पर्यावरणाची काळजी घेऊन केले तर त्यातील पर्यटन सुद्धा वाढीस लागू शकते. आंजर्ले, वेळास येथील कासव महोत्सव चिपळूणमधील क्रोकोडाईल सफारी या पर्यावरण पूरक पर्यटनाची उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत.

कातळ सड्यावरील जीवसृष्टी संवर्धनाची गरज

याच बरोबर कोकण किनारपट्टीला समांतर असणारे कातळाचे भव्य सडे गेल्या काही वर्षात सातत्याने चर्चेत येत आहेत. नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी, जैतापूरचा अणुविद्युत प्रकल्प ,आंबोळगड आयलोग पोर्ट आणि चंपक मैदान येथील प्रस्तावित मँगो पार्क ही सर्व कातळ सडे जमिनीची उदाहरणे असून येथील जमिनीची नोंद सरकार दरबारी पडीक जमीन म्हणून करण्यात आली असल्याने येथे विनाशकारी प्रकल्पांना चालना मिळण्याची शक्यता आहे. परंतु वास्तविक दृष्ट्या पावसाळ्यामध्ये या कातळे सड्यांवर फुलणारी जीवसृष्टी कासच्या सौंदर्याचा सुद्धा मागे टाकतील अशी फुलं आणि वनस्पती यांच्या मात्र पर्यटन दृष्ट्या अजूनही उपयोग करून घेण्यात आलेला नाही. अनेक दुर्मिळ वनस्पती तर फक्त या सड्यावर आढळून येतात. भुईचक्र दिपकाडीं अशा वनस्पती जर हे सडे नष्ट झाले तर जगाच्या पाठीवरून पूर्णतः नामशेष होतील त्यामुळे या सड्यांचे संवर्धन लोकसहभागातून आणि लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊन जर करण्यात आले तर हे विकासाचे एक योग्य मॉडेल म्हणून पुढे येऊ शकते.

कोकणची जैवविविधता सुखावणारी

कोकणात गेल्या काही वर्षांत निसर्गप्रेमी पक्षी निरीक्षक आणि फोटोग्राफर्स यांची वाढलेली संख्या आणि त्यांनी विविध माध्यमातून पुढे आणलेलं इथलं जैवविविधतेचे वैभव ही एक सुखावणारी बाब पुढे आली आहे. त्यामुळे येथील जैव विविधतेने नटलेली अनेक ठिकाणी आणि पारंपारिक दृष्ट्या वर्षानुवर्षे संरक्षित असलेल्या देवराया यांचं संवर्धन होण्यास हातभार लागला आहे. शेवटी कोकणी माणूस आपली पारंपरिक शेती, आपली आईप्रमाणे असणारी जमीन आणि नारळी पोफळीच्या बागा यातच रमणारा असल्यामुळे पर्यावरणाचा विनाश झाला तर येथील लोकांचे शहराकडे होणारे स्थलांतर ही वाढणार आहे.

आत्मनिर्भर गाव हेच वैभव

कारोना व्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर ही बाब मोठ्या प्रमाणावर लक्षात आली. कोकणातील बरीच गावे ही दूध, पालेभाजी अशा अत्यावश्यक सेवांच्या दृष्टीने स्वयंपूर्ण असल्यामुळे इथे लॉकडावून चा परिणाम तसा फारसा जाणवला नाही. गावांची अर्थव्यवस्था ही त्यांच्या स्वयंपूर्णतेवर अवलंबून असल्यामुळे येथील जनमानसाला बसलेला फटका त्यामानाने कमी आहे आणि म्हणूनच अशी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण म्हणजेच आत्मनिर्भर असणारी आणि आणि पर्यावरणीयदृष्ट्या अनुकूल असणारी गाव हेच आपल्या जिल्ह्याचे वैभव आहे.

३८८ गावे वगळण्याचा निर्णय घातक

जाता जाता महाराष्ट्र शासनाने नुकतीच इको सेन्सेटिव्ह झोन मधून पश्चिम घाटातील 388 गाव बघण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे खाणकाम मोठमोठे विनाशकारी प्रकल्प आणि धरणे यांना परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे परंतु यातून होणारी निसर्गाची हानी जर वेळीच रोखली नाही ही तर निसर्ग वादळ बनून धडा शिकवत असतो. त्यामुळे इथला निसर्ग पर्यावरण आणि कोकणीपणा असाच राखला जावा असे आवाहन या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केलं तरी वावगे ठरणार नाही.

Related posts

शिक्षक, समाज आणि व्यवस्थेला अंतर्मुख करणारी चिकित्सा : ‘शोध काटेमुंढरीचा’

वडणगेतील हिंदू-मुस्लिम ऐक्याची मोहरमची आदर्श परंपरा

ट्रायफेड देणार आदिवासींच्या 177 उत्पादनांना भौगोलिक मानांकन

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406