सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अभ्यासक्रमात डॉ. अशोक कौतिक कोळी यांच्या ‘अशानं आसं व्हतं’ या ग्रंथाचा समावेश
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या देशातील प्रमुख नामांकीत विद्यापीठातील अभ्यासक्रमात जामनेर येथील साहित्यिक कवी डॉ. अशोक कौतिक कोळी यांच्या ‘अशानं आसं व्हतं’ या ललित लेख संग्रहाचा समावेश झाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी (एम.ए.) मराठी द्वितीय वर्ष अभ्यासक्रमात जून 2024 पासून कुमारसाहित्य या अभ्यासक्रमांतर्गत ‘अशानं आसं व्हतं’ या ललित लेख संग्रहाची निवड झाली आहे.
डॉ. अशोक कौतिक कोळी हे, जळगाव जिल्हा जामनेर तालुक्यातील सुनसगाव बु ह्या गावचे रहिवासी आहेत. पूर्व खानदेशातील ह्या छोट्या खेडे गावात त्यांचे बालपण गेले. आपल्या बालपणीच्या आठवणी, शालेय शिक्षण व जडणघडण सोबतच तेथील निसर्ग, शेतीभाती व लोकजीवन – लोकसंस्कृतीचा बोलका पट खास खानदेशी तावडी बोलीत या ग्रंथात चितारला आहे. या निमित्ताने लेखकाचे बालपण व खानदेशी लोकजीवन व लोकसंस्कृतीची जडणघडण, खानदेशी तावडी बोलीचा लहेजा यांची वाचकांना, अभ्यासकांना नव्याने ओळख होणार आहे.
या ग्रंथातील बहुतेक लेख साधना साप्ताहिकातून पूर्व प्रकाशित झालेले आहेत. त्यावेळी सुद्धा वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. पुणे येथीलच नामांकित साधना प्रकाशन संस्थेने ग्रंथरूपाने हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. सुनसगाव बु या खानदेशातील छोट्याशा खेड्यातील लेखकाचे उपेक्षित भावविश्व विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे विद्यापीठात अभ्यासले जाणार आहे हा मोठाच बहुमान आहे. या अगोदरही ‘अशानं आसं व्हतं’ हा ग्रंथ अमरावती येथील संत गाडगे बाबा विद्यापीठ अभ्यासक्रमात वाङमय पारंगत (एम.ए.) मराठी साठी अभ्यासाला आहे.
सोबतच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या एम.ए.मराठी अभ्यासक्रमात डॉ. अशोक कौतिक कोळी यांच्या बहुचर्चित, सुप्रसिद्ध ‘पाडा’ या कादंबरीचा समावेश आहे. तर नामांकित अशा मुंबई विद्यापीठ बी.ए. च्या अभ्यासक्रमात ‘चुराडा’ या कथेचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ , पुणे यांनी देखील इयत्ता चौथी मराठी बालभारती पाठ्यपुस्तकात कोळी यांच्या ’धूळपेरणी’ या कवितेचा समावेश केलेला आहे. डॉ. अशोक कौतिक कोळी हे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गोंडखेल ता.जामनेर येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित आहेत. इयत्ता सहावी मराठी बालभारती पाठ्यपुस्तकात त्यांची ‘हिम्मत द्या थोडी’ ही कविता मागील अभ्यासक्रमात होती. नुकतेच त्यांचे ‘पाऊसपिसारा’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यात पावसाची विविध रूपं दर्शविणाऱ्या दर्जेदार गेय कविता आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.