October 18, 2024
book review of Avadale te Nivadale by satish pandit
Home » Privacy Policy » आवडलं ते निवडलं ….चोखंदळ निवडीचा प्रत्यय !
मुक्त संवाद

आवडलं ते निवडलं ….चोखंदळ निवडीचा प्रत्यय !

कोरोनाचा काळ हा सर्वांसाठीच भयाण काळ होता. संपूर्ण जगच जणू नजरकैदेत होतं.’ सातच्या आत घरात ‘ नव्हे तर दिवसभर घरात अशी अवस्था झाली होती. पण या बंदीवासाचाही अनेकांनी उपयोग करुन घेतला. आपल्या सुप्त गुणांना वाव देऊन किंवा बरेच दिवस मनात असलेली योजना पूर्ण करुन मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करणारे जे होते त्यापैकी एक म्हणजे अभिजीत पाटील.

सुहास रघुनाथ पंडित, सांगली.
9421225491

चिंतेऐवजी चिंतनाला आपलेसे करुन त्यांनी या काळात एक कलाकृती निर्माण केली. अभिजीत पाटील हे स्वतः एक कवी असल्याने त्यांना कवितेविषयी प्रेम, आकर्षण असणे स्वाभाविक आहे. कविता – रती या काव्याला वाहिलेल्या नियतकालिकाचे संपादक डाॅ. आशुतोष पाटील यांनी काही वर्षांपूर्वी ‘ काव्यमुद्रा ‘ हे पुस्तक संपादित केले. हे पुस्तक म्हणजे कविता – रती या त्यांच्या नियतकालिकातील निवडक कवितांचा संग्रह आहे. या ‘काव्यमुद्रा ‘ मधील विशेष आवडलेल्या कवितांचा संग्रह म्हणजे अभिजीत पाटील यांचे ‘आवडल ते निवडलं’ हे कोरोना काळानंतर प्रकाशित झालेल पुस्तक.

प्रथम ‘कविता-रती’ , नंतर ‘काव्यमुद्रा’ अशा दोन वेळेला निवडलेल्या कवितांतून अभिजीत पाटील यांनी पुन्हा आपल्या आवडीनुसार निवड केली आहे. त्यामुळे साहजिकच या संग्रहात दर्जेदार, निवडक कविता वाचायला मिळतात. पण केवळ कविता न निवडता त्यांनी प्रत्येक कवितेवर भाष्यही केले आहे. त्यामुळे प्रत्येक कवितेचा त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ, त्यातील सौंदर्य त्यांनी उलगडून दाखवले आहे. त्यामुळे कविता समजून घेणे, त्या कवितेबद्दल त्यांचे मत काय आहे ते जाणून घेणे शक्य होते.

या संग्रहासाठी त्यांनी चाळीस कविता निवडल्या आहेत. यामध्ये वा. रा. कान्त, शंकर रामाणी, शंकर वैद्य , कुसुमाग्रज, शांता शेळके यांसारख्या मागील पिढीतील कविंच्या कविता निवडल्या आहेत. कल्पना दुधाळ , नागराज मंजुळे , प्रशांत असनारे, केशव सखाराम देशमुख, दासू वैद्य, महेश केळुसकर अशाआजच्या पिढीतील नामवंत कवी कवयित्रींच्या कविताही निवडल्या आहेत. त्यामुळे विचारांची आणि विषयांची विविधता अनुभवायला मिळते.

कविता, हायकू, रुबाया , गझल अशा विविध प्रकारातील कविता आपण वाचू शकतो. त्यावरील अभिजीत यांनी केलेले भाष्य वाचताना त्यांचे कविता या साहित्य प्रकाराविषयी काय चिंतन झाले आहे व ते कवितेविषयी किती गंभीरपणे विचार करत आहेत याची कल्पना येते. ‘ कवितेकडे आपल्याला डोळसपणे बघायला हवे. एखादी कविता जीवनाकडे वेगळ्या नजरेतून बघायला शिकवते ‘ असे त्यांचे मत आहे. दुस-या एका ठिकाणी ते म्हणतात ‘ काव्य निर्मिती वेदनेची बाजू मांडणारी असू शकते किंवा कवितेच्या निर्मितीमागे जळजळणारी वेदना हे कारण असू शकते.’ अशा पद्धतीने प्रत्येक कवितेचा विषय आणि आशय लक्षात घेऊन त्यांनी त्या कवितेविषयीचे स्वतःचे मत व्यक्त केले आहे.हे करत असताना नकळतपणे कविता या साहित्य प्रकाराविषयीच प्रकट चिंतन झाले आहे.त्यांनी म्हटले आहे,

‘ कविता या विषयावर अनेक कविता, कवितेच्या व्याख्या व व्याख्याने आपण ऐकतो. त्या संबंधातील लेखन वाचतो, तरीही कविता म्हणजे नेमकी काय याचा शोध घ्यावाच वाटतो.’हे पुस्तक म्हणजे हा शोध घेण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

अन्य कविंच्या कविता वाचून त्या लोकांसमोर ठेवणे, त्यावर आपण भाष्य करणे हा वेगळा प्रयोग या पुस्तकाद्वारे श्री.पाटील यांनी केला आहे. त्यांनी हाती घेतलेल्या साहित्य चळवळीतील तो एक महत्वाचा टप्पा ठरेल. अन्य कविंच्या कविता वाचून त्यावर चिंतन करावे अशी प्रेरणा सर्वांना या पुस्तकामुळे मिळेल अशी आशा आहे.त्यातच या पुस्तकाचे यश सामावले आहे.

पुस्तकाचे नाव : आवडलं ते निवडल
लेखक : अभिजीत पाटील, 9970188661
मूल्य : रु.१२०|-
प्रकाशक : शब्द शिवार प्रकाशन, 9423060112


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading