December 3, 2024
Bhagwat of Agriculture Agriculture during the time of Saint Eknath
Home » शेतीचे भागवत : संत एकनाथकालीन शेती
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतीचे भागवत : संत एकनाथकालीन शेती

सामान्य माणसाला आपलं म्हणणं पटवण्यासाठी नाथांनी सतत शेतीमातीतली उदाहरणं दिलेली आहेत. त्यामुळे भागवतात सतत शेतीचे संदर्भ येतात. या लेखात आपणाला प्रामुख्यानं या शेतीसंदर्भाचा छडा लावायचा आहे.

इंद्रजीत भालेराव

॥ शेतीचे भागवत : संत एकनाथकालीन शेती ॥

चक्रधर आणि ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून आपण यादवकालीन शेती समजून घेतली. तोपर्यंत मुस्लिम राजवट इथं आलेली नव्हती. मुस्लिमांनी जरी दहाव्या शतकानंतर भारतावर हल्ल्याला सुरुवात केलेली होती तरी महाराष्ट्रापर्यंत यायला त्यांना वेळ लागला. पण ते आले आणि भरभराटीला आलेली इथली सगळी कृषीव्यवस्था उध्वस्त झाली. पुढची पाचशे वर्षे स्थिती तशीच राहिली. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांना फारच वाईट दिवस आले. सामान्य शेतकऱ्यांची जमीन जहागीरदारांची झाली, जे मुळीच शेतात राबणार नव्हते. गुलामांकडून ती शेती कसली जाणार होती. राजाचा आणि प्रजेचा जिव्हाळ्याचा, सौहार्दाचा संबंध संपुष्टात आला. राबणाऱ्यांवर सतत जुलुमच होत राहिला.

सुरुवातीच्या काळात मुस्लिम आक्रमक असल्यामुळे विध्वंसकही होते. त्यांनी शेतीचीही नासधूस केली. उदाहरणार्थ धारच्या भोज राजाने इसवीसनाच्या अकराव्या शतकात भोपाळजवळ बेटवा नदी बांध घालून अडवली आणि सिंचनासाठी एक मोठे धरण तयार केले. मुस्लिम आक्रमकांनी त्या धरणाचा बांध फोडून नासधूस केली. मुस्लिम राजवटीतच जमीनदारीचा उदय झाला. पण मुस्लिमांची सुरुवातीची ही आक्रमक वृत्ती हळूहळू कमी होत गेली. कारण ते आता इथले राज्यकर्ते झालेले होते.

अकबराच्या चांगल्या राजवटीमुळे या स्थितीत थोडी सुधारणा झाली. सोळाव्या शतकापासून अकबरामुळे शांतीचं वातावरण पुन्हा सुरू झालं. अकबरानं शेतीत पुष्कळ सुधारणा केल्या. विजयनगरच्या सम्राटानेही याच काळात काही चांगले निर्णय घेतले. शेरशहा सुरीने पाचच वर्षे पण चांगलं राज्य केलं. त्यानं शेतकऱ्यांकडं विशेष लक्ष दिलं. शेतकऱ्यांची लूट थांबवून त्यानं रस्ते आणि सिंचनाच्या सुविधांकडं लक्ष दिलं. अकबरानं तीच परंपरा पुढं सुरू ठेवली. त्यानंतरच्या मुघल सम्राटांनी मात्र शेती विकसित करण्याऐवजी स्वतःच्या ऐय्यासीसाठी फुलबागा विकसित केल्या. या पार्श्वभूमीवर आपणाला त्या काळातली शेती समजून घेण्यासाठी एकनाथ महाराज उपयोगी पडतात. कारण त्या काळात एकनाथमहाराजांशिवाय सजगपणे लिहिणारा दुसरा कुणीही नव्हता.

शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज हे काळाच्या दृष्टीनं पाहू जाता ज्ञानदेव-तुकारामांचा मध्यबिंदू म्हणता येतील. त्यांचा जन्म मराठवाड्यातल्या पैठणचा. इ. स. १५३३ मधला. सुरुवातीचा गुरुगृही अध्ययन करण्याचा आणि नंतर गुरुसोबतच्या तीर्थयात्रेचा कालखंड सोडला तर उर्वरित आयुष्यातला चाळीस वर्षांचा कालखंड त्यांनी पैठण इथंच घालवला. प्रचंड म्हणावी अशी काव्यरचना केली. त्यात अभंग, भारुड, गवळणी आणि आणखी काही स्फूट रचना येतात. पण त्यांनी मराठीत निर्माण केलेले दोन महाग्रंथ म्हणजे भावार्थ रामायण आणि एकनाथी भागवत यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. दोन्ही ग्रंथांचा व्याप अवाढव्य आहे. भावार्थ रामायणाची ओवीसंख्या चाळीस हजाराच्या घरात आहे. तर भागवताची ओवी संख्या अठरा हजार आहे. एकनाथांच्या एकूण कवितेची गणना पाऊण लाखाच्या घरात आहे. इतकी मोठी काव्यरचना करणारा दुसरा कोणीही मराठी कवी नाही. शिवाय नाथांची सर्वच रचना लोकप्रिय आहे. सामान्य बहुजनांमध्ये त्यांची भारुडं आणि गवळणी अत्यंत लोकप्रिय आहेत. पारावरच्या पोथ्यांमध्ये भावार्थरामायण आणि भागवत अत्यंत लोकप्रिय आहेत. घरगुती पारायणासाठी रुक्मिणीस्वयंवर आघाडीवर असते. तर विद्वानांमध्ये त्यांच्या काही रचनांची चर्चा होते. म्हणजे एकाच वेळी नाथ संतकवी, पंडितकवी आणि लोककवीही आहेत. असे तिन्ही कवीलोकांत स्थान मिळविणारे कवी देखील मराठीत दुसरे कुणीच नाहीत. नाथांच्या वाट्याला हे भाग्य आलेले आहे.

आपला हा लेख प्रामुख्यानं नाथांच्या भागवतातल्या शेतीचे संदर्भ शोधण्यापुरताच मर्यादित आहे. या दृष्टीकोनातून नाथ भागवताचे वाचन करताना लक्षात येतं की नाथांच्या मनात शेती कायम घर करून आहे. जागोजाग ते आपले म्हणणे शेतीतले संदर्भ देऊन पटवताना दिसतात. आपले विवेचन करताना त्यांच्यासमोर चटकन उदाहरणं येतात ती शेतीतलीच. हे सगळे वाचताना मला तर सतत शंका येते की, नाथांच्या मालकीची शेती असावी आणि लक्ष घालून ते शेती करत असावेत. त्याशिवाय का माणसाला शेतीतले इतके तपशील माहीत असतात ? एकनाथांना ज्ञानेश्वर, तुकारामासारखी जगण्याच्या साधनांची ददाद नव्हती, असे संदर्भ त्यांच्या चरित्रात येतात. मग त्यांच्या जगण्याचे साधन काय होते ? केवळ कथाकीर्तन हे एकमेव साधन नक्कीच नसावे. नाथांसारखा माणूस व्याजव्यवहार करणेही शक्य नाही. तेव्हा शेती शिवाय दुसरा पर्याय काय ?

नाथ बहुजनांची बाजू घेतात, संस्कृत या देववानीपेक्षा मराठी या लोकबोलिला महत्त्व देतात, या कारणांमुळे त्यांचा मुलगा त्यांच्यावर नाराज होता. त्यामुळेच हरी पंडित हा त्यांचा एकुलता एक मुलगा वरील कारणांसाठी नाथांवर रुसून काशीला निघून गेला. बहुजनांच्या कैवार घेताना नाथांना आपल्या लाडक्या मुलांशीही संघर्ष करावा लागला. तो त्यांनी केला. पण शेवटी हरीपंडिताला आपल्या बापाचं म्हणणं पटलं आणि बापाच्या विनंतीला मान देऊन तो काशीहून परत आला. नाथ त्याला आणायला काशीला गेले, तेव्हा तिथंच त्यांनी मराठी भागवतकथेची रचना केली. सुरुवातीला विरोध करणाऱ्या काशीच्या विद्वानांनी नाथांचं भागवत वाचून पाहिल्यावर ते इतके प्रभावित झाले की त्यांनी नाथांच्या भागवताची हत्तीवरून मिरवणूक काढली आणि मग नाथांचा मुलगा हरी पंडिताचाही विरोध मावळला आणि तो नाथांसोबत परत पैठणला आला.

नाथांनी भागवताची रचना जरी काशीला केलेली असली तरी त्यांच्या डोळ्यासमोर सतत महाराष्ट्रच होता. आणि जरी तो ग्रंथ विद्वानांना आवडला असला तरी त्यांच्या डोळ्यासमोर सतत महाराष्ट्रातला सामान्य माणूसच होता. या सामान्य माणसाला आपलं म्हणणं पटवण्यासाठी नाथांनी सतत शेतीमातीतली उदाहरणं दिलेली आहेत. त्यामुळे भागवतात सतत शेतीचे संदर्भ येतात. या लेखात आपणाला प्रामुख्यानं या शेतीसंदर्भाचा छडा लावायचा आहे.

भागवताच्या तिसऱ्या अध्यायात सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय समजावून सांगताना नाथांना शेती, शेतकरी आणि पिकाचेच रूपक आठवते. नाथ म्हणतात,
तेथ जें जें स्थळाकारे व्यक्त । तें तें करूं लागे अव्यक्त
जेवी पेरलें पिकोनी शेत । स्वये वाळत उष्णकाळी ॥
तृणादी नाना बीजे क्षिती । स्वभावे वार्षिये विरुढती
तेची शारदिये नाना व्यक्ती । सफळीते होती सुपुष्ट ॥
तेची ग्रीष्माच्या अंति । फळमूळ मोडोन व्यक्ती
बीजें लीन होती क्षिती । तैसी काळगती संसारा ॥
जेवी वसंताचे अलीकडी । वृक्षाची होय पानझडी
तेवी ब्रम्हादिकांची पखडी । काळ झोडी निजसत्ता ॥
जेवी का वाळलिया शेत । कृषीवळू मळू लागे समस्त
ठेवी व्यक्त्ताचे अव्यक्त । काळ त्वरित करू लागे ॥
(भा. अ. ०३ ओ. १५२ – ५६)

शेतातली पिकं आणि जंगलातल्या वनस्पती मातीत रुजतात, उगवतात, फळतात, पिकतात मग पुन्हा मातीत मिसळतात आणि पुन्हा पुढच्या पावसाळ्यात रुजून त्या उगवतात. हेच सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाचे रूपक आहे, असे नाथ समजावून सांगतात. लेकराच्या मायेनं वाढवलेलं पीकही शेतकरी शेवटी कापून काढतो. कारण तो सृष्टीचा नियमच आहे, असे नाथांना सांगावयाचे आहे. हीच गोष्ट पुढच्या चौथ्या अध्यायात नाथ नेटकेपणानं साररूपात दोनच ओव्यात मांडून दाखवतात,

जो शेताची पेरणी करी । तोची राखे, देखे, सोकरी
तोची वाळलियावरी । सवंगणी करी सर्वाची ॥
तेवी उत्पत्ती काळी तोची ब्रह्मा । स्थिती काळी तोची विष्णू नामा । प्रलय काळी ही रुद्रप्रेमा । ये पुरुषोत्तमा तेची नामे ॥ (भा. अ. ०४ ओ. ६१ – ६२)
जणू इथं शेतकऱ्याला नाथ ब्रह्मा, विष्णू आणि महेश याची उपमा देत आहेत. पेरणी, राखणी, मळणी करणारा शेतकरी जसा एकच असतो, तसाच सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय ही कामं करणाऱ्याची नावं जरी ब्रम्हा, विष्णू , महेश अशी वेगवेगळी असली तरी त्या एकाच शेतकऱ्यांप्रमाणे तो जगन्नियंताही शेवटी एकच असतो, असे नाथ समजाऊन सांगतात.

का अनावृत मेघजळा । धरणे धरुनी घालीजे तळा
मग नेमेची ढाळे ढाळा । पिकालागी जळा काढीजे पाट ॥ (भा. अ. ०५ ओ. २१६ )
जमिनीवर पडून अनावरपणे वाहून जाणारं पावसाचं पाणी धरणात साठवून ठेवलं तर पाट काढून पाहिजे तेव्हा ते पिकाला देता येतं, असं नाथ सांगतात. जणू पाचशे वर्षांपूर्वीच त्यांनी जायकवाडी प्रकल्पाची जाणीव करून दिलेली होती. पुढच्या अकराव्या अध्यायात तर त्यांनी हीच गोष्ट आणखीच संगतवार पद्धतीनं पटवून दिलेली आहे,
मळा शिंपावया लागोनी । मोट पाट उपाय दोन्ही ।मोटा काढीजे विहीरवणी । बहुत कष्टोनी अतिअल्प ॥
मोट नाडा बैल जोडी । अखंड झोडीता आसूडी । येता-जाता ओढा ओढी । भोय भिजे थोडी भाग एक ॥ तेथही मोट फुटे का नाडा तुटे । ओडव पडे बैल अवचटे । तरी हाता येतां पीक आटे । बोल तुटे तात्काळ ॥ तैसा नव्हे सरितेचा पाट । एक वेळ केल्या वाट । अहर्निशी घडघडाट । चालती लोट जीवनाचे ॥
(भा. अ. ११ ओ. १३१ – ३४)

नाथांनी इथं मोटेच्या आणि पाटाच्या पाण्याची केलेली तुलना पाहण्यासारखी आहे. मळा भिजवण्यासाठी मोट आणि पाट हे दोन उपाय आहेत. मोटेच्या पाण्याला फार फार कष्ट पडतात. मोट, नाडा, बैलजोडी अशी कितीतरी साधनं जमवावी लागतात. बैलांना आसूडानं मारून येरझारा कराव्या लागतात. तेव्हा कुठं जमिनीचा थोडासा तुकडा भिजतो. त्यातही नाडा तुटला, मोट फुटली, बैल उरफाटले असा प्रकार झाला तर, तूट पडून पीक वाळून जाऊ शकतं. पण पाटाच्या पाण्याचं तसं नसतं. एकदा तुम्ही पाट लावून दिला की रात्रंदिवस हवं तेवढं पाणी तुम्ही घेऊ शकता. नाथांचं हे निरीक्षण किती सूक्ष्म आहे, हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. पुढं दहाव्या अध्यायात नाथांनी शेतीच्या अडचणींचा पाढा वाचला आहे. स्वर्गप्राप्तीच्या प्रयत्नात जसे अनंत अडथळे येतात तसेच शेती करतानाही शेतकऱ्याला कसं अनंत अडचणींना सामोरं जावं लागतं ते सांगताना नाथ म्हणतात,
कष्टोनिया बारा माशी । जैसा कृषीवळू करी कृषी ।
त्याच्या फलाआड विघ्णे कैशी । केल्या कष्टाशी नाशक ॥ भूमी शुद्ध, शुद्ध बीज । काळी पर्जन्य कर्ता निरुज । उपकरण सामग्री समाज । पहिले हे ओज पाहिजे ॥ पेरणी झालिया पाठी । देखणे राखणे कुपकाटी । सोकरावे आवशीं पहाटी । आळसू पोटी सांडून ॥ पीक येत येता कणशी । आभाळे हिंसळा पडे त्याशी । का कान्ही पडे पिकाशी । घाली शेताशी निंदणे ॥ गर्वाचा तांबारा पडे । कां अहंतेचा रोग जडे ।
की अधर्माची आळी वाढे । पीक बुडे तेणेंही ॥ सबळ सोकरणे न घडी । तरी आशा तृष्णेच्या भोरडी । किजे पिकाची ओरबडी । दाणा बुडी पुरेना ॥ दंभाची घाटी पडिल्या ठायीं । घाटा दिशे परी दाणा नाही । काम क्रोधाच्या उंदरी पाही । मुळाच्या ठाई करोडीले ॥आल्या विकल्पाची धाडी । शेतामाजी नुरे काडी ।कुवासना टोळाची पडे उडी । समूळ सशेंडी खुराट ॥
एवम कृषीवळाचिया परी । स्वर्गप्राप्तीशी विघ्ने भारी ।
केले कष्ट वृथा करी । भोगू कैशापरी घडेल ॥ (भा. अ. १० ओ. ५११-१९)

या नऊ ओव्या म्हणजे शेतकऱ्याच्या पाठी लागलेल्या नवग्रहांचे वर्णनच आहे. एखाद्या आधुनिक ग्रामीण कवीने शेतकऱ्यांच्या अडचणींचा पाढा वाचावा तसा नाथ शेतकऱ्यांच्या अडचणीचा पाढा वाचतात. बारोमास राब राब राबून शेतकरी शेत कसत असतो. पण येणारी संकटं त्याच्या सगळ्या कष्टावर पाणी फिरवतात. त्या संकटाचा प्रकार तरी एक आहेत का ? तर नाही. ती अनेक मार्गानं येतात. त्यातलं एक संकट जरी आलं तरी ते शेतकऱ्याला समूळ नष्ट करण्यासाठी पुरेसं असतं. मुळात जमीन चांगली पाहिजे, बी बियाणं शुद्ध पाहिजे, पाऊस वेळेवर पडायला पाहिजे, शेतीची सगळी साधनं जुळून यायला पाहिजे, हे सगळं झाल्यावर मग पेरणी होते. पण काम इथंच संपत नाही. आता तर कामांना सुरुवात झालेली असते. कोंब उगवले की हजार प्रकारची संकटं त्यावर धावून येतात. त्यासाठी कुपकाटी लावावी लागते. शेताची राखण करावी लागते. रात्रंदिवस आवस-पुनव न म्हणता आळस-आराम न म्हणता तिथं लक्ष ठेवावं लागतं. पीक कणसावर येताच आभाळ फिरलं तर हिंसाळा पडतो किंवा कानी पडते.

पीक हिंसाळ्या पडलं किंवा पिकात कानी पडली, हे शब्द अजूनही मराठवाड्यातला शेतकरी वापरत असतो. त्यामुळे नाथांचं शेतीनिरीक्षण पुस्तकी नव्हतं तर ते अनुभवाधारीत होतं हेही आपल्या लक्षात येतं. पीक हिसाळ्या पडणं किंवा पिकात काणी पडणं हे शब्द केवळ विद्वांना असणाऱ्यांना समजणं शक्य नाही. ते समजण्यासाठी शेतीचा अनुभव आणि शेतीतलं ज्ञान असणं देखील आवश्यक आहे. नाथांना ते होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढं नाथांनी आणखी तांबारा, आळी आदी रोगांचा उल्लेख केलेला आहे. नंतर भोरड्या कसं पीक ओरबाडून खातात तेही नाथ सांगतात. भोरड्या दाणा सुद्धा शिल्लक ठेवत नाहीत, हेही सांगायला नात विसरत नाहीत. पुढं घाटेअळी, उंदीर यांचा उपद्रव आहे. टोळधाड आली तर सगळं शेत खुराट करून टाकतात, पिकाची काडीही शेतात शिल्लक ठेवत नाहीत, असं नाथ सांगतात. अशा प्रकारे कितीतरी विघ्नं शेतीच्या वाट्याला येतात आणि शेतकऱ्यांनी केलेले कष्ट वाया घालवतात. हे कोणत्या जन्माचे भोग शेतकऱ्याला भोगावे लागतात ते न कळे, असंही निराश होऊन शेवटी नाथ म्हणतात,
बीज अधिकाधिक पेरीता
उल्हास कृषीवळाचे चित्ता (भा. अ. १४ ओ २४७)
शेतकऱ्यांचं दुःख व्यक्त करणाऱ्या वरील ओव्यांसोबतच नाथांची ही ओवी वाचली आणि पेरणीचा आनंद व्यक्त करणारी ना. धो. महानोर यांची कविता आठवली,
रुजे दाणा दाणा
ज्येष्ठाचा महिना
मातीतला गंध ओला
चौखूर दिशांना
पाखराचे पंख आम्हा
आभाळ पुरेना
एका ठिकाणी नाथांनी जमिनीच्या पोताच्या संदर्भात दोन ओव्या फार सुंदर लिहिलेल्या आहेत,
कोणे एके पृथ्वीतळी ।मेघ न वर्षता जळी ।
पेरीली धान्य सदा निळी । वसुधा जिव्हाळी ते म्हणती ॥ तेची पाहता पृथ्वीवरी। एके भागी गा उखरी । मेघ वर्षता शरधारी । अंकुरेना डीरी अखरत्वे ॥ (भा. अ. २१ ओ. ८१ – ८२)

इथं नाथांनी जमिनीचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. एक जिव्हाळ आणि दुसरी उखर. त्यालाच आजच्या भाषेत आपण काळीची आणि खडकाळ जमीन असं म्हणतो. काळीची जमीन ओल धरून ठेवते. त्यामुळे तिथं कमी पाऊस पडला तरी पीक चांगलं येतं आणि खडकाळ जमीन ओल धरून ठेवत नाही म्हणून तिथं पाऊस चांगला पडला तरी पीक मात्र चांगलं येत नाही. माणसांमध्ये देखील जिव्हाळ आणि उखर माणसं असतात, हे आपणाला माहीतच आहे.
कितीही दुष्काळ पडला तरी पेरणीसाठी राखून ठेवलेलं बी खरा शेतकरी कधीही दळून खात नाही या संदर्भात नाथांनी लिहिलं आहे,
शेती पेरावया आणिले चणे । त्याचे आदरे करी जो फुटाणे । तो शहाणा की मूर्ख म्हणने । तैसे फळ भोगणे सकामी ॥ (भा. अ. २१ ओ. २७०)
शहाणा कधीच कोंबडी मारून खात नाही. तो नेहमीच अंडी खातो. कारण एकदा कोंबडी मारून खाल्ली की अंडी मिळण्याचा मार्ग संपतो. पण काही जणांना अशी घाई झालेली असते, जेमतेम पेरणी करेपर्यंत त्याला दम निघतो, पण पिक येईपर्यंत वाट पाहण्याची सहनशक्ती त्याच्याजवळ नसते. नाथांनी पुढील ओव्यांतून तेच सांगितले आहे.
कष्टोनी शेती पेरिले चणे । त्याची उपडोनी भाजी करणे (भा. अ. २१ ओ. २६६) ओला जोंधळियाची करबाडे । खाता अत्यंत लागती गोडे । त्यालागी शेत जै उपडे । तै लाभू की नाडे निजस्वार्था॥ (भा. अ. २१ ओ. २६८)
अशी हातघाईवर आलेल्यांची आणखीही काही उदाहरणं भागवतात पाहायला मिळतात.
बाबडे बीज पेरल्या शेती । पिकास नाडले निश्चिती ।
शेखी निजबिजा नागवीती । राजे दंडुनी घेती करभार ॥ (भा. अ. २१ ओ. ३१३)

वरील ओवीतला पहिलाच जो शब्द आहे ‘बाबडे बीज’ तो फार महत्त्वाचा आहे. भागवताच्या एका पोथीत बाबडे ऐवजी बापडे असंही मला दिसलं. कदाचित त्या पोथीच्या संपादकाला बाबडे हा शब्द माहीत नसावा. त्याला वाटलं असावं हे बाबडे नाही बापडे असावं. म्हणून त्याने तो बदल करून घेतला असावा. तो शब्द बऱ्याच जणांना माहीत नसतो. तो शब्द नेमकेपणानं समजून घ्यायचा असेल तर आपणाला आधी शेत समजून घ्यावं लागतं. शेतात मुगाचं पीक काढायला येतं, तेव्हा पावसाळ्याचे दिवस असतात. एखादेवेळी पीक पक्व होऊन काढायला येतं आणि पाऊस काही उघडायला तयार नसतो. तेव्हा पक्व पीक भिजत राहतं. ते भिजल्यामुळे त्यातले मूग फुगतात. नंतर पीक काढून ते वाळलं की बरं दिसतं. पण शेतकरी त्याला मूग बाबडले असं म्हणतो. असे बाबडलेले मूग पुन्हा पेरण्याच्या लायकीचे राहत नाहीत. कारण ते सुरुवातीला भिजले तेव्हाच फुगून आल्यामुळे त्याची उगवण शक्ती उमलून मावळलेली असते. असं बी शेतात पेरलं तर ती फुकाची नागवन होय, असं एकनाथ वरील ओवीत म्हणतात. ते मला फार महत्त्वाचं वाटतं. जसं बाबडं बी पेरण्याच्या लायकीचं नसतं, तसंच ज्या पेवात पाणी शिरलं त्या पेवातलं धान्यही पेरण्याच्या लायकीचं राहत नाही. तेही एकनाथ एकदोन ठिकाणी सांगतात,
पेवी रिगालेया पाणी । त्या धान्याची नव्हे पेरणी (भा. अ. ११ ओ. १०२६) पाणी रिगे पेवाआत । तेणे धान्य नासे समस्त । धडू झोंबोनी हरी शेत । दैवहत तो झाला ॥(भा. अ. २३ ओ. १३२)

असे पेवाचे संदर्भ जागोजाग येतात. कारण त्या जुन्या काळात धान्य साठवण्याचं ते एक महत्त्वाचं साधन होतं. आजच्यासारखे गोदाम किंवा शीतगृह तेव्हा उपलब्ध नव्हते. तेव्हाच्या शेतकऱ्यांसाठी हे पेव हेच गोदाम किंवा आणि शीतगृह होते. हे पेव म्हणजे जमिनीत खड्डा खोदून त्यात ज्वारी ठेवणे. त्यासाठी या पेवाचं एक स्थापत्यशास्त्र होतं. त्या पद्धतीनं ते पेव तयार करण्यात येत असे. त्यामुळे धान्य खराब होणार नाही आणि भिजणार नाही याची काळजी घेतली जात असे. पण पाऊस खूप झाला की कधीकधी ह्या पेवात पाणी शिरत असे. आणि नाथांनी वरील ओव्यात सांगितलेली परिस्थिती निर्माण होत असे. नाथांना पीकशास्त्रही बऱ्यापैकी माहीत असावं, असं अनेक ओव्या वाचताना आपल्या लक्षात येतं. त्याचे हे काही नमुने,
जेवी जळ बिज क्षोभूनी । दोनी दळे उलवुनी । डीरू निघाला त्यातूनी । तरतरुनी तिवणा पै ॥ (भा. अ. २४ ओ. १०६) जेवी वर्षाकाळी नाना तृणे । वाढोनी शरदकाळी होती पुर्णे । तीच उष्णकाळी बीज कणे ।
होती सुलीने पृथ्वीशी ॥ (भा. अ. २४ ओ ५००)
कणाची वाढी भुसापासी । कण निडारे भुसेसी । तो कण यावया हातासी । सांडीत भुसासी पाखडोनी ॥(भा. अ. २५ ओ. ७१) करुनी पिकाची सवंगण । जेणे कोंडेनी वाढले कण । तो कोंडा सोडोनी जाण ।
कण घ्यावे ॥ (भा. अ. ३१ ओ. ४०९)
भूस किंवा कोंडा याच्यामुळेच पिकाची वृद्धी होते. पण भूस आणि कोंडा सोडूनच आपणाला कण घ्यावे लागतात. पिकाचं पोषण कोंड्यामुळेच होतं, हे नाथांचं निरीक्षण मला महत्त्वाचं वाटतं. त्याआधीच्या ओव्यांमध्ये गवताच्या बिजाची रुजवन कशी होते आणि गवत कसं वाढीला लागतं, ते नाथांचं निरीक्षणही मला महत्त्वाचं वाटतं. पीकशास्त्राविषयीची अशी अनेक निरीक्षणं आपणाला नाथभागवतात विपुल प्रमाणात पाहायला मिळतात. नाथांच्या उसाच्या संदर्भातल्या या काही ओव्या,
जे का मूळ बिजाची गोडी । तोची स्वादू वाढला वाढी

कांडोकांडी स्वादू परवडी । अधिकार गोडी उसासी ॥(भा. अ. १२ ओ. ४१०) ऊस सर्वांगे बीज सकळ ।
बीजरूप ऊस सफळ ॥ ( भा. अ. १२ ओ. ४४२) ऊस गाळीता रस होय । तो ठेवीलेया बहुकाळ न राहे ।
त्याला आळुनिया पाहे । गुळ होय सपिंड ॥ (भा. अ. १६ ओ. १८)
उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे वर्णन असलेल्या या काही ओव्या,
गोठणी शेणया रोगू पडे । निमाले गाईम्हशींचे वाडे ॥(भा. अ. २३ ओ. १३३) गेले शेत निमाली कुळवाडी ।
घर पडीले परचक्रधाडी । धन नासले नाही कवडी ॥(भा. अ. २३ ओ. १४०) हिंसाळ्याने गेले शेत ।(भा. अ. २३ ओ. १२८)
वरील ओवीत परचक्रधाडीमुळेसुद्धा शेतकरी कसा उद्ध्वस्त होतो, त्याचा उल्लेख आलेला आहे. आपल्या देशात आलेल्या मुस्लिम आक्रमकांनी अशाच प्रकारे शेत आणि शेतकरी उध्वस्त केल्याचे संदर्भ इतिहासात पाहायला मिळतात. नाथांनीही ते पाहिलेलं असावं. म्हणून वरील संदर्भ त्यांच्या ओवीत आलेला असावा.

नाथांच्या भागवताचे एकूण अध्याय ३१ आहेत. ३१ वा अध्याय हा कळसाध्याय आहे. या अध्यायात नाथांनी ३१ अध्यायांची रूपरेषा सांगितलेली आहे. आपण नेमकं कोणत्या अध्यायात काय सांगितलं आहे, याची उजळणी नाथ या अध्यायात करतात. ही सगळ्या अध्यायांची रूपरेषा नाथ शेतीच्या रूपकातूनच सादर करतात. म्हणून हा ३१ वा अध्याय हाच या लेखाचाही कळसाध्याय आहे. नाथ सांगतात पहिल्या अध्यायात साधकाने आपल्या भूमीची निवड कशी करावी ते सांगितलं आहे. पुढच्या अध्यायातून जनक राजाने विचारलेल्या नऊ प्रश्नांची नऊ उत्तरं म्हणजे या नऊ नांगरांनी केलेली निवडलेल्या भूमीची मशागत आहे. त्या भूमीतल्या जुनाट पालव्या आणि खूट समूळ उखडून ती जमीन आधी समान करून घेतलेली आहे. पावसाळ्यात जमीन वाफेवर आली की, त्यात ब्रह्माचे निजबीज पेरलेले आहे. त्यात चाडे कोणते ? नळे कोणते ? दोर कोणते ? तेही नाथांनी सविस्तर सांगितलेले आहे. त्या शेताभोवती चोवीस गुरूंचा खंदक खोदून त्याचा बंदोबस्तही केलेला आहे.

नंतर भजनाची गोफण करून भोरड्या उडविलेल्या आहेत. अकराव्या अध्यायात हुरडा, ओंब्या आणि घोळाणा तीळगुळासोबत चाखवला आहे. तेराव्या अध्यायापर्यंत पिकाची निष्पत्ती पूर्ण झालेली आहे. चौदाव्या अध्यायात समाधीभांडारात साठवलेले पीक भक्तांना मिळावे त्यासाठी भक्ती सांगितली आहे. पंधराव्या अध्यायात झडप घालणाऱ्या सिद्धीपासून आपले धान्य कसे वाचवावे ते सांगितले आहे. सोळाव्या अध्यायात अमाप पिकलेल्या पिकाची साठवण कशी करायची ते सांगितले आहे. सतराव्या व अठराव्या अध्यायात शेताचे जे चार अधिकारी चौवर्ण त्यांचे काम सांगितले आहे. एकोणिव्या अध्यायात भुसापासून दाणे वेगळे करणे कसे आवश्यक तेही सांगितले आहे. गुणदोषरुपी चोरापासून आपला वाटा कसा राखावा तो विषय एकविसाव्या अध्यायात येतो. पुढील काही अध्यायात या चोरांची आई माया ही कशी फसवून आपले भांडार लुटते ते नाथ सांगतात. हे पीक शेवटपर्यंत कसे सांभाळावे, त्याचे उपाय पुढील काही अध्यायातून येतात. या शेतीच्या मोठ्या रूपकाच्या पोटात आणखी मूळ भागवतासाठी एक उपरूपक येतं, तेही शेतीचंच. ते इथं मुद्दाम नाथांच्या शब्दात देतो आणि थांबतो.

श्री भागवत महाक्षेत्र । तेथ ब्रह्मा मुख्य बीजधर । नारद तेथ मिरासीकर । पेरणी विचित्र तेणे केली ॥
येथ श्रीव्यासे अतिशुद्ध । बंधारे घातले दशविध । पीक पिकले अगाध । स्वानंदबोध निडारे ॥ तेथ शुक बैसला सोंकारा । तेणे फोडीला हरीकथा पागोरा ।
पापपक्षांचा थारा । उडविला पुरा निःशेष ॥ त्याची एकादशी जाण । उद्धवे केली सवंगण । काढिले निडाराचे कण । अतिसधन कृष्णोक्ती ॥(भा. अ. ३१ ओ. ४४३ – ४६)
( नाथभागवतातल्या या कृषीविषयक ओव्या निवडण्यासाठी कवीमित्र हरीश कवडे यांनी खूपच मोलाची मदत केलेली आहे. त्यांचे खूप खूप आभार.)

संदर्भ :
१. श्री एकनाथी भागवत – सं. सोमेश्वर महाराज ढाळेगावकर, ज्ञानराज आश्रम श्रीक्षेत्र ढाळेगाव, जि. लातूर
२. वै. श्री. नानामहाराज साखरे सांप्रदायिक सार्थ श्री एकनाथी भागवत – अर्थ व संपादन – दिवाकर अनंत घैसास, धार्मिक प्रकाशन संस्था, पुणे ३०, (२०१६)
३. एकनाथ चरित्र – ल. रा. पांगारकर, वरदा प्रकाशन प्रा. लि. पुणे – १६ (२०१३)
४. श्री. एकनाथ : वाङ्मय आणि कार्य – न. र. फाटक, मौज प्रकाशन गृह, मुंबई – ४ (२०११)
५. संत एकनाथ दर्शन – लेखसंग्रह सं. हे. वि. इनामदार, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे – ३० (२०१४)
६. श्री. एकनाथ : परंपरा आणि प्रभाव – डॉ. र. बा. मंचरकर, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे – ३० (२०१४)
७. भारत मे कृषी – रणजीत सिंह, नॅशनल बुक ट्रस्ट (२०००)
८. मध्ययुगीन भारत : एक सांस्कृतिक अभ्यास – इरफान हबीब, अनुवादक – विजया कुलकर्णी, नॅशनल बुक ट्रस्ट (२०१३)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading